Skip to main content

इतिहासापलीकडचं जर्मनी

इतिहासापलीकडचं जर्मनी

र्मनी, दुसऱ्या जागतिक महायुद्धातील एक अजरामर अध्याय.दोन तीन वर्षांपूर्वी जर्मनीतील हिटलरच्या समर हाऊस संदर्भात एक लेख वाचनात आला होता त्याच वेळी जेव्हा केव्हा संधी येईल त्यावेळी जर्मनीला भेट द्यायचीच असे मनाशी पक्के ठरवलं होतं आणि मागच्या वर्षी तो योग जुळून आलाच. आमच्या आत्तापर्यंतच्या युरोप सहलींमध्ये स्वीत्झरलँड,फ्रान्स सारख्या मुलांना आकर्षण वाटेल अशाच देशांचा प्रामुख्याने समावेश होता त्यामुळे पूर्णपणे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं जर्मनी मुलांना कितपत रुचेल ह्याबद्दल आम्ही जरा साशंकच होतो पण मुलांना इतिहासाशी वास्तवात तोंडओळख करून देणारा जर्मनी मात्र यूरोपमधील आत्तापर्यंतच्या पाहिलेल्या इतर सगळ्या देशांपेक्षा आमच्या सगळ्यांच्याच मनात कायमस्वरूपी घर करून गेला.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या यंत्रणा,सोयीसुविधारस्त्याच्या कडेने डोलणारी ट्युलिप्स, जिथे नजर पोहचेल तिथे डोळ्यांना सुखावणारं लोभस हिरवंगार निसर्गसौंदर्य आणि संपन्न ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्यांचा अलौकिक संगम म्हणजे जर्मनी.राखेतून फिनिक्स पक्षाने भरारी घ्यावी तसं दुसऱ्या महायुद्धात पूर्ण बेचिराख झालेला हा देश घडून गेलेल्या इतिहासाची साक्ष देत आज दिमाखात उभा आहे. आमच्या सहलीदरम्यान जर्मनीची आर्थिक राजधानी अगदी त्यांच्या राजधानीपासून ते पिटुकल्या गावापर्यंत आम्ही सहा ते सात शहर पालथी घातली पण प्रकर्षाने जाणवली ती एकचं गोष्ट,देशाची आर्थिक राजधानी असो व मूठभर लोकवस्तीचं छोट्यातलं छोटं गाव असो आपापली सामाजिक जाणीव टिकवून आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपून पर्यावरणाची तसूभर हानी होऊ न देता आणि देशाच्या कोणत्याही सार्वजनिक वा नैसर्गिक मालमत्तेचा ऱ्हास न करता सगळ्या यंत्रणा राबविल्या जातात. 





आमच्या ह्या जर्मनी भटकंतीची सुरुवात  फ्रँकफर्ट पासून झाली. आर्थिक राजधानीचा मान असल्यामुळे फ्रँकफर्टमधे मुंबईसारखेच आवर्जून पाहण्याजोगें विशेष काही नाही पण ऱ्हाईन रिव्हर क्रुसचा आनंद घ्यायचा असेल तर फ्रँकफर्ट वरून जाता येतं.  



कलोन मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच कॅथेड्रल आहे तसेच चॉकोलेट प्रेमींसाठी पर्वणी असलेलं एक आगळंवेगळं चॉकलेट म्युझियम सुद्धा आहे. ह्या म्युझियम मध्ये चॉकलेट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याबरोबरच जगप्रसिद्ध Lindt चॉकलेट्स चाखण्याचीही संधी मिळते.आजही दुसऱ्या महायुध्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेली जर्मनीतील दोन प्रमुख शहरं म्हणजे म्युनिक आणि बर्लिन. जर्मनीच्या विलीनीकरणापूर्वी पूर्व जर्मनीची आर्थिक वा राजकीय राजधानी असलेल्या बर्लिनचा एकंदर आवाका पाहून शहरातील वेगवेगळी ठिकाणं पिंजून काढण्यासाठी आम्ही तिथल्या यलो लाईन सिटी टूर होहो (हॉप ऑन हॉप ऑफबस सर्विसचा आश्रय घ्यायचं ठरवलं. मर्यादित दिवसात आणि मोजक्या वेळात संपूर्ण शहराचं स्थलदर्शन करायचं असेल तर हा सगळ्यात सोयीचा आणि पैसे वसूल सुयोग्य तोडगा आहे . पण ह्या सिटी टूरने मात्र आम्हाला जर्मनीचा काटेकोर शिस्तप्रियपणा ,वक्तशीरपणा आणि त्यामुळे पर्यायाने येणाऱ्या निष्ठुरपणाची चुणूक दाखवलीच. ज्या दिवशी आम्ही ह्या होहो बसने दिवसभर भटकंती करायचं ठरवलं त्यादिवशी नेमकी बर्लिनमध्ये कसलीशी रॅली आयोजित करण्यात आली होती. ह्या रॅलीमुळे सगळ्याच सिटी टूर्सच्या हो हो बसेस त्यांच्या सुनिश्चित थांब्यांवर नियोजित वेळेच्या अर्धा ते पाऊण तास उशिराने पोहचत होत्या. सामान्यपणे ह्या सिटी टूर्स च्या बसेस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत पूर्ण बर्लिनमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने धावतात पण त्यादिवशी मात्र हे वेळापत्रक बिघडलं. संध्याकाळचे पाच वाजले तेव्हा आम्ही शेवटून तिसऱ्या थांब्यावर होतो. पण घड्याळाचा काटा पाचवर येताक्षणी बस सर्विसची वेळ संपल्यामुळे तुम्हा सर्वांना इथेच उतरून आपापली परतीची सोय पाहावी लागेल असे सांगत पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीची यत्किंचितही पर्वा न करता तो बस चालक आम्ही जिथे होतो तिथे आम्हा सर्वांना उतरवता झाला. सर्व पर्यटकांना पुन्हा सुरुवातीच्या थांब्यावर सोडण्याची जबाबदारी न घेता . आता काय बरं करावं ह्या चिंतेत असतानाच आम्हाला त्याच हो हो सर्विसची रॅलीमुळे अशीच उशिराने धावत असलेली एक बस मागून येताना दिसली आणि आम्हा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. फारच मिनातवाऱ्या आणि विनवण्या केल्यावर त्या बसच्या ड्राइव्हरहने काहीशा नाराजीनेच आम्हा सगळ्यांना पुढल्या स्टॉप पर्यंत सोडण्याची तयारी दाखवली त्यामुळे त्याच्या आंबट चेहऱ्याकडे फारसे लक्ष न देता आम्ही सगळ्यांनीच चोराच्या हाताची लंगोटी म्हणत मिळत असलेल्या संधीच मुकाट लाभ घ्यायचं ठरवलं. ह्यातून निघणारा निष्कर्ष एकच जर्मनीत नियम म्हणजे नियम. मग पर्यटक असोत किंव स्थानिक रहिवासी कोणालाही सवलत नाही. येणारे पर्यटक जर्मनी बद्दलची काय प्रतिमा मनात घेऊन मायदेशी परततील ह्याची अजिबात भ्रांत नाही. टेक इट ऑर लिव्ह इट. आपल्याकडील पुणेकर मंडळी बहुदा तरी ह्या तुसड्या जर्मनांचेच वंशज असावेत. असो. सांगण्याचा मुद्दा हा की जर्मनीला जेव्हा केव्हा भेट देण्याचा विचार कराल  तेव्हा आधी शिस्त व वक्तशीरपणा अंगवळणी पडून घ्या नाही तर काही खरं नाही. हे राष्ट्र स्वित्झरलँडसारखे टुरिस्ट फ्रेंडली राष्ट्र नाही. किंबहुना पर्यटंकाची आम्हाला गरज नाही पर्यकांनाच जर्मनी पहायला येण्याची हौस आहे असाच काहीसा ह्यांचा बाज आहे. त्यातून जर का तुम्ही इंडियन टुरिस्ट असाल तर मग आनंदच. काही  अंशी आपणही आपल्या बेफिकीर व बेशिस्त वृत्तीमुळे जबाबदार असलो तरी इतिहास काळापासूनच भारतीयांबद्दल असलेली घृणा,चीड आणि अनास्था फ्रान्स, इटली व जर्मनीत आजही बऱ्यापैकी अनुभवाला येते .काळ बदलला,जग बदललं,तंत्रज्ञान बदललं पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाला कार्स व पर्फुम्स उद्योगांमध्ये सर्वोत्तम जागतिक दर्जाचे मर्सिडीज, BMW सारखे ब्रॅण्ड्स देणारी ही राष्ट्रे मात्र वर्णभेद आणि वंशभेदाच्या मामल्यात मात्र आजही मागासलेलीच वाटतात. आपल्या भारतीयांप्रमाणेच 'अतिथी देवो भव ह्या उक्तीचं अनुकरण करणारं युरोप मधील एकमेव राष्ट्र म्हणजे स्वित्झर्लंड. स्विस लोक मात्र पर्यटकमित्र आहेत . तसं तर जर्मनांची शिस्तप्रियता,उद्यमशीलता,वक्तशीरपणाची प्रचिती जर्मनीची फिरताना पावलोपावली आपल्याला येतेच. पण त्यांच्या काटेकोर शिस्तीचा हा मासला मात्र नक्कीच पचनी पडणारा नव्हता.

बर्लिनच्या ह्या अशा पाहुणचारणानंतर आता वेळ होती ईगल्स नेस्ट ला भेट देण्याची. जे  ह्या सगळ्या सहलीच्या नियोजनाचं मूळ होतं. आमच्या bucket लिस्ट मधील  एक मस्ट सी असं डेस्टिनेशन, ज्यासाठी ह्या सहलीचा सगळा प्रपंच मांडला गेला. ऑस्ट्रिया जर्मनीच्या सरहद्दीवर ६०१७ फूट उंचीवर बांधले गेलेलं हे ईगल्स नेस्ट म्हणजे हिटलरचं समर हाऊस, ‘kehlsteinhaus' . स्थापत्यकार मार्टिन बोरमनच्या अथक परिश्रमातून साकारलेली एकमेवाद्वितीय रचनाकृती. सुमारे ३००० कामगारांनी १३ महिने अहर्निश खपून बोरमानाच्या ह्या कल्पनेला प्रत्यक्षात मूर्त रूप दिलं. हे समर हाऊस म्हणजे मार्टिन बोरमनने हिटलरला त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाप्रीत्यर्थ दिलेली भेट. उन्हाळ्यात दोन महिने हिटलर ह्या घराचा वापर आपल्या अत्यंत विश्वासातील अधिकाऱ्यांशी गोपनीय राजकीय चर्चा व भेटींसाठी करत असे. ह्या इमारतीच्या आत पर्वताच्या बरोबर मध्यभागी चारशे सहा फूट उंच बोगदा खणून बसविलेला पितळी एलिव्हेटर आजही नव्याने बसविल्यासारखा चमकतो.हिटलरची त्याकाळची बहुचर्चित मैत्रीण इवा ब्राउन जरी आपल्या मित्रमैत्रिणींची सरबराई करण्यासाठी ह्या समर हाऊसचा उपयोग करीत असे तरी प्रत्यक्ष हिटलर ने मात्र फक्त १७ वेळा ह्या  समरहाऊस मध्ये वास्तव्य केल्याची नोंद आहे . ६०१७ फूट उंचीवर पूर्ण वर्षभर बर्फाच्छादित असलेलं हे फूट उंचीवर वर्षभर हिमाच्छादित असलेलं ईगल्स नेस्ट हे मार्टिन बोरमनच्या आणि एकूणच संपूर्ण जर्मनीच्या स्थापत्यकला व तंत्रज्ञान नैपुण्याचा मानबिंदू आहे.



जिथे एकीकडे ह्या ईगल्स नेस्ट वरून दिसणारं विहंगम दृश्य आणि हलका झिरझिरणारा हिमवर्षाव मनाला उभारी देतो,मन टवटवीत करतो  तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मनाला सुन्न आणि विषण्ण करणारी जर्मनीच्या इतिहासातील पराकोटीची लज्जास्पद आणि अमानवीय स्मृती म्हणजे म्युनिकचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प. सत्तर हजार ज्यूंना गॅस चेंबर मध्ये कोंबून मारण्याची आणि हजारो युद्ध कैद्यांवर महायुद्धादरम्यान झालेल्या अनन्वित अमानुष अत्याचारांची जीवंत साक्ष.जर्मनीला अतिशय रोचक अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे इथे वेगवेगळे राजवाडे,स्मारकं पाहायला मिळतात. 








पण आता सगळे प्रासाद स्मारकं पाहून आलेला शीण घालवण्यासाठी  एक सुंदर नेचर वॉल्क आणि ब्लॅक फॉरेस्ट केकची टेस्टिंग सफर तो बनतीही है. पण ह्याचा अनुभव मात्र प्रत्यक्ष ब्लॅक फॉरेस्ट प्रांतात गेल्याशिवाय घेता येणं अशक्यच. किंबहुना ह्या प्रांतावरूनच ह्या केकचे ब्लॅक फॉरेस्ट असं नाव पडलं . पण ह्या भागाची ख्याती केकपुरतीच मर्यादित नाही तर आपण लहानपणापासून अप्रूप बाळगत आलेल्या जगप्रसिद्ध कुक्कुज क्लॉक ची जन्मभूमी सुद्धा हीच.मनाजोगती घड्याळाची खरेदी आणि ऑथेंटिक ब्लॅक फॉरेस्ट केकने क्षुधाशांती केल्यावरच आम्हा सर्वांचा आत्मा तृप्त झाला.

नेचर वॉल्क हा तिथपर्यंच्या प्रवासाचा शिणवटा घालवणारा आमच्या सहलीचा अखेरचा टप्पा.इतक्या सुंदर निसर्गरम्य जर्मनीच्या आमच्या १५ दिवसांच्या मनमुराद भटकंतीचा सुखांत आणि आता पुन्हा मुंबईला परतल्यावर त्याच चाकोरीबद्ध आयुष्यात आपल्याला स्वतःला झोकून द्यावं लागणार ह्या कल्पनेनं शोकांत सुद्धा होता. पण प्रत्येक उदयास आलेल्या सुंदर सुखद गोष्टीचा अंत हा असतोच तसा आमच्या सहलीचाही झाला आणि अतिशय जाड मनाने आम्ही आमची पावलं मुंबईच्या दिशेने वळवली अत्यंत रम्य आठवणी कायमच्या मनात कोरूनच .


माधुरी गोडबोले-माईणकर 


१२ नोव्हेंबर २०१९

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...