ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)
"Travel is the only expense that makes you rich",अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन ते विमान तिकिटं,हॉटेल बुकिंग्स यासाठी हाताशी तीनचारच दिवस असल्यामुळे अर्थातच सगळं युद्धपातळीवर पार पाडावं लागलं.मागच्या महिन्याभरात आधी पूर्वांचल आणि महिनाअखेरीस काश्मीर अशा हिमालयाची दोन विभिन्न रूपं ल्यायलेल्या प्रदेशांची ओळख झाली.आपण जे म्हणतो "आयुष्य एक शाळा आहे, अनुभव त्यातला शिक्षक,आयुष्याच्या विविध वळणांवर आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती ह्या त्या शाळेचा अभ्यासक्रम आणि आपण त्याचे आजन्म विद्यार्थी "ते म्हणजे नेमकं काय हे आम्हाला ह्या पाठोपाठच्या दोन सहलींमध्ये उलगडलं.आयुष्यातला अजून एक नवीन वस्तुपाठ शिकण्याची आमची अथश्री जरी ह्या दोन्ही सहलींमध्ये भेटलेल्या परस्पर विरोधी शैक्षणिक पार्श्वभूमीच्या आमच्या दोन बहुआयामी सारथ्यांपासून झाली असली तरी एकूणच ह्या दोन्ही सहलीत भेटलेल्या एक से एक अशा बहुढंगी,बहुरंगी माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अभ्यासताना आम्ही खूप काही शिकलो.
ठरल्या दिवशी दुपारपर्यंत श्रीनगरला एअरपोर्टवर पाऊल टाकता क्षणी आम्हाला पहिला सुखद धक्का मिळाला.सामानसुमान उचलून एअरपोर्टवर बाहेर पडतो ना पडतो तोच,अगदी शिडशिडीत बांध्याचा,नुकती वयाची एकविशी उलटलेला कोवळा लाल गोरा तरुण,आमचा ड्राइवर नाही तर सारथी सलीक़,हातात सुरेख पुष्पगुच्छ घेऊन अतिशय अदबीने आमच्या स्वागतासाठी पुढे आला.सोनमर्ग,गुलमर्ग,पहलगाममध्ये तिथलीच गाडी स्थलदर्शनासाठी वापरायची सक्ती असल्यामुळे,वारंवार गाड्या बदलण्याचा आमचा खर्च आणि त्रास वाचवण्यासाठी आमच्यासाठी तो स्वतःची खाजगी गाडी घेऊन आम्हाला न्यायला सज्ज होता.कोणा ड्रायव्हरने आमचं असं हृद्य स्वागत करण्याचा आमचा हा पहिलावहिला प्रसंग .. पण हे आमच्यासाठी फक्त ट्रेलर असणार आहे ह्याची आम्हाला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती,पूरी पिक्चर देखनी तो अभी बाकी थी ..... .मी त्याला ड्राइवर असं न संबोधता सारथी का म्हणतेय ते पुढे कळेलच,हा ड्राइव्हर आमच्या मागच्या अरूणाचल प्रदेशाच्या सहलीत झालेल्या स्नेह्यांची आम्हाला अविस्मरणीय भेटच म्हणायला हवी.श्रीनगरला पोहोचेपर्यंत मध्यान्हीचा सूर्य डोक्यावर अंमळ जरा चळचळतच होता, पोटात कावळेही कोकलत होते.आधी पुष्पगुच्छ आणि नंतर रमादान असल्यामुळे स्वतःचा कडक "रोझा" सुरू असतानासुद्धा आमचे भुकेने व्याकुळलेले चेहरे पाहून ज्या समंजसपणे सलीक़ने आमच्या शाकाहाराला साजेशा अशा रेस्तराँ पाशी गाडी थांबवून क्षुधाशांती करून घेण्याचं सुचवलं तेव्हाच कुठेतरी त्याची माणूस म्हणून आम्हाला थोडीबहुत ओळख व्हायला सुरूवात झाली होती.प्रवासाचा काहीसा थकवा शिवाय पुढच्या दिवशीचा आमचा लांब पल्ल्याचा कार्यक्रम पहाता पहिल्याच दिवशी फार कोलांट्या उड्या न मारता त्याच्या मदतीने त्यादिवशी आम्ही श्रीनगरमधलीच जवळपासची ठिकाणं पालथी घालण्यावर समाधान मानलं.सध्याची काश्मीरची वादग्रस्त परिस्थिती पहाता संपूर्ण श्रीनगरमध्ये प्रत्येक रस्त्यावर आणि सीमेवरच्या परिसरात तर हमखासच आपल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची आणि सशस्त्र सैन्याची दिवसरात्र गस्त असते. त्यामुळे एखाद्या भेदरलेल्या पोराला आईवडील दृष्टीस पडल्यावर जितकं सुरक्षित वाटेल तसंच काहीसं आम्हाला वाटलं.असो.
झोजीला पासच्या विघातकपणाचं भान ठेवून आपलं सैन्य रोज अगदी नेमक्या गाड्या ह्या पासमधून सोडतं.त्यामुळे भल्या सकाळी साडेसहाच्या ठोक्याला सलीक़ आम्हाला कारगीलला घेऊन जाण्यासाठी हजर होता.आदल्या दिवशी झालेल्या दमदार पावसाने आणि उंचीवरच्या भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे हवेत गारवा नाहीतर चांगला गारठा आला होता.सकाळच्या कोवळ्या उन्हात वाटेवरच्या निसर्गसौंदर्यांमध्ये स्वतःला नखशिखांत न्हाऊ घालत आमचा प्रवास सुरु असताना एकीकडे त्याच्याशी पण गप्पा सुरु झाल्या.त्या गप्पांच्याच ओघात तो अगदी नुकताच लखनऊ युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट क्लास विथ honours मिळवून सिव्हिल इंजिनिअर झाल्याचं कळलं.इतकंच नाही तर सध्या तो पदव्युत्तर शिक्षणासाठी Gate परीक्षेची तयारी सुद्धा करतोय हे ऐकून तर आमची तोंडं उघडी ती उघडीच राहिली.पण अर्थार्जन तर अर्थार्जन आणि शिवाय स्वतःची फिरण्याची हौस अशी पर्यटकांबरोबर फिरून आपोआपच फिटते हा ह्या सगळ्या उद्योगामागचा दुहेरी उद्देश.
ज्यांना साहसी खेळांची दांडगी हौस आहे त्यांनी झोजीला,पटणी टॉप,नथुला,सेला,बुमला,खारडुंगला अशा घाटातून प्रवास करून आपली भूक शमवून घ्यायला काहीच हरकत नाही.जगलो,वाचलो पुन्हा भेट अशी अवस्था ... अशा घाटांमधून वाहन हाकणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही,मातब्बर मंडळीच इथे वाहन हाकू जाणे.भूस्खलन किंवा हिमस्खलन होणं आणि कोणती ना कोणती गाडी दरीत कोसळणं हे जसं नित्याचंच,त्यामुळे सलीक़चं कोवळं वय, घाटाच्या रस्त्याची दयनीय अवस्था आणि घाटाचं रौद्र रूप हे तिन्ही पाहून आम्ही तर खरे अंतर्बाह्य सर्द पडलो होतो.पण ज्या सफाईने आणि आत्मविश्वासाने एकीकडे वरच्या दरडींवर,बाजूला खालच्या खोल दरीकडे आणि शिवाय पुढच्या खड्ड्यांमध्ये असलेल्या रस्त्यावर नजर खिळवून तो गाडी हाकत होता ते पाहून किमान आमच्यासाठी तरी झोजिला वैकुंठ पास ठरणार नाही ह्याबद्दल आम्हाला यत्किंचितही शंका राहिली नाही.
झोजिलाच्या दोन बाजूंची दृश्यं एकदम विरुद्ध.झोजिलाच्या एका बाजूला हिरवळच हिरवळ तर झोजिला ओलांडल्यावर फक्त रबाड वाळवंट,ते ही डोळ्यांना न सुखावणारं.झोजिलापासून साधारण तासभर अंतरावर द्रास जिल्ह्यात कारगिलचं युद्ध स्मारक आहे.हा द्रास जिल्हा पूर्वी जरी काश्मीरचा हिस्सा होता तरी २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर तो आता नव्याने तयार झालेल्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. सायबेरिया नंतर मनुष्यवस्ती असलेला जगाच्या पाठीवरचा दुसरा अतिशीत असा हा भूभाग,जिथे १९९५ मध्ये ऐन हिवाळ्यात तापमान उणे ६० पर्यंत गेल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसात तापमान उणे ३० अंश सेल्शिअस पर्यंत जाणं ही काही इथे नाविन्याची बाब नाही.कारगिलचं युद्ध कडाक्याच्या थंडीत न होता इथल्या उन्हाळ्यात सुरु झालं एवढंच काय ते आपल्या जवानांचं नशीब थोर म्हणायचं.कारगिल युद्धस्मारकाच्या मागे युद्धात गोळीबाराने काळा झालेल्या टोलोलिंग पर्वतावर आज गवताची साधी एक काडी सुद्धा उगवत नाही,आजही हा टोलोलिंग त्या गोळीबाराच्या खुणा आपल्या अंगावर वागवत कारगिलच्या युद्धाची साक्ष देतो आहे.कॅप्टन विक्रम बत्रा जरी त्याच्या "ये दिल मांगे more"ह्या घोषवाक्यामुळे आपल्या सगळ्यांनाच परिचित असला तरी कॅप्टन मनोज पांडेचं ह्या युद्धातलं योगदानसुद्धा तितकंच मोलाचं आहे.युद्ध स्मारकावर कॅप्टन मनोज पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा ह्यांच्या समाधीसह ह्या युद्धात शाहिद झालेल्या आपल्या ५२७ जवानांना अतिशय मनापासून आदरांजली वाहून आम्ही भीमबाटकडे रवाना झालो. ह्या भीमबाट गावात एक विशिष्ट दगड आहे जो आख्यायिकेप्रमाणे पांडवांच्या अज्ञातवासात भीमाचं घट्ट झालेलं शरीर आहे.असं मानलं जातं की एखाद्या स्त्रीला जर का गर्भधारणा होत नसेल तर तिने ह्या दगडाची थोडी माती खाल्ली तर तिला गर्भधारणा होते त्यामुळे ह्या गावातला मुस्लिम समुदाय सुद्धा हा दगड जपण्यात तितकाच सक्रिय आहे.शिवाय इथे एक द्रौपदी कुंड आहे,द्रौपदीने स्वर्गात जाण्यापूर्वी ह्या कुंडावर तिने आंघोळ केली होती असा समज आहे.जर्दाळू ही सुद्धा ह्या कारगिलची अजून एक ओळख.त्यामुळे जर्दाळू घेण्यासाठी कारगील इतकी दुसरी योग्य जागा नाही.
पण काश्मीरला निघताना आम्ही खरे काही वेगळाच मनसुबा घेऊन निघालो होतो आणि ते म्हणजे गुरेझचं खोरं.ह्या गुरेझ खोऱ्यामध्ये पाकिस्तानी सैन्य त्यांना मर्जी येईल तेव्हा गोळीबार करतं.भारत पाकिस्तान सीमेवरच्या ह्या खोऱ्याचं सौंदर्य शब्दांत मांडायला शब्दच अपुरे पडतात.गुरेझला पोहोचण्यासाठी तीन वेगवेगळ्या सैन्य चौक्यांवर तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. संध्याकाळी सात ते रात्री बारा इतकाच काय तो पाच तास इथे वीजपुरवठा केला जातो.जिओच्या आणि आमचा ड्राइवर सलीक़च्या कृपेने मागच्या वर्षी इथे लोकांना मोबाइलसेवा उपलब्ध झालीय.. हो बरोबर वाचलंत तुम्ही ,गुरेझ व्हॅलीच्या सुरुवातीच्या गावापासून ते अगदी थेट शेवटच्या गावापर्यंत म्हणजे गुजरान पर्यंतच्या २०० किमी.च्या परीघात वेगवेगळ्या ठिकाणी जिओचे टॉवर्स उभारण्याचं काम ह्या सलीक़ नामक अवलियाने केलेलं आहे हे आम्हाला गुरेझला जातानच्या वाटेवर कळलं.सुरुवातीला त्याने हे सांगितल्या नंतर आधी तर आमचा विश्वासच बसला नाही पण नंतर प्रत्येक टॉवरचं काम त्याने आणि त्याच्या मित्राने कशा पद्धतीने केलं त्याची शास्त्र शुद्ध प्रक्रिया समजावल्यानंतर तर आम्हाला मूर्छा यायचीच बाकी होती.मग cowsite म्हणजे काय,मुख्य टॉवरची site आणि cowsite ह्यांच्यातला फरक,अनिल आंबानीच्या काळात थोडे बहुत उभारले गेलेले मोबाइल टॉवर्स (अर्थातच गुरेझच्या खोऱ्यात नाही) आणि आताचे जिओ टॉवर्स ह्यातला फरक कसा ओळखायचा,एअरटेल आणि जिओच्या टॉवर्स मध्ये काय फरक असतो,त्यासाठी लागणारं कोडींग ते कसे करतात इत्यादी इत्यादी अनेक अमूल्य विषयांवर त्याने आम्हाला ज्ञानामृत पाजलं.हे कमी होतं म्हणून की काय गुरेझच्या वाटेवर राझदान टॉपवर आमचे फोटो काढताना आणि निसर्गाचं सौंदर्य टिपताना फोटोग्राफी मधलं त्याचं कसब पाहून आम्ही जेव्हा त्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा तो त्याच्या अजून एका मित्राबरोबर लग्नसमारंभाचे किंवा कोणत्याही महत्त्वाच्या सोहळ्याचे फोटो काढण्याचं सुद्धा काम करतो हे कळलं.प्रत्येक गोष्ट करायला जमलीच पाहिजे ह्या ध्येयाने झपाटलेला असा हा अवलिया.
ह्या गुरेझ मध्ये किशनगंगा नदी वाहते जी पाकिस्तानमध्ये नीलम नावाने ओळखली जाते.हिच्या पाण्यात जो कोणी पडला तो "हीना" सिनेमातल्या ऋषी कपूरसारखा विनाखर्च पाकिस्तानात जाऊन पोहोचतो,त्यामुळे नदीच्या पाण्यात कोणीही उतरू नये अशी सक्त ताकीद देणारा फलक खोऱ्याच्या सुरुवातीलाच आपल्या सैन्याने नागरिकांसाठी लावलेला आहे.सध्या तिथे ह्या किशनगंगा नदीवर धरण बांधण्याचा प्रकल्प सुरु असल्यामुळे पाकिस्तानकडून तो हाणून पाडण्याचे वारंवार प्रयत्न केले जातात.खोऱ्यात पोहोचल्यावर तिथल्या जवानाला जेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला भारत पाकिस्तान सीमेपर्यंत जायचं आहे तेव्हा तो हसून म्हणाला ,"आहात तर खरे सीमेवर,अजून कुठे जायचंय?",मग जरा अजून उकलून सांगितल्यावर त्याने आम्हाला तारबल गावाचा रस्ता सांगितला.तिथल्या चौकीवर परवानगी मिळाली तरच तुम्हाला भारत पाक सीमा जवळून पाहता येईल हे ही आवर्जून सांगायला तो विसरला नाही.बहुदा तिथून पिटाळले जाऊ याची पूर्वकल्पना त्याला असावी.पण तरीही कदाचित परवानगी मिळेल ह्या आशेवर आम्ही वाट काढत शेवटच्या म्हणजे तारबलच्या चौकीवर पोहोचलो.पण तिथल्या जवानांनी,"तुम्हाला काही झालं तर आम्हाला वर उत्तर द्यावं लागेल,पुढे no man's land आहे,आम्ही इथे तुम्हाला प्रेमाने समजावतो तरी आहोत,तिथे दृष्टीपथात आलात तर सरळ गोळीच घालतील.तुमची सुरक्षा आमची जबाबदारी आहे,त्यामुळे तिथपर्यंत तिथल्या स्थानिक लोकांशिवाय कोणालाच जाण्याची आम्ही परवानगी देत नाही," हे सांगितल्यानंतर निराश होऊन परतण्याशिवाय तर पर्यायच नव्हता आम्हाला.तारबल हे गुरेझमधलं भारतपाक सीमेवरचं शेवटचं गाव. ह्या गावात पाकिस्तानी सैन्याकडून आकस्मिक केल्या जाणाऱ्या गोळीबाराचं सतत सावट असल्यामुळे आपल्या सरकारने इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बंकर्स बांधलेले आहेत.पण ह्या अशा अतिसंवेदनशील भागात राहत असण्याची नकारात्मक बाजू अशी की आपल्या सरकारकडून ह्या गावकऱ्यांना मोफत वीज,पाणी,अन्नधान्य पुरवलं जात असल्यामुळे इथला एकही माणूस उद्योगधंदा करत नाही.उलट जे पैसे ह्यांना सरकारकडून मिळतात त्यातून वाचवून काहींनी आपल्या घरात खाजगी बंकर्स सुद्धा बांधलेले आहेत.सकाळी गुरेझ सोडताना लागोपाठ फटाके वाजल्यासारखा जोरदार आवाज झाल्यावर आम्ही जरा चपापालोच,त्या आवाजाने बावचळलले आमचे चेहरे पाहून जवळच्या आर्मी पोस्ट वर आपल्या सैनिकांचं firing चं प्रशिक्षण सुरू असल्याचा सलीक़ने लागलीच हसत हसत खुलासा केला.
गुलमर्गला जाताना श्रीनगर गुलमर्गचा हायवे घेण्याच्या ऐवजी जवळचा रस्ता म्हणून सलीक़ने बारामुल्ला, सोपोर चा रस्ता धरला होता. सोपोर मधून तंगमर्ग मध्ये घुसतानाच नेहमीच्या टुरिस्ट गाडीऐवजी खाजगी वाहन पाहून जवानाने गाडी अडवली.बारामुल्ला सोपोर मधून अतिरेक्यांची बहुतांशी वेळा घुसखोरी होत असल्यामुळे हमखास गाड्यांची झाडाझडती आणि गाडीमधल्या पुरुष प्रवाशांची झडती घेतली जाते. आम्ही मुंबईहुन काश्मीरला फिरायला आलोय कळल्यावर सलीक़ समोरच जवान आम्हाला म्हणाला ,"इन कश्मिरीयों का बिलकुल भरोसा मत करना । " शिवाय सलीकला पण त्याने दम भरला,"तेरी गाडी का नंबर नोट कर रहा हूं मैं।अगर इन्हें कुछ हुआ तो तुझे कूट डालूंगा, याद रखना ।" तिथपर्यंतच्या प्रवासादरम्यान काहीही खरंतर अप्रिय असं घडलेलं नसताना, का कुणास ठाऊक पण त्या जवानाचे शब्द नंतर कितीतरी वेळ आमच्या कानात घुमत राहिले.त्या पार्श्वभूमीवर ट्रिपचे तीन एक दिवस बाकी असताना सलीक़ने जेव्हा ट्रिपच्या अखेरच्या दिवशी काश्मिरी काहवा पिण्यासाठी आम्हाला त्याच्या घरी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं तेव्हा फारच द्विधा मनःस्थिती झाली.पण त्याने त्याच्या घरी काहवाला येण्याचं आमच्याकडे इतकं लावून धरलं की त्याचं मन आम्हाला मोडवेना.
ट्रीप संपायच्या आदल्या दिवशी सलीक़ अगदी आग्रहाने आम्हाला त्याचं घर दाखवायला घेऊन गेला.छान टुमदार तरी प्रशस्त असं दुमजली घर त्याने स्वतः जातीने लक्ष घालून अगदी निगुतीने सजवून घेतलंय.घरचा फेरफटका होईपर्यंत त्याच्या आई आणि वहिनीने वेलकम ड्रिंक म्हणून सुक्या मेव्यासहित ज्यूस आणि अस्सल काश्मिरी काहवा पेश केला.काश्मीरला निसर्गाचं वरदान आहे.एरव्ही मुंबईत आपण गलेलठ्ठ पैसे देऊन विकत घेत असलेले बदाम,अक्रोड,जर्दाळू,चेरी,सफरचंद,स्ट्रॉबेरी,ब्ल्यू बेरी,ब्लॅकबेरी,रेड बेरी, अशा ज्या कोणत्या निसर्गात अस्तित्त्वात असतील नसतील त्या नानाविविध बेरीज,सगळे सुके मेवे आणि फळं आणि सर्वात महत्त्वाचं "केशर"इथे मुबलक प्रमाणात होत असल्यामुळे,मिळतातसुद्धा आपल्या खिशाला परवडतील अशा भावात.त्यामुळे खरेदी करायला अगदी दुकानात जरी गेलात तरी ते सुका मेवा आणि काश्मिरी काहवाने हटकून तुमचं स्वागत करतात.जेवणापूर्वी हात धुवायला राजेमहाराजांच्या काळात जसं पाण्याची सुरई आणि हात धुतलेलं पाणी गोळा करण्यासाठी भांडं धरलं जायचं तसं शाही पद्धतीने आमचा जेवणापूर्वीचा हात धुण्याचा सोहळा उरकला.ट्रिपमध्ये कधीतरी मी त्याला नद्रू याखनी किंवा याखनी पुलाव सारखे काश्मिरची खासियत असलेले पदार्थ कुठे चाखायला मिळतील असं सहजच विचारलं होतं,ते लक्षात ठेवून त्याने आवर्जून आपल्या वहिनीकडून ते करून घेतलं होतं.त्याचे भाऊ,वडील,आई,वाहिनी त्यादिवशी दुपारी सगळे त्यांच्या व्यापातून वेळ काढून आमच्यासाठी हजर असलेले पाहून आम्हाला फारच दबल्यासारखं झालं.वास्तविक पाहता आम्ही त्याच्यासाठी खरंतर फक्त टुरिस्ट पण कधी कोणाशी कोणाच्या मनाच्या तारा जुळतील हे काही सांगता येत नाही.संपूर्ण प्रवासात आम्हाला कोणताही त्रास होणार नाही किंवा आमची कुठेही कसलीच फसवणूक होणार नाही ह्याची तो आटोकाट खबरदारी घेत होता.
तर असा गप्पा मारत अस्सल काश्मिरी जेवणाचा कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आम्ही अतिशय जड पोटांनी,मी आयत्या वेळी आमच्या itinerary मध्ये घुसडलेल्या गांदरबल मधल्या खीर भवानी मंदिराकडे निघालो. ही खीर भवानी किंवा राज्ञा देवी काश्मिरी पंडितांची कुलदेवी.रावणाच्या भक्तीवर ही राज्ञा देवी प्रसन्न होऊन सिलोन मध्ये स्थिरावली पण नंतर त्याच्या अत्याचारी वागण्याने व्यथित झालेल्या राज्ञा देवीने हनुमंताला ह्या गांदरबल जिल्ह्यातल्या तुल्मुलमध्ये स्वतःला स्थापित करण्याची विनंती केली आणि तेव्हा पासून तिचा इथे वास आहे असं म्हणतात. ही देवी ज्या छोट्याशा कुंडामध्ये स्थापित केलेली आहे त्या कुंडाचं पाणी एरव्ही तर नेहमीसारखंच दिसतं पण जेव्हा कोणत्या संकटाची चाहूल लागते तेव्हा त्याचं पाणी काळसर लाल दिसतं असं म्हणतात. ज्येष्ठ अष्टमीला देवीचा वर्धापन दिनाचा इथे मोठा उत्सव असतो,ज्यात देवीला खिरीचा नेवैद्य दाखवला जातो म्हणून ह्या देवीचं नाव पडलं "खीर भवानी "किंवा "क्षीर भवानी".अशाच टिक्कर आणि कुपवाडा मधल्या खीर भवानीच्या देवळांचा आपल्या सैन्याने जीर्णोद्धार केलाय.
कोरोनाने जगभर हात पाय पसरल्यानंतर त्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेचं सुकाणू पुढे करून आपल्या विमान कंपन्यांनी स्वतःचे खिसे भरण्याच्या ज्या वेगवेगळ्या क्लृप्त्या राबवल्या, त्या कोरोना नाहीसा झाल्यानंतर सुद्धा बिनबोभाट सुरुच आहेत,त्यातलंच एक म्हणजे वेब चेक-इन. प्रवास सुरु करण्याच्या आधी वेब चेक इन नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जात नाही .एअरपोर्ट वर पोहोचल्यावर चेक इन केलं तर माणशी दोनशे रुपये ज्यादा मोजावे लागतात आणि तसं नाही केलं तर पूर्ण पैसे भरलेले असूनही तुमचं तिकीट दुसऱ्या व्यक्तीला देऊ करण्याचा अधिकार ह्या विमान कंपन्यांनी स्वतः कडे ठेवलेला आहे,हे सांगायला नकोच.आदल्या दिवशी तब्बल दीड एक तास झगडून सुद्धा मोबाईलवरून आमचं वेब चेकइन होईना तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो.सकाळी लवकारची फ्लाईट असल्यामुळे सकाळी उठून वेब चेकइन करण्यासाठी हाणामाऱ्या करायला आमच्याकडे पुरेसा वेळही नव्हता. मोबाईल वरून होत नाही तर लॅपटॉप वरून प्रयत्न करून पहावा म्हणून आमचा हिशेब निस्तरण्याच्या निमित्त्याने आम्ही जरा अवघडतच आमच्या homestay च्या मालकीणबाईंना थोड्या वेळासाठी लॅपटॉप वापरायला मिळेल का म्हणून विचारायला गेलो.साधारण सत्तरीच्या घरातल्या आमच्या homestayच्या ह्या मालकीण बाई अतिशय मृदुभाषी,कृतीशील,उद्यमशील आणि मदतीला तत्पर असं व्यक्तिमत्त्व.सगळ्या homestay चा पसारा,शिवाय थोड्याच अंतरावर असलेल्या त्यांच्या कॅफेचा कारभार ह्या वयात एक हाती समर्थपणे सांभाळण्यापासून घेऊन ते ब्रेकफास्ट मध्ये homestay च्या पाहुण्यांसाठी ठेवला जाणारा केक किंवा जेवणामधलं पक्वान्न हे सगळं त्या स्वतः जातीने करतात.आमची अडचण सांगितल्यावर त्यांच्याकडे लॅपटॉप नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या ऑफिसमधला मॅनेजर,दिल्लीत रहात असलेला त्यांचा मुलगा आणि spice jet मधला त्यांचा विश्वसनीय स्रोत सगळ्यांना फोन करून रात्री दहा वाजता आमच्या वेब चेकइन च्या कामाला लावलं.आणि इतकंच नाही तर ते होईपर्यंत त्या स्वतः सुद्धा आमच्या बरोबर काम काहीसं दृष्टीपथात येईपर्यंत जाग्या राहिल्या.त्यांचा मुलगा दिल्लीत बसून आमचं वेब चेकइनचं काम पुढे सरकवत होता तिथपर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या.बोलता बोलता माझी लेक सहज त्यांना म्हणाली," कालचा तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये ठेवलेला केक मला खूप आवडला,मला त्याची रेसिपी मिळेल का?".हे ती विचारते ना विचारते तोच क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी आपल्या नोकराला सांगून लेकीसाठी त्याच फ्लेवरचे चार कपकेक्स पॅक करवून घेऊन तिच्या हातात ठेवले तेव्हा माझी लेक कमालीची संकोचली. रात्री निद्राधीन होईपर्यंत चारही बोर्डिंग पास आमच्या मेल मध्ये आलेले होते.पण तरीही प्रवासाला निघताना आमचा जीव टांगणीला लागू नये म्हणून सकाळी सकाळी सहा वाजता चारही बोर्डिंग पास आम्हाला आमच्या WhatsApp वर पाठवूनच त्या शांत बसल्या.अशी माणसं भेटतात तेव्हा निःशब्द व्हायला होतं.फक्त देवाकडे एकच मागणं मागावसं वाटतं ...
नको मजला दागदागिने नको माणिक मोती
तुझ्या दयेने जुळत राहो अशी अमोल नाती
माधुरी गोडबोले माईणकर
३ मे २०२२
Comments
Post a Comment