Skip to main content

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )


 ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हणजे भारतातलं स्वित्झर्लंड पण मला वाटतं स्वित्झर्लंडला जगाचं काश्मीर म्हटलं पाहिजे.काय ते डोंगर,काय त्या नद्या,काय ते तलाव,काय ती हिरवाई आणि काय ते सौंदर्य सगळंच लई भारी. मग ट्रेक असो नाहीतर ट्रिप कोणतंही निमित्त्य धावतं काश्मीरला जायला. 


  


१९९० मध्ये काश्मीरमध्ये जे काही घडलं ते हृदयद्रावक,गोठवणारं आणि दुर्दैवी होतं त्यामुळे जवळपास दहा वर्षं तरी पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली होती. २००० नंतर मात्र काहीसं मनोधैर्य एकवटून पर्यटकांनी पुन्हा आपली पावलं जरी हळूहळू काश्मीरकडे वळवली तरी आजही काश्मीरमध्ये गेल्यावर तिथल्या वातावरणात एक चमत्कारिक भीती जाणवत रहाते.त्यातून दहशतवादाच्या कधी किरकोळ तर कधी गंभीर अशा काही ना काही घडामोडी होत असतात त्याचीही भर पडते.अमरनाथ यात्रेच्या तोंडावर तर ते ठरलेलंच असतं.काश्मीरमधल्या तरूणांना दगडफेक आणि दहशतवादी कृत्यांपासून परावृत्त करण्याच्या उद्देश्याने आठ दहा वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये कश्मीर ग्रेट लेक्सच्या ट्रेकची सुरुवात झाली.अमरनाथ यात्रेच्या काळातच नेमका ह्या काश्मीर ग्रेट लेक्सच्या ट्रेकचा हंगामही सुरु होतो त्यामुळे काही झालं तरी हाडाच्या भटक्यांना काश्मीरला पूर्णपणे वाळीत टाकता येणं केवळ अशक्यच.ही काश्मीर ग्रेट लेक्सची ट्रेक इंडिया हाईक्स किंवा ट्रेक द हिमालयाज मधून करायची तर म्हणे त्यांच्या त्या ट्रेक्स वर्षभर आधीपासूनच फुल्ल होतात म्हणजे ट्रेकच्या जेमतेम दोन तीन महिने आधी माझ्यासाठी हे दोन्ही पर्याय निकालात निघालेले होते.पण गुगल बाबांच्या कृपेने थोडी झाडाझडती केल्यावर म्या पामराला आसरा देणारी एक ट्रेकिंग कंपनी सापडली एकदाची. 

गडसर पासकडे जाताना  




एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकमुळे मिळालेला आत्मविश्वास म्हणा नाहीतर स्वभावातली खोड पण ही ट्रेक एकट्याने पार पाडण्याइतका आत्मविश्वास वाटत होता.आमच्या दादाभाई नवरोजींनी ह्या ट्रेक मध्ये फारसं गम्य न वाटल्यामुळे कामाची सबब पुढे करून ह्या ट्रेकमधून फार आधीच काढता पाय घेतला होता.ह्या वेळी मी मात्र अन्नपूर्णा सर्किट ट्रेक सारखं मुलांच्या आणि अहोंच्या विरोधाला बळी न पडता एकटीने का होईना पण ह्या ट्रेकसाठी जायचं असं ठरवलेलंच होतं.सोलो ट्रॅव्हलची ही संधी मला सोडायची नव्हतीच.बाकी ट्रेकचं फारसं दडपण नाही वाटलं तरी ट्रेकिंग कंपनीच्या चमूला जॉईन होईपर्यंत श्रीनगरसारख्या ठिकाणी एकटीनेच रहाण्याचं काहीसं चमत्कारिक दडपण तर मनावर होतं.पण तिथला होमस्टे तसा परिचयाचा असल्यामुळे राहण्याच्या ठिकाणची सेफ्टी ही माझ्यासाठी फारशी काळजीची बाब नव्हती.ट्रेकच्या आदल्या दिवशी मी सगळ्या जाम्यानिम्यानिशी श्रीनगरमध्ये थडकले. ट्रेकिंग कंपनीने ज्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दुसऱ्या दिवशी एकत्र जमायला सांगितलं होतं ते ठिकाणही सुदैवाने माझ्या होम्सस्टे पासून खूप लांब नव्हतं.श्रीनगरमध्ये कोणतीच वाहनं मीटर प्रमाणे चालत नाहीत त्यामुळे अगदी जवळपासच्या अंतरासाठी रीक्षा करायची तरी शंभराची नोट मोजावी लागते तेव्हा मुंबईची किंमत कळते. 





पहिल्या दिवशी शीताई बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत सूर्य बुडायलाच आला होता.एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेक मध्ये टी पोस्ट्स मध्ये राहून सामायिक स्वच्छतागृह वापरणं हा जसा एक वेगळा अनुभव होता तसा ह्या ट्रेकमध्ये टेन्ट्स मध्ये राहून आपल्या कोकणात असणाऱ्या पाटीच्या संडासांसारखं सो कॉल्ड पर्यावरण स्नेही स्वच्छतागृह वापरणं हे माझ्यासारख्या स्वच्छतेच्या किड्यासाठी आव्हान असणार होतं. असं पर्यावरण स्नेही स्वच्छतागृह वापरण्याचा माझा पहिलाच आणीबाणीचा प्रसंग, पण तुकाराम म्हणतात ना ,"आलिया भोगासी असावे सादर ,चित्ती असू द्यावे समाधान...". रात्री ट्रेक लीडरने सगळ्यांना थोडक्यात आपापली ओळख करून द्यायला सांगितली तेव्हा कोणी किती हिमालयन ट्रेक्स ह्या ट्रेकच्या आधी केलेल्या आहेत ह्याचीही माहिती घेतली.ज्यांची ही पहिलीच हिमालयन ट्रेक आहे त्यांनी पुढे जायचं कि नाही ह्याचा नक्की विचार करा कारण ही ट्रेक सोपी नाही आणि बिगिनर्ससाठी तर नाहीच नाही अशी काहीशी सूचना वजा चेतावणीही दिली तेव्हा मी फक्त स्वतःला "आल इज वेल " इतकंच बजावलं.मुदिखाईचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात समजावली आणि स्लीपिंग बॅग आणि इको फ्रेंडली टॉयलेट कसं वापरायचं ह्याची पुरेशी कल्पना दिली. स्लीपिंग बॅगचा जसा त्याने ती उघडायची कशी, ती वापरायची कशी आणि सकाळी उठल्यानंतर ती पुन्हा गुंडाळून छोट्याशा बॅगमध्ये कोंबून कोंबून भरायची कशी ह्याचं त्यात झोपून प्रात्यक्षिक दाखवलं तसं टॉयलेट कसं वापरायचं ह्याचं प्रात्यक्षिक न देता नुसतंच समजावलं हे नशीबच म्हणायचं  ....


दिलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेषेवरून प्रत्येक दिवशी किमान १४ ते १५ किलोमीटर आणि एक दिवस साधारण अठरा किमी चालणं असणार आहे ह्याचा अंदाज आला. त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे लवकरच होणार होती.दिलासा फक्त इतकाच होता की पहिल्या दिवशीचा ट्रेकचा कार्यक्रम सकाळी अंमळ थोडा उशीरानेच सुरु होणार होता.पण आमच्या कॅम्पिंग साईटच्या अगदी जवळच असलेल्या मशिदीत पहाटे पहाटे सुरु झालेल्या लाऊड स्पीकरवरच्या अझानने कोणीही पहाटे पाचच्या पुढे झोपणार नाही ह्याची काही न सांगताच तजवीज केली होती त्यामुळे सगळेच गपगुमान पहाटे लवकर आपापली आन्हिकं उरकून चढाई करायला सज्ज होते.ट्रेकला सुरुवात केल्यानंतर काहीसं अंतर चढल्यावर एक आर्मी पोस्ट लागतो जिथे तुमच्या ओळखपत्रांची तपासणी केली जाते. सगळ्या ट्रेकिंग कंपन्यांच्या ट्रेकला येणाऱ्या प्रत्येक चमूचा ह्या सुरुवातीच्या आर्मी पोस्टवर फोटोही काढला जातो, शिवाय प्रत्येक ट्रेकिंग कंपनीला चमूतल्या प्रत्येकाला कोरडा कचरा ठेवता येण्यासाठी एक पर्यावरण स्नेही ट्रॅश बॅग देणं आपल्या सैन्याने सक्तीचं केलेलं आहे. अर्थात ह्या पर्यावरण स्नेही ट्रॅश बॅग द्यायला लावण्यामागचा आर्मीचा हेतू सफल होत नाही तो भाग वेगळा कारण प्रत्येक कंपनीला ट्रॅश बॅग द्यायला लावण्याचं आपलं कर्तव्य सैन्य चोख बजावतं आणि ट्रेकला येणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा असा वर्ग आणि स्थानिक लोकं कचरा फक्त आणि फक्त ट्रॅश बॅगमध्ये न टाकता तो जमेल तितका बाहेरच टाकण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावतात.


पहिल्या दिवशीच आम्ही साधारण आठ हजार फुटांवरून अकरा हजार फूटांपर्यंची उंची गाठली होती.पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणापर्यंत आमच्यातल्या एकाची तब्येत इतकी बिघडली की तो आणि त्याच्याबरोबर आलेल्या इतर तीन जणांनी लागलीच तंबूत परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपण जरा जास्तच धाडस करतोय की काय अशी शंकेची पाल एक क्षणभर माझ्याही मनात चुकचुकून गेली कारण आमच्या चमूत मी एकटीच पन्नाशी उलटलेली तरुणी आणि बाकी सगळेच खरंतर जेमतेम वयाची तिशी गाठलेले होते.पण दुसऱ्याच क्षणी मी ती नकारात्मकता बाजूला सारून रोज नव्या उत्साहाने उगवत्या दिवसाला सामोरं जायचं ठरवलं आणि एक वेगळीच ऊर्जा संचारली.आता उडी घेतलीय तर काठ गाठूनच बाहेर पडायचं इतकंच ठरवलं होतं.वाटायला तर ह्या ट्रेकचा फक्त तिसरा दिवस कठीण असेल असं सांगितलं गेलं होतं आणि माझं मनोधैर्य वाढवायला जरी ट्रेक लीडर मला म्हणताना म्हणाला की,"अरे मॅडम, आपने एव्हरेस्ट बेस कॅम्प किया है तो ये तो आसान हैं आपके लिये," तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती.ह्या ट्रेकचा प्रत्येक दिवस वेगवेगळं आव्हान घेऊन उगवत होता.आता हिमालयाचा मूड नूर आणि त्यानुसार वातावरणाचा मूड नूर कसा बदलेल हे काय सांगता येतं ... हिमालयन ट्रेक्समध्ये ह्या सगळ्याची मानसिक आणि पर्यायाने शारीरिक तयारी ठेवावीच लागते. कधी कशाला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. संपूर्ण ट्रेकमध्ये चालून चालून छान गुळगुळीत झालेली मातीची पायवाट तर नजरेसच पडली नाही. संपूर्ण ट्रेकचा रस्ता फक्त खडकाळ आणि दगड गोट्यांनी अंथरलेला.कधी निसरडे मोठाले दगड धोंडे, कधी निमुळत्या खडकाळ पायवाटा,कधी एका बाजूला भीषण दरी आणि वर उंच कडा तर कधी भुसभुशीत रेतीचा तर कधी एकदम खडकाळ तीव्र उतार,कधी खडकाळ तीव्र चढण,कधी वाहती नदी ओलांडणं,कधी बर्फावरून चालणं तर कधी पावसाची संततधार सुरु असताना पावसाच्या पाण्याने,चिखल आणि दलदलीने निसरड्या झालेल्या खडकाळ वाटांवरून कपाळमोक्ष होणार नाही किंवा कोणतं हाड उत्तर देणार नाही ह्याची खबरदारी घेत जीव मुठीत धरून उतरणं अशी रोज हिमालयाची नवीन रूपं,रोज नवं आव्हान आणि आमच्यासाठी नवीन शारीरिक कसोटी आणि ह्या कसोटीत खरे उतरलात तर डोळ्यांचं पारणं फिटेल अशी निसर्गाची मुक्त हस्ते केलेली उधळण पाहायला मिळणं हे बक्षीस.ह्या वाटा घोड्यांसाठी आणि खेचरांसाठी सुद्धा सोप्या नव्हत्या तर माणसांची काय कथा. रोजच्या रोज सगळ्या सोयीसुविधा पायांशी लोळण घेत असलेल्या शहरांमध्ये लहानाचे मोठे झालेल्या आपल्यासारख्यांना हे सगळं अनोळखीच असतं.पण वास्तविक पहाता आपल्या भौतिक गरजा म्हटलं तर किती कमी असतात किंवा त्या कमी ठेवता येऊ शकतात हे अशा ट्रेक्स करताना उमजतं.  

ह्या ट्रेकचा बराचसा भाग हा काश्मीरचा आपण न पाहिलेला चेहरा आहे.एरव्ही आपली काश्मीरशी ओळख ही श्रीनगर,पहलगाम, सोनमर्ग,गुलमर्ग अशा पर्यटनाच्या दृष्टीने जाणीवपूर्वक विकसित केल्या गेलेल्या शहरांपुरती मर्यादित असते त्यामुळे पर्यटनाच्या हंगामात माणसांचे थवेच्या थवे, गजबज हेच अनुभवायला मिळतं पण इथे मात्र लोकवस्ती नावापुरतीच. तुरळकच दृष्टीस पडणारे मॅगी पॉईंट सोडले तर लोकच दृष्टीस पडत नाहीत.जी काही थोडी बहुत लोकांची वर्दळ असते ती बहुतांशी ट्रेकर्सची असते आणि त्यामुळे इथे वाटेवर असलेले हे  मॅगी पॉईंट सुद्धा कदाचित ह्या ट्रेक्सच्या हंगामापुरतेच थाटले जात असावेत. बाकी इथे फक्त निसर्गाचा आणि आपल्या सैन्याचाच काय तो वावर. संपूर्ण ट्रेकभर डोळे थकवून टाकणारी हिरवाई,निळेशार तलाव,कधी जोशात तर कधी हळुवार वाहणारे झरे,वाऱ्यावर डोलणारी सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं, हिरवीगार पठारं बस्स.व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकमध्ये पाहायला मिळाली नाहीत इतकी रंगीबेरंगी फुलांची बहार ह्या ट्रेकच्या योगाने पाहायला मिळाली.पण एक चिंताजनक बाब मात्र नक्कीच जाणवली आणि ती म्हणजे ह्या ट्रेकच्या निमित्त्याने ट्रेकिंग कंपन्या आणि ट्रेकर्सनी आरंभलेली पर्यावरणाची हानी.कॅम्पसाईट्स आणि वाटेवर जमत चाललेला प्लास्टिकचा आणि इतर कचरा डोळ्यांना खुपत रहातो. शिवाय इतक्या संख्येने पाण्याच्या स्रोतांच्या सान्निध्यात उभ्या केल्या गेल्या कॅम्पसाईट्स मुळे इथले पाण्याचे स्रोत सुद्धा दूषित होतायत ही अजून एक धोक्यांची घंटा.प्रत्येक ट्रेकिंग कंपनी जुलै आणि ऑगस्ट ह्या अवघ्या दोन महिन्यांमध्ये जवळपास ६० ते ७० ट्रेक्स करते आणि प्रत्येक ट्रेकमध्ये साधारण २४-२६ लोकं असतील तर ट्रेकच्या प्रत्येक हंगामात पर्यावरणाची किती प्रमाणात हानी होतेय ह्याचा पुरेसा अदमास आपल्याला कॅम्पसाईट्सच्या आसपास हळूहळू जमत चाललेला कचरा पाहून बांधता येतो.शिवाय तेवढ्या संख्येने इथे पर्यावरण पूरक स्वच्छतागृहं बांधली जातात त्यामुळे होणारं पर्यावरणाचं प्रदूषण वेगळंच. 







वाटेवरची नानाविविध फुलं आणि झरे 

ट्रेकच्या सगळ्यात कठीण समजल्या जाणाऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत जशी काही पावसाने आमच्यावर कृपा करायची ठरवली होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी विषणसर लेक ते १३८०० फुटांवरचा गडसर पास ओलांडून आम्ही गडसर,बमसर,यमसर अशा तीन तलावांचं सौंदर्य डोळ्यांमध्ये साठवून अठरा किमीचं अंतर तुडवून तिथल्या आर्मी चेकपोस्ट पोहोचेपर्यंत पावसाने तर उसंत धरली होती पण आमचं मात्र सगळं अवसान संपलं होतं.ह्या आर्मीपोस्टवर सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा ओळख पटवून द्यावी लागते.ओळख पटवताना माझा थकलेला चेहरा बहुदा आपल्या जवानांच्या नजरेतून सुटला नसावा. पोस्टवर काहीजण ओळख पटवून घ्यायला थांबले होते.आधीच चालून चालून पायांचे तुकडे पडले होते आणि आता बहुदा तरी इथे थोडा वेळ मोडण्याची शक्यता दिसल्यावर  जवळच असलेलं बाकडं पाहून मी थोडीशी विसावते तोच बारीक डोळ्यांचे आसाम रायफल्सचे सिक्कीमचे आपले दोन जवान हसून पुढे येऊन म्हणाले," विषणसर से गडसर तक का सफर एक दिन में थोडा ज्यादा हो जाता हैं नहीं ? थक गयी क्या आप ?आप कहाँ से आई हो ? "  थकलेल्या शरीरावर आणि शिणलेल्या मनावर अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या शब्दांनी झालेल्या अशा आपुलकीच्या शिडकाव्याने मन कसं तरतरलं. बाकी मुंबईचा ऑरा मुंबई बाहेर पडल्यावर फार प्रकर्षाने जाणवतो.बॉलीवूडमुळे इतकं काही कुतूहल असतं सगळ्यांच्या मनात की मुंबईबद्दल,की "कुठून आलायत?",  'मुंबईहून", म्हटलं कि बॉलीवूडच्या झगझगाटाच्या विचाराने आपल्याशी बोलताना चेहराच उजळतो लोकांचा,मग तुम्ही आपल्याच देशात असाल नाहीतर परदेशात.त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या त्यांच्या मनात असलेल्या मुंबईबद्दलच्या कुतूहलाने ,बॉलीवूडच्या प्रेमापोटी उजळलेल्या चेहऱ्यामुळे त्यावेळी अस्सल मुंबईकर असल्याचा जाज्ज्वल्य अभिमान काही क्षण का होईना नक्कीच मनाला गुदगुल्या करून जातो. आता त्याला हे जवान सुद्धा अपवाद नव्हते.मी मुंबईहुन आलेय म्हटल्यावर त्यांनाही कोण कौतुक वाटलं.मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून अगदी मधाळ हसत मी काही बोलायच्या आधीच ओरडून त्यांनी त्यांच्याकडची ट्रेकर्स ची यादी  मागवली आणि म्हणाले,"अरे मॅम की जल्दी पहचान कराओ।". अतिशय आस्थापूर्वक एकदाची ओळख परेड पार पडली आणि आता कॅम्पसाईट पर्यंतचं जेमतेम एक किलोमीटरचं अंतर कापायचं तेवढं राहिलंय ह्या विचाराने सुखावयाला झालं. ह्या सगळ्या भागात ना दळणवळणाच्या सोयी,ना पायाभूत सोयी ,ना मोबाइल नेटवर्क म्हणजे कुटुंबाला पाहणं तर सोडाच त्यांच्याशी दिवसेंदिवस साधं बोलणं सुद्धा शक्य नाही. कसे काय कुटुंबापासून लांब अशा दुर्गम ठिकाणी महिनोंमहिने राहतात देवच जाणे. आणि तरीही चेहऱ्यावर यत्किंचितही त्राग्याची,उद्वेगाची एकही रेष उमटू न देता कसं काय जमतं इतकी आस्थेने चौकशी करायला...



विषणसर तलाव  


गडसर तलाव 



पुढच्या दिवशी खरंतर अर्धा दिवसच चालायचं होतं.साधारण दोनपर्यंत आम्ही सतसर बेस कॅम्पपर्यंत पोहोचणार होतो.पण तो अर्धा दिवस सुद्धा पूर्ण दिवसाच्या बरोबरीचा वाटला.जवळपास दोन तृतीयांश अंतर कापलं नसेल तोवर कालपर्यंत कळ काढलेल्या पावसाने आता मात्र अगदी जोरातच गळा काढला.आम्ही गडसर पार करायलाच फक्त तो जसा काही थांबला होता.अगदी संततधार पावसात नदीतले मोठाले निसरडे खडक अंथरलेलं असं उरलेलं पूर्ण एक तृतीयांश अंतर कापणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण हे परवडलं असं दिव्य पुढले दोन्ही दिवस आमच्यासाठी वाढून ठेवलेलं आहे हे उमगायला दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडावी लागली.आदल्या दिवशीच्या दुपारपासून पावसाने लावलेला तार सप्तकातला स्वर यत्किंचितही आटोपता घेण्याचं पावसाचं काही चिन्ह दिसेना तेव्हा नाईलाजाने आम्ही आपापल्या तंबूंमधून बाहेर पडून पुढच्या कॅम्पची वाट धरायचं ठरवलं कारण सतसरच्या कॅम्प साईटवर अजून एक रात्र काढणं हे एकूणातच शहाणपणाचं ठरणार नव्हतं. 

दर दिवशीप्रमाणे दुसऱ्या दिवशी साधारण काय स्वरूपाचं दिव्य पार पाडायचं आहे ह्याची थोडी बहुत कल्पना ट्रेक लीडर ने आदल्या दिवशी दिली होती पण ते प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा जबडेच पडले आमचे. जगलो वाचलो पुन्हा भेट अशी ती जिथे नजर जाईल तिथे फक्त अगडबंब खडकांनी सजलेली तीव्र चढणाची ३-४ किलोमीटरची खडकाळ वाट आमच्याकडे आवासून पहात होती.पावसाने थोडी दया दाखवली असती तर  कदाचित ते चढण सुसह्य झालं असतं पण ऐन पावसात निसरड्या झालेल्या अगडबंब खडकांवरून स्वतःचा तोल सावरत तीव्र चढणाचा कडा पार करणं माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं.एकामागे एक असं एकमेकांचे हात धरून शिशु वर्ग किंवा प्राथमिक शाळेच्या वर्गांमध्ये मुलं जशी हात धरून साखळी करून वर्गात जातात,तसं आम्ही एकामागे एक आगगाडी करून एकमेकांना लीड करत कसंबसं ते अंतर कापून हाशहुश करतोय तोवर पुढचं चढण वाट पहायचं.बाकी ट्रेक लीडर्स ना कधीही कोणीही विचारलं की," अजून किती चढायचं बाकी आहे?," की, "बस्स मॅम/सर,अब वैसे आ ही गया ..बस अब ये जो आठ नौ यू बेन्डस दिख रहें हैं ना, उतने कर लिये फिर आज के लिये चढाई खत्म, फिर हम कॅम्प पे पहुच के रेस्ट करेंगे , बस्स पंधरा बीस मिनिट और चढना हैं फिर बस्स सिर्फ उतरना हैं," अशी शेंडी लावून सगळ्यांना मैल आणि मैल अंतर पायपीट करवण्याची कला चांगली अवगत होती. फक्त एक होतं की काही क्षणांसाठी खोटा दिलासा नक्कीच मिळायचा आणि कितीही हवा निघालेली असली तरी चालण्याची ऊर्जा...हो,पण ह्या वेळी मात्र खरोखरच ट्रेकचा हा शेवटचा पास होता झज पास... म्हटलं तसं इतके परिश्रम केल्यानंतर जी निसर्गचित्रं पाहायला मिळतात ती शब्दांत मांडता येत नाहीत किंवा कृत्रिम कॅमेरात बंदिस्त करता येत नाहीत.झज पासवरून नंदकुल आणि गंगबल अशा दोन तलावांचा जो अवर्णनीय नजारा दिसतो ना तो शब्दात काय वर्णू.... 



झज पासवरून गंगबल तलाव 

झज पासवरून नंदकुल आणि गंगबल तलावांचा नजारा 


फक्त ह्या सगळ्यात काळीज पिळवटणारं दृश्य काही असेल तर मुक्या जीवांवर लादलं जाणारं त्याच्या वाहून नेण्याच्या शक्तीपलीकडचं अचाट सामान आणि त्याची त्यांना मोजावी लागणारी किंमत. माणसाच्या स्वार्थी स्वभावाचं इतकं विदारक चित्र दुसरं नाही. एकीकडे जितकं एक से एक निसर्ग चित्रांनी डोळे आणि मन आनंदतं तितकं मुक्या जनावरांची अशा दुर्गम वाटांवर जीवापलीकडची ओझी वाहून नेताना होणारी असहाय्य परिस्थिती पाहून हेलावतं.घोड्यांवर आणि खेचरांवर इतकं अफाट सामान लादलं जातं की मुकेपणी सुद्धा त्यांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचतात.ह्या आधीचे पास चढताना जीव गमावून ओंडका होऊन पडलेले बेवारशी घोडे दिसलेच होते पण झज पास चढत असताना,पास आता अगदी जवळच होता जेव्हा घोड्यांना वाट देण्यासाठी आम्ही कडेने थांबलो होतो आणि असंच ओझं लादलेला एक  घोडा अचानक जागीच उभा राहिला,चार पाच घोडेवाल्यांनी मिळून त्याला किती रेटायचा प्रयत्न केला तरी तो जागचा टस की मस हलला नाही,जसं काही मालकाला सांगत होता की," बाबा रे, तुझा माझा एकत्र प्रवास बस इथपर्यंतचाच होता,आता इथून पुढे मला नाही तुला सेवा देता येणार,मला क्षमा कर." त्याचं हे न बोलताही बरंच काही बोलणं मनाला चटका लावून गेलं.. का कोणास ठाऊक आपल्या नजरेसमोर जेव्हा कोणी शेवटचा श्वास घेतं मग जवळची व्यक्ती असेल नाहीतर कोणताही जीव,ते पाहणं फार क्लेशकारक असतं.पण घोडेवाले जेव्हा " इसकी ज़िन्दगी बस इतनी ही थी ।" म्हणत त्याच्याबद्दल कोणतंही सुख दुःख करण्यात वेळ न दवडता त्याचा नाद सोडून पुढच्या वाटेला लागले तेव्हा त्या घोड्यासाठी जीव फार हळहळला.तुमचे हातपाय चालतात तिथवर जग तुम्हाला विचारतं आणि ज्या क्षणी तुमचा उपयोग संपतो तेव्हा तुमची सावलीसुद्धा तुम्हाला साथ देत नाही हेच खरं. 



नारानागच्या वाटेवर  


त्या दिवशी पावसाने सगळी समीकरणंच बदलली होती,सावधानी हटी दुर्घटना घटी अशी परिस्थिती असल्यामुळे तर चालायचा वेगही मंदावला होता आणि पर्यायाने इतर वेळी तो रास्ता कापायला जितका वेळ लागला असता त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागणार होता.काही घोडे सुद्धा दरीत कोसळता कोसळता घोडेवाल्यांनी सगळी ताकद एकवटून त्यांना खेचून वाचवले होते कारण पावसाने आमच्यासाठीच नाही तर घोड्यांसाठी सुद्धा परिस्थिती बिकट केली होती. पाय घसरणं तर परवडण्यासारखंच नव्हतं त्यामुळे बऱ्यापैकी कमी उताराचं पठार लागेपर्यंत काळजीपूर्वक चालणं क्रमप्राप्त होतं.अशा त्या झरा झरा पडणाऱ्या पावसात आम्ही सगळे झज पास नंतरचा तीव्र निसरडा उतार उतरलो ते ही कोणालाही कोणतीही इजा न होता हे विशेष.त्या दिवशीची रात्र सरून दिवस उजाडला तरी पाऊस थांबणं अशक्यच वाटत होतं.पण आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता आणि तीन दिवसांच्या सततच्या पावसाने कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी टेन्ट्स,आमचं असेल नसेल ते सगळं सामान, अंतर्बाह्य कपडे काहीही भिजायचं शिल्लक राहिलं नव्हतं,त्यामुळे कधी एकदा उतरून श्रीनगर गाठतोय असं झालं होतं. आज दुपारी तीनच्या आधी पायथ्याशी पोहोचणं गरजेचं होतं.पण आता खरंतर कशाचीच भीती अशी उरली नव्हती,पाऊस पडतोय पडू दे,पाहू काय होतं ते इतका बेरडपणा आला होता आम्हा सगळ्यांमध्ये,पायथा तर गाठायलाच लागणार होता.पाऊस आता कमी होईल नंतर कमी होईलची वाट पाहताना ठरल्यापेक्षा निघायला उशीरच झाला.मग काय, ज्याला जसं जमेल तसं झपझप उतरा पण अर्थातच जीव सांभाळून,म्हणून ट्रेक लीडर ने फतवा काढला.प्रत्येकाने आपापला उरला सुरलेला उत्साह आता पणाला लावला. कुठे पावसाने झालेल्या किचाट दलदलीत पाय रुतत होता तर कधी नदी ओलांडताना भिजलेल्या नदीच्या नाहीतर धो धो वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याने गुळगुळीत झालेल्या खडकांवरून सटकत होता पण सगळ्यांचं लक्ष्य एकच होतं शक्य तितक्या लवकर श्रीनगर गाठणं.निघायला उशीर होऊन सुद्धा कोणताही पराक्रम न गाजवता सुखरूपपणे अपेक्षेपेक्षा बरंच आधी जेव्हा आम्ही पायथा गाठला तेव्हा खाली पोहोचल्यावर आम्ही सगळ्यांनी स्वतःच स्वतःला शाबासकी दिली.पायथ्याशी पोहोचलो तर आम्हाला श्रीनगरला घेऊन जाणारी गाडी तयारच होती. गाडीत बुड टेकवतोय ना टेकवतोय तोच गाडीचा ड्राइवर म्हणाला, बस्स श्रीनगर के लिये ये आज की आखरी सवारी हैं, बारीश भी बहुत हो रही हैं, मौसम भी काफ़ी खराब हैं और अभी दोन दिन पहले निचनई पास में बर्फ़ गिरी तब ट्रेकिंग के लिये गया हुआ एक बॅच और कुछ घोडे गायब हो गये हैं इस लिये आर्मी ने अब ग्रेट लेक्स ट्रेक कि सारी बॅचेस वापस भेज दी हैं ।....  

माधुरी गोडबोले माईणकर 
२० सप्टेंबर २०२४
    



  

  


 



  
 

Comments

  1. Hats off to you! Your description is really engrossing. Very well penned

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता