मध्य प्रदेशच्याअंतरंगात
आमचा एक भाजीवाला आहे.मध्ये बरेच महिने तो अचानकच दिसेनासा झाला म्हणून मी त्याला त्याची विचारपूस करण्याच्या उद्देश्याने त्याच्या इतके महिने गायब असण्याचं कारण विचारलं. मध्यंतरी माझी तब्येत बरीच बरी नव्हती आणि मी जवळपास मरणासन्न अवस्थेतच पोहोचलो होतो असं त्याने सांगितल्यावर साहजिकच मी त्याने नेमका कोणत्या डॉक्टरांकडून इलाज केला की तो आता इतका ठणठणीत बरा झालाय ?असं जरा जास्त खोलात जाऊन त्याची चौकशी केली.माझ्या ह्या प्रश्नावर मला जे उत्तर मिळालं ते ऐकून मी गारच पडले. काही वर्षांपूर्वी बऱ्याच मित्रांकडून ऐकून काळभैरवाला दारूचा नेवैद्य चढवण्याचं त्याच्यासुद्धा मनात होतं ,पण काही कारणाने ते राहून गेलं त्यामुळे त्याच्या इतक्या मरणोन्मुख अवस्थेत पोहोचण्याचं कारण त्याच्या दृष्टीने बोललेला नवस न फेडणं हेच होतं अशी त्याची धारणा आहे.तेव्हापासून प्रत्येक महिन्यात न चुकता काळभैरवाला दारू पाजण्याचा त्याचा नेम त्याने सुरूच ठेवलाय. खरंच, किती अजब आणि गंमतशीर वाटतं ना आपल्याला हे सगळं ऐकायला,दारूच्या नवसाला पावणारा देव वगैरे ? पण आपल्या भारतात अशा चित्र विचित्र दंतकथा किंवा धारणा जोडलेली बरीच देवस्थानं आहेत.त्याची ही सगळी कथा ऐकून झाल्यानंतर, हे देऊळ नक्की आहे कुठे म्हणून मी कुतूहलाने त्याला विचारलं आणि त्यातच आमच्या मध्य प्रदेशच्या पहिल्या वारीचं बीज पेरलं गेलं....
मध्य प्रदेश... नावाप्रमाणेच आपल्या देशाच्या मध्यभागी वसलेलं,आपल्या देशाचं मन. मल्हारराव होळकरांची स्नुषा ,राणी अहिल्याबाई होळकरांची कर्मभूमी आणि कुमार गंधर्व व किशोर कुमार ह्यांच्यासारख्या दोन दिग्गज गायकांची जन्मभूमी. मध्य प्रदेशचीओळख तसं म्हटलं तर आपल्याला इंदोरचे मल्हारराव होळकर आणि ग्वाल्हेरच्या महादजी शिंद्यांच्या शिवकालीन इतिहासातल्या योगदानामुळे नवीन नाही. पण मला मात्र मध्य प्रदेशचं आकर्षण वाटायचं ते माझ्या आजीच्या इंदुरी साडीमुळे. तिच्या अतिशय मऊ,तलम पोत आणि मोहक रंगांमुळे इंदुरी साडी दिसायला साधीअसूनही मनात भरते. तेव्हापासून मनात होतं की कधी इंदुरी घ्यायचीच तर ती दस्तुरखुद्द इंदूरमध्येच. काही वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्त्याने होऊ घातलेली आमची इंदोर वारी करण्याची संधी हुकली तेव्हापासून मध्य प्रदेश तसं आमच्या रडारवर होतंच फक्त संधीचाच अवकाश होता आणि त्यामुळे आता त्याची सुरुवात होणार होती ती साहजिकच इंदोरपासूनच.मुंबई ते इन्दोर कारने प्रवास करायचा ठरवल्यामुळे,ट्रिप फारशी दगदगीची न करता थोडं दमानेच घ्यावं असं ठरवलं खरं पण प्रत्यक्षात मात्र मध्य प्रदेशची माहिती जसजशी खणून काढायला सुरुवात केली तसतसं हो नाही करत आधी फक्त इन्दोरपर्यंतच मर्यादित असलेली आमची ट्रिप लांबतंच गेली आणि ट्रिपचा तीन दिवसांचा कालावधी थेट आठवड्यावर गेला. इंदोरच्या बरोबरीने त्यात मग इतर शहरांचीही भर पडली.
मुंबईहून इंदोरकडे जाताना महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत आपल्या पाठीचा आणि कमरेचा एक एक टाका खिळखिळा होईल याची पूर्ण खबरदारी आपल्या महाराष्ट्रातले रस्ते घेतात. त्यामुळे मुंबई ते इंदोरपर्यंतचा प्रवास हा गाडी चालवणाऱ्यासाठीच नाही तर गाडीत नुसतं बसणाऱ्यांसाठीही गाडीच्या आणि त्यांच्या स्वतःच्या सुदृढपणाची खरी कसोटी आहे आणि इंदोरला पोहोचल्यानंतर तिथल्या छोट्या गल्लीबोळांत काय किंवा मोठ्या हमरस्त्यांवर काय गाडी हाकणं हे एखादा पुणेकरच करू जाणे. वाहतूकशिस्तीचा आणि त्यांचा तसा काही दूरवर संबंध नाही.
इंदोरला आलात आणि तुम्ही सराफा बाजारला नाही गेलात तर तुमची इंदोरची ट्रिप व्यर्थ आहे.इंदोरमध्ये ह्या सराफ बाजारात ज्याने आपली पायधूळ झाडली नाही तो खरा खवैय्याच नव्हे. जोशीजी के दहीवडे,छपन्न दुकान,तिखट मीठ चाट मसाला लावलेलं गराडू,मक्याचे दाणे,एकाहून एक लज्जतदारअसे चाट आणि मिठाईचे एक ना अनेक नानाविध प्रकार म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गच जणू . पण इंदोरी पोहे आणि जिलबी-रबडी खाल्ल्याशिवाय ही खाद्ययात्रा पूर्णच होऊ शकत नाही. बाकीआपण मुंबईत महागाईच्या नावाने रोज शिमगा करत असलो तरी मुंबई सोडली तर एकूणच भारतातल्या बऱ्याचशा भागात पैशांचं मूल्य अजूनही टिकूनआहे हे जाणवतं . त्यामुळे मुंबईबाहेर आपल्याला आपल्या खिशाला सहज परवडतील अशा माफक किमतीत, बाकी काही नाही तरी किमान खवैय्येगिरी तरी चांगलीच करता येते.
भोपाळ भलेही मध्य प्रदेशाची शासकीय राजधानी असेल पण इंदूर,आपल्या मुंबईसारखीच मध्य प्रदेशची व्यावसायिक नाडी आहे.व्यावसायिक राजधानी असल्यामुळे खुद्द इंदोरमध्ये होळकरांचा यथातथा अवस्थेतला वाडा सोडता फार काही पाहण्यासारखं नसलं तरी इंदोरच्या आसपास साधारणपणे १०० किलोमीटरपर्यंतच्या परिघात महेश्वर,ओंकारेश्वर,देवाससारखी मुद्दाम पाहावं अशी बरीच ठिकाणं आहेत.आपले सासरे मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर राणी अहिल्याबाई होळकरांनी राज्यकारभाराची सगळी सूत्रं हातात घेतली आणि परकीय आक्रमणांपासून मराठा साम्राज्याला वाचविण्यासाठी आपली राजधानी इंदोरमधून महेश्वरला हलवली.अहिल्याबाईंनी सुरतच्या विणकरांना इथे वसवून त्यांच्याकडून महेश्वरच्या स्थापत्यकलेची छाप जाणवेल अशा सुंदर रेशमी साड्या विणून ग्यायला सुरुवात केली ज्याआज "महेश्वर साडी" म्हणून जगप्रसिद्ध आहेत. महेश्वरला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बोटीतून केलेली नर्मदेची सफर आपल्याला कातर केल्याशिवाय रहात नाही.नर्मदेच्या काठावर वसलेल्या महेश्वरवरआजही आपल्याला अहिल्याबाईंच्या असामान्य कर्तृत्वाची मोहोर आढळते.
जसं गुजरात कृष्णभक्तीत रंगलेलं आहे तसं मध्य प्रदेश शिवभक्तीत.ओंकारेश्वरआणि महाकालेश्वर ह्या दोन ज्योतिर्लिंगांव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जागोजोगी शंकराची देवळं पाहायला मिळतात,त्यातच आहे जगातलं सगळ्यात ऊंच म्हणजे २१ फूट ऊंच जागृत शिवलिंग असलेलं भोपाळजवळचं भोजपुरमधलं भोजेश्वर शिवमंदिर.असं मानलं जातं की कुंती शंकराची पूजा केल्याशिवाय अन्नपाण्याला शिवत नसे म्हणून पांडवांनी अज्ञातवासात फक्त एका रात्रीत आपल्या आई कुंतीसाठी हे देऊळ उभारलं. पुढे राजा भोजने ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला ज्यावरून ह्याला भोजेश्वर असं नाव पडलं. मध्य प्रदेशमध्ये एकूण तीन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यात भोपाळजवळच्या भीमबेटका आणि उदयगिरी गुहा आपल्याला आदिमानवाच्या कलाकौशल्याची ओळख करून देतात तर सम्राट अशोकाने बुद्धाच्या अवशेषांवर उभारलेला सांचीचा स्तूप मौर्य वंशीय काळातील बौद्ध शिल्पकलेची साक्ष आहे.
असं म्हणतात की ," कोहरेमें अगर आपने मांडू नहीं देखा तो कुछ नहीं देखा "खरं मांडू पाहावं ते पावसाळ्यात कारण पावसाळ्याच्या धुक्यात ह्या मांडूचं सौंदर्य एखाद्या नववधूपेक्षा कमी नसतं. पण जरी आम्हाला पावसाळ्यात मांडू पाहायचा योग नव्हता तरी ते असं सुद्धा सुंदरच आहे हे तिथला जहाज महाल आणि राणी रूपमतीचा महाल पाहताना नक्कीच पटतं.त्या काळात विज्ञान फारसं प्रगत नसताना देखील इतिहासकाळात बांधल्या गेलेल्या छोट्यातल्या छोट्या वास्तूंना विज्ञानाची खूप भक्कम बैठकआहे.तत्कालीन राज्यकर्त्यांनी कोणतही रीतसर शिक्षण न घेता त्यांना असलेली खगोलशास्त्राची,पर्यावरणाची व स्थापत्यशास्त्राची उत्तम समज आणि त्याचा त्यांनी ह्या वास्तूंमध्येअतिशय काटेकोरपणे केलेला उपयोग आपल्याला अवाक करतो,मग ते जयपूरचं जंतरमंतर असेल नाही तर कोणताही गड किल्ला नाही तर मांडूचा हा जहाज महाल.ह्या महालाच्या बाजूच्या दोन जलाशयांमध्ये ह्या महालाचं जे प्रतिबिंब पडतं ते पाण्यात तरंगणाऱ्या एखाद्या नावेसारखं दिसतं ज्यामुळे ह्या महालाला जहाज महल म्हटलं जातं.
पण आता शिल्लक होतं ते म्हणजे आमचं रहस्यमय काळभैरवाचं देऊळ..... ज्याने आम्हाला मध्य प्रदेशपर्यंत आणलं होतं.उज्जैनच्या महाकाळेश्वराच्या दर्शनाबरोबरच उत्सुकतेपोटी का होईना आम्हाला ह्या काळभैरवाचं दर्शन घ्यायचंच होतं.हे काळभैरवाचं देऊळ भारतातील एकमेव असं देऊळ आहे जे स्मशानाच्या बरोबर समोर बांधलेलं आहे आणि ह्या देवळाच्या आजूबाजूला जितकी हारतुऱ्यांची दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पूजा थाळीच्या बाकी सामनाबरोबरच राजरोस दारूची छोटी बाटली ठेवली जाते. असं मानलं जातं की काळभैरव कायम नशेतच असतो. अर्थात नसेल तरच नवल, जो तो दर्शनाला येणारा जर का देवाला दारू पाजत असेल तर आणखी वेगळं काय होणार म्हणा.असो....आपण म्हणतो देव काही खातो पितो का? पण इथे मात्र आंम्ही ह्या देवळात पुजाऱ्यांना देवाला नेवैद्य म्हणून दारू पाजताना पाहिलं. दारू जर एका बशीत ओतून देवाच्या तोंडापुढे धरली तर काही क्षणांतच बशीमधली दारू नाहीशी होते.का आणि कशी ह्याला कोणताही शास्त्रीय आधार अथवा सिद्धांत नाही पण वाटायला आपल्याला कितीही चमत्कारिक वाटलं तरी हे पाहिल्यानंतर आपली मती गुंग होते.फक्त मला ह्या किश्श्यावरून माझ्या लहानपणी " आज गणपती दूध पितोय " ची उठलेली वावटळ आठवली होती,तेव्हा संपूर्ण मुंबईभर लोक त्याचा प्रयोग आपापल्या घरी करून पाहत होते,लहान असल्यामुळे कुतूहलापोटी आम्हीही त्यात मागे नव्हतो. हाही त्यातलाच काहीसा प्रकार होता. पण जसा त्या प्रसंगाला काही आधार नव्हता तसाच ह्या गोष्टीलाही नव्हता.
आपल्या अलीकडच्या ऐहिकआणि भौतिक सुखांना अवास्तव महत्त्व असलेल्या जीवनशैलीमध्ये सगळ्याच लोकांमधली माणुसकीची,आपुलकीची,प्रेमाची ऊब संपलीय असं सामायिकीकरण करणं किती सपशेल चुकीचं आहे ह्याची प्रचिती आपल्याला मुंबईबाहेर जवळपास सगळीकडे येते त्यामुळे आमच्याबरोबर असलेल्या आमच्या स्नेह्यांच्या नाशिकच्या आप्तेष्टांपासून घेऊन ते इंदोरमधल्या त्यांच्या मित्रपरिवारांपर्यंत आमच्या जेवणावळी प्रत्येक घरी वार लावल्यासारख्या सुरूच होत्या.कोणीही आदरातिथ्य करण्यात मागे नव्हतं.आमच्या ह्या मध्य प्रदेशच्या ट्रीपच्या जेमतेम दोन महिने आधी आम्ही पुद्दूचेरीच्या ट्रीपला गेलो होतो. तिथे ट्रिप संपण्याच्या अगदी आदल्या दिवशी आमच्या रिसॉर्टवर आमची मध्य प्रदेशमधून आलेल्या एका व्यावसायिक कुटुंबाशी ओळख झाली. कुठून आलात,काय आलात वगैरे वरून सुरु झालेल्या आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयांना हात घालत दोन तीन तास रंगल्या.आम्ही आणि ते लागलीच दुसऱ्या दिवशी आपापल्या दिशांना पांगणार असल्यामुळे निरोप घेण्यापूर्वी,एकमेकांना घरी येण्याचं आमंत्रणही दिलं गेलं.पण अशी किती आमंत्रण आपण देतो आणि घेतो बरेचदा केवळ एक शिष्टाचार म्हणून आणि नंतर आपल्या रोजच्या व्यापात विसरूनही जातो.किंबहुना प्रसंगी जाणीवपूर्वक कोणालाआवर्जून "घरी या" म्हणणं टाळणं किंवा काहीही न सांगता सवरता धडकलेल्या पाहुण्यांची अनपेक्षित भेट झाल्याचा सुखद धक्का बसण्याऐवजी, "आता ह्या वेळी हे कशाला टपकले ! "अशा भावनेने त्यांचं जेवढ्यास तेवढं अगत्य करणं हे आजच्या रोजच्या झपाट्याच्या व्यावसायिक जीवनशैलीत आणि लोप पावत चाललेली माणुसकी पाहता नवीन नाही,मग त्यामागची कारणं काहीही असतील .पण आमचे हे मध्य प्रदेशमधले नवीन स्नेही मात्र ह्या नियमाला अपवाद निघाले.आमची त्यांच्याशी ओळख झाल्याच्या नेमकं दोनच महिन्यांनंतर आम्हाला हा मध्य प्रदेशला फिरायला जायचा योग आला होता. मी त्याला भेट न म्हणता ओळखच म्हणतेय ह्याचं कारण ,आमचं मैत्र नुकतंच जन्मालाआलं होतं.भोजपुर सोडून पुन्हा भोपाळकडे येताना आम्हाला कुठे ढंगाचं खाण्यालायक हॉटेल दिसेना म्हणून असं काही हॉटेल कुठे सापडेल हे विचारण्यासाठी आणि त्यांची धावती भेट घेता यावी ह्या दुहेरी उद्देश्याने त्यांना आमच्या परतीच्या वाटेवर कुठेतरी भेटायला यायला सुचवायला मी त्यांना फोन केला. पण आम्ही मध्य प्रदेशात आहोत आणि ते ही भोपाळच्या अगदी जवळपासच आहोत हे कळल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरीच जेवायला येण्याचा आग्रहच धरला, थोड्याथोडक्या ओळखीवर त्यांच्याकडून आलेलं हे थेट जेवायला येण्याचं आमंत्रण आम्हाला अजिबातच अपेक्षित नसल्यामुळे संकोचून टाकणारं होतं. पण आमचे हे नवीन स्नेही,नाही नाही म्हणत असताना देखील,आम्हाला घर शोधणं कठीण जाईल म्हणून आम्ही जिथे होतो तिथे घ्यायलाच यायचं म्हणाल्यानंतर,अखेरीस नाईलाजास्तव आम्ही शस्त्रं टाकून शरणागती पत्करली. फक्त एका फोन कॉलवर त्यांच्या घरी ऐन आठवड्याच्या मध्याला दुपारी तीन वाजता दुसरे अजून काही पाहुणे येऊ घातलेले असताना आम्हा आठ जणांना गरमागरम जेवणाने आणि त्यांची सगळी काम बाजूला ठेवून त्यांनतरचा उरलेला संपूर्ण दिवस आमच्याबरोबर घालवून,त्यांनी आमची जी सरबराई केलीय, त्याने आमच्याबरोबरचे आमचे स्नेहीच काय आम्हीसुद्धा पुरते चेपून गेलो कारण आमच्या स्नेह्यांपेक्षा आमची त्यांच्याशी ओळख फक्त दोनच तर तास जुनी होती.अशी कमालीच्या निःस्पृहपणे स्नेहबंध जपणारी वेळोवेळी कायमस्वरूपी जुळत गेलेली आमची ही बिनरक्ताची नाती म्हणजे आमच्यासाठी आयुष्यभराचा आनंदाचा अमूल्य ठेवा आहेत.आपल्या भारताचं मनसुद्धा किती मोठंआहे नाही !
माधुरी गोडबोले-माईणकर
www.valuevacations.co.in
२४ डिसेंबर,२०१९
Good description of Madhya Pradesh, even I have been to all these places you mentioned, Indore is a heaven for any foodie
ReplyDeleteमाधुरी, खूप सुंदर लिहितेस... interesting माहिती देतेस आणि अतिशय ओघवत्या भाषेत, त्यामुळे वाचायला मजा येते आणि पुढचा ब्लॉग कधी वाचायला मिळेल ह्याबद्दल उत्सुकता वाटते! Keep writing!
ReplyDeleteमाधुरी छान व सहज वर्णन. विशेषतः सहलीची कल्पना एका गंमतीशीर संवादातून झाली व त्याचा तुम्ही पाठपुरावा केला हे वाचून मजा आली. आम्हीही ही सारी ठिकाणे ( काळभैरव मंदिर वगळता) अनुभवली आहेत. इंदूरच्या वैविध्यपूर्ण शेवेची चव आजही जिभेवर रेंगाळली.
ReplyDelete