Skip to main content

भेट जॉर्जियाची स्मरते….. (भाग १ )

भेट जॉर्जियाची स्मरते….. (भाग १ )

सुट्टी आणि मुशाफिरी असं आमचं ठरलेलं समीकरणच आहे जणू. दरवर्षी आम्ही होता होईतो काही तरी मुलखावेगळं  खणून काढण्याच्या प्रयत्नांत असतो. त्यासाठी मी आणि माझ्यापेक्षा थोडा जास्तच माझे मिस्टर गृहपाठही करतो.हा गृहपाठ करत असतानाचजर नेमकं एखाद्या ठिकाणाबद्दलच कोणतं तरी वाचनात आलेलं सदर नाहीतर एखादा पाहिलेला सिनेमा अथवा कोणा स्नेही मंडळींची तिथे दिलेली भेट असं काही ना काही तरी निमित्त्य झालं तर आमचं शोधकाम थोडं सोपं होतं आणि मग यथावकाश एखादं ठिकाण निश्चित झालं की त्या अनुषंगाने आम्ही अभ्यास सुरु ठेवतो.त्यात यंदा क्रम होता जॉर्जियाचा.आम्ही जॉर्जियाला सुट्टीला जाणार असं कळल्यानंतर बऱ्याच लोकांच्या,त्यातही बऱ्याच जणांच्या कुतूहलाने तर काहींच्या Georgia?(Of All,Why Georgia?) अशा प्रश्नार्थक अर्थाने भुवया उंचावल्या. मग जॉर्जिया U.S. मधलंअशा आश्चर्यकारक मुद्रेने प्रश्न विचारले गेले, पण नाही U.S.मधलं नाही ,जॉर्जिया country असं म्हटल्यानंतर तर आमच्या स्नेही वर्गाची उत्सुकता शीगेला पोहोचली.
तसं पाहिलं तर जॉर्जिया अजून तरी फारसं आपल्या भारतीय पर्यटकांच्या bucket list मधलं डेस्टिनेशन तर नक्कीच नाही. कारण एक तर ,तसं त्या देशात जाऊन आवर्जून पाहावं असं फारसं वाचनात कधी काही आलं नव्हतं किंबहुना जे काही वाचनात आलं होतं ते इतकं नकारात्मक होतं की खरं तर ह्या देशाला मुद्दाम उठून जाण्याचा विचार कधी करूच नये असंच वाटलं होतं. काही वर्षांपूर्वी आपल्या बहिणीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या celebration साठी तिथे गेलेल्या एका भारतीय कुटुंबाला कसं एअर पोर्टवरून अकारणच परतवून लावण्यात आलं आणि पैशांचं नुकसान तर झालंच पण त्यामुळे कसं त्यांना बऱ्याच वर्षांनी होणारं फॅमिली get - together  मिस करावं लागलं ह्याबद्दलची बातमी अतिशय ठळकपणे पेपर मध्ये छापून आली होती.त्यानंतरही लागोपाठ अशाचं काहीशा आशयाच्या बातम्या सातत्याने,जॉर्जियाला गेलेल्या भारतीय प्रवाशांच्याबाबतीत वाचनात आल्या होत्या. त्यामुळे जॉर्जियाभेटीचं कुतूहल जरी चाळवलं तरी धाडस मात्र होत नव्हतं. भारतातून भारतीय पासपोर्टवर जाणाऱ्या अनेकांना मग स्टुडंट्स ,सोलो ट्रॅव्हलर्स ,कुटुंबं, कोणीही असो त्यांना एअरपोर्ट वरून परतवून लावण्याचा जॉर्जियन immigration ऑफिसर्सनी मधल्या काळात सपाटाच लावला होता. त्यात बरेचसे वैद्यकीय शक्षणासाठी जाणारे स्टुडंट्स होते, ह्या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये आपल्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कै.सुषमा स्वराज ह्यांच्या राजकीय मध्यस्थीनंतर deportations चं प्रमाण काहीसं फक्त कमी झालं पण पूर्णपणे थांबली नाहीत आणि दुसरं म्हणजे जॉर्जिया हा देश इतर पूर्व यूरोपातील देशांच्या मानाने फारसा प्रकाशझोतात नाही किंवा त्याला पश्चिमेकडील तथाकथित श्रीमंत युरोपियन राष्ट्रांसारखं प्रसिद्धीचं वलय नाही.पण जॉर्जियाला जाण्यासाठी आमच्या आखाती देशात स्थायिक झालेल्या स्नेह्यांना व्हिसाची गरज भासत नसल्यामुळे,मागच्या वर्षीची आमच्या अशाच एका स्नेह्यांची तिथली भेट आमच्यामध्ये पुन्हा जॉर्जियाला भेट देण्याची उर्मी जागवण्यासाठी पुरेशी होती.
जे बजेट ठरवलं होतं त्यात करता येण्यासारखे बरेच हटके पर्याय आम्ही शोधले होते खरे,पण जॉर्जियासारख्या भारतीयांसाठी वादग्रस्त ठरलेल्या देशाचा विचार काही डोक्यातून जात नव्हता.Tbilisi ते Tbilisi  अशी राऊंड ट्रिप ची विमान तिकिटे बुक केल्यानंतर विविध ब्लॉग्स मधून जे काही तिथे जाणाऱ्या भारतीय पर्यटकांचे अनुभव पुन्हा एकदा वाचनात आले ,त्यावरून आमच्या ह्या जॉर्जिया ट्रीपचं भवितव्य धोक्यात असल्याची स्पष्ट चिन्हं आम्हाला दिसायला लागली. सगळी तयारी करायला दिवस तर हाताशी फार कमी होते. वेगवेगळ्या ब्लॉग्सवरची माहिती वाचून पूर्ण पैसे वाया जाण्यापरीस व्हिसा आणि विमान प्रवासाच्या खर्चाचं एक वेळ नुकसान सोसलेलं बरंम्हणजे जीवावर बेतलं ते बोटांवर निभावलं असं जसं शायिस्तेखानाचं झालं तसं आपलंही होऊ दे, असंही अनेकदा वाटून गेलं पण मग आम्ही चंगच बांधला,आता शेंडी तुटो वा पारंबीजॉर्जियात आत घुसायचंच.मग त्या दिशेने शोधाशोध करताना लक्षात आलं की भारताबाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांची जॉर्जियात अडवणूक केली जात नाही पण भारतातून भारतीय पासपोर्ट वर प्रवास करणाऱ्या भारतीयांना मात्र ई-व्हिसाच नाही तर रीतसर स्टिकर व्हिसा असूनसुद्धा प्रवेश नाकारला जातो,कोणतीही सबळ कारणं न देता ...त्यादिवशी एअरपोर्टवर हजर असलेल्या immigration ऑफिसरचं डोकं ठिकाणावर आणि तुमचं नशीब बलवत्तर असेल तरच तुम्ही आत प्रवेश मिळवू शकता... मागच्या दोन एक वर्षांपासून जॉर्जियाने भारतातून जाणाऱ्या पर्यटकांपैकी जवळपास ९० टक्के पर्यटक विमानतळावरून परतवून लावल्याचं बऱ्याचशा ब्लॉग्समधून वाचनात आलं. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती नव्हती. जॉर्जियाची अर्थव्यवस्था तशी बेतास बातच. मग असं असताना देखील आपल्यासारख्या पर्यटकांकडून मिळणारं परकीय चलन नाकारणं वास्तवविक पाहता ह्या देशाला परवडण्यासारखं नाही. पण जॉर्जिया आपल्या भारतासारखाच कृषिप्रधान देश आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडील पंजाबमधील बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तिथे जमिनी विकत घेऊन कसायाला सुरवात केली आणि त्यातून येणारं कृषीउत्पन्न निर्यात करायला सुरुवात केली. परिणामी जॉर्जियातील शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आल्यामुळे साहजिकच एकूणच भारतीयांबद्दल काहीशी चीड निर्माण झाली आणि त्या असुरक्षिततेच्या भावनेतूनच त्यांनी भारतातून येणाऱ्या सरसकट सगळ्या पर्यटकांना मज्जाव करायचा जो सपाटा सुरु केला तो आजपर्यंत,मग ती कुटुंब असोत,विद्यार्थी असोत,सोलो ट्रॅव्हलर्स असोत. ह्याला अपवाद आहेत ते फक्त आखाती देशांमध्ये स्थायिक झालेले आपले अनिवासी भारतीयतेही कुटुंबीय,सोलो ट्रॅव्हलर्स नाही.त्यांच्यापासून त्यांना असं कोणताही भय वाटत नसावं.आखाती देशांशी जॉर्जियाचा मोफत प्रवेश देण्याबाबतचा करार आहे,त्यामुळे आखाती देशांमधून जॉर्जियात जाणाऱ्या भारतीयांनादेखील व्हिसाची गरज नसते आणि हेच प्रमुख कारण आहे की आखाती देशात राहणारे जवळपास सगळेच भारतीय जॉर्जियाला हटकून भेट देतात शिवाय आखाती देशांपासूनचं जॉर्जियाचं भौगोलिक अंतर सुद्धा कमी असल्यामुळे प्रवासासाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होते. फक्त आपल्यासारख्या भारतीय पर्यटकांना जॉर्जियात प्रवेश नाकारताना ते त्यांच्या देशाचं पूर्ण नुकसान होणार नाही ह्याचीही पुरेशी खबरदारी घेत असावेत आणि म्हणूनच सुरुवातीलाच व्हिसा अर्ज करायला बंदी करण्याऐवजी,व्हिसा fees चे पैसे कॉन्सुलेटच्या गल्ल्यात जमा झाल्याची खातरजमा करून घेऊन मग तिथे पोहोचल्यानंतर परतवून लावतात.
रीतसर सगळ्या व्हिसाच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून जाण्याच्या जेमतेम दोन दिवस आधी आम्ही  जॉर्जियाचा ई-व्हिसा नाही तर त्यांचा स्टिकर व्हिसा पदरात पाडला.पण खरी लढाई तर तिथे पोहोचल्यानांतरच सुरु होणार होती.अखेर सर पे कफन बांध के आम्ही जॉर्जियाकडे कूच केलं. ठरल्या वेळी आम्ही Tblisi विमानतळावर  पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर जसे आम्ही immigration  च्या रांगेत उभे राहिलो तसे तांदूळातून खडे वेचून काढावेत तसे भारतीय पासपोर्ट वर प्रवास करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला वेगळं काढायला सुरुवात झाली. आमचाही नंबर आला .बाजूला काढलेल्या प्रत्येक भारतीयाची वेगळ्या खोलीमध्ये घेऊन कसून चौकशी करण्यात येत होती.immigration ऑफिसर्स ना तुम्ही दिलेली उत्तरं समाधानकारक वाटली तरच(त्याहीपेक्षा त्या ऑफिसरची मानसिक स्थिती त्यादिवशी ठीक असली तरच) आम्हाला प्रवेश दिला जाणार होता.बाकी सगळ्या देशांच्या पर्यटकांना मात्र बिनधोक प्रवेश मिळत होता हे पाहून आमची चरफड होत होती. एकूणच सगळ्या ब्लॉग्सवरचे आत्तापर्यंतचे लोकांचे (चित्त)थरारक अनुभव वाचून , आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे, व्हिसा,आत्तापर्यंतचे जेवढे असतील नसतील तेवढे stamped पासपोर्ट्स ,हॉटेल reservations ,रिटर्न एअर टिकेट्स अशा एकूणएक सगळ्या गोष्टी ऑफिसर्सना दाखवायला आपण आपल्याकडे बॅगमध्ये वरच ठेवू असं वारंवार बजावून देखील,”आपली सगळी documents स्वच्छ आहेत त्यामुळे आपल्याला काहीही अडचण येणार नाही,” असा मला दिलासा देत, माझ्या मिस्टरांनी  व्हिसा, एअर टिकेट्स आणि लागलीच आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरणार होतो त्या हॉटेलच्या reservation चं print out इतकंच काय ते कागदोपत्री आणि बाकी सगळी documents सॉफ्ट कॉपी मध्ये ठेवली होती. आम्ही  immigration  विंडो वर पोहोचल्यावर आमचा भारतीय पासपोर्ट पाहून लागलीच आम्हाला बाजूला केलं गेलं. आमच्या आधी बाजूला काढलेल्या आमच्यासारख्या इतर भारतीयांचा immigration ऑफिसर्स समाचार घेईपर्यंत आमचा धीर सुटत चालला होता.काही वेळ ताटकळत ठेवल्यावर इम्मीग्रेशन ऑफिसरने आम्हाला त्याच्या खोलीत बोलावलं , आमच्याआधी नुकताच तो आमच्या सहप्रवाशांपैकी, एकत्र प्रवास करणाऱ्या दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबाला,त्यांना इंग्रजीमध्ये उत्तरे न देता आल्याच्या सबबीवरून एअरपोर्ट वरूनच परतीची वाट दाखवता झाला होता, ते पाहून आम्ही जरा धास्तावलोच . आम्ही सगळ्या हॉटेल reservations चे ,ट्रॅव्हल इन्शुरन्स चं print  out  जवळ न ठेवता फक्त सॉफ्ट कॉपी जवळ ठेवल्यामुळे तो जरा साशंक नजरेने आमच्याकडे पाहू लागला.  आम्हाला पुरता घाम फुटला होता. "आल इज वेल,आल इज वेल.. " असं कितीही मनाला समजावलं तरी आता मात्र आमचं उरलं होतं नव्हतं ते सगळं अवसान गळालं. सगळ्याच दस्तावेजांची कागदी प्रत का नाही ठेवली म्हणून आमची खबर घेत असतानाच,त्याची आमच्या पासपोर्टवरच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या U.K. व्हिसा स्टॅम्पवर नजर पडली आणि त्याने आम्हाला,आम्ही U.K . ला कधी गेलो ,कोणत्या वर्षी गेलो, तिथे जाण्याचा हेतू काय वगैरे वगैरे प्रश्न विचारले, सगळी पटतील अशी उत्तर देऊनही त्याच्या डोक्यातल्या शंकांचं निरसन आम्ही करू शकलोय ह्याबाबतची आमच्या डोक्यावरची टांगती तलवार तरीही अजून कायमच आहे असंच वाटत होतं.त्याचा एकंदर अविर्भाव पाहून बहुदा तरी हा आम्हाला लगेचच्या परतीच्या विमानात कोंबूनच गप्प बसेल असं वाटत असतानाच एक मिनिटभर विचार केल्यावर, आम्ही ठरल्या दिवशी जॉर्जियातून काढता पाय घेऊ अशी तोंडी कबुली आणि जर का तसा तो नाही घेतला तर आम्हाला पुन्हा कधीही जॉर्जियात प्रवेश मिळणार नाही अशी तंबी देऊन त्याने आमचा व्हिसा स्टॅम्प करून आमचा जॉर्जिया प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. त्याक्षणी इतका वेळ टांगणीला लागलेला आमचा जीव भांड्यात नाही तर परातीत पडला. जणू काही आम्ही पानिपतची लढाई जिंकल्याचा आमचा आनंद गगनात माईना…….. फत्तेशिकस्त !!!   
क्रमशः……. 


माधुरी गोडबोले–माईणकर

१९ नोव्हेंबर ,२०१९

Comments

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता