Skip to main content

गंध गुजरातचा(भाग १)


 गंध गुजरातचा (भाग १)


असं म्हणतात की कस्तुरी मृगाला त्याच्याआत दडलेल्या सुगंधाची कल्पनाच नसते .आपलंही तसंच काहीसं आहे.काही तरी नवनवीन  शोधून काढण्याच्या भानगडीत" काखेत कळसा आणि गावाला वळसा "अशी  आपली अवस्था असते .वेगवेगळे देश पालथे घालताना आपण आपल्याच बगलेत असलेल्या प्रांतांना बगल देतो आणि थेट साता समुद्रापलीकडे पोहोचतो.कालच बातमी वाचायला मिळाली की "युरोप,ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड या देशांना भारतीय पर्यटकांची सुट्टी घालवण्यासाठी पहिली पसंती असते आणि दरवर्षी ह्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते आहे. पण वर्षअखेरीस विमान तिकिटांच्या दरांनी आकाशाला गवसणी घालायला सुरुवात केल्यामुळे पर्यटकांनीअशा देशांचा विचार न करता नवीन वर्षाचं  स्वागत करण्यासाठी भारतातल्या जवळपासच्या स्थळांना प्राधान्य देणं पसंत केलंआहे ". भारतातच एखाद्या थंड हवेच्या अगदी नयनरम्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली हिरवाई पाहून, निसर्ग पाहून "लगताही नहीं कि ये इंडिया मैं हैं" असे उद्गार आपल्या कितीतरी जणांच्या तोंडून हमखास बाहेर पडतात. खरंतर भारतातही वेळात वेळ काढून आवर्जून पाहावं असं खूप काही आहे.पण आपल्याला फक्त त्याबद्दल माहित नसतं इतकंच. अगदी उदाहरणादाखलच द्यायचं झालं तर आपल्यातल्या बऱ्याच जणांनी महाराष्ट्रसुद्धा पूर्ण पहिला नसेल.त्यात थोड्या फार प्रमाणात आम्हीही आलोच. किंबहुना महाराष्ट्रात सुद्धा बरंच काही पाहण्यासारखं आहे हेसुद्धा आपल्यातल्या कित्येकांना माहिती नसेल. म्हणतात ना "पिकतं तिथं विकत नाही"अशातलाच काहीसा प्रकार.उगाच नाही ब्रिटिश आपल्या देशाकडे आकर्षित झाले. जेव्हा जेव्हा भारताबाहेर जातो तेव्हाआपल्या शास्त्रांबद्दल,हिंदू संस्कृतीविषयी,योगाभ्यासाविषयी,अध्यात्माविषयी,चाली रीतींविषयी प्रचंड ओढ ,कुतूहल आणि त्या कुतूहलातून ह्यासगळ्या गोष्टींबद्दल जास्त माहिती आणि ज्ञान मिळवलेली माणसं आम्हाला भेटतातच भेटतात.म्हणूनच की काय त्यांच्या ह्या निव्वळ जिज्ञासेपोटी आणि कुतूहलापोटी बाहेरच्या देशातून दरवर्षी आपल्यापेक्षाही मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक भारतात,भारत पाहण्यासाठी म्हणून लोटत असावेत.मग त्याला स्थळांचे,तिथल्या सोयीसुविधांचे ,स्वच्छतेचे कोणतेही निकष ते ठेवत नाहीत.  

काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थांच्या आणि दत्त गुरूंच्या दर्शनाच्या निमित्त्याने आम्ही अक्कलकोट आणि गाणगापूरला जायचं ठरवलं .अक्कलकोटच्या भक्त निवासात सोय न झाल्याने  शिवपुरीच्या विश्व फाऊंडेशन जवळपासच्या आश्रमात आमच्या स्नेह्यांनी आमची उतरण्याची व्यवस्था केली होती.आमच्या राहण्याच्या ठिकाणच्या अगदी जवळच असल्यामुळे कुतूहल म्हणून आम्ही ह्या संस्थानाला भेट द्यायला गेलो .तेव्हा "विश्व "फाऊंडेशनची उभारणी सुरु होती. काम जवळपास पूर्ण होते आलं असलं  तरी बरंच काम बाकी होतं.हे संस्थान आपले वेद ,शास्त्र,पुराणे,त्यांचं आपल्याआयुष्यातलं अध्यात्मिक प्रगतीच्या  दृष्टीने महत्त्व अशा बऱ्याच अध्यात्मिक विषयांवर आणि मुख्यत्वे अग्निहोत्राच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने,आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वावर बरंच विवेचन करणारी शिबिरं भरवते. "अग्निहोत्र"  ही शरद पोंक्षे आणि मुक्त बर्वे अभिनीत एक सुरेख  मालिका आहे ह्यापलीकडे ,अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचं अध्यात्मिक महत्त्व ,"अग्निहोत्र" , आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने कसं करावं याबद्दल आपला ब्रह्मवृंद आणि आपल्यापैकी हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी लोकं वगळता कोणालाच काहीही माहिती असण्याची सूतराम शक्यता नाही.पण तिथे आम्हाला एक जर्मन कुटुंब भेटलं.ते जर्मन दाम्पत्यआणि त्यांची साधरणपणे विशीतली मुलगी दरवर्षी न चुकता तीन महिने तिथे येतात आणि  तिथे राहून त्या विश्व फाऊंडेशनचे संस्थापक परम सद्गुरूंची सेवा म्हणून त्या आश्रमात श्रमदान करतात,वेदांचा विशेष करून अग्निहोत्राचा अभ्यास  करतात.फक्त इतकंच  नाही तर त्या आश्रमातून अग्निहोत्रासाठी लागणारी सगळी साधन सामग्री घेऊन जाऊन त्यांच्या मायदेशी सुद्धा दर संध्याकाळी न चुकता अग्निहोत्र करतात. त्यांचा तो साधा स्वच्छ शुभ्र भारतीय पेहराव ,त्यांचा  वेदाभ्यास,अग्निहोत्र आणि त्याचं महत्त्व ह्याचा सखोल अभ्यास आणि ते शास्रोक्तपद्धतीने का आणि कसं करावं ह्याबद्दल आमच्याच देशात येऊन त्यांनी  आम्हाला जवळपास अर्ध्या पाऊण तासात पाजलेलं ज्ञान ह्यानंतर तर आमचे जबडेच पडले.स्वतःचीच लाज वाटली की कोण कुठून जर्मनीतून आलेलं ते कुटुंब आपल्या हिंदुत्त्वाची  पाळंमुळं खणून काढतं आणि आपण स्वतःला अभिमानाने हिंदू म्हणवतो पण हे सगळं आमच्या महाराष्ट्रात आहे आणि आम्हाला ह्याविषयी पुसटशी कल्पनाही नसावी. तसं तर आधीही आवर्जून फिरत होतोच पण ह्या प्रसंगानंतर बाकी देशांमधल्या भटकंती बरोबरीने आणखी कटाक्षाने भारतातल्या पर्यटन स्थळांविषयी मुलांना जास्तीत जास्त गोष्टी माहित करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी एक किंवा दोन ठिकाणी अशा हटके ठिकाणी मुलांना घेऊन जायला सुरुवात केली. मग त्यात कधी गड-किल्ले,कधी स्थापत्त्य कलेचे वैज्ञानिक अविष्कार असलेल्या ऐतिहासिक इमारती,कधी तीर्थक्षेत्रे ,कधी देवस्थाने,कधी महाल तर कधी पर्वत रांगांमधली भटकंती तर कधी थंड हवेची ठिकाणे...जे जे म्हणून पाहणं आणि त्याबद्दल माहिती मिळवणं शक्य आहे ते काही सोडायचं नाही असं  ठरवूनच टाकलं आणि ह्यातच आम्हाला योगायोगाने शोध लागला गिरनार पदयात्रेचा. 

दरवर्षी दत्त जयंती आली की  गिरनारला जाण्यासाठी माझ्या एका मित्राच्या जीवाची घालमेल होते.प्रत्येक दत्तजयंतीला तो हटकून दत्तात्रयांच्या दर्शनाला गिरनारच्या १०,००० पायऱ्या चढून जातोच जातो.एखाद्या वर्षी नाही गिरनारला  जायला मिळालं तर इतका का बरं ह्याचा जीव कासावीस होतो,ह्याबद्दल कुतूहल वाटून एका डिसेंबरमध्ये मीसुद्धा घरी गिरनारला जाण्याचा फतवा काढला. १०,००० हजार पायऱ्या चढून जायचं ह्या नुसत्या  कल्पनेनेच मुलांचा प्राण कंठाशी आला. सगळ्यांनी मोठाले आवंढे गिळले.कसं जमणार आहे? ही भीती खरंतर माझ्याही मनात होतीच पण शूरपणाचा आव आणून  "यंदा नवीन वर्षाची सुरुवात दत्तगुरूंच्या आशीर्वादानेच करायची "असा निर्वाणीचा संदेश दिल्यावर मुलांना गत्यंतरच नव्हतं.ह्या गिरनारच्या डोंगरावर दत्त गुरूंनी तब्बल बारा वर्षं  तपश्चर्या केली. ह्याचा संदर्भ आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात आढळतो.  पण मग फक्त गिरनार न करता आजूबाजूलाही जरा काही हुडकावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे मोहीम आखली गेली. ह्या गिरनारच्या आतापर्यंत आमच्या तीन वाऱ्या झाल्यायत आणि प्रत्येक वेळी गिरनारच्या बरोबरीने जसा जमेल तसा आम्ही गुजरात पालथा घातलाय. तरीही अजून बरंच काही पाहायचं  राहिलंय असंच वाटतंय. 

आपल्यासाठी गुजरातची ओळख खाकरा,ढोकळा,गरबा, फार तर फार गांधीजींची जन्म आणि कर्मभूमी इतकीच काय ती . पण आपला सख्खा शेजारी गुजरात इतका वैविध्यपूर्ण असेल असं तिथे जाईपर्यंत आम्हालाही कधीच  वाटलं नव्हतं. इतकंच काय माझ्या कोणत्याच गुजराती मैत्रिणीने आम्ही जितका पाहिलाय तितका गुजरात अजून पाहिलेला नाही. आताशा सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं "स्टॅचू ऑफ युनिटी"चं अनावरण झालं आणि गुजरात एक पर्यटन स्थळ म्हणून प्रकाशझोतात आलं.ह्या गुजरातला सांस्कृतिक,अध्यात्मिक,व्यावसायिक असे बरेच पदर आहेत,ते जसजसे आपण त्याच्या अंतरंगात  डोकावत जाऊ तसतसे आपल्यासमोर उलगडत जातात. आणि आपण हळूहळू त्याच्या अक्षरशः प्रेमातच पडायला लागतो.गुजरातमध्ये ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या बरीच महत्वाची शहरं आहेत-जामनगर,वेरावळ,जुनागढ,भावनगर,सुरत,अहमदाबाद ,बडोदा ,द्वारका,पाटण,मोधेरा....यादी लांबलचक आहे आणि प्रत्येकाची खाद्य संस्कृतीही वेगळी आहे. पण कोणतंही शहर कोणत्याच अंशाने दुसऱ्या इतर शहरांपेक्षा  व्यावसायिक दृष्ट्या डावं नाही. मला आजही आठवतंय मी माझ्या लहानपणी पाहिलेलं बकाल आणि गावंढळ गुजरात.पण मागच्या काही वर्षांमधला गुजरात चा अतिशय जाणीवपूर्वक केला गेलेला कायापालट वाखाणण्यासारखा आहे.आज गुजरातच्या छोट्यातल्या छोट्या गावात चोवीस तास पाणी आणि वीज पोहोचलेली आहे.राजकीय इच्छाशक्ती असेल तर एखाद्या राज्याचा व्यावसायिक आणि त्यामुळे पर्यायाने आर्थिक आणि राजकीय स्तर किती आणि कुठवर उंचावू शकतो ह्याचा गुजरात हा दाधांत नमुना आहे.कापड उद्योगाबरोबरच इथलं कृषी उत्पन्नही वधारलं. आज भारतातून होणाऱ्या एकूण टोमॅटोंच्या निर्यातीत गुजरात अग्रेसर आहे. नवनवीन उत्तम राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था उभ्या राहताहेत. शहर असो वा  छोटं खेडं,पोटातलं पाणीसुद्धा हलणार नाही इतक्या उत्तम प्रतीचे रस्ते आपल्याला संपूर्ण गुजरातमध्ये फिरताना बिलकुलच ड्रायविंगचा शीण येऊ देत नाहीत.ज्यांना लॉन्ग ड्राईव्हची आवड असेल आणि असं भटक्यासारखं फिरायला आवडत असेल तर त्यांना इथे मनमुराद ड्राइविंगचा आनंद लुटता येईल.अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही आतापर्यंत जितक्या गुजरात मध्ये वाऱ्या केल्यायत त्यात असं जाणवलं की इथे आवश्यक तिथे योग्य त्या signages तर आहेतच पण त्या नसतील तरीही आपण ठरवूनसुद्धा रस्ता चुकू शकणार नाही इतका , वयस्क माणसांपासून ते अगदी १५-१६ वर्षांच्या पोरांपर्यंत ,आपल्याला अगदी बिनचूक रस्ता सांगणारी अवलिया माणसं आहेत. त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही.असो....

१०,००० पायऱ्या चढून जाण्याचा विडा उचललेला असल्यामुळे ,त्या चढल्यानंतर बाकी काही पाहण्याची उमेद राहणार नाही या भीतीने आम्ही गिरनार गाठे गाठेपर्यंत जितकं शक्य आहे तितकं आधीच पाहून घ्यावं म्हणून वाटेवरचं भावनगर,सोमनाथ करायचं ठरवलं . बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतीर्लिंग आपल्याला गुजरात मध्ये पाहायला मिळतात. एक सोरटी सोमनाथ आणि दुसरं द्वारकेतलं नागेश्वर. भावनगरहून दोन एक तासांच्या अंतरावर अगदी समुद्रालगत  हे सोरटी सोमनाथाचं प्रशस्त  देऊळ उभं आहे. ह्या देवळाने मुघलांची किती आक्रमण झेलली आणि झेपवली ह्याला गणतीच नाही.अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तो कायमस्वरूपी. देवळाचं कोरीव काम इतकं कमालीचं रेखीव आहे की  ते नजरेत भरल्याशिवाय राहत नाही आणि गाभाऱ्यातलं फुलांनी सजवलेलं शिवलिंगसुद्धा  इतकं मोहक की आपोआपच इथे तुमचे हात त्याच्यापुढे जुळतात आणि तुम्ही नतमस्तक होता. मंदिराच्या आवारातून समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र पाहताना आपल्यातल्या खुजेपणाची जाणीव होते आणि आपल्या नकळतच डोळयांतून पाणी ओघळतं. इतकी सुंदर कलाकृती कशी काय उद्ध्वस्त करावीशी वाटली असेल आणि इतकी आक्रमणं ह्या वास्तूने तरी  कशी काय झेपवली असतील ह्या नुसत्या विचाराने आपण भावनाविवश  होतो. ह्या सोरटी सोमनाथपासून जवळ भल्लकातीर्थ आहे,जिथे भगवान श्रीकृष्णांनी बाण लागून आपला देह ठेवला. सोमनाथ सोडून अशाच भावनाविवश विचारमग्न अवस्थेमध्ये जुनागढकडे जाताना आम्ही गीरला पाय लावायचे ठरवले.गीरच्या जंगलाची पूर्ण सफारी तर आम्हाला वेळेअभावी अशक्य होती पण देवळालीया नॅशनल पार्कला भेट देऊन आम्ही जुनागढची वाट धरली. सोमनाथकडून जुनागढच्या रस्त्यावरून गाडी हाकताना जरा सावधच .इथे गाडीसमोर कधी हरीण तर क्वचित कधी सिंहदेखील अचानक आपल्या भेटीला येईल ते सांगता येत नाही.आम्ही ह्या रस्त्यावर एका हरणाला उडवता उडवता वाचलो.

जुनागढला पोहोचल्यानांतर ,आम्ही साधारण गिरनार चढायला लागणाऱ्या  वेळाचा अंदाज घेऊन बाकी गावाबद्दलची आणि इतर प्रेक्षणीय स्थळांची  जुजबी माहिती करून घेतली. शेव टोमॅटो भाजी ही  तशी पूर्ण  सौराष्ट्राचीच खासियत, त्यामुळे बाकी काही ढंगाचं खायला मिळेल ना मिळेल पण ह्या शेव टोमॅटो भाजीवर तुम्ही जुनागढमध्ये तरून जाऊ शकता. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच आम्ही ऊन्हं चढण्याच्या आत दत्त मंदिर गाठण्याच्या बेताने चढायला सुरुवात केली. गिरनारच्या ५००० पायऱ्यांवर जैनांचे श्वेतांबर ,७५०० पायऱ्यांवर अम्बाजीचं  देऊळ आणि १०००० पायऱ्यांवर दत्तमंदिर आहे. गिरनारला सुद्धा तुम्हाला चढता उतरताना फिरंगी आढळले तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. म्हटलं ना आपल्याआधी अशा सगळ्या गोष्टींचा कसं ,कुठून,कधी माहित नाही पण तेच सुगावा लावतात. 

जसजशी वेळ पुढे सरकते आणि पहाटेचा कुंद गारवा संपून ऊन्हं वर यायला लागतात तसतसा आपला चढण्याचा उत्साह मावळायला सुरुवात होते पण आजूबाजूने हातात तान्ही मुलं घेऊन चढणारी, वेगवेगळ्या शरीरावस्थेतली, भिन्नविभीन्न शरीर यष्टीची आणि वेगवेगळ्या वयोमानाची चढणारी लोकं पाहून आपण पुन्हा जिद्दीने चढायला सुरुवात करतो. कोणतीही गोष्ट चिकाटीने पूर्ण करण्यासाठी शारीरिक नाही तर फक्त मानसिक बळ लागतं, हे ह्या माणसांना चढताना पाहिलं की प्रकर्षाने जाणवतं. दत्तात्रेय मंदिर गाठेपर्यंतच्या शेवटच्या २५०० पायऱ्या चढताना मात्र देव आठवायला लागतो.पायात पेटके यायला लागतात.ह्या शेवटच्या २५०० पायऱ्या सुरु होण्यापूर्वी अगदी  थेट वरपर्यंत अधेमध्ये सरबत,फळं ,टोमॅटो, Lays ,कुरकुरे  विकणारे ठेले सापडतात.पण शेवटच्या ह्या २५०० पायऱ्या चढताना मात्र आजूबाजूला  साधं पाणी मिळण्याचीही शक्यता संपुष्टात आलेली असते.अशा अवस्थेत कधी एकदा दर्शन घेऊन खाली उतरतोय असं होऊन जातं.परतीच्या वाटेला लागल्यावर ह्या २५०० पायऱ्या संपल्यानंतर अशा छोट्या मोठ्या ठेल्यांचा आपल्याला खूपच मोठा आधार वाटतो. सुदैवाने अजून तरी कोणतीही पंडेगिरी नाही किंवा गुजरात सरकारने ह्या देवस्थानाचं  कोणतंही  बाजारीकरण केलेलं नाही त्यामुळे दत्तात्रेयांच्या पादुकांचं पावित्र्य आणि आणि त्या जागेचं मांगल्यही टिकून आहे. देवळाच्या आत पाऊल ठेवता क्षणीच कसं शांत, प्रसन्न वाटतं आणि पायऱ्या चढताना झालेले श्रम काही क्षणांपूरेसे का होईना विसरायला होतात. देवळातले गुरुजी देखील "नीचे जा के प्रसाद का भोजन खा के जाना,फ्री हैं " म्हणून हमखास आग्रह करतात .दत्तात्रेय मंदिरापासून खाली साधारण पाचशे पायऱ्या उतरून धुनीचं दर्शन घेता येतं आणि इथेच महाप्रसादाची सोयही केलेली आहे.ज्यांच्यात थोडा बहुत उत्साह बाकी असेल त्यांनी अवश्य ह्या महाप्रसादाचा  लाभ घ्यावाच घ्यावा असं मी नक्कीच सांगेन.दमून भागून तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या महाप्रसादाची चव अमृततुल्य वाटते.हो,पण महाप्रसादाच्या जागी तुम्हाला पाण्याचा एक थेंबदेखील वाया घालवायला परवानगी नसल्यामुळे  तिथे हात धुणं,चूळ भरणं ह्या गोष्टींना सक्त मनाई आहे. संपूर्ण १०,००० पायऱ्या उतरून पायथ्याशी येईपर्यंत पायाचा एक एक सांधा बोलायला लागतो.इतके श्रम करून इतक्या पायऱ्या चढून वर गेल्यांनतर तिथे एका छोट्याशा झोपडीसदृश देवळामध्ये पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दोन पादुकांशिवाय  खरंतर काहीच नाही पण तरीही इतका सगळा त्रास होऊनही दरवर्षी डिसेंबर आला की आम्हाला आजही गिरनारला जाण्याची ओढ लागते एवढं मात्र खरं.काही किती तरी जादू नक्कीच आहे त्या देवस्थानात. खरं नसेल वाटत तर मी तर म्हणीन एकदा तरी अनुभव घेऊन पहाच. 

पाहण्यासारखं तर बरंच काही आहे गुजरातमध्ये. गिरनारयात्रा ही तर गुजरातच्या आध्यात्मिक चेहऱ्याची एक छोटीशी झलक आहे. यंदा  झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या निमित्त्याने आपल्या पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांना २०२२ पर्यंत भारतातल्याच १५ पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन केलेलं आहेच.
चला तर भारत भ्रमणाच्या ह्या मोहिमेची सुरुवात त्यांच्याच राज्यापासून करूयात,काय मग जाणार नं ...? 


ચાલો ગિરનાર જઈ યે !!



माधुरी गोडबोले-माईणकर 
www.valuevacations.co.in 

११ डिसेंबर २०१९



Comments

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता