आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग २)
यात्रा सुरु होण्याच्या दिवशी भल्या सकाळी मानसरोवर भवनात असलेल्या शंकराच्या देवळात रीतसर रुद्राभिषेक वगैरे केला गेला. काही कैलास सेवी , दिल्लीतच राहणाऱ्या यात्रेकरूंचे आप्तेष्ट त्या दिवशी सकाळी निरोप द्यायला आवर्जून हजर होते त्यामुळे आम्ही कैलास परिक्रमेला नाही तर शुभांषु शुक्ला सारखे अंतराळ स्थानकावर जायला निघाल्यासारखं वाटत होतं आणि तितकंच मनावरचं दडपणही वाढत होतं. यात्रा सुरु करण्यापूर्वी काही कैलास सेवी स्वयंसेवक आणि स्वतः उत्तर प्रदेश सरकार ह्या यात्रेमध्ये उपयोगी पडतील असे संच नाहीतर छोट्या मोठ्या वस्तू येता जाता वाटत असतात, तुमची इच्छा असेल नसेल त्यात इतकं प्रेम आणि सेवाभाव ओथंबत असतो की ते अव्हेरणं म्हणजे स्वतःलाच मुजोरपणा वाटावा.आता ह्या संपूर्ण यात्रेदरम्यान खराखुरा आधारस्तंभ कोणता असेल तर तो म्हणजे ITBP , आपले भारत तिबेट सीमा पोलीस.भारताची सीमा ओलांडून आम्ही चीन मध्ये प्रवेश करेपर्यंत भारत तिबेट सीमा पोलिसांचं पथक अद्यययावत रुग्णवाहिनीसहित सतत सावलीसारखं आमच्याबरोबर होतं.
 |
धारचूलाची संध्याकाळ
|
दिल्ली सोडल्यावर यात्रेचा पहिला थांबा होता टणकपूर ,पण ह्या थांब्या आधी आम्ही रुद्रपूरमध्ये दुपारच्या जेवणाकरता थांबणार होतो. रुद्रपूरच्या एका मोठ्याशा रिसॉर्टमध्ये बसेस थांबल्या तेव्हा काही लोकांचा घोळका, स्थानिक न्यूज चॅनेल्सचे वार्ताहर आधीच आमचं स्वागत करायला सज्ज उभे होते ,बसमधून उतरत असताना ,"ओम नमः शिवाय ,"च्या गजरात आमच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरु झाला, औक्षणाची तबकं पुढे आली , रीतसर पारंपरिक पद्धतीने औक्षण वगैरे झालं,नक्की काय सुरु आहे ,आम्ही असे कोणत्या मोहिमेवर निघालो होतो की किंवा कोणतं युद्ध जिंकून आलो होतो की असं जंगी स्वागत केलं जात होतं हे सगळं उमगण्याच्या पलीकडे होतं. पूर्वीच्या संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर , संत सखू अशा कृष्ण धवल मराठी चित्रपटांमध्ये ट्रिक सीन्स दाखवताना वरून स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करत असल्याचा प्रसंग हमखास दाखवलेला असायचा , आज आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवत होतो,फक्त पुष्पवृष्टी होत होती ती स्वर्गातून नाही तर समोरून. त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी न्यूज चॅनेल साठी मी byte दिला पण प्रवास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं हे byte देणं सुद्धा रोजनिशीचा भाग झालं. बरं , जेवायला प्रकार तरी किती असावेत ह्याची गणतीच नाही , आतापर्यन्त मी तरी जास्तीत जास्त सेव्हन कोर्स मिल्स ऐकली होती पण इथे सगळा वेगळाच मामला होता कोणताही प्रकार ठेवायचा सोडला नव्हता,एखाद्या शाही लग्नाचं जेवण झोडतोय असं वाटत होतं. त्या दिवशी पहिलाच श्रावणी सोमवार असल्यामुळे काही यात्रेकरूंचा उपास होता, त्यांनाही अजीर्ण होईपर्यंत रुद्रपूरच्या कैलास सेवा समितीने सुका मेवा, मिठाया,फळं खाऊ घातली. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था झाली होती त्यांची.त्यांचे स्वयंसेवक इतकं जातीने स्वतः आम्हाला काय हवं नको ते पाहत होते की अगत्य आणि प्रेम सुद्धा अजीर्ण होऊ शकतं हे पहिल्यांदा अनुभवलं. यात्रा संपपर्यंत हे असं कधी फुलांच्या,कधी गुलाबाच्या पाकळ्यांनी नाहीतर हारतुरे घालून आगत स्वागत , बडा खाना, स्थानिक लोकांची आणि मुलांची स्वागतपर नृत्यांचं सादरीकरण , न्यूज चॅनेलचं हे स्वागताचे नाहीतर निरोपाचे समारंभ कव्हर करणं ,आम्ही त्यांना bytes देणं हळूहळू अंगवळणी तर पडलं पण आपण ह्यासाठी खरंच लायक आहोत का ? हा प्रश्न मात्र शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिला होता.
दुसऱ्या दिवशी धारचूलाला जाण्यासाठी निघेपर्यंत धारचूला आणि गुंजी मधला रस्ता बंद असल्याची पुसटशी खबर आमच्या तुकडीबरोबर आलेल्या मुख्य संपर्क अधिकाऱ्यांना लागली होती , शिवाय त्यांची तब्येतही काही फारशी ठीक नव्हती त्यामुळे पिथोरागडला दुपारच्या जेवणानंतर आपण सगळेच जरा इथे एक दीड तास लवंडू या म्हणून त्यांनी फतवा काढला. असं कोणत्याहीयात्रा नाहीतर सहली दरम्यान टूर मॅनेजर झोप काढायला थांबल्याचं पहिल्यांदाच आमच्या पाहण्यात आलं. वास्तविक धारचूलात एक रात्र थांबून दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे गुंजीला जायला निघणार होतो म्हणजे रस्ता बंद असण्याचा म्हटलं तर तसा कोणताच परिणाम आमच्या त्यादिवशीच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेवर झाला नसता . पूर्ण यात्रेत संपर्क अधिकारी म्हणून बरोबर आलेले सरकारी अधिकारी त्यांच्या सरकारी अधिकारी असण्याचा अकारण गैरवापर आणि दुरुपयोग करतात हे लक्षात येत गेलं . शिवाय ते कोणी व्यावसायिक टूर ऑपेरेटर्स नसल्यामुळे आधी यात्रा घडवून आणल्या असल्या तरी नियोजनातही बऱ्याच त्रुटी असतात ज्या त्यांनी ठरवलं तर सहज टाळता येऊ शकतात.पण अशा यात्रांवर सुद्धा ते यात्रेकरूंना प्राधान्य देण्याऐवजी सरकारी पैशांवर स्वतःच्या यात्रा आरामदायी करण्यावर आणि स्वतःच्या जीभेचे चोचले पुरण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत असल्यामुळे ते त्यांचा सरकारी अधिकारी असल्याचा अहंकार आणि मानपान सोडत नाहीत. उलट कोणतेही यात्रेकरू कोणतीही क्षुल्लक अडचण जरी घेऊन गेलं तरी " ये LO का लुक आऊट नहीं हैं ""असंच त्यांना उत्तर मिळायचं , विशेषतः दुय्यम संपर्क अधिकाऱ्याकडून. सरकारी यात्रेत येणारे अर्ध्याहून अधिक यात्रेकरू हे सरकारी संस्थांमध्ये काम करणारे असल्यामुळे प्रत्येकाच्या अहंकाराने काय अडचणी आल्या असतील हे सांगायला नको. आमचे मुख्य संपर्क अधिकारी साधारण पन्नाशीच्या घरातले उत्तर भारतीय होते. त्यामुळे यात्रेच्या एक दोन दिवसातंच हिंदी भाषिकांचा गट आणि एक दक्षिण भारतीयांचा गट तयार झाला होता. त्यातही ह्या मुख्य संपर्क अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी घसट करू पहात असलेल्या साधारण पस्तिशीच्या गटातल्या हिंदी भाषिकांचा ,अगदी परखड भाषेत बोलायचं तर त्यांच्या चमच्यांचा एक गट तयार केला होता , जे ह्या मुख्य संपर्क अधिकाऱ्यांचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि प्रतिनिधी होते . अधिकार गाजवण्याचा अट्टाहास आणि हव्यास माणसाला कोणत्याही स्तराला नेऊ शकतो. आपल्याला संपर्क अधिकाऱ्यांचा कायमच पुरेसा पाठींबा आणि फूस आहे ह्याचा वास लागल्यामुळे यात्रेच्या अखेरी पर्यंत काही यात्रेकरूंनी घोडे पोर्टर घ्यायला नकार दिल्यामुळे किंवा फक्त पोर्टर घेतल्यामुळे त्या त्या यात्रेकरूंवर शिस्तशीर कारवाई करण्याच्या उघड धमक्या देण्यापर्यंत ह्या सो कॉल्ड स्वयंघोषित हस्तकांची मजल गेली होती. अगदी यात्रा संपायच्या आदल्या दिवशी तर कोणाच्याही मध्यस्थीला न जुमानता एका ज्येष्ठ यात्रेकरूच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्कीही केली गेली होती.स्वतःच्या डोळ्यासमोर कोणी जास्त ताकदीचा कमी ताकदीच्या माणसाला धक्कबुक्की करताना पाहूनही ते थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याऐवजी त्याचा मूक साक्षीदार होणं मुख्य संपर्क अधिकाऱ्यांनी पसंत केलं होतं.त्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनावरच्या अपमानाच्या जखमांवर खरोखरच मलम लावलं गेलं की नाही ते माहित नाही पण नंतर गावामागून जाग यावी तशी त्या रात्री मुख्य अधिकाऱ्यांनी स्वतःला नोबेल शांती पुरस्कारासाठी आपण किती लायक आहोत हेसिद्ध करण्यासाठी शांतिदूताचा आव आणत त्या दोघांमध्ये शांतिपूर्वक सलोखा करवल्याचं नाट्य घडवलं होतं आणि त्याचा रीतसर फोटोही आमच्या व्हॉट्सऍप समूहात पोस्टला होता. असो. तर अशा आमच्या अतिशय कार्यक्षम मुख्य संपर्क अधिकाऱ्यांच्या फतव्यामुळे त्या दिवशी धारचूलाकडे निघण्यासाठी तास दीड तास उशीरच झाला, तिथवर पावसाने सुद्धा काळी पाचचा सूर लावला. अशा भर पावसातही शिस्तीत रांगेने उभे राहून ITBP चे सगळे जवान तास दीड तास चिंब भिजत आमच्या बसेस त्यांच्या छावणीवरून जाताना त्यांच्या हातातले तिरंगे फडकावून आम्हाला निरोप द्यायला तिष्ठत थांबलेले पाहिल्यावर तर आम्हाला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.कैलास परिक्रमेला जातोय म्हणून कितीकौतुकसोहळे बांधावेत ..
 |
| धारचूला मधून दिसणारं काली नदीपलीकडचं नेपाळ |
आदी कैलासच्या यात्रेनिमित्त किंवा ह्या मानसरोवर यात्रेनिमित्त कधी धारचूलाला गेलात तर तिथलं "रंग म्युझियम" अगदी आवर्जून पहा. "रंग" ह्या आदिवासी जमातीचं दैनंदिन आयुष्य आणि जीवनशैली दाखवणारं हे म्युझियम जरी छोटेखानी असलं तरी त्यामागे त्यांनी खूप मेहनत घेतलीय. ह्या रंग म्युझियममधून बाहेर पडत असताना एका छोट्या बंद काचेच्या पेटीत काही विशेष जतन करून ठेवलेल्या गोष्टींनी माझं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी परिधान केलेली वस्त्रं, चपला,टोपी,गमचा इत्यादी ऐवज. आपले पंतप्रधान २०२२ मध्ये जेव्हा आदी कैलासच्या यात्रेवर आले होते तेव्हा त्यांनी परिवधान केलेली वस्त्र ह्या रंग म्युझियमने अतिशय निगुतीने जतन करून ठेवलेली पहिली तेव्हा मी कुतूहलाने त्यांना विचारलं ,"का बरं हे इतकं जपून ठेवलंय तुम्ही ? आतापर्यंत आलेल्या इतर सगळ्या पंतप्रधानाची वस्त्रं तर तुम्ही जपून ठेवलेली तर नाही दिसतयंत ? ". त्यावर लागलीच त्या म्युझियमचा गाईड हसून म्हणाला ,"कोई आया होता इसके पहले तो रखते उनके भी कपडे रखते ऐसे सजा के ,कभी कोई आया हीं नहीं उनसे पहले, वो आये और आदी कैलाश के बारे में लोगों को पता चला और हमें आदी कैलाश की यात्रा कराने का व्यवसाय मिलने लगा तब तक किसी को पता ही नहीं था, आदी कैलास के बारे में !" आम्ही कन्नौजला FFDC मध्ये गेलो होतो तेव्हा त्याच्या डायरेक्टरांशी आमच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि वाराणसी विषयी सुरु असलेल्या गप्पांदरम्यान त्याचे डायरेक्टर सहज म्हणाले होते, "अब ऐसा है ना, मोदीजी जिस चीज पर हाथ रख देते हैं वह रातोरात ब्रँड बन जाता हैं," हा त्यातलाच प्रकार होता बहुतेक.
 |
| पंतप्रधान नरेंद्र मोदींची जतन केलेली वस्त्रं |
धारचूला ते गुंजीचा रस्ता दुसऱ्या दिवशीही बंद असल्यामुळे ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे धारचूलात एक रात्र थांबण्याऐवजी आम्हाला दोन रात्री काढाव्या लागल्या. त्याच्या पुढच्या दिवशीसुद्धा रस्ता अंमळ जरा उशिरानेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, धारचूला ते बुदीच्या मध्ये एक काहीसा धोकादायक भाग आहे जिथे सातत्याने भूस्खलन होत असतं त्यामुळे तितका टप्पा आम्ही सुखरूप पार करेपर्यंत , धारचुलाहून निघताना उत्तराखंड पोलीस पाठीराख्यासारखे आमच्या जीपच्या ताफ्याच्या मागेपुढे होते. अशा दर्जाची सुरक्षा यंत्रणा तर आतापर्यंत फक्तमंत्र्यासंत्र्यांसाठीच राबवलेली पाहिली होती. थोड्याफार बऱ्या ढंगाचं KMVN फक्त धारचुलापर्यंतच आणि काही विसरलेलं आवश्यक सामानसुमान मिळण्याची शेवटची आशा.हॉटेल म्हणता येईल अशा दर्जाचं KMVN शेवटचं धारचूलाचं , तशी तर KMVN ची हॉटेल्स टू स्टार दर्जात येतात आणि बुदी , गुंजी किंवा नाभीडांगची KMVN म्हणजे फक्त बंकर्स आणि सोयींचा दर्जा सुमारपेक्षाही सुमार, मग त्या बेडशीट्स असतील नाहीतर स्वच्छतागृह सगळाच आनंद.पण यात्रा म्हटलं की तक्रारीला जागा नाही,जे आहे जसं आहे तसं स्वीकारणं हा यात्रेचा पहिला नियम त्यामुळे हाताची घडी आणि तोंडावर बोट. आमच्या आधीच्या यात्रेकरूंच्या तुकड्यांना त्यांच्या गुंजीच्या वास्तव्यात आदी कैलासला नेऊन आणल्याची टिप आमच्या गोटातल्या गोपनीय सूत्रांना यात्रा सुरु होण्यापूर्वीच मिळाली होती त्यामुळे आम्हीही वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचं ठरवलं आणि आमच्या संपर्क अधिकाऱ्यांना आम्हालाही आदी कैलासला नेऊन आणण्याची गळ घातली आणि ते चक्क तयारही झाले. २०२२ मध्ये आपल्या पंतप्रधानांच्या आदी कैलास भेटीच्या निमित्ताने अगदी विक्रमी मुदतीत आदी कैलासचा रस्ता चककचक तयार झाला होता,त्यामुळे सुदैवाने आदी कैलासला जाताना तरी हाडं जागच्या जागी राहतात.आदी कैलास हा "पंच कैलास" पैकी एक ज्याला छोटा कैलास सुद्धा म्हणतात. कारण बरीच गोष्टीत साधर्म्य आहे .दिसायला साधारण मोठ्या कैसा सारखाच फक्त साहजिकच उंची कमी पण मोठ्या कैलासाच्या पायथ्याशी मानसरोवर आहे तसं इथे पार्वती सरोवर आहे , इथेही मुख्य किंवा मोठ्या कैलास सारखं गौरी कुंड पण आहे. पण शेवटी बडा भाई तो बडा भाईच ..
 |
| आदि कैलास |
 |
| आदि कैलासचं देऊळ |
 |
| देवळाच्या मागचं पार्वती सरोवर |
गुंजीला आणि नाभीडांगला ITBP च्या छावणीत पुन्हा एकदा ITBP च्या डॉक्टरांकडून रक्तातल्या ऑक्सिजनची आणि रक्तदाबाची चाचणी केली जाते,प्रत्येक वेळी वैद्यकीय तपासणी म्हटलं की ताण कारण ह्यातल्या कोणत्याही ठिकाणी काहीही गडबड वाटली तर यात्रेकरूंना तिथूनच माघारी पिटाळलं जातं. गुंजीला इमिग्रेशन होताना आम्हाला IB च्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा briefing देण्यात आलं त्यामुळे चीनमध्ये किती काळजीपूर्वक वावरावं लागेल ह्याचं भान आलं. इतर खाजगी यात्रांमधून नेपाळमार्गे जाणाऱ्या यात्रेकरूंवर इतकी बारीक नजर ठेवली जात नाही पण सरकारी यात्रेतून जाणाऱ्या यात्रेकरूंवर मात्र फार बारीक नजर ठेवली जाते हेही कळलं.चीनमध्ये आठ दिवस तुम्ही जवळपास आभासी कारागृहातच असणार आहात त्यामुळे काळजीपूर्वक फिरा अशी सावधानीची सूचना दिली गेली , शिवाय यात्रेकरू म्हणून तुम्ही आम्हाला काय काय आणि कशा पद्धतीने मदत करू शकता ह्याबद्दलही जागरूकता दिली गेली. दिल्ली सोडल्यापासून वाटेत जितक्या ITBP च्या छावण्या लागल्या होत्या त्या प्रत्येक छावणीतल्या जवानांनी कधी बडा खाना तर कधी चहान्याहारीचं आयोजन केलं होतं , शेवटी शेवटी तर त्यांच्याकडून पाहुणचार करून घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली. आता ह्या गुंजी आणि नाभीडांग मध्ये हिवाळ्यात दहा दहा फूट बर्फ पडतं,तिथे काही मनुष्यवस्ती असेल असा संशयही कोणाला येणार नाही. अशा वेळी ह्या जवानांना पंधरा पंधरा दिवस शिधाही पोहचत नाही ,जे आणि जितकं साठवणीत शिल्लक असेल त्यात उदरभरण करावं लागतं असं असतानाही प्रत्येक वेळी ५० -५० च्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुक्त हस्ते शिधा वापरणं कसं काय जमतं ते देवच जाणे.गुंजी ते नाभीडांग दरम्यान काला पानी मध्ये काली मातेचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन मग पुढे यात्रेला निघण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आम्हीही काली मंदिरात दर्शन घेतलं, ह्या देवळाची व्यवस्था आपलं सैन्य पाहतं. ITBP च्या जवानांसारखचं आपल्या सैन्य सुद्धा आमचा यथोचित पाहुणचार करण्यात कमी पडलं नाही.
भारतातल्या बाजूला आता आमचा शेवटचा मुक्काम होता - नाभीडांग. त्या दिवशी राखीचा सण होता आणि आपल्या सैन्याची छावणी आमच्या कुमाऊ मंडळाच्या मुक्कामाला लागूनच होती. राखीचा सण तोंडावर होता आणि जागोजागी ITBP चे जवान नाहीतर आपलं सैन्य असेल ह्याची कल्पना होतीच त्यामुळे आम्ही तीन चार बायकांनी आमच्या टणकपूरच्या मुक्कामात काही राख्या घेऊन ठेवल्या होत्या.शेजारीच लष्कराची छावणी पाहून आम्ही संधी साधून जवानांना राखी बांधण्यासाठी छावणीत शिरलो. असं अनपेक्षितपणे कोणीतरी राखी बांधायला आलेलं पाहून त्यांनाही सुखद धक्का बसला होता , राखी बांधून झाल्यावर त्यातल्या एका जवानाने ,"खाली हाथ राखी नहीं बंधवाते ," म्हणत पटकन आतून घेऊन येऊन मिठाईचा बॉक्स आणि शंभर रुपये आमच्यासमोर ठेवले तेव्हा काय बोलावं तेच कळेना. कसेबसे ते शंभर रुपये परत घ्यायला त्याला भाग पाडून त्याचा मान आणि मन राखण्यासाठी त्याने प्रेमाने देऊ केलेला मिठाई बॉक्स तेवढा ठेवून घेत आम्ही समाधानाने मुक्कामी परतलो.कुमाऊ मंडळाचे बंकर्स जिथे आहेत त्याच्या अगदी बरोबर समोर हवामान चांगलं असेल तर ओम पर्वत दिसतो. त्या दिवशी हवामान फार चांगलं नसल्याने आम्हाला "ओम"ची फक्त खालचीच मात्र दृष्टीस पडत होती. पण हेही नसे थोडके.नाभीडांगमध्ये चीनमधल्या आठ दिवसांसाठी लागणारं आवश्यक ते सामान वेगळं करून बाकीचं सामान तिथेच सोडायचं होतं जे आम्हाला भारतात पुन्हा परतल्यावर गुंजीमध्ये मिळणार होतं ,असंही नाभिडांगच्या कुमाऊ मंडळाच्या बंकर्सचं आकारमान गुंजीच्या बंकर्सपेक्षा सुद्धा लहान असल्यामुळे बहुतांशी सामान आम्ही सगळ्यांनी गुंजीतच ठेवलं होतं,तरीही उरला सुरला सगळा दिवस packing आणि unpacking मध्ये कसा गेला ते कळलंच नाही.
क्रमशः
कैलासी माधुरी गोडबोले माईणकर
७ सप्टेंबर २०२५
Comments
Post a Comment