आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ३)
दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता लिपू पास ओलांडून चीनमध्ये प्रवेश करायचा होता.ह्याआधी २०१९ पर्यंत नारायण आश्रम ते लिपू पास हे अंतर पायी कापायला एक आठवडा लागत असे आता लिपू पास पर्यंत जरी पक्का रास्ता बांधलेला नसला तरी लिपू पासच्या आधी अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅक्सने जाता येतं ,पण जो काही सो कॉल्ड रस्ता आहे त्याला रस्ता म्हणायचं का असा प्रश्न. नाभीडांग ते लिपू पास अंतर होतं खरंतर सात आठ किमीचं पण इतक्या कमी अंतरात सुद्धा एक हाड जागेवर राहील तर शपथ. गुंजीतल्या ITBP चे जवान आम्ही सगळे सुरक्षितपणे लिपू पास ओलांडून भारताची सीमा पार करेपर्यंत आम्हाला सोबत करणार होते , नियमाप्रमाणे एक रुग्णवाहिकासुद्धा आमच्या ताफ्याबरोबर होतीच.सीमेवर ITBP च्या जवानांनी आम्हाला सुरक्षितपणे चिनी हद्दीत प्रवेश दिला आणि त्यांना निरोप देऊन आम्ही भारताची सीमा ओलांडली. सीमेवर चिनी पोलीस आमच्या दस्तावेजांची छाननी करण्यासाठी आधीच वर येऊन थांबले होते. चिनी सरकारचा टूर कोऑर्डीनेटर पारंपारिक तिबेटी पांढरे गमचे घेऊन स्वागतासाठी हजर होता. आमच्या संपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या बसेस पाचवर्षांपूर्वीं पण पाठवल्या जात होत्या त्याच बसेस आम्हाला न्यायला आल्या होत्या. बसमध्ये बूड टेकता क्षणीच आम्हा सगळ्यांना बसचे पडदे बंद करून घेण्याची सूचना करण्यात आली.गुप्तचर विभागाचं briefing झालं नसतं तर हे आमच्यासाठी अनाकलनीय असतं पण ते झालेलं असल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला काहीशा अपेक्षितच होत्या. इमिग्रेशन ऑफिस मध्ये पोहोचल्यावर प्रत्येकाचे पासपोर्ट्स , शरीराची तापमानं आणि फोनच्या फोटो गॅलऱ्या कसून तपासल्या गेल्या.माझ्या नवर्याच्या पासपोर्टसहित काहींच्या पासपोर्ट्सचे फोटोही काढले गेले, ते का आणि कशासाठी ते त्यांनाच माहित. पण ह्या सगळ्याची पूर्वकल्पना आम्हालागुप्तचर विभागाने आधीच दिली होती.साधारणपणे तुम्ही सरकारी यात्रेतून जा नाहीतर खाजगी ,बहुदा तरी चीनने मानसरोवरला येणाऱ्या सगळ्या यात्रेकरूंसाठी टकलाकोटमध्ये मुद्दाम म्हणून एकच हॉटेल राखून ठेवलं आहे की काय कोण जाणे कारण खाजगी आणि सरकारी जेवढ्याम्हणून यात्रेकरूंच्या तुकड्या येत होत्यात्या सगळ्या त्याच हॉटेलमध्ये उतरवल्या जात होत्या.त्यांना येणाऱ्या यात्रेकरूंवर पाळत ठेवणं सोयीचं व्हावं यासाठी असेल कदाचित कारण ह्या हॉटेलसमोरच पोलीस चौकी आहे आणि त्या संपूर्ण रस्त्यावर दर थोड्या थोड्या अंतरावर आणि अगदी बसेसमध्ये सुद्धा CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. हॉटेलपासून अगदी नजीकच्या भागात तेवढं फिरायला जाण्याची परवानगी मिळते तेही दोघातिघांच्या संख्येने,मोठ्या घोळक्याने नाही.
तकलाकोटमध्ये सुद्धा वातावरणाशी जुळवून घेण्याच्या उद्देश्याने आम्ही दोन रात्री मुक्काम करणार होतो. तकलाकोटपासून आमच्याबरोबर आलेले भारत तिबेट सीमा पोलिसांचे चार जवान आमचे बल्लवाचारी असणार होते.आता त्यांच्या पाककलेचा आणि आमच्या सहनशक्तीचा कस लागणार आहे ह्याची कल्पना नव्हती. वास्तविक पाहता स्वयंपाक हा काही त्यांच्या कर्तव्याचा भाग नाही पण पांडवांना जसं अज्ञातवासात वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागल्या होत्या हे तसंच होतं.साम्य तरी पहा की अज्ञातवासात भीमाने बल्लवाचाऱ्याची भूमिका वठवली आणि इथे आमच्यापेक्षा शक्तिशाली ते जवान बल्लवाचारी बनून आमच्या उदरभरणाची जबाबदारी घेणार होते.यात्रा सुरु होण्यापूर्वी प्रत्येकी ठराविक रक्कम कॉमन पूलमध्ये जमा केली होती ज्यातून ह्या चीनमधल्या एका आठवड्यासाठी पुरेल इतका शिधा,लागणारी भांडीकुंडी घेऊन जाणं,ते सगळं जबाबदारीने वापरणं आणि सांभाळणं ही जितकी त्यांची जबाबदारी असते तितकीच यात्रेकरूंच्या तुकडी बरोबर येणारे दोन संपर्क अधिकारी आणि यात्रा सुरु होण्यापूर्वी यात्रेकरूंमधूनच तयार केली गेलेली जी अन्न समिती असते त्यांची पण असते.आमचे दोन्ही संपर्क अधिकारी स्वतःमध्येच मश्गुल होते. त्यांचा उद्देश्य यात्रेकरूंच्या अडचणी सोडवणं ,त्यांनागरज पडली तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जी मदत करणं शक्य असेल ती करणं किंवा ITBP च्या जवानांना आवश्यक ती मदत करणं ह्या त्यांच्या असलेल्या अपेक्षित आणि अभिप्रेत असलेल्या भूमिका बजावण्याऐवजी स्वतःला कोणतीही तोशिष न होता सरकारी पैशांवर आपली यात्रा आपल्या इच्छेनुसार पूर्ण करणं हा मथळा घेऊन यात्रेवर आले होते. शिवाय ही यात्रा नेऊन आणणं हा त्यांच्या कामाचा भाग असतो त्यामुळे रजा वाया न जाता त्यांना सुट्टीचा आनंद घेता येतो आणि पुढच्या बढतीसाठी फायदा होतो तो वेगळाच, कारण यात्रेला त्यांनी त्यांची अपेक्षित भूमिका निभावलीत की नाही किंवा कर्तव्यं बजावलीयत की नाही हे त्यांना कोणीही विचारत नाही. खरंतर यात्रा सुरु होण्यापूर्वी सामान समिती,अन्न समिती,खोल्या वाटप समिती,शिस्त समिती अशा वेगवेगळ्या समित्या तयार केल्या गेल्या होत्या आणि जातात ,अर्थातच त्यातले जे सदस्य असतात ते मनाविरुद्धच त्या त्या समित्यांमध्ये ढकललेले असल्यामुळे पुढाकार घेऊन तर नाहीच पण बळजबरीनेसुद्धा कोणाची काम करण्याची इच्छा नसते. आधी म्हणाले तसं जेव्हा असे काही अति उत्साही कार्यकर्ते दिसतात तेव्हातर अजूनच सगळे लागलीच हि नको असलेली जबाबदारी झटकून मागे हटतात. त्यात तथाकथित अनुभवी संपर्क अधिकाऱ्यांना आपला अधिकार कुठेच गमवायचा नसल्यामुळे ते ही वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या असतानासुद्धा प्रत्येक छोट्या मोठ्या बाबीत हस्तक्षेप करत होते ,त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या.मग कोणती कामं निर्वेधपणे बिनधोक आणि बिनचूक कशी होणार होती.आधीच्या तुकडीच्या संपर्क अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका कोणाच्याही निदर्शनास न येता किंवा आणू देता सरकावल्या गेल्या असल्या की ह्या गोंधळात अजूनच भर पडते. विशेषतः चीनसाठी आधी खरेदी केल्या गेलेल्या भांड्या कुंड्यांच्या हिशोबाच्या बाबतीत. मग कॉमन पूल मधल्या पैशांनी ,अगदी चिनी युवान मोजून खरेदी केलेल्या भाज्या, भांडीकुंडी, सामानाचा आणि जिन्नसांचा योग्य विनियोग न होता उलटपक्षी अविचाराने सामान खरेदी झाल्यामुळे , न वापरल्यामुळे (काही ठराविक गटांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्यामुळे ) , काय काय आणि किती प्रमाणात करायचं ह्याच्या स्वच्छ सूचना न दिल्या गेल्यामुळे, प्रमाणाबाहेर अन्न तयार केलं गेल्यामुळे ते कोणा भुकेल्याच्या मुखी लावण्याऐवजी फेकून देणं, जिन्नस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना गायब होणं किंवा आवश्यक असलेले जिन्नस कमी पडणं सारखे प्रकार सर्रास ठरलेले असतात. किलोकिलोने विकत घेतलेली भाजी न वापरल्यामुळे सडताना पाहून किंवा शेलकी जिन्नस वापरून रचापचा शिजवलेलं अन्न फेकून देताना पाहून आपला जीव जरी आतून कितीही तुटला तरी आपण हतबल असतो. कारण प्रत्येक बाबतीत आम्हालाच सगळं कळतंय हा सरकारी पदाधिकारातून वर्षानुवर्षे पोसला गेलेला आपला अहंकारी बाणा संपर्क अधिकारी सोडायला तयार नसतात.
आता एकदा आपण चीनमध्ये प्रवेश केला की तर प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून पाहावी लागते. तुमच्याकडून तिथल्या टॉवेलवर लिपस्टिक नाहीतर कुंकवाचे डाग किंवा इतर तत्सम डाग पडलेले असतील,किंवा आंघोळीसाठी किंवा चेहरा पुसायला दिलेल्या टॉवेल्सचा तुम्ही चुकून पायपुसणं समजून वापर केलात तर त्यासाठी ५०० किंवा ६०० युवान दंड आकाराला जातो.त्यामुळे खोलीचा ताबा मिळाल्या मिळाल्या आम्ही सगळ्यांनी अगदो बाथरूम मधल्या शॉवर्स, नळापासून, टॉवेल्स पर्यंत एक एक गोष्ट वापरण्यापूर्वीच असे संभावित दंड टाळण्यासाठी कसून तपासून आणि आवश्यक असेल तिथे दुरुस्त करून किंवा बदलून घेतली.शिवाय खोली किंवा वस्तू वापरण्यापूर्वी त्याचा व्हिडिओ सुद्धा काढून ठेवला. तकलाकोटकडून दार्चेनकडे जाताना आम्हाला पहिलं दर्शन घडलं ते राक्षस तालचं , खरंतर इतक्या देखण्या निळाशार दिसणाऱ्या राक्षसतालला तितकंच सुंदर नाव मिळण्याऐवजी त्याला हे न शोभणारं नाव का मिळालं असावं ? जवळपास एकमेकांना खेटून असणाऱ्या असलेल्या ह्या राक्षसताल आणि मानसरोवर ह्यांचा खालून येत असलेल्या पाण्याचा स्रोत एकच आहे पण असं म्हणतात की राक्षसतालचं पाणी खारं आहे आणि मानसरोवरचं मात्र गोड आहे. राक्षसतालचं पाणी हे रावणाचं मूत्र आहे म्हणून खारट आहे असं मानलं जातं, ह्यात किती तथ्य आहे माहित नाही पण ह्या राक्षसतालचं पाणी मतिमंद मुलांसाठी गुणकारी असल्याचा दावा केला जातो , ह्याला काही विज्ञाननिष्ठ पुरावे आहेत की नाही कोणास ठाऊक. राक्षसताल दिसत तर सुंदर होता पण आमच्या सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या ह्या कथेच्या खऱ्याखुऱ्या नायकाकडे, मानसरोवरकडे . राक्षसताल ओलांडून जेमतेम दहा मिनिटांत आमच्या आसुसल्या डोळ्यांना मानसरोवरचन पहिलं मुखदर्शन घडलं आणि कृतार्थ झाल्यासारखं वाटलं.
ऐन दुपारी बाराच्या ऊन्हात त्याचं सौंदर्य निखरून येत होतं.प्रत्यक्ष पाहीपर्यंत आम्ही फक्त ऐकलं होतं की राक्षसताल तर कायम निळाच दिसतो पण मानसरोवरचा रंग मात्र सतत बदलत असतो, ते ह्याची देही ह्याची डोळा अनुभवलं, विलक्षण अनुभव आहे तो. ज्यांचे ज्यांचे रोमिंग data packs होते त्यांनी पटापट फोन काढून व्हिडिओ कॉलवरून आपापल्या जवळच्या आप्तेष्टांनासुद्धा त्याचं साक्षीदार केलं.राक्षसताल काय किंवा मानसरोवर काय दोन्ही ठिकाणी किती फोटो काढू आणि किती नाही असं होऊन जातं ,दोन्हीकडून पाय निघत निघत नाही,त्यांच्या काठावर बसून पाण्यात पाय सोडून जराही नजर न ढळू देता तासंतास त्या शांत पाण्याकडे एकटक पाहत रहावं असं खूप खूप वाटतं पण आपण चीनमध्ये आहोत , भारतात नाही ह्याचं भान ठेवून शेवटी मनाला आवर घालून तिथून काढता पाय घ्यावाच लागतो...
![]() |
| मानसरोवरचं पहिलंवहिलं मुखदर्शन |
![]() |
| मानसरोवरची राखाडी छटा |
आमच्या दार्चेनच्या हॉटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिक , एकदम अद्ययावत हॉटेल होतं आणि तेवढेच त्यांचे दंडही . तिथली ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टिम पाहून , मला पुलंच्या "मी आणि माझा शत्रुपक्ष" मधलं वाक्य आठवलं,"का हो,नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होतं की कुंथावं लागतं ?", टॉयलेट सीट वर बसायची सुद्धा भीती वाटायला लागली होती. खोलीचा ताबा घेतल्या घेतल्याचं तिथल्या माणसाने येऊन कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी कसे दंड आहेत ते अगदी खोलात समजावून सांगितलं. तकलाकोटपासून आम्हाला ह्याची काहीशी सवय झाली होती पण हे हॉटेल तकलाकोटच्या किंचित एक पायरी अजून वरच्या दर्जाचं असल्यामुळे इथे जास्त दक्ष राहणं आवश्यकहोतं. पुन्हा तेच सगळे , खोलीचे व्हिडिओ रेकॉर्ड करणं, टॉवेल्स आणि इतर वस्तू पारखून घेण्याचे वगैरे सोपस्कार उरकले. हॉटेल तसं छोटेखानीचअसलं तरी बहुदा नवीन असावं त्यामुळे स्वच्छताही सांभाळलेली होती.
![]() |
| दार्चेनच्या हॉटेलमधून होणारं पहिलं कैलास दर्शन |
हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये आम्हाला सरकारच्या नथूला पासमार्गे होणाऱ्या यात्रेच्या नवव्या तुकडीतून तब्येतीच्या अडचणीमुळे डेराफूकहून माघारी परत आलेली काही मंडळी भेटली , जवळपास सगळ्यांचा रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी समाधानकारक नसणं हाच खोडा होता , काहींची तर रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी ४० पर्यंत खालावल्यामुळे साहजिकच त्यांना ऑक्सिजन देऊन प्राथमिक उपचार केले गेल्यानंतर तिथून परत पाठवलं गेलं होतं , हे सगळं ऐकून अचानक मनावर ताण आलाय असं जाणवायला लागलं कारण दुसऱ्या दिवशीपासून आमची कैलास परिक्रमा सुरु होणार होती. शिवाय त्याच हॉटेलमध्ये आम्हाला खाजगी टूर कंपन्यांमधून आलेले काही यात्रेकरूसुद्धा भेटले, त्यातलेही बरेचसे लोकं डेराफूकहूनच परतले होते, तीन दिवसांची परिक्रमा पूर्ण पायी करून परतलेली मंडळी अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढीच होती जे आमच्यासाठी फार आशादायी चित्र नव्हतं कारण मी आणि माझा नवरा दोघेही तीन दिवसांची कैलास परिक्रमा पूर्ण पायी करण्याच्या निश्चयाने आलो होतो. पण जेवढ्या व्यक्ती तेवढे अनुभव आणि प्रत्येकाचे वेगवेगळे,शेवटी सगळी नकारात्मकता बाजूला सारून आंम्ही "जो भी होगा देखा जायेगा ।"ह्या हिय्याने परिक्रमेसाठी तयार झालो. आता ह्यातही एक मेख आहे,यात्रा सुरु होण्यापूर्वी आणि यात्रेदरम्यान, आधी परिक्रमा करून आलेल्या जितक्या आणि ज्या ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा गाईड्सनी म्हणून सूचना आणि माहिती दिली होती त्या बहुतांशी सगळ्यांनी एकाच गोष्टीची "री" ओढली होती आणि ती म्हणजे ," परिक्रमेचे तिन्ही दिवस घोडा आणि हमाल दोन्ही जवळ ठेवा ,कारण दार्चेन मध्येच घोडे मिळतील नंतर तुम्ही घोडा करायचा ठरवलात तरी तो करता येणार नाही , घोडे फक्त दार्चेन मध्येच मिळतील. डोलमा पास पार परताना तर घोड्यांना सुद्धा दम लागतो तर आपली काय कथा. त्यांना तुमचा इन्शुरन्स समजा. " वाटायला वरकरणी तसं म्हटलं तर ह्यात काहीच चुकीचं नाही, विचार केला तर तार्किकच आहे पण माहिती द्यायला बोलावलेला प्रत्येक जण जेव्हा हे सांगतो तेव्हा ते कोणीतरी पट्टी पढवून पाठवल्यासारखं एकसारख्या शब्दांत हे तुम्हाला सांगतात. तुम्हाला घोडा आणि हमाल दोन्ही करण्याची जवळजवळ अप्रत्यक्ष सक्तीच केली जाते कारण आपण जे घोड्याचे आणि हमालांचे पैसे भरतो त्याच्या काही टक्के हिस्सा दलाली म्हणून ह्या संपर्क अधिकाऱ्यांना मिळतो, त्यामुळे जर कमीत कमी लोकांनी घोडा आणि हमाल घेण्याचं ठरवलं तर त्यांची ही वरकमाई कमी होते . जितकी जास्त लोकं घोडा आणि हमाल वापरतील तितकी ह्यांची मिळकत जास्त. त्यातही जास्त कमाई होते ती घोड्यातच..ज्यांना तब्येतीच्या अडचणी आहेत, जे वयस्क आहेत त्यांनी कधीही घोडा आणि हमाल दोन्हीही वापरणं किंवा किमान जवळ ठेवणं हेच इष्ट पण जे बऱ्यापैकी नियमित मॅरॅथॉन्स, गिर्यारोहण किंवा इतर साहसी मोहिमा करत असतात त्यांचं काम हमालावर होऊ शकतं फक्त तुम्हाला स्वतःलाही ह्याबद्दल पुरेसा आत्मविश्वास असेल तर कारण दुसऱ्या दिवशीची २८ किमीची परिक्रमा अक्षरशः कोथळा काढते.दार्चेनला पोहोचेपर्यंत आमचा घोडा पोर्टर साठी संपर्क अधिकाऱ्यांकडून इतका ब्रेनवॉश केला गेला होता की आमच्यातल्या बहुतांशी लोकांनी मग तरुण असतील नाहीतर वयस्क , घोडा आणि हमाल दोन्ही घ्यायचं ठरवलंच होतं. आता आम्ही मोजकीच अतिशूर मंडळी राहिलो होतो ज्यांनी ह्या ब्रेनवॉशला बळी न पडता फक्त पोर्टरच्या साहाय्याने पायी परिक्रमा करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
क्रमशः
कैलासी माधुरी गोडबोले माईणकर
७ सप्टेंबर २०२५










Comments
Post a Comment