आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ४)
परिक्रमेच्या पहिल्या दिवशी दार्चेनहून आम्ही यमद्वार गाठलं.आपण जे काही पोर्टर्स किंवा घोडे मागितलेले असतात ते ह्या यमद्वारलाच मिळतात. इथे यमद्वारच्या प्रवेशद्वाराशी पोर्टर्स घोडेवाले येईपर्यंत सकाळचे दहा साडे दहा वाजतात त्यामुळे आपण जरी परिक्रमा लवकर सुरु करायची ठरवली तरी ते शक्य नाही ,बरं ज्यांना फक्त पोर्टर्स हवे असतात आणि ज्यांना घोडा आणि पोर्टर दोन्ही हवं असतं त्यांचं वर्गीकरण झाल्यावर चिठ्ठ्या पडल्या जातात , त्यात ज्याचं नाव येईल तोच पोर्टर किंवा पोर्टर आणि घोडेवाला आपल्याला घ्यावा लागतो, तुम्हाला निवड करण्याची मुभा नाही.चीनने अतिशय जाणीवपूर्वक जास्तीत जास्त स्त्रिया किंवा मुली पोर्टर्स म्हणून नेमलेल्या आहेत,ज्यातल्या काही चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या आहेत अशी गुप्तचर विभागाने आम्हाला आधीच कल्पना दिली असल्यामुळे पोर्टर मिळाल्या मिळाल्या आधी आम्ही दोघांनी त्या दोघींचे फोटो काढले. नवऱ्याची पोर्टर जेमतेम १८ वर्षांची , तिला मोडकं तोडकं इंग्लिश कळत होतं आणि तितकंच मोडकं तोडकं बोलता येत होतं. खरंतर बऱ्याचशा पोर्टरची तीच अवस्था होती पण तंत्रज्ञानाने सगळ्यांचंच आयुष्य बऱ्यापैकी सोपं केलंय त्यामुळे बहुतांशी पोर्टर यात्रेकरूंनी काही विचारलं की सर्रास गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून संभाषणाची अडचण सोडवण्यात तरबेज होते. पण माझी पोर्टर मात्र अशा कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करण्यावर ठाम दिसली तेव्हा का कुणास ठाऊक पण ते काही मला सकारात्मक चिन्हं वाटलं नाही. असंही गुप्तचर विभागाने पोर्टर्सशी फार संवाद साधणं टाळा , जवळीक करायला जाऊ नका वगैरे केलेला सूचनांचा भडीमार चांगला लक्षात होता. त्यामुळे मी तिला एक दोन वेळा काही तरी विचारण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्यावर उत्तर देण्याऐवजी इस्त्री केल्यासारखा चेहरा ठेवून माझ्या आरपार पाहिलं तेव्हा मीही पुढचे तीन दिवस तिला काही विचारण्याच्या फंदात पडले नाही. फक्त परिक्रमेचे तीनही दिवस तिचं सातत्याने दीर्घ काळपर्यंत फोनवर कोणाशी तरी बोलणं मात्र मला अस्वस्थ करत होतं त्यात अजून भर पडली जेव्हा परिक्रमेच्या शेवटच्या दिवशी मी तिथल्या खोऱ्याचे फोटो काढताना तिने अचानक माझ्या फोनमध्ये डोकावून मी नक्की कशाचे फोटो काढतेय हे चाचपायचा प्रयत्न केला. ती नक्की काय चाचपायचा प्रयत्न करत असावी ? मी जरा रोखूनच तिच्याकडे कटाक्ष टाकल्यावर ती लागलीच मागे झाली.
![]() |
| परिक्रमेदरम्यान सतत सोबत करणारा करणी नदीचा प्रवाह |
![]() |
| परिक्रमेच्या पहिल्या दिवशी दिसणारा कैलास |
![]() |
| करणी नदीचं खोरं |
परिक्रमेचा पहिला दिवस तर १५ + किमी, साधारण १५००० फुटांच्या उंचीवर पण बरचंस सरळ चालणं होतं तरी तकलाकोटपासून ITBP च्या सो कॉल्ड बल्लवाचार्यांनी आरंभलेले आम्हा गिनीपिग्जवरचे त्यांच्या पाककलेचे प्रयोग आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा तिथवर सुरु झाल्यामुळे बऱ्यापैकी उपासमार सुरु झाली होती.शिवाय चिनी हॉटेल्स जी आणि जितक्या दर्जाची अस्वच्छ स्वयंपाकघरं ह्या मंडळींना स्वयंपाक करायला देतात ती पाहून तर भूकच मरते आणि बल्लवाचार्यांचा स्वच्छता सांभाळण्याचा आनंद तो तर इथे जमेसचं धरलेला नाही , एकूण काय तर कमालीची अस्वच्छ स्वयंपाकघरं ,जेवणखाणाच्या वेळापत्रकाचे वाजलेले तीन तेरा , स्वयंपाक करताना पाळल्या जाणाऱ्या अगदी मूलभूत स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की पोटातल्या पुरेशा अन्नाच्या अभावापोटी सरळ चाला नाहीतर चढ चढा , कितीही कमी चालायचं असलं तरी थकवा ठरलेलाच असतो. त्यामुळे आमच्या अतिशूर गटातले काही मावळे पहिल्या दिवशीच्या १५ किमी च्या परिक्रमेनंतर रक्तातली ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे दुसऱ्या दिवशीची परिक्रमा करण्यासाठी घोडेवाल्यांना शरण गेले. बरं इतकी अस्वच्छता कमी की काय म्हणून परिक्रमेदरम्यान आणि परिक्रमे दरम्यानच्या मुक्कामाच्या दोन्ही रात्री, जिथे मुक्काम असतो तिथे स्वच्छतागृह सुद्धा ढंगाची नाहीत शिवाय पाण्याची सोय नाही त्यामुळे जे काही एक दोन पाटीचे संडास तिथे बाबा आदमच्या काळापासून आहेत ते इतके पराकोटीचे अस्वच्छ की वापरण्याच्या लायकीची नाहीत. अशा बिकट परिस्थितीत सरकारी यात्रेकरू असतील नाहीतर खाजगी कंपनीतून येणारे यात्रेकरू असतील , उतरणाऱ्या सगळ्यांची पोटं जर जिथे जागा मिळेल तिथे रिकामी झाल्याने जागोजागी सोनखताचा सडा पडत असेल , मग जिथे अन्न शिजवलं जातं त्या स्वयंपाकघराच्या अगदी लगेच मागच्याच बाजूला असेल नाही तर थोडंसं लांब , हे सगळं दृष्टीस पडलं की काय अवस्था होते ते लक्षात आलचं असेल. एक घास सुद्धा घशाखाली उतरत नाही. बरं जवळ वाहणारा पाण्याचा स्रोत मोठा असला तरी त्याचं पाणी इतकं गढूळ होतं की तेच पाणी बाकी प्रातःर्विधींसारखंच स्वयंपाकासाठी सुद्धा वापरलं जातंय हे पाहतो तेव्हा तर डोकं गरगरतं. अशा परिस्थितीत परिक्रमेचा कळस म्हणजे आणि दुसरा दिवस . शरीरातल्या साठवणीतल्या अन्नाच्या ऊर्जेवर ५६५० मीटर वरचा डोलमा पास ओलांडणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं होतं. शाळा कॉलेज मध्ये असताना भौतिक शास्त्रात शिकलेली "Potential Energy " ही संज्ञा फक्त ज्ञानापुरतीच माहिती होती पण ह्या संज्ञेचा खराखुरा अर्थ, त्याचा उपयोग आणि महत्त्व काय ते मला शाळा कॉलेजमध्ये शिकले होते त्यापेक्षा परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात अवलंबून जास्त चांगलाकळलं होतं. कोणत्याही केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून मिळवलेलं ज्ञान जास्त चांगलं लक्षात रहातं नाही का...परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशीचा माझा डोलमा पास चढून जाण्याचा प्रवासच नाही तर कैलास परिक्रमा, त्या दरम्यानचं वास्तव्य सगळं सगळं नक्कीच आता मला आमरण लक्षात राहील. त्यादिवशी बळेबळे पोटात ढकलेल्या सकाळच्या जेमतेम चमचाभर न्याहारीवर २८ किमी चालताना शेवट शेवट तर पुलंच्या भाषेत सांगायचं तर ,"पाय ही शरीराला जडलेली एक व्याधी आहे," असं वाटायला लागलं होतं. पण हा दुसरा दिवस पूर्ण केला की मानसिक दृष्ट्या परिक्रमा जवळपास पूर्ण झाल्यात जमा असते , कारण आदल्या दिवशी डोलमा पास ओलांडून जाण्याचं दिव्य पूर्ण केल्यावर पुढच्या दिवशीचे आठ किमी काहीच वाटत नाहीत. शिवाय त्या दिवशी तुमची परिक्रमा पूर्ण होणार असल्याचा जो दिलासा असतो तोच तुमच्यामध्ये इतकी अनाकलनीय ऊर्जा भरतो की त्याच उत्साहाच्या भरात आपण कधीच आठ किमी चालून जातो.परिक्रमा पूर्ण होऊन आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी पोर्टर आमच्या बसच्या थांब्याजवळ पोहोचलो होतो. हळूहळू एकामागून एक लोकं पोहोचत होती.ह्या पोर्टर्स आणि घोडेवाल्याना साहजिकच टिप अपेक्षित असते त्यामुळे ती टिप हातात पडेपर्यंत खरंतर ते तिथे आजूबाजूलाच घुटमळत असतात. मी बऱ्यापैकी आधी पोहोचले होते आणि आमचे नवरोजी पोहचायचे होते.तिथवर तिच्या पाठीवर उगाचच वजन वागवायला नको म्हणून माझ्या पोर्टरला मी खुणेनेच तिच्या पाठीवरची बॅग जवळच खाली उतरवून ठेवायला सांगून नवरा आल्यावर दोन्ही पोर्टर्सना टीप द्यायला तिला तिथेच थांबायला सांगितलं. तिने आज्ञाधारकपणे बॅग तर उतरवून ठेवली ,पण बाकीच्या पोर्टरसारखी टिपेसाठी न रेंगाळता माझी पाठ वळताच तिथून टिप न घेता नऊ दो ग्यारह झाली तेव्हा तर माझा तिच्यावरचा संशय अजूनच बळावला.परिक्रमा ठरवल्याप्रमाणे पायी पूर्ण केल्याच्या आनंदात जरी तात्पुरतं हे सगळं मी विचारांच्या पडद्याआड सरकवलं होतं तरी तिचं ते तीन दिवसांदरम्यानचं वागणं काही मनातून निघत नव्हतं. आम्ही परिक्रमा पूर्ण केली त्यादिवशी खरंतर आपला स्वातंत्र्य दिन होता पण अर्थातच जय हिंदचा उद्घोष किंवा भारतीय राष्ट्रगान उघडपणे म्हणायला बंदी असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मनातल्या मनात राष्ट्रगान म्हणून सगळ्या यात्रेकरूंच्या यशस्वीरीत्या परिक्रमा पूर्ण करण्याचा आनंद साजरा केला.
![]() |
| डोलमा पास |
आता चीनमधल्या वास्तव्याचे दोनच दिवस राहिले आहेत ह्या नुसत्या कल्पनेनेच आनंद गगनात माईना झालं होतं , वागता बोलताना असलेलं सततचं मानसिक दडपण , आमच्यावर सुरु असलेले पाककलेचे प्रयोग, अस्वच्छपणा सगळ्याचा कडेलोट झाला होता. पण अजून मानसरोवर परिक्रमा बाकी होती. कुगूला पुन्हा दोन रात्री आणि तकलाकोटला एक रात्र काढायची होती. दोन रात्रींसाठी वास्तव्य असलेलं आमचं कुगूचं हॉटेल अगदी मानसरोवरच्या समोर होतं. मानसरोवरला मध्यरात्री देवदेवता स्नानासाठी उतरतात असं ऐकलं होतं त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता टिपेला पोहोचली होती , त्या निव्वळ उत्सुकतेपोटी कुगूच्या त्या सो कॉल्ड गलिच्छ हॉटेलात दोन रात्री काढण्याची सगळ्यांना उभारी मिळाली होती. २०२० पूर्वी जरी प्रत्यक्ष मानसरोवरमध्ये आंघोळ करण्याची मुभा होती तरी आता मात्र ती नाही. मानसरोवरच्या काठावर चिनी ज्याला न्हाणीघरं म्हणतात असे फक्त आडोसे तयार केलेले आहेत जिथे आपण मानसरोवरमधून बादलीने पाणी भरून घेऊन आंघोळ करू शकतो. आमचं हॉटेल मानसरोवरच्या अगदी समोरच असल्यामुळे आमच्यातल्या काहींनी त्या आडोश्यांचा आसरा घेऊन नाहीतर बादलीत पाणी भरून घेऊन जाऊन खोलीवर आंघोळ केली. दुसऱ्या दिवशी मानसरोवच्या काठाशी समोर संपर्क अधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत होम केला गेला. संपर्क अधिकारी कायम आपल्या हातातच सगळी सूत्रं ठेवतात ह्याचा काही लोकांना बहुतेक आधीच सुगावा लागला असावा त्यामुळे आमच्यातले काही अतिउत्साही भाविक आपली स्वतःची वेगळी होम हवनाची सामुग्री घेऊनच आले होते.संपर्क अधिकाऱ्यांचा होम सुरु होण्यापूर्वीच आपला स्वतंत्र संसार थाटून ह्या अतिउत्साही भाविकांनी आपली होमाची हौस भागवून घेतली होती. वास्तविक आता मानसरोवरवर होम करण्याची परवानगी नाही. कोणी खाजगी कंपन्यांमधून आलेल्या भारतीय यात्रेकरूंनी जर नियमाविरुद्ध मानसरोवरवर होम करण्याचा अट्टाहास केला तर तो त्यांना ५००० युवानला पडू शकतो.आम्ही सरकारी यात्रेकरू असल्यामुळे आम्हाला होम करण्याची परवानगी मिळाली असावी बहुदा ,बस्स इतकाच काय तो सरकारी यात्रेचा फायदा. फक्त एक महत्त्वाची कंसातली टीप अशी की आपल्याला कायद्याबाहेरचं किंवा नियमाबाहेरचं काही काम चिन्यांकडून करवून घ्यायचं असेल तर सिगारेटची लाच जादूच्या छडीसारखी काम करते. चिनी म्हणजे धुरांडी आहेत आणि त्यांना आपल्या भारतीय सिगारेट ब्रॅंड्सचं खूप वेड आहे त्यामुळे कैलासाच्या चरणस्पर्श किंवा अष्टपदी ला मनाई असताना आमच्या माहितीतल्या काही खाजगी यात्रेकरूंना ह्या लाचलुचपतीचे प्रयोग करून पहिले होते आणि ते यशस्वीही झाले होते. इतकंच काय आमच्या कुगूच्या हॉटेलवर रात्री ९:३० ते १२ इतकाच वेळ वीज मिळायची ,पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्यातल्या काही यात्रेकरूंनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना अशीच सिगारेटची लाच देऊन ह्या ठरलेल्या वेळेबाहेर एक तासासाठी वीजपुरवठा मिळवला होता.घरोघरी मातीच्या चुली हेच खरं.
![]() |
| मानसरोवरच्या अथांग पाण्यात शांतपणे विहरणारी बदकं |
कुगूहून निघाल्यावर आम्ही दीड दोन तासातच म्हणजे दहापर्यंत तकलाकोटमध्ये पोहोचलो होतो. तिथल्या हॉटेलची चेक इनची वेळ दुपारी बाराची असल्यामुळे अशा अनायास हाताशी आलेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करणं भाग होतं म्हणून चीनच्या कोऑर्डिनेटरने आम्हाला जवळच्या खोरचांग मॉनेस्त्री मध्ये नेलं.इसवी सॅन ९९६ मध्ये कर्नाली नदीच्या काठावर पुरांग खोऱ्यात कोरी राजाच्या राज्यकाळात बांधली गेलेली ही खोरचांग मॉनेस्त्री तशी साधीच आहे पण मुख्य मोनेस्टरीला चिकटून असलेल्या ह्या राम मंदिरात काही टन सोन्याच्या राम ,लक्ष्मण, सीतेच्या सोन्याच्या मूर्ती होत्या पण चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर साहजिकच त्यांनी त्या मूर्त्या तिथून काढून चीनच्या खजिन्यात जमा केल्या. आज ह्या देवळात राम लक्ष्मण सीतेच्या माणसांएवढ्या उंचीच्या साध्या मूर्ती आहेत ज्यांची तिबेटी भिख्खूंकडून विधिवत पूजा अर्चा केली जाते.ह्या देवळात एक अंधारं अगदी चिंचोळं भुयार आहे ज्यातून वाट काढत वर एका खोलीत गेलं की कोणाला सहजासहजी दृष्टीस पडणार नाही अशा एका अंधाऱ्या कोनाड्यात बुद्धाची एक चांदीची मूर्ती आहे ज्याला बुद्धा मंजुश्री किंवा wisdom बुद्धा म्हणतात. ह्यामागची कथा फार रोचक आहे. भारतातून काही मण चांदी सात भिख्खू राजा कोरीला भेट देण्यासाठी घेऊन आले होते.ही भेट म्हणून मिळालेली चांदी घेऊन राजा कोरी जेव्हा आपले धर्मगुरूंकडे गेला तेव्हा त्यांनी हा तुला मिळालेला कुबेराचा (ज्याला तिबेटी लोकं "जम्भाला "असं म्हणतात) आशीर्वाद आहे तर तू ह्यातून बुद्धाची मूर्ती घडव असा सल्ला दिला. आपल्या धर्मगुरूंच्या सल्ल्यानुसार कोरी राजाने ही भेट म्हणून मिळालेली चांदी पुरांग खोऱ्यात राहणाऱ्या नेपाळचा अश्वधर्म आणि काश्मीरचा वनकुला ह्या त्यांच्या कारागिरीसाठी नावाजाळ्या जाणाऱ्या दोन प्रसिद्ध सोनारांकडे घेऊन आला.ह्या दोन कारागिरांनी त्या चांदीतून मूर्ती घडवण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले पण मूर्ती घडवू शकले नाहीत. तेव्हा वैफल्यातून एका सोनाराने जोरात हि चांदी जमिनीवर आपटली आणि त्याच क्षणी त्या चांदीने बुद्धाचा आकार घेतला. लागलीच त्या मूर्तीला रथामध्ये स्थानापन्न करून राजा कोरीकडे घेऊन जात असताना एका दगडामुळे रथ अडला आणि त्याच क्षणी "मी ह्याच जागेतून काढलो गेलो आहे तेव्हा मला इथेच स्थापित करा " असा आवाज आला आणि ह्या मूर्तीची इथेच स्थापना केली गेली. असं म्हणतात की तेव्हापासून आजपर्यंत सात वेळा ही मूर्ती बोलली आहे. आहे ना रोचक ???
![]() |
| मॉनेस्ट्रीचं अंतरंग |
![]() |
| मॉनेस्ट्रीला चिकटून असलेलं राम मंदिर |
![]() |
| खोरचंग मॉनेस्ट्री |
![]() |
| मॉनेस्ट्रीच्या आवरातली फुलं |
पण मानसरोवरची परिक्रमा करत असताना त्याच्या शांत अथांग पाण्यात क्षणोक्षणी वरच्या आकाशातल्या बदलणाऱ्या रंगांच्या छटांनुसार पाण्यात उमटणारे तितक्याच झपाट्याने रंग बदलणारे मनमोहक तरंग पाहणं, त्यात तितक्याच शांतपणे विहरणारी बदकं पाहणं , मध्येच अकस्मात बससमोरून बागडत रस्ता ओलांडणारे ससे दृष्टीस पडणं, ऐटीत दौडणारे उमदे घोडे पाहणं, वाटभर नजरेला सुखावणारी नानाविविध रंगांची फुलं पाहणं , एखाद्या काळ्याभोर साडीवर शुभ्र पांढरी खडी काढावी तसं मध्यरात्री चांदण्यांनी टिपुरलेलं स्वच्छ आकाश न्याहाळणं , मानसरोवरच्या त्या निरव शांततेत बह्ममुहूर्तावर ध्यान लावून बसणं एक शब्दातीत स्वर्गीय अनुभव आहे.मला वाटतं मानसरोवर ही निसर्गाची अशी अद्भुत एकमेवाद्वितीय कलाकृती आहे जिला न्याहाळताना त्यालाही प्रश्न पडावा की इतकी सुंदर कलाकृती मी घडवली कशी. मानसरोवरचं अलौकिक सौंदर्य न्याहाळताना डोळे अक्षरशः थकून जातात. कधी सौंदर्य टिपण्याचा पण डोळ्यांना थकवा येतो हे माहीतच नव्हतं.जर त्याचं सौंदर्य टिपायला आपले डोळे आणि ते वर्णायला आपली लेखणी असमर्थ आहेत तर कोणा कृत्रिम कॅमेराची काय बिशाद की तो हे लावण्य बखुबी टिपेल. पण निव्वळ भारत आणि भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देश्याने चीनने हा स्वर्गासारखा भूभाग नव्हे पृथ्वीवरचा हा स्वर्ग इतका उपेक्षित ठेवलाय. नाहीतर आज आपल्यापेक्षा जवळपास प्रत्येकच बाबतीत किमान पंचवीस तीस वर्षं आघाडीवर असलेल्या चीनसारख्या राष्ट्राला इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंनाच नाहीतर स्थानिक तिबेटी लोकांना अद्ययावत दर्जाच्या पायाभूत सोयी पुरवणं , उत्तम दर्जाचे रस्ते तयार करणं , किंवा एकूणच तिबेटचा सगळ्या स्तरांवर विकास करणं अवघड नक्कीच नाही. वाईट वाटतं ते तिबेटी लोकांचं. आज तिबेट चीनचा भाग असला तरी नुसता म्हणायला, तिबेटी लोकांचा जगण्याशी संघर्ष कधी संपेल ते देवच जाणे.शत्रूलासुद्धा आदराने वागवणाऱ्या आपल्या भारतीय मानसिकतेला हे अजिबात पचनी पडत नाही.
चीनमधल्या त्या एक आठवड्याच्या भीषण वास्तव्यानंतर पाय तर भारताकडे ओढायला लागले होते , आम्ही सगळे खूप होमसिक सुद्धा झालो होतो त्यामुळे कधी एकदा पुन्हा भारतात प्रवेश करतोय असं झालं होतं. पण मन मात्र मानसरोवरपाशीच रेंगाळलं होतं. तकलाकोटला एक रात्र काढून दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे सकाळी लवकरच भारताची सीमा ओलांडणार होतो कारण इमिग्रेशन साठी पुरेसा वेळ हाताशी ठेवणं गरजेचं होतं. पुन्हा इम्मीग्रेशन अधिकारी फोनच्या फोटो गॅलरीपासून ते सामानपर्यंत सगळ्याची झाडाझडती आता तर जरा जास्तच करतील ह्याची कल्पना होती. सगळे भारतात परतून घरी पोहोचण्यासाठी इतके अधीर झाले होते की सकाळी दिलेल्या वेळेच्या आधीच सगळे आपलं जे काही थोडं बहुत सामानसुमान बरोबर होतं ते घेऊन हॉटेलच्या लॉबीमध्ये हजर ....
पुन्हा इम्मीग्रेशनचे तेच सगळे सोपस्कार उरकल्यानंतर आम्ही लिपू पासकडे निघालो. तकलाकोटमध्ये कडक ऊन आणि लिपू पासमध्ये मात्र सर्द वारे आणि हलका पाऊस अशी एका तासाच्या अंतरात आम्ही दोन एकदम विरुद्ध हवामानं अनुभवली.पण सीमा ओलांडून भारतात परत आल्यावर काय हायसं वाटलंय म्हणून सांगू... सीमेवर पुन्हा आपले ITBP चे जवान रुग्णवाहिकेसोबत आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी हजर झालेले पाहून हरवलेल्या मुलाला आईवडील नजरेस पडल्यावर जसा आनंद होईल अगदी तसाच आनंद आम्हाला त्या ITBP च्या जवानांना पाहून झाला. ह्यावेळी दिल्लीपर्यंतचा परतीचा प्रवास धारचूला सोडल्यानंतर चौकोडी अल्मोडा मार्गे होणार होता. चौकोडी हे उत्तराखंडमधलं थंड हवेचं ठिकाण,ह्या चौकोडीमध्ये "हिमालयन नारी" नावाचा स्थानिक महिला बचत गट आहे जो जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्यांची विणकामाची कलाकुसर पोहोचवतोय. इथल्या स्थानिक महिलांनी मेंढीच्या, सशाच्या लोकरीपासून हाताने विणलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी पाहून थक्क झालो कारण ह्या महिला ह्या वस्तू बनवून ठेवत नाहीत तर जशा ऑर्डर्स त्यांना येतात तशा मागणीनुसार तयार करतात आणि ह्या मागण्या त्यांच्या संकेतस्थळांवर नोंदवल्या जातात म्हणजे आपल्या भारतातल्या चौकोडी सारख्या छोट्याशा कसब्यातल्या महिलांच्या ह्या कौशल्याबद्दल जगाला माहितेय पण भारतात मात्र आपल्याला माहिती नसावी ह्याची लाज वाटली पण अभिमानही वाटलं . आम्ही ज्या कपड्यावर बोट ठेवू तो अमेरिकेला चालला होता. चौकोडी सारख्या छोटयाशा गावात बसून ह्या स्त्रिया जगाच्या नकाशावर आपल्या कामाचा ठसा उमटवू पाहत आहेत. तंत्रज्ञानाने आज जग इतकं जवळ आणलंय की तुमच्यामध्ये इच्छा आणि कौशल्य असेल तर तुम्ही अगदी जगातल्या दुर्गम भागात बसून सुद्धा रोजगार मिळवू शकता.
नीम करोरी बाबा हे उत्तर भारतातलं मोठं प्रस्थ .हे नीम करोरी बाबा हनुमानाचा अवतार असल्याचं मानलं जातं म्हणून हे मानवी रुपातलं आराध्य. फक्त उत्तर भारतीयांचीच नाही तर देशविदेशातल्या लोकांची ह्या नीम करोरी बाबांवर गाढ श्रद्धा असल्याचं ऐकिवात आलं होतं. अल्मोडाहून दिल्लीकडे निघताना आम्हाला कैचीधामला जायला मिळालं. खूप ऐकलं होतं ह्याआधी त्याबद्दल तरी जिथे लोक मुद्दाम उठून लांबून लांबून ह्या नीम करोरी बाबांच्या दर्शनासाठी कैचीधामला येतात तिथे जाण्याचा योग्य इतक्या अनपेक्षितपणे चालून येईल असं वाटलं नव्हतं. आपल्या अद्ययावत हाय टेक फोनने अख्ख्या जगाला भुरळ घालणारा त्याने ऍपलचा स्टिव्ह जॉब्स आणि समस्त सान थोरांना फेसबुक इंस्टाच्या आभासी दुनियेत रमवणारा मेटाचा मार्क झुकेरबर्ग अशा जगातल्या अव्वल कंपन्यांचे संस्थापकही नीम करोरी बाबांना प्रत्यक्ष भेटण्याच्या आशेने बाबांचा शोध घेत जगाच्या नकाशावर कदाचित एखाद्या बारीक ठिपक्याएवढंसुद्धा दिसणार नाही अशा ह्या कैचीधामसारख्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत.तसं एक नीम करोरी बाबांचं एक देऊळ धारचूलात पण आहे. आज ते देऊळ जिथे उभं आहे तिथे नीम करोरी बाबांनी वयाच्या सतराव्या वर्षी कैलास परिक्रमा पूर्ण करून उत्तराखंडमध्ये परतल्यावर सहा महिने ध्यान केल्याचं सांगितलं जातं. उत्तराखंडमध्ये बऱ्याच ठिकाणी नीम करोरी बाबांची छायाचित्रं लावलेली दिसतात.
वाटेत अलमोडाचं कुमाऊ मंडळ विकास निगम आणि नंतर संध्याकाळी गजरौला गावातली कैलास सेवा समिती ह्यांचा हृद्य पाहुणचार स्वीकारत दिल्ली गाठेपर्यंत तब्बल बारा तासांचा प्रवास घडला होता.हे आगत स्वागत, ग्रुप फोटो , गाणं बजावणं सगळं नकोसं वाटत होतं कारण आता आम्हा सगळ्यांचे डोळे फक्त आणि फक्त घराकडे लागले होते. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बारा तास अंग चोरून बसल्यामुळे सगळ्यांची अंगं सुद्धा खूप आंबली होती. पंचवीस दिवसांच्या यात्रेने उद्वेगलेल्या आम्हा सगळ्यांना आता इतकी घराची ओढ लागली होती की ज्यांची आधीपासून तिकिटं काढलेली होती ती आम्ही ठराविक लोकं वगळता बाकीच्यांनी आयत्या वेळी ज्या पहिल्या विमानाचं तिकीट मिळेल ते काढून अगदी अपरात्रीसुद्धा त्या कैलास मानसरोवर भवन मधून पळ काढला ते पुन्हा कधीही कोणत्याही सरकारी यात्रेच्या वाट्याला जायचं नाही असा कानाला खडा नाहीतर "खडक" लावूनच ...






















Comments
Post a Comment