आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग १)
सात आठ वर्षांचा असेल माझा नवरा जेव्हा त्याने इंडियन एक्सप्रेसमध्ये मागे कैलास आणि पुढे मानसरोवर असा पूर्ण पानभर छापून आलेला फोटो पाहिला होता, मानसरोवर तेव्हापासून जे त्याच्या बकेट लिस्ट मध्ये घट्ट रुतून बसलं होतं ते त्या गोष्टीला पन्नास वर्षं उलटून गेली तरीही आज तितकंच जीवंत होतं. बरं आम्ही जातिवंत हटवादी, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा पठडीतले, त्यामुळे मानसरोवरला जाईन तर सरकारी यात्रेतूनच, ते ही लिपू लेख मार्गेच , जसे पांडव कैलासावर गेले होते तसंच. नेपाळ मार्गे वगैरे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ह्यावर त्याने आधीच खूणगाठ बांधली होती. पण २०२० मध्ये गलवान प्रकरण घडलं आणि चीनने भारतीय पर्यटकांना मानसरोवरची यात्रा करण्यापासून रोखलं. " Where are you planning to trek next in the Himalayas ?" असा प्रश्न ट्रेक संपता संपता गप्पांच्या ओघात आमच्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या चमूने मला विचारला होता. त्यांच्या सहजच विचारलेल्या ह्या प्रश्नावर मी जेव्हा तितक्याच सहजपणे उत्तरले होते की " This is my last Himalayan Trek, I will not be trekking anymore !" तेव्हा माझ्या ह्या अनपेक्षित उत्तरावर सगळ्यांचेच चेहरे अचंबित आणि काहीसे प्रश्नार्थक झाले.नजीकच्या काळात कोणाचे किलीमांजारो,कोणाचे माऊंट एलब्रुस अशा वेगवेगळ्या मोहिमा करायचं मनात होतं पण मी मात्र अन्नपूर्णा सर्किट ट्रेक सुरु करण्यापूर्वीच , ही माझी शेवटची हिमालयन ट्रेक असेल , आता हिमालयात गेलं तरी नुसतं फिरायला पण कधीही ट्रेकिंगला म्हणून जायचं नाही असं स्वतःच्या मनाला तेव्हाच बजावलं होतं.पण क्षणाचाही विलंब न करता पटकन माझी fellow ट्रेकर म्हणाली होती, " You may say so, but mountains will keep calling you ! " तिचं ते वाक्य मनात घर करून राहिलं होतं. ही गोष्ट असेल जेमतेम एप्रिल महिन्यातली.
खरंतर हिमालयावर माझं मनस्वी प्रेम , हिमालयात जाण्यासाठी मी निमित्तच शोधत असते , पण का कोणास ठाऊक पण इतक्यात तरी हिमालयात जाण्याचा माझा कोणताच मानस नव्हता त्यामुळे माझ्या दृष्टीने त्या विषयाला तेव्हापुरता का होईना स्वल्पविराम मिळाला होता. २०२० नंतर पाच वर्ष यात्रा स्थगित झाल्यावर नवऱ्याने मानसरोवरचा विचार मनातून बहुदा तरी काढून टाकलाय असा आपला माझ्या भाबड्या मनाचा समज झाला होता. ट्रेक संपवून घरी परतून थोडा बहुत ट्रेकचा थकवाभागवा निघतच होता इतक्यात एप्रिल अखेरीपर्यन्त गलवान आणि कोरोनाच्या प्रकरणानंतर मागचे पाच वर्ष स्थगित असलेली सरकारी मानसरोवर यात्रा ह्यावर्षीपासून सुरु होत असल्याची त्याला खबर लागली.ही बातमी कळायचीच खोटी की त्याने लहान मुलासारखी टुणकन उडी मारत ," चल आता ह्यावर्षी संधी सोडायची नाही, आपण रेजिस्टेशन करू, ह्यावर्षी जायचंच मानसरोवरला," म्हणून हुकूम काढला...पण आधी नोंदणी करायची,मग सोडत निघणार आणि त्यात आपलं नाव आलंच तर आपल्याला संधी मिळणार ह्या विचाराने मी तेवढ्यापुरेशी निश्चिन्त झाले खरी पण त्याचे ते शब्द ऐकून मला मात्र माझ्या fellow ट्रेकरचे शब्द आठवले "You may say so, but mountains will keep calling you !" पुन्हा एकदा हिमालयाचं बोलावणं येऊ घातल्याची ती वर्दी तर नव्हती ...
आता कोणतीही सरकारी कामं आणि सावळा गोंधळ ह्यांचं किती जवळचं नातं आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे आधी तर तीन चार दिवस नोंदणीसाठी सरकारी वेबसाईटने आपले दात दाखवले. शेवटी येन केन प्रकारेण नोंदणी करून झाली एकदाची.पण नोंदणी करताना वेबसाईटवर दिलेल्या आवश्यक त्या कायदेशीर कागदपत्रांची जमवाजमव नोंदणी करतानाच करायची की नोंदणी करून सोडतीमध्ये नाव आलं तर करायची ह्याबद्दल काहीच खुलासा नसल्यामुळे "वेळ येईल तेव्हा पाहू" अशा पंथातल्या अहोंनी कोणत्याही अशा मामुली अडचणींचीसुद्धा नाट लागू नये म्हणून सोडत जाहीर होण्याच्या आधीच ह्या वेळी चक्क अकारणच घाईघाईने ह्या सगळ्या बाबी पूर्ण करून ठेवल्या होत्या. दिल्लीमध्ये आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यावर वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरतील त्या यात्रेकरूंना घेऊन जूनच्या अखेरीस सरकारी यात्रेची पहिली तुकडी आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेवटची तुकडी निघणार होती . नोंदणी करून जवळपास दोन आठवडे उलटूनही जेव्हा आम्हाला काहीच खबरबात आली नाही तेव्हा "गेला बहुतेक सुंठेवाचून खोकला " ह्या विचाराने माझा जीव काहीसा परातीत पडला कारण सरकारी यात्रेत पंचवीस दिवस काढायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येत होता.वाटलं ,नाही नाव आलं तर ह्याला नेपाळमार्गे जाण्याशिवाय पर्याय नाही. पण अखेरीस दोन आठवड्यानंतर सरकारी यात्रेच्या सोडतीत आम्हा दोघांनाही खात्रीशीर संधी मिळाल्याची सूचना आली आणि यात्रेची तारीखही आम्हाला हवी होती त्याच्या आसपासच मिळाली होती , त्यामुळे आता सरकारी यात्रेतूनच जाण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
इतके वर्ष मनाच्या बंद कुपीत जपून ठेवलेलं त्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसल्यावर अहोंमध्यें कोण जोश संचारला होता , एरव्ही कोणत्याही कितीही महत्त्वाच्या घरगुती किंवा कौटुंबिक अडचणीसाठी एक दिवसही कामाचा खोळंबा करून घरात थांबण्याची तयारी न दाखवणाऱ्या माझ्या नवऱ्याने जोमाने त्याच्या सगळ्या assignments वर आगाऊच एक नाही दोन नाही तर त्याच्या तब्बल पंचवीस दिवसांच्या सुट्टीची आगामी योजना नुसती जाहीर केली नाही तर त्या हिशोबाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच कामं आटोपती घ्यायची जंगी मोहीमच आखली. त्याच्यात अचानक संचारलेला हा कामाचा उरक पाहून माझा जबडाच पडला. मामला फारच गंभीर होता .. दिवसरात्र त्याच्या डोक्यात फक्त मानसरोवरची चक्र फिरत होती. जेव्हा केव्हा संधी मिळेल तसं सह्याद्री नाहीतर हिमालयन ट्रेक्सवर जात असल्यामुळे कैलास परिक्रमेच्या दृष्टीने फार वेगळी तयारी करावी लागणार नव्हती ,पण ह्यावेळी अजून २०० मीटर वर , ५६५० मीटरची उंची गाठायची म्हणजे पुन्हा तेच रक्तातल्या ऑक्सिजनशी सगळे झगडे. मोठा फरक हा होता की ह्यावेळी चीनमध्ये प्रवेश मिळेपर्यंतची यात्रा टेम्पो ट्रॅव्हलर किंवा जीपने होणार असल्यामुळे एरव्ही ट्रेकमध्ये तासंतास चालून होणारी दमछाक नव्हती . आता जे सरकारी अधिकारी Liasoning ऑफिसर्स म्हणजे संपर्क अधिकारी म्हणून प्रत्येक तुकडी बरोबर येतात त्यांना ह्याआधी चार पाच यात्रा घडवून आणल्याचा अनुभव असला तरी अर्ध्याहून अधिक गोष्टींची म्हणजे कोणत्या कागदपत्रांच्या किती प्रति ठेवाव्या , किती परकीय चलन न्यावं ,पोर्टर किंवा घोडा घ्यायचा असेल तर अंदाजे किती खर्च येतो वैगैरे गोष्टींची कल्पना कशी नसते ते त्यांनाच माहित. प्रत्येक वेळी वेगवेगळी नवीन माहिती आणि नवे गोंधळ तेही अगदी यात्रेला निघण्याच्या दिवसापर्यंत. अखेर जमेल तितक्या कायदेशीर बाबी, इतर कागदपत्र, आमच्याच अंदाजाने लागेल ते परकीय चलन सगळं जमवून यात्रेच्या पाच दिवस आधी आम्ही गाझियाबादच्या कैलास मानसरोवर भवनमध्ये थडकलो.
उत्तर प्रदेश सरकारकडून ह्या कैलास मानसरोवर भवनमध्ये उतरणाऱ्या सगळ्या यात्रेकरूंच्या वैद्यकीय चाचण्या होऊन ते यात्रेला निघेपर्यंत मग ते लिपू लेख मार्गे किंवा सिक्कीम नाथूला पास मार्गे जाणारे असतील , सगळ्यांच्या न्याहारी आणि खानपानाची यथोचित निःशुल्क व्यवस्था केली जाते , अगदी तुम्हाला यात्रेच्या आधी आणि नंतर काही दिवस ज्यादा राहायचं असेल तरीही. योगी सरकारने हे भवन २०२० मध्ये बांधून तयार तर केलं पण नेमकं त्याचवेळी गलवान प्रकरण घडलं आणि हे प्रशस्त मानसरोवर भवन यथायोग्य वापराशिवाय काहीसं दुर्लक्षित पडून राहिलं. त्याचा सांभाळ केला गेला पण अर्थातच जेवढ्यास तेवढा,फक्त यात्रा असेल तेव्हा इथे सरकारी कर्मचारी वर्ग इथे यात्रेच्या पूर्ण काळात हजर असतो. पण जरी इथली स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा साधारण सुमार असला तरीही आज इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंच्या वास्तव्याचा आणि जेवणाखाणाचा खर्च उचलणं चेष्टा नक्कीच नाही. सगळ्या गोष्टी निःशुल्क आहेत म्हटल्यानंतर येणाऱ्या यात्रेकरूंची मानसिकता सुद्धा त्या गोष्टींकडे पाहण्याची वेगळी असते. आपल्या खिशाला खार पडत नाहीये तर कशाला पर्वा करायची ह्या मानसिकतेतून, येणारे यात्रेकरूसुद्धा दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा जबाबदारीने आणि शिस्तीने वापरत नाहीत त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला आपल्याला अपेक्षित अशी स्वच्छता सांभाळता येणं कठीणच आहे पण आम्ही सगळं तुम्हाला फुकट पुरवतोय असा यात्रेकरूंना उपकृत केल्याचा कोणताही अभिनिवेष तिथल्या कोणत्याच कर्मचाऱ्याच्या वागण्यात उमटत नाही. उलट त्यांना कैलास परिक्रमा करण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची सेवा करण्याचा इतका आनंद असतो की अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा कसल्याही वरच्या मोबदल्याचीही अपेक्षा नसते , हाच तर खरा निष्काम कर्मयोग.
मानसरोवर भवनमध्ये आमचं अगदी रीतसर पारंपरिक भारतीय स्वागत झालं आणि तिथे प्रवेश केल्यापासूनच आम्ही यात्रेकरू कोणीतरी अति महत्त्वाच्या व्यक्ती झाल्याचा आम्हाला आभास द्यायला सुरुवात झाली. पुढे अजून कोण, किती ठिकाणी आणि कसं आमचं हृद्य स्वागत करणार आहे ह्याची तेव्हा आम्हाला कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी व्हिसासाठी लागणारी सगळी कागदपत्रं जमा झाल्यावर आता खरा महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे Delhi Heart & Lungs इन्स्टिटयूट मध्ये होणाऱ्या वैद्यकीय तपासण्या.सरकारी यात्रेतून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी साहजिकच सवलतीच्या दरात म्हणजे जवळपास अर्ध्या किमतींपेक्षाही कमी किंमतींत सगळ्या आवश्यक त्या चाचण्या हे Delhi Heart & Lungs इन्स्टिटयूट उपलब्ध करून देतं , असं असूनसुद्धा कैलास यात्रेला जाणारे यात्रेकरू म्हणून त्यांचा कर्मचारी वर्ग सुद्धा इतका अदबीने वागतो की आपल्यालाच चेपल्यासारखं होतं. इथे होणाऱ्या सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट्स थेट दिल्लीच्या भारत तिबेट सीमा पोलिस रुग्णलयाच्या डॉक्टरांकडे पाठवले जाणार होते मग आमच्या जाण्यावर अथवा न जाण्यावर हिरवा कंदील दाखवला जाणार होता म्हणजे अजून टांगती तलवार सरायची बाकी होती. दोन्ही दिवस तपासण्यांच्या आदल्या रात्री कोणालाही शांत झोप लागली नव्हती, सगळेच अस्वस्थ होते. विशेषतः आदल्या दिवशी Delhi Heart & Lungs इन्स्टिटयूट मध्ये ज्यांच्या PFT चाचण्यांमध्ये अडचणी आल्या होत्या ते सगळे तर जास्तच.सकाळी भारत तिबेट सीमा पोलिसांच्या रुग्णालयात आम्हाला तब्येतीची घ्यायची काळजी, Dos & Don'ts ह्याबद्दल माहिती दिली गेली शिवाय बऱ्यापैकी वेळा कैलास परिक्रमा करून आलेल्या जय भोलेनाथ परिवार सारख्या सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवकसुद्धा त्यांचे नुकत्याच करून आलेल्या परिक्रमेचे ताजे अनुभव सांगण्यासाठी हजर होते.त्यांचे अनुभव आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक असणार होते त्यामुळे आम्हीही त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होतो. आमच्या तुकडीतून खरंतर आठ नऊ जणांच्या वैद्यकीय तपासण्यांचे रिपोर्ट्स निकषांवर पूर्ण उतरत नव्हते, पण त्यांच्या पर्यायी चाचण्या करून घेण्यात आल्या, अखेरीस एक बाई वगळता बाकी सगळ्या यात्रेकरूंना यात्रेसाठी ITBP च्या डॉक्टरांकडून हिरवा कंदील मिळाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्याच्या पुढच्या दिवशी रिवाजाप्रमाणे आम्हाला MEA च्या कार्यालयात नेण्यात आलं, तिथेही पुन्हा एकदा तेच काही काटेकोरपणे पाळायचे नियम आणि इतर आवश्यक माहिती सांगण्यात आली. एव्हापर्यंत आम्ही इन्फॉरमेशन ओव्हरलोडचे बळी व्हायला सुरुवात झाली होती.
क्रमशः
कैलासी माधुरी गोडबोले माईणकर
७ सप्टेंबर २०२५





Comments
Post a Comment