बकेट लिस्ट (भाग २)
इतक्या अडचणींची शर्यत पार केल्यानंतर अगदी
प्रवासाला निघायच्या दिवशीपर्यंत सगळं काही यथासांग पार पडलंय आणि आम्ही
ठरवल्याप्रमाणे खरोखरच निघालोय ह्यावर विश्वास बसत नव्हता.का कोणास ठाऊक , एक अनाहूत
भीती होती मनात .पण अॅमस्टरडॅमला इमिग्रेशन मधून सुखरूप बाहेर पडलो आणि जीव भांड्यात
पडला.पूर्व यूरोपातल्या आणि पश्चिम
यूरोपातल्या देशांच्या संस्कृतीतही बरीच तफावत आहे.पश्चिम यूरोपच्या जीवनशैलीमध्ये
असलेला भपका आणि झगझगाट पूर्व यूरोप मध्ये कुठेही जाणवत नाही.पण तरीही अॅमस्टरडॅम
मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लंडच्या आणि बाकी यूरोपियन देशांच्या संस्कृती
मध्ये असलेला फरक नजरेतून निसटला नाही.आम्ही इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मुलं अनुक्रमे वयवर्ष
सहा आणि एक इतकी लहान होती.इंग्लंडमध्येही लोकं संध्याकाळी साडे पाच पर्यन्त कमालीची
व्यस्त असतात.त्यांच्या रोजच्या आयुष्यातली ही व्यग्रता आम्हाला मेट्रो स्टेशन्स वर
ऑफिस अवर्स मध्ये मेट्रो गाठण्याच्या लगबगीतून जाणवायची.पण त्या घाईतही आमची दोन लहान मुलांना हाताशी
आणि कडेवर सांभाळत सामान वाहून नेण्याची झटापट पाहून हमखास जाणारा येणारा कोणी गोरा “मे आय हेल्प
?” असं म्हणून जेव्हा माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करायचा तेव्हा आपल्यावर
दीडशे वर्ष अनन्वित अत्याचार करणारे हेच का ते ब्रिटिश असा प्रश्न पडायचा.पण स्वित्झर्लंड
सोडता इंग्लंडसारखा असा अनुभव आम्हाला इतर कोणत्याही यूरोपियन देशात आला नाही.
बाकी पश्चिम यूरोप मध्ये मॉल ,सुपरमार्केट्स असोत वा पर्यटन स्थळं, संध्याकाळी
साडे पाच पर्यंतच खुली असतात ,बरं तिथल्या वास्तूही भव्य
त्यामुळे म्यूझीयम,किल्ले,संग्रहालयं,कला दालनं अशा गोष्टी पाहताना बराच वेळ ठेवावा लागतो.अशात आपल्या हाताशी
असलेल्या मोजक्याच दिवसात आणि ठराविक वेळात आपल्याला पहायच्या असलेल्या सगळ्या गोष्टींना
न्याय देताना अक्षरशः तारेवरची कसरत होते. त्यातही जरा हटके ठिकाणं ही बसवायची म्हणजे
अजूनच पंचाईत. पण तरीही आम्ही अॅमस्टरडॅमच्या कॅनाल क्रुज,वॅन
गोघ म्यूजियम,टुलिप गार्डन इत्यादि पाहून बेल्जियम कडे जेव्हा
मोर्चा वळवला तेव्हा मात्र नेहमींची ठिकाणं पाहण्याआधी जरा हटके अशा टिनटिन म्यूजियम
आणि बेल्जियम च्या बॉर्डरवर असलेल्या vintage
cars
चं म्यूजियम पाहण्याला जास्त प्राधान्य दिलं कारण ही दोन्ही म्यूजियम्स
आवर्जून पहावी अशीच आहेत.बेल्जियमचा टाऊन हॉल
ओलांडून “Mannekan Pis “ला पोहोचेपर्यंत वाटेवरचा जगप्रसिद्ध बेल्जियन waffles चा गोडट वास आपली
भूक चाळवल्याशिवाय रहात नाही.
बेल्जियमचं अॅटॉमियम पाहून होईपर्यंत दुपारच्या जेवणाची
वेळ झालीय ह्याची पोटात कोकलणार्या कावळ्यांनी आठवण करून दिली. अॅटॉमियमच्या बाजूचा
परिसर बर्यापैकी निर्मनुष्य असल्यामुळे अगदी “Must See” असं
ठिकाण असूनही जवळपास कुठलं इंडियन रेस्टोरंट असेल ह्याची सुतराम शक्यता नव्हती,म्हणून शेवटी अॅटॉमियमच्याच कॅफेटेरियामध्ये पोटपूजेसाठी डोकावलो. कॅफेटेरियामधल्या
बर्याचशा टेबल्स वर केसरी टुर्स चे placards लावलेले पाहून आम्ही
काऊंटर वरच्या माणसाकडे भारतीय मेन्यू आहे का असं कुतुहलाने विचारताच त्याने तडक आत जाऊन तिथल्या एका गोर्या लेडी शेफला बोलावून आणलं. त्यादिवशी त्यांनी केसरीच्या मोठ्या
ग्रुपसाठी छोले भटुर्यांचा बेत केलेला असल्यामुळे आमचंही आयतच फावलं. आम्ही इन्डियन
आहोत म्हटल्यावर ती लेडी शेफ इतकी आनंदली की तिने लगेचच आत जाऊन एक छोले भटुर्यांची
प्लेट आणून ठेवत,"मी बरोबर केलयं का ते सांगा ,"असं म्हणत मलाच समीक्षा करायला बसवलं. पंजाबी आणि मराठी हयातला फरक तिला कुठे कळायला,पण कधी कधी आपली निव्वळ इन्डियन अशी ढोबळ जमात अशी कामी येते. माझ्या पंजाबी
पाककौशल्याच्या तुटपुंज्या ज्ञानावर पंजाबी पाकशास्त्राचे थोडेबहुत धडे तिला देऊन अजून
कोणताही बाका प्रसंग ओढवण्याआधी आम्ही तिथून काढतं पाऊल घेतलं.
सर्वोत्तम जागतिक दर्जाच्या Red Cross ,UN सारख्या संस्था, chocolates किंवा वस्तु त्यातही घड्याळं ही स्वित्झर्लंडची जागतिक ओळख आहेत कधीतरी उभ्या
आयुष्यात एखादं RADO, OMEGA किंवा TISSOT सारख्या महागड्या ब्रॅंडचं घड्याळ आपल्या मनगटावर लावून असं स्वप्न न पाहणारा
कोणी प्राणी अजून जन्माला आला नसेल.त्यातून ८०-९० च्या दशकातल्या यश चोप्रांच्या चाँदनी
ने तर सरसकट सगळ्याच जनमानसाला श्रीदेवीच्या आणि स्वीत्झर्लंडच्या हिरव्यागार सौंदर्याची
जणू भुरळच घातली.स्वीत्झर्लंडच्या एकूणच अर्थकारणात आणि दरडोई उत्पन्नात जितका वाटा
त्यांच्या जागतिक दर्जाच्या मालाच्या उत्पादन क्षेत्राचा आहे तितकाच मोलाच वाटा आपल्यासारख्या
असंख्य पर्यटकांच्या माध्यमातून त्यांना परकीय चलन मिळवून देणार्या पर्यटन क्षेत्राचा
आहे आणि ह्याची जन आणि भान असं दोन्ही ह्या राष्ट्राला आहे. त्यामुळं स्वीत्झर्लंडमध्ये
पर्यटन क्षेत्राशी संलग्न असलेल्या अशा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे सरकारी अधिकारी
,कर्मचारी,व्यावसायिक बर्यापैकी “अतिथि
देवो भव | “ च्या भावनेतून पर्यटकांशी बोलतात.त्यामुळे स्वीत्झर्लंडमध्ये
फिरताना “At Home “ वालं फीलिंग येतं.
Jangfrau,Zermatt,Lucern,Geneva,Mount Titlis असो की Interlaken सगळ्यांची निसर्गसौंदर्याच्या बाबतीत जशी चढाओढ लागल्यासारखी वाटते आणि त्यांची
countryside सुद्धा तितकीच विलक्षण सुंदर.Geneva ते Interlaken चा SBB ट्रेनचा लेक थून च्या किनार्यालगतचा तो झिरझिरत्या पावसातला निसर्गसुंदर प्रवास
आठवला की आज ही अंगावर रोमांच उभे राहतात.
पण जितकं स्वीत्झर्लंड सुंदर तितकीच तिथली माणसं देखील लोभस.बर्यापैकी मित्रत्वाने
वागणारी.आम्ही जिथे आठवडाभर उतरलो होतो ते अगदी आप्ल्स पर्वतांच्या कुशीत वसलेलं एक
Sanitorium cum Hotel असं
असल्यामुळे बरीच वयोवृद्ध मंडळी तिथे मुक्कामासाठी होती. साहजिकच हॉटेल तर स्वच्छ होतच
त्याहीपेक्षा तिथला सगळं कर्मचारी वर्ग अतिशय मृदुभाषी,मनमिळाऊ आणि helpful होता.एक दिवस सकाळी ब्रेकफास्ट serve करायला आलेल्या गोर्या वेटरच्या युनिफॉर्मवरच्या nameplate वर “नेहरू” असं नाव
वाचून आम्हाला खूप गम्मत वाटली. त्याच्या वडिलांनीन
त्याचं नाव “नेहरू” असं ठेवण्यामागची जी काही छोटी पार्श्वभूमी त्याने आम्हाला ऐकवली त्यातून उमटलेली
त्याच्या वडिलांची “नेहरूभक्ति” आम्हाला आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी होती.नेहरूंबद्दल माझं वैयक्तिक
मत काहीही असो ते ऐकल्यानंनंतर मला फक्त “आनंद” सिनेमातला राजेश खन्नाचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवला ,”बाबू मोशाय, जिंदगी लंबी
नही बडी होनी चाहिये | "
खरंच,बाकीच्या इतर बलाढ्य अशा आर्थिक महासत्तांच्या क्षेत्रफळापुढे
आणि अर्थव्यवस्थेपुढे भारत तसं म्हटलं तर तुलनेने खूपच लहान पण त्याची कीर्ती मात्र
महान.क्षेत्रफळाने लहान असूनही सगळ्या जगाची नजर भारताने कायमच स्वतःवर खिळवून ठेवलीय,मग असं असताना आपण काश्मीरला “भारताचं स्वीत्झर्लंड” असं संबोधण्यापेक्षा “स्वीत्झर्लंडला
जगाचं काश्मीर” का बरं म्हणू नये ?
माधुरी गोडबोले - माईणकर
६ जून २०२०
छान लेखन शैली. वाचकाला प्रत्यक्ष आपणच टूर करितअसल्याचा अनुभव येतो. बेल्जियम रेस्टॉरंट मधील किस्सा मस्त वाटला.
ReplyDelete