Skip to main content

God’s Own Country

God’s Own Country

एखाद्या नैसर्गिक संकटाचा कोणत्याही देशावर किंवा राज्यावर होणारा दूरगामी परिणाम पडताळता येणं तसं कठीणच. तसचं काहीसं केरळच्या बाबतीत म्हणता येईल.अलीकडेच काही महिन्यांपूर्वी केरळला जाणं झालं.वास्तविक पाहता एकंदरीत पर्यटकांचा केरळकडचा ओढा पाहता फक्त पंधरा दिवस आधी विचार करून आम्हाला कुठे आश्रय मिळेल असं जरा दुरापास्तच वाटत होतं,तेही ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये.ऑक्टोबर ते डिसेंबर हा केरळचा पर्यटन हंगामच खरा तर त्यामुळे जर का केरळमध्ये काही थारा नाही मिळाला तर आम्ही आमचा बॅकअप प्लान सुद्धा तयार ठेवला होता.पण अहो आश्चर्यम ! आम्ही जसा बेत आखला होता तसं तसं त्या त्या ठिकाणी आमची सोय होत गेली अगदी अनपेक्षितपणेच ...अर्थात ती का झाली ते आम्हाला तिथे पोहोचल्यावरच लक्षात आलं.

थिरुअनंथपूरमच्या एअरपोर्टवर उतरलो आणि एकही ओला / उबर मोकळी सापडायला तयार नाही. मग  रिक्षाशिवाय पर्यायच नव्हता. तिथे साधारणपणे आपल्याकडचा सांगली-सातारा-कोल्हापूरकडचा छकडा किंवा वढाप म्हणता येईल इतक्या आकाराच्या रिक्षा राजरोस रस्त्यांवर धावताना दिसतात.अशाच रिक्षाच्या शोधात असताना आमची गाठ पडली “सय्यदशी “.आमचा रिक्षा ड्रायवर कम गाइड. तसे सकाळी बर्‍यापैकी लवकर पोहोचलो असल्यामुळे थिरुअनंथपूरम भटकण्याच्या उद्देश्याने आम्ही त्याच्याशी बोली ठरवून घेतली.त्याच्या रोजच्या मिळकतीपेक्षा थोडे वरचेच पैसे मिळणार असल्यामुळे तो ही आम्हाला गावभर हिंडवायला आनंदाने तयार झाला, इतकंच नाही तर आम्हाला अष्टमुडीला जाण्यासाठी वाजवी दरात टॅक्सी शोधून देण्याची जबाबदारीसुद्धा त्याने आपणहून स्वीकारल्यामुळे आम्ही एकदमच निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यामुळे साहजिकच पोटात कावकाव करणारे कावळे आता काही गप्प बसू देईनातन्याहारीची वेळही म्हटलं तर तशी टळूनच गेली होती.त्याला आमचे भुकेने  काकुळतीला आलेले केविलवाणे चेहरे वाचता आले असावेत त्यामुळे आम्ही फारसं काही नं सांगताच त्याने आम्हाला आधी न्याहारी उरकून घेण्याचा नुसता बहुमूल्य सल्लाच नाही दिला तर थेट एका हॉटेल पाशी रिक्षा नेऊन थांबवली.अगदी अस्सल केरळी पद्धतीच्या अल्पोपहारावर आणि  फिल्टर कॉफीवर ताव  मारून आम्ही भटकंतीला सुरुवात केली. त्यानंतर पुढचे तीन तास,त्याच्या परीने जितकी थिरुअनंथपूरमची माहिती पुरवता येईल तितकी पुरवत,त्याचा आणि आमचा त्याला सहज समजेल अशा तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये संवाद सुरू राहिला.थिरुअनंथपूरमपर्यन्त जाऊनही कन्याकुमारीपर्यंत नं जाता येण्याची मात्र मनाला चुटपुट लागून राहिली.आमच्या लेकीकडून , ती तिच्या नवर्‍याबरोबर हनीमूनला केरळलाच फिरायला येईल, असं हंगामी आश्वासन तिच्याकडून घेऊन आणि आमच्याबरोबर एक सेल्फी घेऊन ठरवल्याप्रमाणे अष्टमुडीच्या टॅक्सीमध्ये आम्हाला बसवून त्याने आमचा निरोप घेतला.

एकदा का तुम्ही केरळच्या बॅकवॉटर्सला येऊन पोहोचलात की नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवाईच नजरेस पडते.म्हटलं तर आपलं कोकण आणि केरळ दोन्ही प्रांत किनारपट्टीला लागूनच , दोन्हीही तितकेच हिरवेगार आणि अलगद वार्‍यावर डोलणार्‍या गर्द माडांच्या वनराईने नटलेले पण तरीही आपल्या कोकणच्या आणि केरळच्या हिरवाईच्या छटेत फरक नक्कीच जाणवतो.केरळ नितांत सुंदर आहे, निःसंशय !.... पण तरीही त्यावेळी मला मात्र आपल्या कोकणातली हिरवाईच जास्त भावते असं वाटलं. रिसॉर्ट अगदी बॅकवॉटर्सला लागूनच असल्यामुळे क्वचित मध्येच पाण्याची हलकी गाज ऐकू येत होती.त्यात दिवाळीचा पहिलाच दिवस त्यामुळे रोषणाईला तर तोटाच नव्हता. रात्री एक से एक अशा पक्वान्नांच्या झोडीने तर ह्या सगळ्या सणाच्या सोहळ्याला चार चाँद लावले.पण आपला महाराष्ट्र सोडला तर बाकी राज्यांमध्ये सर्वसाधारणपणे एकच दिवसाची दिवाळी साजरी होत असल्यामुळे जेमतेम एकच दिवस ही सगळी चैन पुरवता आली ह्याची खंत वाटली.खरंतर दक्षिणेकडच्या कोणत्याही  प्रांतांमध्ये दिवाळी साजरी केली जातच नाही पण हॉटेल व्यावसायिकांना सर्वच जातीधर्माच्या लोकांची मनं सांभाळावी लागत असल्यामुळे, मुंबई बाहेर असूनही एक दिवसाची का होईना पण दिवाळी साजरा करण्याचा आनंद घेता आला.कधी थिरुअनंथपूरमला गेलात तर जटायूची visit तो बनती ही है.... थिरुअनंथपूरमपासून साधारणपणे ६० कि.मी.वर कोल्लममध्ये राजीव अंचल ह्यांच्या सृजनशील हातातून घडलेला एक अप्रतिम कलाविष्कार “जटायू अर्थ सेंटर ”.असं म्हणतात कि रावण सीतेला पळवून लंकेला नेत असताना,रावणाशी लढताना इथेच जटायू गत:प्राण झाला,त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय दर्जाचं डोळ्यांचं पारणं फिटेल असं हे  दगडी शिल्प उभारलं गेलं आहे.त्याचबरोबर कोल्लम हे केरळमधलं काजूचं आगारसुद्धा समजलं जातं.

२६ जुलै २००५ च्या पावसाच्या हाहा:कारानंतर मुंबई बर्‍यापैकी लवकर पूर्वपदावर आली होती पण २०१८ च्या पुराने  केरळची मात्र  कंबर अगदी पुरती मोडलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.२०१८ च्या पुरात क्लब महिंद्रच्या कुमारकोम रिसॉर्टचं इतकं प्रचंड नुकसान झालं की ते दुरुस्त करण्यापलीकडचं असल्यामुळे  बंद करण्याशिवाय त्यांना पर्यायच राहिला नाही.इतकंच नाही तर २०१८ च्या पुरानंतर एकूणच केरळला येणार्‍या पर्यटकांचा ओघ इतका बर्‍यापैकी आटलाय की अगदी ऐन हंगामात सुद्धा टुरिस्ट टॅक्सी चालकांच्या हाताला असणारं काम कमी झालं.आमच्या  मुन्नारच्या टॅक्सी ड्रायवरचं तर म्हणणं होतं की,”२०१८ पूर्वी पर्यटक आमच्या मागे धावायचे आता आम्ही त्यांच्यामागे धावतो.” हेच कारण होतं की फक्त पंधरा दिवस आधी सुद्धा आम्हाला हवी तशी आणि तिथे आमची केरळमध्ये सोय झाली होती.असो.

मुन्नार फिरताना आपल्याकडे गावात रस्त्यालगत जितक्या स्वाभाविकपणे गवत उगवलेलं दिसतं अगदी तशीच आणि तितक्या संख्येने वेलचीची झाडं पाहायला मिळतात.वर्षभर असलेल्या अतिशय थंड कुंद हवामानाबरोबरच चहाचे मळे, दर्जेदार मसाल्यांचे पदार्थ आणि जगप्रसिद्ध केरळीय आयुर्वेदिक मसाजसाठी मुन्नार कायमच देशोदेशीच्या पर्यटकांना आकर्षित करत राहिलंय. मुन्नारच्या आयुर्वेदिक फार्म मध्ये आपल्या स्वैपाकघरात आपण सर्रास वापरत असलेल्या मसाल्यांच्या पदार्थांबरोबरच इतर अनेक वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची तोंडओळख झाली. खरचं ,किती काय काय दिलंय निसर्गाने माणसाला ! आपण म्हणतो माणूस मातीतून जन्माला आला आणि मातीतच मिसळणार ते अगदी तंतोतंत खरं आहे कारण माणसाच्या प्रत्येक लहान मोठ्या व्याधींवर निसर्गाकडे कसं चपखल उत्तर आहे ह्याची कल्पना आम्हाला ते फार्म फिरताना आली. माणूस कितीही प्रगत होऊ दे ,रोज नवीन तंत्रज्ञान शोधू दे, पण अखेरीस जाऊन भिडणार आहे तर निसर्गालाच.जेव्हा जेव्हा माणसाने निसर्गावर कुरघोडी करायचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा निसर्गाच्या पुढे माणूस झेप घेऊ शकत नाही हे वारंवार निसर्गाने माणसाला दाखवून दिलंय आणि दाखवतोही आहे. सध्याच्या करोना विषाणूच्या विश्वव्यापी संसर्गाने तो संपूर्ण मानवजातीला कसं पाहता पाहता गुडघे टेकायला लावू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्याने प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या कुशीत योग्य त्या ठिकाणी आश्रय दिलाय आणि तो हक्क हिरावण्याचा दुसर्‍या कोणत्याही प्राणिमात्राला अधिकार नाही,अगदी माणसालाही नाही असं तो आपल्याला बजावतोय.आता गरज आहे ती आपल्याला काळाची पावलं ओळखून जबाबदारीने वागण्याची.”जगा आणि जगू द्या “ तत्वाचा अवलंब करण्याची. निसर्गदत्त संपत्ति जीवापाड जपण्याची ना की तिचा विध्वंस करण्याची .

We preserve nature or nature has its own ways of reclaiming it.


माधुरी गोडबोले – माईणकर

२६ मार्च २०२०

Comments

  1. खूपच छान! आत्ता जानेवारीत आम्ही पूवर, जे त्रिवेंद्रम च्या outskirts ला आहे, तिथे 5 दिवस गेलो होतो. त्रिवेंद्रम मध्ये खूप भटकलो आणि जटायू सेंटर ही बघितलं. त्यानंतर बरेच वर्ष बघायचं राहून जात होतं ते कन्याकुमारी ही बघून आलो. मुन्नार बघून जवळ जवळ 17-18 वर्ष झाली. पण त्या सर्व आठवणी तुझ्या ह्या ब्लॉग मुळे जाग्या झाल्या😊

    ReplyDelete
  2. Thank you so much, मेधाताई. आमच्याकडे जेमतेम पाच दिवस होते त्यामुळे पूवर आणि तिथून पुढे कन्याकुमारी हे दोन्ही वगळाव लागलं आम्हाला दुर्दैवाने...मग पाच दिवसात जितकं बसवता आलं तितकं बसवलं. In fact आमचं तर्वकोची सुद्धा नाही झालं कारण मुन्नार ते कोची रस्ता खराब असल्यामुळे परत येताना आम्ही मदुराईहून आलो.त्यामुळे मीनाक्षी temple झालं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...