दुबई --- एक मायाजाल
मागच्या वर्षी जॉर्जीयाला
जाता येता दोन्ही वेळी आमचा शारजा एअर पोर्टवर बराच मोठा stop-over होता.तेव्हा सवडच सवड असल्यामुळे साहजिकच आमच्या
दुबईतल्या वास्तव्यातल्या बर्याच आठवणी शारजाच्या निमित्त्याने ताज्या झाल्या.“
दुबई ” असं नुसतं उच्चारलं जरी तरी आपल्या डोळ्यांसमोर येतं ते एक चकचकीत असं अरबी
राष्ट्र .खूप चमक धमक असलेलं. आपल्या मनांत वर्तमानपत्रांमधल्या अवाजवी प्रसिद्धी दिल्या
गेलेल्या दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या जाहिराती,तिथला सोने
बाजार,अरबी अत्तरं,
सगळ्यांना नादावणारा अरबी लावण्यवतीचा Belly Dance असं बरंच
काही ऐकीव क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून जातं.त्यामुळे
दुबई म्हटलं की फक्त लखलखाट असं समीकरण डोक्यात बसलेलं आहे.ह्या सगळ्यामुळे जसं
एकदा तरी ताज महाल नाही तर यूरोप पाहावं असं आपल्या मनात असतं अगदी तसचं आयुष्यात
एकदा तरी दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या निमित्त्याने दुबई पाहता यावं असं आपल्या बकेट
लिस्ट मध्ये असतं. काही वर्षांपूर्वी मनोजच्या म्हणजे माझ्या नवर्याच्या नोकरीनिमित्त्याने
काही वर्षांसाठी दुबईत राहण्याचा योग आला.त्याने जेव्हा दुबईत नोकरी घेतली तेव्हा
आपल्याकडच्या हिन्दी सिनेमांमधून ज्या प्रकारचं अरबांचं स्त्रीलंपट चित्र रंगवलं
जातं तेच डोळ्यासमोर असल्यामुळे तिथे जाण्यापूर्वी आम्ही दोघंही थोडेसे धास्तावलेलो
होतो.कुटुंब घेऊन तिथे राहणं कितपत सुरक्षित आहे,तिथली
इस्लामिक संस्कृती आणि अरबांबद्दलची एक अनाहूत भीती अशा बर्याच काही शंका कुशंका डोक्यात
घेऊन मनोजने दुबईत पाय ठेवला .पण जसजसं तो तिथे राहत गेला तसतसं त्याच्या मनातलं
अरबांबद्दलचं हिडीस चित्र पुसलं जाऊन हळूहळू त्यांच्याबद्दलची त्याच्या मनातली
प्रतिमा चांगल्या अर्थाने बदलत गेली.
तीन चार महिन्यांत मी ही
आमच्या लेकीला घेऊन रीतसर दुबईत दाखल झाले.मी पोहोचेपर्यंत मनोजने त्याला सुचेल
जमेल तसं बर्यापैकी संसारोपयोगी सामानसुमान मला लावण्यासाठी घरात तयार ठेवलं
होतं. पण तरीही बर्याचशा गोष्टी बाकी होत्या.” अगं, दुबई
म्हणजे आपलं मिनी मुंबईच आहे,तू म्हणशील ते ते सगळं तुला इकडे मिळेल त्यामुळे तिकडून येताना
फार काही वजन उचलून आणू नकोस “,असं
आधीच त्याने निक्षून सांगितलं होतं.अलीकडेच वर्तमानपत्रात वाचलं की भारताबाहेर
संपूर्ण भारतातल्या लोकसंख्येच्या जवळपास म्हणता येईल इतके भारतीय आहेत.काही
प्रमाणात कदाचित ही अतिशयोक्ति असेलही पण त्यात तथ्य नक्कीच आहे, कारण
दुबईत ७० टक्के भारतीय आणि ३० टक्के तिथले स्थानिक आणि इतर देशांचे लोक आहेत.आपल्याकडे
जितक्या प्रमाणात सापडणार नाहीत तितक्या प्रमाणात दुबई मध्ये शुद्ध शाकाहारी
हॉटेल्सची संख्या असल्यामुळे इस्लामिक देश
असूनही आपल्यासारख्या शाकाहारी लोकांचं तिथे बिलकुलच अडत नाही..फार दंगामस्ती आणि हल्लाबुल्ला
करून उपद्रव केला नाही तर सगळे सणवारही तिकडे अगदी उत्साहाने साजरे करता
येतात.प्रगत तर सगळ्याच अमीराती आहेत पण सातही अमीरातींमध्ये दुबई त्यामानाने बर्यापैकी
पुरोगामी विचारांचं आहे.रमादानच्या काळात काय किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय
स्थलांतरितांवर त्यांच्या धर्मस्वातंत्र्याला घेऊन किंवा बायकांना जाचक असे अतिशय
कठोर निर्बंध तिथे नाहीत.
कुठे,
कोणत्या वेळी आणि साधारणपणे कोणत्या भागांमध्ये एकटीने जाऊन हिंडणं सुरक्षित आहे
त्याची मनोजकडून पुरेशी कल्पना घेतल्यावर रोज लागणार्या आवश्यक गोष्टी
शोधण्यासाठी एकटीनेच दुबई पिंजायला मी सज्ज झाले.तसं आम्ही जिथे राहत होतो तो टापू
खरंतर अगदी मोक्याच्या अशा मध्यवर्ती
ठिकाणी आणि भारतीयांनी बजबजलेला असल्यामुळे तसा सुरक्षित तर होताच पण दुबईच्या इतर भागांशी
पब्लिक बसेसनी बर्यापैकी चांगला जोडलेला सुद्धा होता त्यामुळे पायी फिरणं शक्य होतं.
पण
तरीही तिथे गेल्यानंतर दोन तीन महिने मला जरा सबुराईनेच घ्यावं लागलं कारण दुबईचं वर्षातले
जवळपास आठ ते नऊ महिने असलेलं आत्यंतिक उष्ण हवामान आपल्याला त्याची मुभा देत
नाही.वातानुकुलीत वाहनाशिवाय पर्याय नाही. अगदी जवळची सुपरमार्केट्स वगळता फार लांबपर्यंत
कुठे जाऊन काही गरज पडेल ते खरेदी करणं फारसं शक्य झालं नाही.त्यावेळी दुबईत
मेट्रो अस्तित्वात नव्हती आणि बसेसची सेवा ठराविक ठिकाणं जोडण्याइतपतचं मर्यादित होती.त्यामुळे दुबईहून अगदी साधं
शारजाला जायचं किंवा जरा थोडं लांब कुठे जायचं तर स्वतःचं वाहन घेईपर्यन्त दुबईची
पब्लिक टॅक्सी खिशाला न परवडणारी असल्यामुळे स्वस्तशा पठाणी लोकांच्या टॅक्सीचाच
आसरा घ्यावा लागायचा.मग त्यात safety आणि
गाडीची अवदशा हे दोन कळीचे मुद्दे असायचे.दुबईत ड्रायविंग लायसन्स मिळणं म्हणजे I.A.S. नाही
तर C.A. ची परीक्षा पास होण्यासारखं आहे.आतापर्यंत ड्रायविंग
लायसन्स मिळाल्यावर कधी कोणी पेढे वाटल्याचं ऐकीवात नव्हतं ते तिकडे ऐकायला
मिळालं.दूध नाही पण पिण्याचं पाणी मात्र नियमितपणे रतीब लावून विकत घ्यावं लागणं
हे ही त्यातलंच एक. बाकी आपल्या देशात आपल्या आजूबाजूला सहज आणि स्वस्तात मिळणार्या
किंवा उपलब्ध असणार्या बर्याचश्या गोष्टींचं आपल्याला मोल वाटत नाही ते मला
दुबईत राहताना कळलं. अगदी रोज लागणार्या दुधासारख्या किंवा मिरची
कोथिंबीरीसारख्या मामुली गोष्टी विकत आणण्यासाठी सो कॉल्ड जवळच्या सुपरमार्केटपर्यन्त
तिथे जेव्हा ऐन पोळणार्या उन्हात चालत जावं लागत असे तेव्हा जितकं मी गल्लीच्या
तोंडावर असलेल्या भाजीवल्याला किंवा वाण्याला miss केलं
असेल ते त्याआधी मी कधीच केलं नव्हतं.अशा लोकांचा आपलं दैनंदिन आयुष्य काहीसं
म्हणण्यापेक्षा बर्याच अंशी सुखकर करण्यातला अमूल्य वाटा तेव्हा माझ्या लक्षात आला.
दुबईत जागेचा तुटवडा
नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी कशा कमालीच्या प्रशस्त असतात मग ती साधी दुकानं,शाळा,ऑफिसेस
असोत नाही तर हॉस्पिटल्स, शॉपिंग मॉल किंवा गार्डन्स असोत. सगळी ठिकाणं नुसती वातानुकूलितच
नाहीत तर अगदी अद्ययावत सुखसोयींनी आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज सुद्धा असतात.आपल्याकडे
पाहिली नाही इतकी हिरवाई जपलेली मी तिथे पाहिली.ती ही
आपल्या रोजच्या सांडपाण्याचा वापर करून.नव्याने अस्तित्वात आलेलं कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान
दुबईत लागलीच अवलंबलं गेलं नाही असं मी पाहिलं नाही. खनिज तेल सोडता इतर कोणतीही निसर्गदत्त
संपत्ति नसली तरी जर मुबलक पैसा हाताशी असेल आणि राजकीयांची तितकी इच्छाशक्ति आणि
दूरदृष्टी असेल तर स्वतःचं असं बुद्धीसामर्थ्य नसूनही आपल्या भारतीयांसारख्यांच्या
बुद्धीचा यथायोग्य वापर करून अगदी वाळवंटाचा सुद्धा एका अतिशय प्रगत राष्ट्रात कसा
कायापालट करता येऊ शकतो हे आखाती देशांनी सगळ्या जगाला दाखवून दिलंय.
कधी दुबईला जाणं झालच तर
तिथली Desert सफारी आणि Belly Dance
तर अजिबात चुकवू नका.Desert सफारी हा एक थरारक अनुभव आहे तर त्यातला Belly Dance ही एक
मादक अनुभूतीच म्हणावी लागेल.अरेबिक संगीतावर आपला कमनीय बांधा कमालीच्या लवचिकपणे
थिरकवणारी लावण्यवती पाहून एखाद्या बाईलाही तिच्या त्या मादक सौंदर्याची मोहिनी
पडावी.आणि हो, आम्हा बायकांसारख्या shopoholics साठी
दुबई म्हणजे शॉपिंग स्वर्गच जसा.सर्वोतम जागतिक दर्जाच्या खात्रीलायक electronic वस्तू , महागडे
perfumes, सोन्याचे
दागिने बर्यापैकी वाजवी किमतीत मिळण्याचं हमीचं ठिकाण म्हणजे दुबई.दुबईच्या
मुर्शिद बाजारच्या गोल्ड souk मध्ये फिरताना सोन्याच्या दागिन्यांचाच इतका लखलखाट असतो
की रस्त्यांवरल्या दिव्यांचा उजेड फिका वाटावा.तसा आजच्या जागतिक महिला दिनाच्या
निमित्त्याने आठवलं, माझा लेक ऋषी तान्हा असताना जेव्हा कधी रस्ता
ओलांडण्यासाठी मी बराच वेळ मुलांना घेऊन ट्रॅफिक कमी व्हायची वाट पहात थांबलेले असायचे
तेव्हा तिथे उभा असलेला पोलिस रस्त्याच्या मधोमध येऊन ट्रॅफिक थांबवून मला रस्ता
ओलांडायला मदत करत असे.मला आठवतंय,ऋषी पाचच महिन्याचा होता जेमतेम जेव्हा मी दोन्ही
मुलांना घेऊन दुबई एअरपोर्टवर मुंबईला येण्यासाठी बॅगेज चेक इनच्या रांगेत उभी होते.
माझ्या मागे उभा असलेला माणूस अकारणच खूप घाई असल्यासारखं भासवत मला काहीशी ढकलाढकली करायचा प्रयत्न करत होता आणि त्यात अचानकच माझ्या
लेकाने जो टाहो फोडला तो काही केल्या थांबायचं नाव घेईना. पण बाळ रडतंय आणि मला
त्या माणसाचा त्रास होतोय हे हेरून लगेच तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्या माणसाला
रांगेतूनच हाकलून दिलं आणि माझ्यासाठी चेक इन ची स्वतंत्र रांगच उघडली.असं कधी मी
आपल्या एअरपोर्टवर चुकूनही अनुभवलं नाही उलट बायकांप्रती तितकाच तटस्थपणा अनुभवलाय
. पण स्त्रीदाक्षिण्याचे असे बरेच अनुभव मी दुबईत रहात असताना घेतले.तिथे स्त्रियांच्या
बाबतीतले कायदे आणि सुव्यवस्था अतिशय कडक आहेत.स्त्रियांना सर्वतोपरी संरक्षण
देण्याचा,शक्य असेल तिथे तिथे त्यांना प्राधान्य देण्याचा
प्रामाणिक प्रयत्न केला जातो.पण कायदे इतके
कडक असूनही तिथे स्थलांतरित झालेल्या पाकिस्तानी किंवा अफगाणी लोकांमुळे बलात्कारांचे
गुन्हे घडत नाहीत असं नाही.तिथली पोलिस
यंत्रणा त्यांचं हे अपयश सहजासहजी बाहेरही येऊ देत नाही, पण
बलात्कारांचे गुन्हे तिथल्या स्थानिक अरबी लोकांमुळे अजिबात घडत नाहीत.कधी कोणत्या
अरबाला उगाच आंबटशौकिनपणा करताना,कोणत्याही बाईकडे बिभत्स किंवा वाकड्या नजरेने पाहताना आमच्या
वास्तव्यात आम्हाला चुकूनही आढळलं नाही.
आजच बातमी वाचली की भारतात
स्त्रियांबाबत घडणार्या अत्याचारांमध्ये आणि बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये दरवर्षी
लक्षणीय वाढ होतेय .पण “ यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता । “ संस्कृतीचा उदो
उदो करणार्या आपल्या देशात जर का दर
बावीस मिनिटांना एक लेक बलात्काराची बळी होत असेल तर आपल्या देशात महिलांना असलेल्या
संरक्षणाबाबत,समाजाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या मानसिकतेबाबत खूप सखोल विचार
होण्याची गरज आहे. यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या “ इच फॉर इक्वल ” या संकल्पनेच्या
निमित्त्याने राहून राहून एकच वाटतं की स्त्रीशक्तीचा जागर ,
त्यांचा आदर ही केवळ नवरात्रीच्या किंवा जागतिक
महिला दिनाच्या औचित्याने साजरा करण्याची बाब नाही तर तो आपल्याला सातत्याने साजरा
करता यायला हवा .आजही काही कुटुंबांचा अपवाद वगळता,सरसकट सगळ्या
कुटुंबांमध्ये घरातल्या जावयांना जितक्या आदराने वागवलं जातं तसं सुनांना वागवलं जात
नाही कारण पुरूषांना बायकांपेक्षा वरचढ समजलं जाणार्या अशा आपल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या
मानसिकतेचा कुठेतरी आपण सगळेच अप्रत्यक्षरीत्या आजही गुलाम आहोत, हे
कितीही कटू असलं तरी सत्य आहे.आजच्या घडीलासुद्धा आपल्याकडे स्त्री पुरुष समानता
केवळ ही कागदोपत्री आहे.फक्त उक्ती आहे पण कृती मात्र नाही.त्यामुळे
स्त्रीशक्तीचा आदर आपण आपल्या घरातूनच करणं खरंतर क्रमप्राप्त आहे.आज “पंगा”, “थप्पड”
सारखे चित्रपट अतिशय बोलक्या पद्धतीने आणि अत्यंत प्रभावीपणे हा विचार अधोरेखित
करू पाहतायत, समाजव्यवस्थेमुळे पिढ्यांनुपिढ्या जटिल होत गेलेल्या संवेदनशील
अशा स्त्रीविषयक प्रश्नांना वाचा फोडतायत. पण त्याच्यावर आवश्यक तितकं आणि तसं विचारमंथन होऊन जेव्हा खर्या अर्थाने स्त्री-पुरूष
लैंगिक समानतेचा विचार आपल्यासारख्या सामान्य जनमानसांच्या माध्यमातून संपूर्ण
समाजात रूजेल तेव्हाच घरादारातली किंवा रस्त्याने चालणारी एकटी मुलगी ही सावज नसून
जबाबदारी आहे अशी प्रत्येक पुरुषाची मानसिकता तयार होईल आणि मग प्रत्येक दिवस हा खर्या
अर्थाने जागतिक महिला दिवस असेल.मग वेगळ्या जागतिक महिला दिनाची गरजच काय ? आजपासून
प्रत्येक दिवशी साजरा करूयात -
“जागर स्त्रीशक्तीचा,जागर समानतेचा ! “
Happy Women ‘s Day!
माधुरी
गोडबोले-माईणकर
८
मार्च २०२०
Comments
Post a Comment