Skip to main content

औरंगाबादच्या कडेकपाऱ्यांत

 औरंगाबादच्या कडेकपाऱ्यांत

उंचावल्या ना भुवया शीर्षक वाचून.. औरंगाबाद ? हॉलिडे डेस्टिनेशन? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात डोकावला असेलच ... .पण आपल्या महाराष्ट्रातसुद्धा बरंच काही आहे पाहण्यासारखं,आपण फक्त ते फारसं मनावर घेत नाही इतकंच.नाशिकनंतर महाराष्ट्रदर्शन दौऱ्यातील आमचा पुढचा मुक्काम पोस्ट होता "औरंगाबाद"....  

अलीकडच्या पाताळयंत्री सासवा किंवा सुना ह्यांच्या स्टिरीओ टिपिकल मेलोड्रॅमॅटिक सिरिअल्स पाहणं आमच्यासारखंच ज्यांना फारसं झेपत नसेल त्यांच्यासाठी "एपिक" चॅनेलवर एकांत,रेजिमेंट डायरीज,अद्रिश्य इ.बरेच वैविध्यपूर्ण कार्यक्रम चालतात.अशाच कार्यक्रमांच्या यादीत एक माहितीपूर्ण कार्यक्रम असतो "संरचना ".ज्यात आपल्या देशातील वेगवेगळ्या भागांमधल्या प्राचीन वास्तूंच्या, मग त्यात देवळं ,महाल,गड किल्ले,लेणी,गुहा इत्यादींच्या बांधणीची स्थापत्यशास्त्र,भौतिकशास्त्र,वास्तुशास्त्र,सामान्य विज्ञान आणि ध्वनी विज्ञान अशा निरनिराळ्या दृष्टिकोनातून माहिती दिली जाते.अशाच एका भागामध्ये आम्हाला हम्पी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या दौलताबादच्या किल्ल्याबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली होती.तसं म्हटलं तर अजिंठा वेरूळच्या लेण्यांबद्दल आपण लहानपणी आपल्या इतिहास भूगोलाच्या पुस्तकांमध्ये वाचलेलंही आहे पण ती माहिती बऱ्यापैकी जुजबी होती,असं हा कार्यक्रम पाहताना जाणवलं.

सरत्या वर्षाला निरोप देताना कोणत्या तरी देवस्थानाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाच्या उगवत्या सूर्याचं स्वागत करायचं असा एक सर्वसाधारण प्रघात आम्ही गेले काही वर्षं जमेल तसा सुरु ठेवलाय.सगळ्यांच्या व्यापाचा ताळमेळ घालता घालता ह्या वर्षी बहुदा तरी हा प्रघात सांभाळता येणं दुरापास्तच दिसत होतं.पण जाण्यायेण्याचा दिवस जमेस धरून जेमतेम चार दिवसांची का होईना कदाचित सुट्टी हाताशी लागेल असा पुसटसा आशेचा किरण दिसायला लागल्यावर आम्ही लगेचच कामाला लागलो.निघायच्या अगदी आदल्या दिवसापर्यंत सुट्टीचा कोणताही ठोस कार्यक्रम ठरला नसल्यामुळेआणि यंदा बदामीच्या "शाकंभरी"च्या दर्शनाऐवजी "घृष्णेश्वर"च्या दर्शनाचाच आम्हाला योग होता म्हणून बहुदा,हंपीमधल्या राहण्यालायकीच्या तब्बल पंधरा ते वीस हॉटेल्समध्ये शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा एकही हॉटेल आमच्या हाताशी लागलं नाही.जसं काही सगळंच जग आमच्यासारखं हंपीच्या दौऱ्यावर निघालं होतं,पण हार न मानता आम्ही वळलो औरंगाबाद,दौलताबादकडे.आमच्या सुदैवाने आम्हाला नुकत्याच सुरु झालेल्या हॉटेलमध्ये बुकिंग मिळालं आणि आमच्या सुट्टीला निघण्यावर शिक्कामोर्तब झालं. 

मुंबईपासून औरंगाबादचा जवळपास आठ एक तासांचा प्रवास बिलकुलच सुखकर नाही. रस्त्यात खड्डे की  खड्ड्यात रस्ते ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमची संपूर्ण ट्रिप संपेपर्यंत मिळालंच नाही.कदाचित महाराष्ट्रात तरी ह्यालाच " विकास " म्हणतअसावेत.त्यातल्या त्यात विकसित म्हणता येतील अशा पुणे,नाशिक,औरंगाबाद ह्यासारख्या Tier II शहरांमध्ये, म्हणावं इतपत औद्योगिकीकरण असूनही, पुणं आणि नाशकाच्या मानाने ,औरंगाबाद तसं बकाल वाटतं.अजिंठा आणि वेरुळसारखी जगप्रसिद्ध युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळं  पाहायला देश विदेशातून पर्यटक लोटत असताना औरंगाबादला पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अपेक्षित तसं विकसित केलं जाऊ नये ही खरॊखरच वैषम्याची बाब आहे.ह्याचा मासला एकूणच औरंगाबादपर्यंतच्या रस्त्यांवर विशेषतः अजिंठ्याच्या रस्त्यावर तर मिळतोच मिळतो.आधीच पायाभूत सुविधांचा आनंद त्यात भर म्हणून ह्या सगळ्या आकर्षणांना पंधरा वर्षांखालील मुलांना असलेल्या मोफत प्रवेशामुळे जवळपासच्या शाळांच्या येणाऱ्या शैक्षणिक सहलींची आणि बेशिस्त उपटसुम्भान्ची भाऊगर्दी नकोशी करते.  

अजिंठाच्या लेण्यांना पोहोचेपर्यंत आपली सगळी हाडं त्यांच्या सुयोग्य जागेवर आहेत ह्याची तिथे उतरल्यावर खातरजमा आपल्याला करून घ्यावी लागते.अजिंठा लेण्यांचा विस्तार वेरूळच्या लेण्यांच्या मानाने कमी आहे. १८१९ मध्ये जॉन स्मिथ आणि त्यांचे काही ब्रिटिश सहकारी ह्या भागात फिरस्तीला आलेले असताना त्यांना इथल्या गर्द झाडीमध्ये लपलेली जलाशय असलेली अर्धवर्तुळाकार रेषा दृष्टीस पडली आणि त्याचा मागोवा घेत असतानाच त्यांना ह्या अद्भुत लेण्यांचा शोध लागला.अजिंठामध्ये अर्धवर्तुळ आकारामध्ये एकूण २९ लेणी आहेत. इसवीसन पूर्व दोन ते सहाच्या शतकांमधील ही बौद्ध भित्तिचित्रे बऱ्याच काळपर्यंत मातीत गाडली गेलेली असल्यामुळे दुर्लक्षित राहिली,परिणामी ती फारशी जतन केलेल्या अवस्थेत नाहीत.बौद्ध भिक्षूंनी स्त्रीसौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा,जातक कथा,बुद्धाचं सर्वसामान्य जीवनआणि बोधिसत्वातील अध्यात्मिक सौंदर्य असे वेगवेगळे विषय भित्तिचित्रांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलाय,त्यामुळे ह्या लेण्यांच्या भित्तिचित्रांमध्ये माणसांच्या चेहऱ्यावर एखाद्या प्रसंगांमधून प्रतिक्रियेच्या रूपात उमटणारे सहजसुलभ उत्कट आणि तरल भाव अतिशय काव्यात्मक स्वरूपात चित्रित केलेले जाणवतात. ह्या लेण्यांची विभागणी बुद्धाच्या विहार कक्ष आणि चैत्य कक्षांमध्ये केली गेलेली आहे.चैत्य कक्ष हे प्रार्थनास्थळ म्हणून आणि ध्यानधारणेसाठी तर विहार कक्ष हे बौद्ध भिक्षुकांना बौद्ध धर्माची दीक्षा,उपदेश देण्यासाठी तसंच भिक्षुकांच्या विश्रामासाठी उपयोगात आणले जात.अजिंठाच्या लेण्यांचा प्रमुख उद्देश्य हा बौद्ध धर्माचा प्रचार असल्यामुळे,ह्या गुहा इथेच का केल्या गेल्या असाव्यात ह्या प्रश्नाचं उत्तर बहुदा तरी ह्या भूभागाचं त्या काळच्या व्यापारी मार्गाशी असलेल्या सान्निध्यात दडलेलं असावं.  

औरंगाबादपासून केवळ १७ कि.मी.वर आहे महाराष्ट्रातल्या अजिंक्य आणि अभेद्य अशा किल्ल्यांपैकी एक,असा दौलताबादचा किल्ला अर्थातच त्याकाळच्या देवगिरीचा किल्ला.देवगिरीच्या यादव घराण्याच्या भिल्लम पंचम नावाच्या राजाने ११व्या शतकात हा किल्ला बांधला.केवळ युद्ध करून हा किल्ला जिंकणं अशक्यंच होतं.हा किल्ला फक्त आणि फक्त कपटानेच जिंकणं शक्य होतं,जो १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने कृष्णा देवरायचा मुलगा रामचंद्र देवरायला हरवून मिळवला.घरचे भेदी असतील तर घराण्याचा कसा ऱ्हास होतो ह्याची हा किल्ला साक्ष देतो.ह्या किल्ल्याला आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा असल्यामुळे शत्रूला किल्ल्यात घुसणं किंवा  किल्ल्यातून पळ काढणं सहजी शक्य होत नसे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर थोड्याच अंतरावर एक पूल आहे जो पूर्वी चामडी होता त्यामुळे रोज सकाळी हा पूल बांधला जायचा आणि संध्याकाळी उचलला जायचा.मुख्य किल्ल्याच्या सभोवताली एक पाण्याचा चर आहे ज्यात विषारी साप आणि मगरी ह्यांचा सुकाळअसे. मुख्य किल्ल्यात प्रवेश मिळविण्यासाठी हा पूल पार करूनच जाता येत असे.कोणा शत्रूने हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तो पूल उचलला जात असे जेणेकरून खालील पाण्याच्या चरात पडून त्याचा मृत्यू ओढवू शकेल.तसंच इथे दोन ठार अंधारलेले असे सुरूंग आहेत जे पार करणं शत्रूला केवळ अशक्यप्राय  होतं.शिवाय ह्या किल्ल्यावर मेंढातोफ सारख्या शॉकप्रूफ तोफा बसवलेल्या आहेत.ह्या आणि अशा अनेक प्रकारच्या सरंक्षणात्मक रचनांनी हा किल्ला अभेद्य बनवला गेला होता.

चरणांद्री पर्वतरांगांमध्ये बसाल्ट खडकांमध्ये कोरल्या गेलेल्या वेरूळच्या लेण्यांचा विस्तार अजिंठाच्या मानाने बराच मोठा आहे,कारण इथे एकूण ३४ लेणीआहेत..इतिहासकारांच्या मते २० हजार वर्षांपूर्वी इथे बरीच मनुष्यवस्ती होती. इसवीसनाच्या सुरुवातीच्या काळात इथे सातवाहन घराण्याचं राज्य होतं.त्यावेळी वेरूळ एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं. इथल्या ३२ व्या गुहेपाशी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हाची चिन्हे आजही पाहायला मिळतात. १६ व्या गुहेतील कैलास मंदिराची शिल्पकला पाहून आपण स्तिमित होतो. तब्बल दोनशे वर्ष खर्ची पाडून बसाल्टच्या खडकांमध्ये वरून खालच्या दिशेने आणि बाहेरून आत कोरलेल्या ह्या कैलास मंदिराच्या भव्य देवळाच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय राष्ट्रकुटाच्या दंतीदुर्ग आणि त्याचे काका कृष्ण प्रथम ह्यांना जातं,ज्याचा उल्लेख आपल्याला ह्या गुहेतील एका शिलालेखात पाहायला मिळतो.वेरूळमध्ये राष्ट्रकूट काळातील बौद्ध लेण्यांच्या बरोबरीने हिंदू आणि चालुक्य व देवगिरी साम्राज्यकाळातील जैन धर्माशी निगडित कोरीव काम असलेली लेणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.फक्त दौलताबादचा किल्ला फिरून आल्यावर तुमच्यामध्ये तासंतास फिरून ही सगळी लेणी पाहण्याचा उत्साह शिल्लक पाहिजे.

ह्या वेरूळच्या लेण्यापासून जेमतेम एक किलोमीटरवर आहे घुष्मेश्वर किंवा घृष्णेश्वराचं बारावं ज्योतीर्लिंग. वारंवार झालेल्या मुघलांच्याआक्रमणांमध्ये उध्वस्त झालेल्या ह्या  मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम अहमदनगरचे सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले ह्यांनी केला,ज्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या बाजूलाच जीर्णावस्थेत दिसते. पुढे इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांनी ह्या देवळाचा पुन्हा जीर्णोद्धार केला, जे आज उभं आहे.देवळाच्या घुमटाचं कोरीव काम खूपच रेखीव आणि नजरेत भरण्यासारखं आहे.हे ज्योतिर्लिंग सगळ्या ज्योतीर्लिंगांमधलं सर्वांत छोटं ज्योतिर्लिंगआहे.

पण आमच्या ह्या दौऱ्याचं महत्त्वाचं आकर्षण होतं ते म्हणजे लोणार सरोवर. ह्या लोणारच्या रस्त्यावर आहे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाईंचं माहेर  "सिंदखेडराजा".जिथे जिजाबाईंचे वडील आणि देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज लखुजी जाधव ह्यांचा वाडा म्हणजे जिजाऊंचं जन्मस्थान आहे.इथे हेमाडपंथी शैलीतलं एक नीळकंठेश्वर मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार ह्या लखुजी जाधवांनी केला होता. 

शरीराच्या आणि गाडीच्या एकेका भागाला व्यायाम देत आम्ही "लोणार" गाठलं.  
उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळून तयार झालेलं म्हणजे अशनीपाताने तयार झालेलं "लोणार" सरोवर हेआशियातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या किंवा आम्लारी(अल्कलाईन) पाण्याचं सरोवर आहे. ह्या आदळलेल्या उल्केतूनच उडालेल्या तुकड्यातून जवळच अंबर तळही तयार झालंय.सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी उल्केच्या आघातातून तयार झालेल्या ह्या सरोवराच्या भोवताली जे लोणारचं अभयारण्य आहे त्यात डायनॉसोरही असावेत जे उल्केच्या आघातातून तयार झालेल्या उष्णेतेने मरण पावले असावेत असा अंदाज आहे. लोणार सरोवराच्या पाण्यात जंतुनाशक गुणधर्म  असल्यामुळे बहुतांश त्वचाविकार बरे करण्याचा गुण ह्या पाण्यात आहे.सरोवराच्या पाण्यापासून तयार केलेला साबण अकबर आंघोळीला वापरत असे असा उल्लेख त्याच्या आईन-ए-अकबरी मध्ये सापडतो असं म्हटलं जातं.सरोवराजवळच दैत्यसदन नावाचं विष्णूचं देऊळ आहे जे कोणार्कच्या सूर्यमंदिराची प्रतिकृती मानली जाते. मुघलांच्या आक्रमणांमुळे आज हे देऊळ बऱ्यापैकी भग्नावस्थेत आहे.त्याच्या जीर्णोद्धाराचे कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.गाभाऱ्यातून चोरीला गेलेली विष्णूची मूळ मूर्ती तेवढी पुन्हा प्राणप्रतिष्ठित केली गेलीय.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची,पेशव्यांची,प्रतिभावंत क्रांतिकारकांची आणि संत मांदियाळीची प्रदीर्घ आणि संपन्न अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलीय.पण त्याचा आपण पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करून घेतला गेलेला दिसत नाही.महाराष्ट्रात फिरताना आपली प्रेरणास्थानं किंवा ऐतिहासिक वास्तू त्यांच्या पावित्र्य आणि महात्म्यासकट जतन करण्यातलं सरकारचं औदासीन्य फार प्रकर्षाने जाणवतं.महाराष्ट्राने देखील  त्याचं पर्यटन मूल्य वाढवण्याच्या दृष्टीने गुजरातसारखे अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढं नक्की. 


माधुरी गोडबोले-माईणकर 
www.valuevacations.co.in 

१४ जानेवारी २०२०












      

    











Comments

  1. माधुरी, नेहेमी प्रमाणे खूप छान माहिती सुंदर भाषे मध्ये दिली आहेस!

    ReplyDelete
  2. माधुरी, नेहेमी प्रमाणे खूप छान माहिती सुंदर भाषे मध्ये दिली आहेस!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...