Skip to main content

अन्नपूर्णा

 अन्नपूर्णा 


सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्याचा मोबाईल काढून त्याच्या एका मित्राने नुकत्याच सपत्नीक पूर्ण केलेल्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचे फोटो आम्हाला दाखवले.ती दोघंही साधारण आमच्याच वयोगटातली ...पण ती दोघंही त्यांचं फिटनेस regime फार काटेकोरपणे पाळतात त्यामुळे इतकी कठीण ट्रेक त्या दोंघांनी कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केली वगैरे वगैरे इत्यंभूत माहितीही मिळाली.आधी रणवीर अलाहाबादीयाच्या यू ट्यूब चॅनेल वर नुकतीच पाहण्यात आलेली बलजीत कौरची अन्नपूर्णा शिखर सर केल्याची मुलाखत आणि आता माझ्या मित्राच्या स्नेह्यांच्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या कथा ह्या दोन्हींनी भारावलेल्या मला अचानक अन्नपूर्णा सर्किट ट्रेकची दिवास्वप्नं पडायला लागली.बरीच वर्षं नियमित योगाभ्यास आणि चालण्याचा सराव ह्याव्यतिरिक्त आजवर दुसऱ्या कोणत्याही व्यायामाच्या आयामाशी माझा कधी फारसा संबंध नाही.पण मला ही ट्रेक शारीरिकदृष्ट्या झेपेल का हा विचारही तेव्हा मनाला शिवला नव्हता,आता जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा ही ट्रेक करायचीच इतकाच विचार डोकं आणि मन व्यापून होता.कोणतीही गोष्ट कठीण आहे असं कळलं की ती गोष्ट करून पाहण्याचा प्रयत्न करण्याची अत्यंत वाईट नैसर्गिक खोड माझ्यात आहे असं मला वाटतं , manufacturing defect च म्हणा ना ... का कुणास ठाऊक पण एव्हरेस्ट शिखर सर करू पाहणाऱ्यांचे आत्मघातकी किस्से ऐकिवात असल्यामुळे असेल कदाचित पण मला एव्हरेस्ट  बेस कॅम्पची ट्रेक शारीरिक दृष्ट्या झेपेल ह्याबद्दल शंका असल्याने ती ट्रेक कधीच माझ्या bucket list मध्ये नव्हती.मागच्या वर्षी अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचा माझा मनसुबा तडीस गेला नसला तरी अजिबात ध्यानीमनी नसताना अगदी योगायोगाने घडलेल्या त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकने मला कमालीचा आत्मविश्वास मात्र दिला इतकं नक्की. त्यामुळे माझी धिटाई वाढली असं म्हणता येईल. त्यामुळे सहाजिकच पुढचं लक्ष्य माझ्यासाठी होतं ते अन्नपूर्णा सर्किट ट्रेक. 


अन्नपूर्णा १

मागच्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेक दरम्यान तेनझिंग नॉरगे म्युझियम पहायला गेलो असताना तिथे लिहिलेलं सर एडमंड हिलरींचं एक छोटंसं वाक्य मनाला फार भिडलं होतं 

"It's not the mountain we conquer, but ourselves."

जे अगदी खरं आहे. EBC चा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर अगदी तंतोतंत स्वतःला जिंकल्याचीच भावना व्यापून होती.आपलं वय जसजसं वाढत जातं तसतसं आपले सेल्फ डाऊट्स वाढतात असं मला मनापासून वाटतं, ह्यात मतमतांतरं असतील किंवा काही अपवादही नक्कीच असतील.आधी जी कामं आपण पूर्ण आत्मविश्वासाने झपाट्याने हातावेगळी करत होतो त्याच कामांची साधी सुरुवात करतानासुद्धा एक चमत्कारिक दडपण यायला सुरुवात होते. असं वाटण्याची कारण काहीही असतील वाढत्या वयानुसार कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनातले असलेले ताणतणाव झेपवण्याची घटत चाललेली शारीरिक आणि मानसिक क्षमता,वैयक्तिक,कार्यालयीन आणि घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करताना वर्षानुवर्षे कणाकणाने झालेली शारीरिक झीज इत्यादी इत्यादी,पण सरतेशेवटी दिवसागणिक घसरत जाणारी आत्मविश्वासाची पातळी रोज मनाला अस्वस्थ करत असते हेच खरं.. आताशी पन्नाशीत ही अवस्था मग अजून वय वाढत जाईल तसं काय होईल हा त्या अनुषंगाने सतावणारा अजून एक अगांतुक विचार.मग एक क्षण असा येतो की आपण ही सगळी मनावरची जळमटं आणि मरगळ झटकतो आणि चलो आज कुछ तुफ़ानी करते हैं चा जोश आपल्यात संचारतो.. आपलं वय निव्वळ मग आपल्यासाठी एक आकडा असतो आणि आपण आपला घसरत चालेलला आत्मविश्वास पुन्हा सावरण्यासाठी काहीतरी भन्नाट करायचा नुसता शोध घेत नाही तर करतो सुद्धा... एव्हरेस्ट बेस कॅम्प सारख्या ट्रेकला अगदी जख्ख म्हाताऱ्यांपासून ते आपल्या लहान मुलांनासुद्धा आपल्याबरोबर ट्रेकसाठी आणणाऱ्या लेकुरवाळ्या आईबापांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या समस्त ट्रेकर्स मंडळींनी केलेली भाऊगर्दी ही कदाचित त्याचाच दाखला असेल. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर अशी कोणतीही ट्रेक ही माझ्यासाठी जितकी माझ्या शारीरिक क्षमतेची चाचणी असते त्यापेक्षाही जास्त ती माझ्या आत्मविश्वासाची , मानसिक लवचिकता आणि सहनशक्तीची चाचणी असते. 

जवळपास सगळ्याच वयोगटातल्या भारतीय ट्रेकर्स मंडळींना एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकचं वेड लावण्यात जसा सूरज बडजात्यांच्या "ऊँचाई"ने सिंहाचा वाटा उचललाय तसा चमत्कार अजून तरी अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या बाबतीत घडायचाय त्यामुळे आम्ही सहा आणि अजून एखाद दोन भारतीय चेहरे सोडले तर ह्या ट्रेकला वर्णी फक्त गोऱ्यांचीच कारण गोऱ्यांच्या साहसी वृत्तीला मात नाही.गोऱ्यांची वर्णी म्हणजे वाटेत असलेल्या टी पोस्टच्या मेन्यू कार्डवर फक्त पिझ्झा,पास्ता,बर्गर,नूडल्स पाहायला मिळण्याची अप्रत्यक्ष हमी. तसंही "ऊँचाई" नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला आता बऱ्यापैकी संख्येने भारतीय हजेरी लावत असले तरी आजही सगळ्या टी पोस्ट वरचे मेन्यू हे गोऱ्यांच्या जीव्हा सौख्याचा विचार करूनच तयार केलेले असतात त्यामुळे जर का याक चीजचा वापर करून केलेल्या पिझ्झा,पास्ता,बर्गर अशा जंक फूडला प्रसंगी शरण जायचं नसेल तर भारतीयांसाठी सपक आणि बेचव नेपाळी दाल भात आणि भात दाल असे दोनच पर्याय असतात. इथे तर औषधाला सुद्धा भारतीय ट्रेकर्स दिसले नाहीत त्यामुळे पुढचे पंधरा दिवस नेपाळी दाल भाताला गोड मानून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. 

ह्यावर्षी मात्र अन्नपूर्णा सर्किट ट्रेक साठी मौका भी था और दस्तूर भी ।.चमूत आम्ही सहा जणं असणार होतो आणि नेहमीप्रमाणे चमूत मी सगळ्यात तरुण म्हणजे अर्थातच विरुद्ध अर्थाने बरं का.त्यामुळे साहजिकच माझ्यामुळे चमूचं मनोधैर्य कधी खचणार नाही ह्याची जबाबदारी नकळतच माझ्या खांद्यांवर येऊन पडली होती. कारण देव न करो पण वैद्यकीय कारणांमुळे किंवा अन्यथा जर का कोणाला ट्रेक दरम्यान खाली बेस कॅम्पला उतरवावं लागलं तर पूर्ण चमूच्या मनोबळावर त्याचे अप्रत्यक्ष पडसाद उमटतात. शिवाय ह्यावेळी जी कमाल उंची ह्या ट्रेक दरम्यान गाठायची होती ती एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकपेक्षा ५० मीटर जास्त म्हणजे ५४१९ मीटर इतकी होती.मागच्या वर्षी जरी मला खाली वगैरे उतरवण्याची गरज पडली नव्हती तरी संपूर्ण EBC ट्रेक दरम्यानचा माझा रक्तातल्या ऑक्सिजनच्या पातळीशी सुरु असलेला झगडा माझ्या मनात आजही तसाच्या तसा ताजा होता त्यामुळे त्याचंही मनावर दडपण होतंच ,पण रोज उगवत्या सूर्याला नमन करायचं आणि पुढे चालत रहायचं हे आधीच मनाशी पक्कं केलं होतं. नुकत्याच घेतलेल्या विपश्यनेच्या दीक्षेतून झालेली ही उपरती असावी कदाचित... त्याबद्दल पुन्हा कधीतरी. 

अन्नपूर्णा पर्वतरांगा एव्हरेस्टपेक्षा थोड्या कमी उंचीच्या पण सततच्या अवकाळी होणाऱ्या हिमस्खलनांच्या धोक्यामुळे ट्रेकर्सने फारशा जवळ न केलेल्या.त्यामुळे अन्नपूर्णा शिखर सर करायचा प्रयत्न केलेले गिर्यारोहक एव्हरेस्टच्या तुलनेत कमीच.खळाळणाऱ्या फेसाळ निळ्याशार मर्तंस्यांगी नदीच्या सोबतीने आधी बेसिशहरपर्यंत टुरिस्ट बस आणि मग त्यापुढचा पल्ला ट्रॅक्स अशी मजल दरमजल करत आम्ही पहिल्या दिवशी ट्रेकचा उगमबिंदू गाठला  "धारापानी ". खरी लढाई तर इथूनच पुढे सुरु होणार होती. "ट्रेकच्या रुपरेषेत दिलेले रोजचे अंतराचे आकडे आणि रोज प्रत्यक्षात चालायचे असलेले आकडे ह्यात कोणतंही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा" असं Disclaimer (अस्वीकरण) खरंतर ट्रेकच्या माहितीपत्रकात कुठेही दिलेलं नव्हतं पण ते तसं अध्याहृत असावं असं पहिल्या दिवशी धारापानीहून चामेला जाताना जेव्हा पत्रकात दिलेल्या १५ किमी ऐवजी १८ किमी चाललो तेव्हा लक्षात आलं.पण अजाणतेपणी झालेल्या ह्या शुद्ध फसवणुकीमुळे शरीर आणि मन दोन्ही "स्टेट ऑफ शॉक"मध्ये गेलं.भविष्यात अशा प्रकारची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी मग आम्ही माहितीपत्रकात रोजच्या दिलेल्या अंतराच्या आकड्यात +३ करूनच वाचण्याची सवय लावून घेतली.पुढचे पंधरा दिवस रोज ४०० ते ५०० मीटर उंची गाठायची आणि पुन्हा २०० किंवा ३०० मीटर खाली येऊन कॅम्पसाईट म्हणजे टी पोस्ट मध्ये थांबायचं हे नित्याचंच झालं.बरं चढणही क्रमाक्रमाने असेल तर शपथ.. शरीरात असल्या नसलेल्या सगळ्या इंद्रियांची शक्ती पणाला लागेल अशी तीव्र चढणं.पण आताशी आमची गाडी टीजर वरून ट्रेलर वर पण पोहोचली नव्हती. दुसऱ्या दिवशी चामे हून १५ किमी अंतर तुडवल्यावर अप्पर पिसांग आणि त्याच्या पुढच्या दिवशी तर कहर म्हणजॆ अप्पर पिसांगहून २२ किमी तंगडतोड करून मनांगला पोहोचेपर्यंत वर खाली चढून उतरून आमचे प्राण कंठाशी यायला लागले होते आणि पुरी पिक्चर तो अभी  बाकी थी । मनांगला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक दिवसाची विश्रांती होती म्हणजे वास्तविक पाहता तो दिवस काही तंगड्या पसरून झोपा काढायचा दिवस नसतो तर त्याच्या पुढच्या दिवशी जी उंची गाठायची असते त्याचा सराव म्हणून जवळपासच्या भागात त्या उंचीपर्यंत चालून म्हणजे चढून येणं अपेक्षित असतं.पण आदल्या दिवशीच्या मनांगच्या तंगडतोडी नंतर पायाचा एक एक पुरजा आणि सांधा उत्तर देत होता त्यामुळे गाईडच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून आम्ही view point पर्यंत न जाता जवळच्या गंगापूर्णा तलावापर्यंतच जाऊन येण्यासाठी त्याच्याशी तह केला. 


मनांगचं प्रवेशद्वार

गंगापूर्णा लेक आणि आम्ही

पुढच्या दिवशी मनांग ते श्रीखारका आणि त्याच्यापुढे श्रीखारका ते तिलीचो लेक बेस कॅम्प हे त्यातल्या त्यात सह्य दिवस होते म्हणायचे ज्या दिवशी आम्ही फक्त ७ ते ८ किमी चाललो, साधारण दोन्ही दिवशी चार ते पाच तास. पण म्हणून आम्हाला फार हुरळून जाण्याची गरज नव्हती याचा साक्षात्कार आम्हाला तिलीचो लेकपर्यंत जाताना झाला ,ह्या वाचलेल्या चालीची भरपाई तिथे होणार होती.श्रीखारकाहून तिलीचो बेस कॅम्पपर्यंत जाताना वाटेत तिथे जाऊन आलेल्यांकडे नसत्या चौकशा करून त्यांचे अनुभव  विचारण्याचा आमचा अनाठायी उद्योग सुरूच होता.त्या सगळ्या मंडळींकडून तिलीचो लेकला पोहोचेपर्यँत आमचा कसा कोथळा निघणार आहे ह्याचा साधारण अंदाज यायला लागला होता.तशी थोरोंग ला पासच्या उंचीची आणि तिथपर्यंत कराव्या लागणाऱ्या दिव्याची पुरेशी कल्पना असल्यामुळे त्याप्रमाणे थोडीबहुत मानसिक तयारीही झाली होती पण हा तिलीचो लेक म्हणजे पूर्णच आऊट ऑफ सिलॅबस पेपर होता,ज्याची मानसिक पूर्वतयारी झाली नव्हती.तिलीचो लेकच्या दिवशी आम्हाला ४००० मीटर ते ४९१९ मीटर इतकी उंची जास्तीत जास्त चार ते पाच तासात चढून पूर्ण करायची होती म्हणजे आम्हाला थोरोंग ला पासच्या दिवशी जी १००० मीटर उंची पाच  ते सहा तासांत चढून पूर्ण करायची होती त्याची ही रंगीत तालीमच होती. थोरोंग ला पास सारखेच सकाळचे आठ नऊ वाजून गेले की तिलीचो लेकवर सुद्धा खूप गार वारे वाहायला सुरूवात होते त्यामुळे पहाटे लवकरच सुरुवात करावी लागेल ह्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे "उद्या ब्रेकफास्ट उरकून आपण पहाटे साडे चारपर्यंत लेककडे जायला निघू या" असं गाईडने आदल्या रात्री फर्मान काढलंच.तिलीचो लेकविषयी नुकत्याच हाती आलेल्या ताज्या अहवालाने आधीच झोप उडालेले आम्ही त्या रात्री गाईडच्या फर्मानानंतर अजूनच शांत झोपू शकलो नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळे पहाटे वेळेआधीच ब्रेकफास्टसाठी हजर झाले पण टी पोस्टवरच सगळ्यांची न्याहारी तयार नसल्यामुळे शेवटी आम्हाला तुटपुंज्या न्याहारीनिशी निघायला पहाटे साडे चार ऐवजी सकाळचे सहा उजाडले.त्यामुळे आता तिलीचो लेकवरच्या कडाक्याच्या गार वाऱ्यांपासून आमची सुटका नव्हती.आधी काही किमीची खडकाळ वाट , त्यावर ७५  ते ८० अंशाच्या कोनात असलेली २२ तीव्र नागमोडी वळणं आणि पुन्हा तितकीच कठीण आणि तीव्र चढणाची खडकाळ वाट अशी दिव्यं पार पडून तिलीचो लेकवर पोहोचायला आम्हाला सकाळचे दहा वाजले.समोर जाडजूड बर्फाच्या चादरीच्या रूपात मैलोन्मैल पसरलेला तिलीचो लेक यथेच्छ फोटो आणि सेल्फीज काढण्याची हौस भागवण्यासाठी मोहवत होता पण हवामान काहीसं बदललं होतं,सर्द गार वारे वाहत होते.आधीच तुटपुंजी न्याहारी, त्यावर इतकी चाल आणि सर्द गार वारे ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून  डोकेदुखीही आम्हा सगळ्यांना त्रास द्यायला लागली होती. रिकाम्या पोटी आम्हा  सगळ्यांची गाडी आता रिझर्व्ह च्याही खालच्या पातळीत खडखडत चालत होती त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेता तिथे अकारण थांबण्यात हशील नव्हता,त्यामुळे थोडेफार फोटो,व्हिडिओज आणि सेल्फीजची हौस भागवून आम्ही लागलीच परतीच्या वाटेला लागलो. अशा परिस्थितीत खरंतर बेस कॅम्पवर पोहोचल्यावर दुपारची जेवणं उरकून लगेचच पुन्हा श्रीखारकाला जायला निघण्याचा विचारही नकोसा वाटत होता पण मनांगच्या अनुभवावरून शहाणपण घेऊन गाईड ह्यावेळी आम्हाला कोणतीही सवलत देणार नाही ह्याचीही कल्पना होती. बेस कॅम्पवर पोहोचेपर्यंत चालून चालून आम्ही सगळे इतके लंबे झालो होतो की त्या अवस्थेत श्रीखारका गाठणं तर दूरच,समोर आलेल्या त्या सपक  बेचव अन्नाचे दोन घास सुद्धा घशाखाली ढकलण्याचे त्राण आमच्यात उरले नव्हते पण कसेबसे दोन घास पोटात ढकलून आम्ही श्रीखारकाला निघण्यासाठी बाह्या सरसावल्या.श्रीखारका ते तिलीचो बेस कॅम्पच्या पूर्ण रस्त्यावर जवळपास दोन ते तीन किमीच्या अंतरात वरचेवर भूस्खलनं होतात त्यामुळे तेवढा पल्ला शक्य तितक्या कमी वेळात आणि दिवसाउजेडी पार करणं श्रेयस्कर असतं पण तिथवर आमच्या सगळ्यांच्या पायांनी त्यादिवशीपासून इतका असहकार पुकारला होता की ते दोन ते तीन किमीचं अंतरही वीस किमी सारखं वाटलं पण शेवटी थोडा जरुरीपेक्षा जास्त वेळ घेऊन का होईना आम्ही ठरल्याप्रमाणे श्रीखारका एकदाचं गाठलं होतं हे महत्त्वाचं. 


गोठलेला तिलीचो लेक 



त्यादिवशी रात्रीच्या ब्रिफींगमध्ये आम्ही कोणीही माणसांतच नव्हतो. कधी एकदा गादीवर अंग टाकतोय असं झालं होतं.गाईडचे "उद्या आपल्याला १२ ते १४ किमी चालायचं आहे,सकाळी ८ पर्यंत निघालो तर संध्याकाळपर्यंत आरामात पोहोचू," इतकेच काय ते मुद्द्याचे शब्द कानात गेले होते,मुद्द्याचे अशासाठी कारण आम्ही आमच्या एरव्हीच्या दिनक्रमापेक्षा जवळपास तासभर उशिरा निघणार होतो म्हणजे तितका झोप मिळण्याचा वेळ जास्त,इतका साधा सोपा हिशेब.बाकी त्याचे उरलेले शब्द आमच्या कानांच्या पडद्यांवर आदळून परत गेले होते. सकाळच्या न्याहारीनंतर आमची सगळ्यांची स्वारी हलतडुलत याकखारकाकडे निघाली.कालच्या चालण्याचा हँगओव्हर अजूनही तसाच होता त्यामुळे आम्ही सगळे काहीसे भरकटल्यासारखेच चालत होतो. तीव्र चढ चढणं आणि उतरणं एव्हापर्यंत काहीसं अंगवळणी पडलं होतं.दुपारच्या जेवणानंतर याकखारकाकडे चालत असलेल्याला  दोन तीन तास उलटले होते, जे आणि जितकं आम्ही चाललो होतो त्यात दुपारचं जेवण कधीच जिरलं होतं त्यामुळे पुन्हा पोटात कावळे कोकलायलाच लागले होते इतक्यात एका चढावर अगदी अनपेक्षितपणे आमच्या दृष्टीस पडला "राजू चाट कॉर्नर" ४२०० मीटरवर असं चाटचं दुकान म्हणजे अलभ्य लाभच होता, भलेही खूप छान चवीची नव्हती तरी तिथवर खाल्लेल्या याक चीजच्या पिझ्झा आणि पास्त्यापुढे ती सुमार दर्जाची पाणीपुरीसुद्धा आम्हाला अमृतासमान वाटली,थकलेल्या अवस्थेत त्या पाणीपुरीने आम्हाला अजून चालण्याची ऊर्जा तर नक्कीच दिली.  


४२०० मीटर उंचीवरची पाणीपुरी

याक खरकाला पोहोचल्यावर थोरोंग ला पासचं आमचं अंतिम लक्ष्य आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलंय असं वाटायला लागलं होतं.तिलीचो लेकची मोहीम तशी कठीण असूनसुद्धा ती आम्ही बऱ्यापैकी यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे नाही म्हणायला थोरोंग ला पास सुद्धा कोणत्याही गंभीर अडचणीशिणाय पूर्ण करता येण्याची किंचितशी आशा आणि उमेद मनात पल्लवित झाली होती .थोरोंग ला पास ही ट्रेकची तसं म्हटलं तर इतिश्री होती कारण एकदा का थोरोंग ला पास ओलांडला की ट्रेक संपल्यात जमा होती,मग मुक्तिनाथ आणि पुढे जोम्सोम हा सगळा पल्ला हा प्रामुख्याने उतरणीचा असणार होता,मुख्य आव्हान होतं ते थोरोंग ला पासचंच.पण तिलीचो लेक नंतर त्याचीही भीती बऱ्यापैकी चेपली होती पण पर्वतांमध्ये विशेषतः हिमालयामध्ये तर प्रत्येक दिवस सारखा नसतो त्यामुळे आला दिवस आपला म्हणण्यातच शहाणपण असतं.तसं तर मनांगपासूनच आमच्या चमूतल्या एकीची तब्येत सगळं काही आलबेल नसल्याची वर्दी देत होती पण याक खारकाला पोहोचेपर्यंत तिच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी साठपर्यंत खालावली, तिला श्वासोश्वासाला तर त्रास होत होताच पण साधे डोळे उघडणं सुद्धा तिला कठीण होत होतं.अशा अवस्थेत तिला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी खाली उतरवणं अपरिहार्य होतं.दिवसाची सुरूवातच अशी झाल्यावर आम्हा सगळ्यांनाच काहीसं सुन्न व्हायला झालं.अशा ट्रेक्स वर येताना आपला मौल्यवान वेळ आणि घामाचे पैसे खर्च करून येणारा प्रत्येक जण डोळ्यांमध्ये शिखरापर्यंत पोहोचण्याची स्वप्नं सजवून आलेला असतो पण जेव्हा असे अनपेक्षित अप्रिय प्रसंग त्या स्वप्नांना सुरुंग लावतात तेव्हा होणारं स्वप्नभंगाचं दुःख पचवणं फार अवघड असतं. ट्रेकसाठी आलेल्या प्रत्येकाला कोणत्याही अडचणीशिवाय अंतिम लक्ष्य पूर्ण करता यावं ह्यासारखी आनंदाची बाब नसते पण निसर्गापुढे माणूस हतबल आहे हे दुर्दैवी सत्य आहे. माणसाने अगदी कितीही प्रगती केली तरी प्रसंगी माणसाच्या प्राक्तनाचे अखेरचे अधिकार निसर्गाने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत ह्याची माणसाला सातत्याने जाणीव करून देण्याचे त्याच्याकडे अनेक मार्ग आहेत हेच खरं. तिला निरोप देऊन आम्ही उरलेले पाच मावळे आमच्या आता अखेरच्या आणि महत्त्वाच्या थांब्याकडे निघालो होतो, थोरोंग फेडी .. काहीशी निराशा, काहीसं दुःख, पुन्हा काहीशी भीती असे वेगवेगळ्या भावनांचे संमिश्र तरंग क्षणाक्षणाला मनात उमटत होते. किमान थोरोंग ला पास ओलांडून जाईपर्यंत तरी आता आमच्यातला अजून कोणी मावळा धारातीर्थी पडणार नाही एव्हढीच प्रार्थना आम्ही करू शकत होतो आणि त्याप्रमाणे योग्य ती काळजी घेऊ पाहत होतो.एरव्ही हसणारा, खिदळणारा आमचा चमू आज सकाळपासूनच एकदम शांत होता,मूक झाला होता पण तरीही न बोलता बरंच काही बोलत होता जे शब्दांशिवाय आम्हा एकमेकांना कळत होतं.पर्वतामध्ये अगदी कमी गतीने चालण्याचं गमक आम्हा सगळ्यांना उमगलं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या पावलांची गतीही अगदी संथावली होती. थोरोंग फेडी येईपर्यंत आम्ही सगळे मानसिक दृष्टया बऱ्यापैकी स्थिरावलो होतो आणि आमचं पूर्ण लक्ष त्या मध्यरात्री सुरु होणाऱ्या आमच्या अखेरच्या टप्प्याकडे केंद्रित करण्यात यशस्वीही झालो होतो. आज संध्याकाळी सहा वाजताच रात्रीची जेवणं आटोपून मध्यरात्री साडे तीनला निघायचं होतं. कसं काय माहित नाही पण मन अगदी शांत होतं त्यामुळे अगदी संध्याकाळी सात वाजतासुद्धा छान झोप लागली पण मध्यरात्रीचा अडीच वाजताचा गजर लावलेला असूनसुद्धा दोनच्या ठोक्यालाच टक्क जाग आली. पटापटा आवरून आम्ही न्याहारीसाठी डायनिंग हॉलकडे वळलो. समोर आलेलं बळेबळे पोटात ढकलून वेळ न दवडता अंतिम लक्ष्याकडे मार्गस्थ झालो. आज थोरोंग फेडी ते थोरोंग ला पास ही १००० मीटरची उंची पाच ते सहा तासांच्या अवधीत चढून जाणं हि सत्त्वपरीक्षाच असणार होती. पाच ते सहा तासांत एकदम १००० मीटरची उंची पार करण्यापेक्षा आपण आदल्या दिवशी थोरोंग फेडी ऐवजी ४८०० मीटर वरच्या हाय कॅम्पमध्ये राहू म्हणजे दुसऱ्या दिवशी थोडं सोपं जाईल आणि अंतर कापायला तेवढा वेळही जास्त मिळेल ही आमची विनंती वजा सूचना गाईडने फार आधीच "इतक्या उंचीवर राहणं योग्य नाही" ही सबब देत धुडकावून लावली होती त्यामुळे आता "आलिया  भोगासी" म्हणत मध्यरात्रीच्या गर्द काळोखात  आम्ही सगळ्यांनी शब्दशः कूर्मगतीने पासच्या दिशेने हळूहळू एकेक पाऊल सरकवायला सुरूवात केली. ह्यावेळी चक्क माझा श्वास अजिबात जड होत नव्हता पण आतापर्यंत चालून चालून झालेल्या दमणूकीने एकेक पाऊल उचलून टाकणं मात्र भयंकर जड होत होतं. पायांचा असहकार संपण्याचं नाव घेत नव्हता,थंडी मी म्हणत होती, चढणही तीव्र असल्याने जी काही उरलीसुरली ताकद होती ती जरुरीपेक्षा जास्त खर्ची पडतेय असं वाटत होतं पण चालण्याशिणाय गत्यंतरच नव्हतं.पण खरं सांगू तर तब्बल साडे पाच तासांच्या अथक चालीनंतर अखेरीस जेव्हा तो " Thorong La Pass 5416 Mtrs" असा फलक दृष्टीस पडतो ना तेव्हा तिथवर ताकदीचं, धैर्याचं आणलेलं सगळं उसनं अवसान,मनात खोलवर दडपून ठेवलेला सगळा ताण,काहीतरी भारी मिळवल्याचा झालेला अतोनात आनंद सगळं सगळं झराझरा अश्रूंच्या माध्यमातून ओसंडून वाहायला सुरूवात होते,स्वर्ग दोन बोटं उरतो.त्या क्षणी अचानक अस्वस्थतेचं, भीतीचं सगळं मळभ सरल्यामुळे मन कसं गार्डन गार्डन होतं हे सगळं इथे शब्दांत मांडणं फार फार अवघड आहे कारण ती एक अनुभूती आहे. वास्तविक थोरोंग फेडी ते थोरोंग ला पास हे अंतर सहा किमी आहे आणि मुक्तिनाथ गाठायला पुढे अजून १६ किमी चालायचं आहे हे सगळं माहित असूनही तो क्षण सगळं जग विसरायला लावतो.त्या क्षणात असता फक्त तुम्ही,पास आणि आनंद बस्स .. 


थोरोंग ला पास आणि मी 

मागच्या वर्षी EBC ची ट्रेक करायचं ठरवलं तेव्हा फक्त व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिब ह्या एकाच हिमालयन ट्रेकचा अनुभव आमच्या गाठीशी होता त्यामुळे चौकशीसाठी म्हणून ज्या ज्या ट्रेकिंग कंपन्या पालथ्या घातल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी एका ट्रेकच्या अनुभवावर EBC ची ट्रेक करणं फार साहसी आहे,किमान अजून एक  अन्नपूर्णा भागातली वगैरे ट्रेक करून मग EBC ची ट्रेक करावी, विशेषतः जर का अन्नपूर्णा सर्किट ट्रेक करून मग EBC च्या ट्रेकचा विचार केला तर फारच उत्तम असा कळकळीचा सल्ला दिला होता पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य होतं त्यामुळे ती ट्रेक अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या आधी घडली. पण आज मी "डंके की चोट पें" असं म्हणू शकते की एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागण्याच्या बाबतीत ही ट्रेक बरीच वरच्या पातळीची आहे हे निर्विवाद सत्य आहे. तिथे आव्हान आहे ते बहुतांशी फक्त उंचीचं आणि त्यामुळे जुळवून घ्याव्या लागणाऱ्या वातावरणचं पण इथे आव्हान आहे ते फक्त उंचीचं किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या वातावरणाचं नाही तर सलग पंधरा दिवस रोजच्या रोज १५ ते २२ किमी न थकता चालता येण्यासाठी लागणाऱ्या तुमच्या चिकाटीचं सुद्धा.पण म्हणतात ना.. 
“Mountains teach us to climb higher and dream bigger.”


माधुरी गोडबोले माईणकर
१६ एप्रिल २०२५
             

  


  

 

Comments

  1. धन्य आहे तुझी!. आता next trip बहुतेक Everest

    ReplyDelete
  2. Madhuri you are simply great. Bravo. Very interesting and inspiring experience. कमाल आहे तुझी. कसंकाय जमतं तुला हे सगळं. लिहिलयसही मस्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...