ऊँचाई
"It has been a long road....
"From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ---- Tenzing Norgay
नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच पण गोठवणारा आहे.त्यांचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करत किती गिर्यारोहकांनी आजवर मृत्यूला कवेत घेतलं असेल ह्याला गणती नाही.
मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलंच होतं की सध्या आमच्या घरात EBC म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पचे वारे खूप जोरदार वाहतायत असं,ज्या चित्रपटामुळे आमच्या घरात हे EBC चं कांड घडलं त्या चित्रपटाच्या नावाइतकं दुसरं समर्पक शीर्षक मला ह्या ब्लॉग पोस्टसाठी सुचलं नाही.जशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात योगायोगाने होतात तशाच त्या काही वेळा अपघातानेही होतात तसंच झालं माझ्या बाबतीत EBC चं."जाते थे जापान पहुँच गये चीन समझ गये ना ?" अगदी तसं.. दोन वर्षांपूर्वीची रविवारची टळटळीत दुपार... रविवारच्या मेजवानीचा बेत झोडून अहो सुस्तावून तंगड्या पसरून टीव्ही ची भक्ती करायला हॉलमधल्या सोफ्यावर स्थिरावले.भक्ती करताना इकडचे तिकडचे चॅनेल दर दोन तीन सेकंदाला बदलणं नेहमीप्रमाणे सुरु होतं.अशा दर दोन तीन सेकंदाच्या बदलाबदलीमध्ये न जाणो कुठून अमिताभचा "ऊँचाई" त्याच्या नजरेस पडला.नेहमीप्रमाणे दोन तीन सेकंद पाहील आणि पुढे जाईल असं वाटत असतानाच अहोंनी चक्क तो सिनेमा कसा काय माहित नाही पण अथ पासून इति पर्यंत पूर्ण पहिला आणि EBC च्या खुळाने आमच्या घरात मूळ धरलं.सिनेमा पाहून संपेपर्यंतच "ऊँचाई" मधल्या अमिताभ कडून स्फुरण घेऊन मावळ्याच्या जोशात अहोंनी "चल,आपणही जाऊ या का EBC ला?" अशा अनपेक्षितपणे टाकलेल्या गुगलीने माझी विकेटच पडली.पोटात मोठ्ठा गोळा आला.
दोन वर्षांपूर्वी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिबची ट्रेक करताना १५००० फुटांवर काहीसा श्वासोच्छश्वासाचा त्रास जाणवला होता कारण माझ्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी कायम थोडी आवश्यक पातळीपेक्षा कमीच असते. १५३०० फुटांवर चढताना थोडासा त्रास झाला तर मग १८००० वर माझी काय अवस्था होईल ह्या कल्पनेनेच उरलंसुरलं अवसान गळालं. काय तर म्हणे,"अगं, सत्तरी उलटलेला अमिताभ चढलेला दाखवलाय मग आपण तर पन्नाशीच्याच घरात आहोत.जमेल आपल्याला जर का आपण नियमित आपला व्यायाम,चालणं वगैरे सुरू ठेवलं तर."आता ह्या सूरज बडजात्या नामक प्राण्याला कायमच "larger than life" सिनेमे करायची हौस,असे सिनेमे करून गल्ला गोळा केला की त्याचं काम झालं ,पण हे असे आमच्या अहोंसारखे अनेक त्यात फशी पडतात.म्हटलं,"अरे,अमिताभ काही खरंच गेला असेल का तिथे आणि गेलाही असेल तरी तो हेलिकॉप्टरने काही वेळेपुरता गेला असेल नाहीतर त्यांनी दाखवताना एव्हरेस्ट बेस कॅम्पचा दगड कुठल्या तरी दुसऱ्या नॉर्मल लोकेशन वर पेंट करून सगळ्यांना त्याच्या पुढ्यात उभं केलं असेल फक्त दाखवायला.Reel life is inspired by real life ,असं जरी असलं तरी असं सत्तरी उलटल्यावर आपल्या मित्राचं राहिलेलं स्वप्नं पूर्ण करायला कोणी असं काही केल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे का?उगाच काहीही काय उड्या मारायच्या सिनेमा पाहून ? झेपायला ही हवं ना, तू जा EBC ला,मी अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला जाते."वाटलं मी कच खाल्लेली दाखवली तर हा गप्प बसेल पण अहोंची EBC ची एकतारी ओढणं सुरूच होतं.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक पूर्ण पोखरा भागातली असल्यामुळे हिमालयाच्या अवर्णनीय निसर्गसौंदर्याची पर्वणी असते असं ऐकून होते.म्हटलं, "अरे,नुसता साहस आणि थरार अनुभवण्यापेक्षा थोडा डोळ्यांनासुद्धा सुखावू की जरा.ह्या ट्रेकच्या निमित्त्याने पोखरा पिंजून काढू म्हणजे सगळंच नेपाळ पाहून झाल्यात जमा आहे.शिवाय सर्किट ट्रेकची उंची नाही म्हणायला एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षा जरा बरी म्हणजे १६००० फूट. आधी जरा स्वतःला १६००० फूटांवर चाचपू जर झेपलं जमलं तर मग पाहू पुढे कधी एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक करायची की नाही ते," इति मी.पण अहो म्हणजे "No means No"अशा पिंडाचे.फक्त सर्किट ट्रेकचा मुख्य अडथळा असा आहे की त्या सहसा ग्रुप ट्रेक्स नसतात, EBC च्या ट्रेकसारखी त्याला भाऊगर्दी नसते कारण गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या जवळपास प्रत्येकच गिर्यारोहकाला एव्हरेस्टचं दिवास्वप्नं पडत असावं.पण अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला बहुतांशी गाईड,पोर्टर आणि एखाद दोघे जण नाहीतर तेवढ्याही नोंदण्या ट्रेकला नसल्या तर गाईड आणि तुम्ही एकटेच असंही घडतं.मला ज्या दिवशी ती ट्रेक सुरु करायची होती त्या दिवशीसाठी सुद्धा कोणीच नोंदणी केली नव्हती तरीही मी माझ्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला जायच्या माझ्या निर्णयावर ठाम होते.शेवटी नवऱ्याचीच बायको मी... म्हटलं कधीही केली तरी ती अशी एक दोघांच्याच संख्येने करावी लागणार तर मग ह्यावेळी एकट्याने का नाही करायची.. मी एकटीनेच गाईड बरोबर ट्रेक करायचं म्हणतेय हे कळल्या दिवसापासून एकीकडे नवरा तर दुसरीकडे दूर देशांमध्ये बसलेली दोन्ही मुलंसुद्धा तशी आधीपासूनच माझ्या एकटीने गाईड बरोबर ट्रेकला जाण्याबाबत रोज त्यांचा कडाडून निषेध नोंदवत होती,"आई ,काही गरज आहे का असं एकटीने ट्रेकला जाण्याची ? फक्त गाईड आणि तू ? आणि आम्हाला कसं कळणार तुला काही झालं तर ? किती सेफ आहे असं जाणं ,असं जातं का कोणी ? " इत्यादी इत्यादी."अरे बाबांनो, ही ट्रेक तशीही प्रायव्हेटच असते,ह्या ट्रेकला कधीच फारशा नोंदण्या नसतात त्यामुळे मला ग्रुप मिळणं अवघड आहे ",वगैरे वगैरे सगळे युक्तिवाद करून झाले पण मुलं काही भीक घालेनात."तू एकटीने जायचं नाहीस ,बस्स ,तू बाबांबरोबर EBC ट्रेकला जा ". "मला नाही खात्री वाटत की मला ती झेपेल की नाही",असं त्यांना परोपरीनने सांगून झालं पण मुलांपुढे माझं काहीही चाललं नाही.देवाच्याही मनात काहीतरी वेगळं असावं,तो जसं काही मला सांगत होता की उगाच स्वतःला underestimate करू नकोस.जमेल तुला EBC ची ट्रेक. त्यामुळे त्याने मुलांच्या नकारघंटेवर तथास्तु म्हटलं आणि मी माझ्या ट्रेकच्या तारखांना काढलेल्या विमान तिकिटांच्या जातायेतानाच्या दोन्ही फ्लाईट्स नेपाळ एअर लाईन्सने कोणतंही सबळ कारण न देता रद्द केल्याचा आम्हाला फोन आला.आता दैवाने आणि देवाने कौल दिला म्हटल्यानंतर शेवटी हो नाही करत मला अहोंच्याच ट्रेकसाठी स्वतःचं नाव नोंदवून घ्यावं लागलं.विमान कंपनीने स्वतःच फ्लाईट्स रद्द केलेल्या असल्यामुळे त्यांनी लागलीच पूर्ण रक्कम परत देऊ केली.बाकी दोन्ही ट्रेक्स साठी लागणारी तयारी सारखीच असली तरी अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला इन्शुरन्सची गरज नव्हती. पण आधीची विमान तिकिटं निकालात निघाल्यामुळे माझ्यासाठी पुन्हा नवीन विमान तिकिट आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक असल्यामुळे देव न करो पण काही कारणास्तव हेलिकॉप्टरने rescue करण्याची प्रसंगी गरज पडल्यास ह्या ट्रेकसाठी मात्र इन्शुरन्स वगैरे काढण्याची मोर्चेबांधणी करावी लागली.अहो आधीपासून त्याच ट्रेकसाठी जाणार असल्यामुळे त्याच्यासाठी हे सगळे सव्यापसव्य आधीच उरकले होते.
हो नाही करत आम्ही ट्रेकच्या दोन दिवस आधीच काठमांडू मध्ये दाखल झालो.म्हटलं ट्रेकनंतर काठमांडू फिरायचा किती उत्साह शिल्लक राहील माहित नाही तर आधीच थोडंफार काठमांडू पाहून घ्यावं ह्या निमित्याने.ट्रेकच्या आधीच्या दोन दिवसांत शक्य तितकं म्हणण्यापेक्षा जवळपास सगळंच काठमांडू आम्ही पालथं घातलं.ट्रेकच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला तिथलं अचानक बदलतं हवामान ,ट्रेकची रूपरेखा, येऊ शकणाऱ्या संभाव्य तब्येतीच्या किंवा इतर अडचणी ह्या विषयी सगळी पूर्वकल्पना देण्यात आली.त्यादिवशी आम्हाला जेमतेम दोन तीन तास झोप मिळेल असं लक्षात आल्यावर आम्ही सगळे संध्याकाळी साडे सहा सातला जेवणं उरकून साडे आठपर्यंत निद्राधीन झालो. मध्यरात्री एक वाजता उठून आंघोळ पांघोळ आटोपून दोन वाजता खाली येतो तो पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे आम्हाला रामेछाप विमानतळावर नेण्यासाठी दोन बारा सीटर गाड्या हॉटेलच्या दाराशी सज्ज होत्या.प्रत्येक गाडीत आम्हा प्रत्येकाची दहा किलोची डफेल बॅग आणि आम्ही दहा बारा जणं कसेबसे कोंबून मावलो आणि असे दोन गाड्यांमध्ये मिळून आम्ही जवळपास वीस एक काळे गोरे मावळे एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या लढाईवर निघालो.नेपाळमधल्या रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की कधी खड्ड्यात रस्ते कधी रस्त्यावरचे खड्डे अशी कसरत पार करत चक्क आमचे सगळे अवयव त्यांच्या त्यांच्या जागी सहीसलामत ठेवत आम्ही एकदाचे पाच तासांनंतर रामेछापला उतरलो.आमच्या प्रत्येक सहा सहाच्या ग्रुपचे चार गाईड्स आणि लागणारे पोर्टर्स सगळे आम्हाला लुकलात भेटणार होते.सकाळी डोळे चोळत रामेछापला उतरलो तर एका शेड सदृश दिसणाऱ्या बांधकामाच्या अगदी दारात बस थांबली होती.तेच एअरपोर्ट आहे हे कळायला सुद्धा आम्हाला थोडा वेळ लागला.रामेछापचं विमानतळ म्हणजे आपला लाल डब्यांचा एस.टी स्टॅन्डच.त्याला एअरपोर्ट म्हणणं चहाच्या टपरीला पंचतारांकित हॉटेल म्हणण्यासारखं आहे.रामेछाप वरचा लोकांचा उसळलेला चेकइनचा गोंधळ पाहून पुलंच्या म्हैस मधला एसटी मध्ये चढू पाहणाऱ्या लोकांचा कल्लोळ आठवला.शेवटी एकदाचं सो कॉल्ड तिथलं चेकइन वगैरे उरकून आम्ही विमातळावरच्या प्रतिक्षा हॉलमध्ये आमच्या एअर लाइन्सचं विमान कधी आम्हाला पलीकडे लुकलाला न्यायला येतंय ह्याची वाट पाहत बसलो.रामेछापला तारा,समिट आणि सीता एरलाईन्स अशा तीन विमान कंपन्यांची प्रत्येकी दोन विमान सतत हेलपाटे घालत येणाऱ्या गिर्यारोहकांना रामेछापवरून लुकला आणि लुकला वरून रामेछाप अशी ने आण करत असतात.तारा आणि समिट एअर लाईन्स च्या विमानांच्या तीन तीन फेऱ्या इकडून तिकडे झाल्या तरी सीता तोंड दाखवायचं नाव घेईना म्हणून जेव्हा विचारलं की कोणत्या रावणाने पळवलीय सीतेला की ह्यांच्या तीन तीन वाऱ्या झाल्या प्रवासी घेऊन तरी हिची झलक दिसणं सुद्धा कठीण आहे तेव्हा कळलं कि सीता एअर लाईन्सचं एक विमान पंक्चर झाल्यामुळे तूर्तास तरी एकाच विमानाने प्रवाशांची ने आण सुरु आहे.बाकी दोन्ही एअर लाईन्सचे जवळपास सगळे प्रवासी कधीचेच पलीकडे लुकला मध्ये एव्हाना दाखलही झाले असतील तरी आम्ही फक्त सीतेची प्रतिक्षाच करत होतो. शेवटी आता विमानतळावर फक्त सीतेने जाणारेच लोकं शिल्लक होते तेव्हा कुठे जाऊन जेव्हा एक सीता एअर लाईन्सचं विमान दृष्टीस पडलं तेव्हा दुपारचे बारा वाजायला आले होते.म्हणजे सकाळी सात ते दुपारी बारा आम्ही फक्त चेकइन आणि सीतेची प्रतीक्षा ह्यातच सार्थकी लावला होता.पण करणार काय "अडला नारायण ..."शेवटी त्या एका विमानाने ये जा करत दोन फेऱ्यांमध्ये आमच्या ट्रेकिंग ग्रुपचे सगळे मावळे सुरक्षितरीत्या लुकलात पोहोचते केले.सकाळच्या न्याहारीच्या ऐवजी दुपारच्या जेवणापर्यंत लुकलाला पादस्पर्श झाल्यामुळे गाईडने सगळ्यांना पटापट जेवणं उरकायला सांगितली.तशी नेपाळच्या ढाब्यांवरची किंवा हॉटेल्सची मेनूकार्ड म्हणजे डाळ भात ,भात डाळ ,नेपाळी डाळ भात ,टोस्ट जॅम ,जॅम टोस्ट अशा पद्धतीची असतात त्यामुळे आपल्याला जेवायला काय मागवायचं असा फार मोठा यक्षप्रश्न नसतो.डाळ भात हा प्रकार फारच बेचव आणि सपक असतो पण आलिया भोगासी..पोट भरायला काहीतरी मिळतंय हेच आमचं नशीब थोर म्हणायचं आणि उदरभरण करायचं ,तर त्या सपक डाळ भाताला अमृत मानून आम्ही पोटपूजा उरकली,पुढचे दहा दिवस आम्हाला हेच तप करायचं होतं, त्याला पर्याय नव्हता.
आमचा पहिला थांबा होता फाकडींग,जे लुकलापासून साधारण नऊ किमीवर आणि लुकलापेक्षा खालच्या उंचीवर आहे , म्हणजे किमान पहिल्या दिवशी तरी जेवण झाल्याझाल्या जड पोटाने तीव्र चढण चढण्याच्या अत्याचारातून आमची सुटका झाली होती,अर्थात हा साक्षात्कार आम्हाला उरलेल्या इतर दिवशी रोज सकाळच्या न्याहारी नंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर लागलीच जेव्हा रोज तीव्र चढणं चढायला लागली तेव्हा झाला.लुकलापासून थेट EBC पर्यंत हिमालयाची वेगवेगळी शिखरं तुम्हाला सोबत करत राहतात कुंगडे,थामसेकरु,लोटसे,सांगत्से,नागार्जुन,अगदी एवरेस्ट सुद्धा.एकदा का काठमांडू सोडलं की आपल्याला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात.म्हणजे साधारण एखाद्या वस्तूची जी छापील विक्री किंमत असेल त्याच्यावर अगदी राजरोसपणे एक पूज्य चढवून ती विकली जाते म्हणजे १ लिटरची मिनिरल पाण्याची बाटली १५० ते २०० नेपाळी रुपये,अर्धा लिटर गरम पाणी १५०रु ,मोबाइल चार्जिंग २०० ते २५० रु.,आंघोळीसाठीचं गरम पाणी सुरवातीच्या टप्प्यात ४०० नेपाळी रुपये तर नामचे बाजारपासून आंघोळीच्या गरम पाण्याची किंमत ६०० नेपाळी रुपयांपर्यंत पोहोचते,अर्थात ट्रेकच्या दुसऱ्याच दिवशी नामचे बाजारला पोहोचेपर्यन्त थंडी इतकी वाढलेली असते की एकीकडे गारठ्याने आणि दुसरीकडे आंघोळीच्या गरम पाण्याची किंमत ऐकून गोठलेले गिर्यारोहक ट्रेक संपेपर्यंत पार्वतीसारखा अंगावरचा मळ काढून त्याचा गणपती घडवायला तयार होतात. ह्या सगळ्यात आपल्या देशाची एक जमेची बाजू अत्यंत तीव्रतेने जाणवली की आपल्याकडे लेह लडाख सारख्या भौगोलिक दृष्ट्या दुर्गम भागात जिथे त्यांना पेट्रोल साठी सुद्धा आपल्या सैन्याच्या जवानांवर अवलंबून राहावं लागतं आणि नेपाळच्या लोकांसारखीच पाण्याचं दुर्भिक्ष्य,विजेची वानवा ही दैनंदिन जीवनात सामोरी जायला लागणारी आव्हानं त्यांच्यापुढे आहेत तिथेसुद्धा पाण्यासारख्या आवश्यक गोष्टी किंवा आंघोळीसाठी लागणारं गरम पाणी पैसे न घेता हॉटेल्समध्ये विनातक्रार पुरवलं जातं. १ ते ९ मधला पहिल्यांदा मनात जो आकडा येईल त्याच्यावर मनाला येतील तेवढी पूज्य लावून सांगून अवाजवी किमतीला ह्या गोष्टी विकून त्याचा व्यापार केला जात नाही.अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या अगदी मोबाईल चार्जिंगसारख्या सेवांसाठी सुद्धा लेह लडाख मध्ये कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.ह्याउलट नेपाळमध्ये इटलीसारखं चित्रं आहे,अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पैसे मोजावे लागतात तेही थोडे थोडके नाही तर बक्कळ. पण आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं आणि तिथे मिळणाऱ्या सोयीसुविधांचं मोल आपल्याला दुर्दैवाने देशाबाहेर पडतो तेव्हाच का कळावं ?असो...
पहिल्या दिवशी फाकडींगपर्यंत जेमतेम नऊ किमी चालताना पुढे काय काय वाढून ठेवलंय ह्याची आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती.आम्ही स्वतःला वास्तवाचं भान द्यायला जाणीवपूर्वकच रेग्युलर ट्रेकिंग ग्रुप घेतला होता.,ज्यात सामायिक वॉशरूम्स असणार होत्या.कॉलेजच्या दिवसांत केलेल्या ट्रेक्सनंतर आता इतक्या वर्षांनी पुन्हा आमची कॉमन वॉशरूम्सशी गाठ पडली.आपण सडे असतो तेव्हा ह्या गोष्टी कधी आपल्याला फारशा मानसिक त्रास देत नाहीत विशेषतः कॉलेजच्या दिवसांत आईवडिलांकडून मिळालेल्या तुटपुंज्या पैशांत केल्या गेलेल्या ट्रेक्समध्ये कधी गावातल्या जिल्हा परिषदेच्या नाहीतर एखाद्या नगर परिषदेच्या पडीक शाळेत नाहीतर घरात उतरणं ,तिथली न्हाणीघरं किंवा शौचालयं वापरणं ह्या गोष्टी गृहीतच धरत असू पण आता इतके वर्षांनी स्वतःला पुन्हा एकदा त्या मानसिक साच्यात बसवणं सुरुवातीचे एक दोन दिवस फार अवघड गेलं.एखाद्या चाळीत जसे सकाळी सकाळी लोकं एकामागे एक आन्हिकं उरकायला रांगेत उभे असतात तसेच आम्ही सगळे सकाळी एकामागे एक रांगेत उभे राहायचो फक्त हातात डबा नव्हता इतकाच काय तो फरक,आणि आंघोळीचा तर प्रश्नच नव्हता .. एकंदरीत नेपाळमध्ये हिमालयाच्या ट्रेक्सवर येणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये गोऱ्यांची संख्या प्रचंड आहे . आमचा गाईड प्रकाश सांगत होता की नेपाळमधल्या हिमालयन ट्रेक्सवर विशेषतः EBC च्या ट्रेक्सवर भारतीय पूर्वी कधीच फारसे येत नसत प्रामुख्याने गोऱ्यांचीच त्यात वर्णी असायची पण मागच्या दोन वर्षात ह्या ट्रेक्सना येणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय पण असं असलं तरीही आजही गोर्यांच्या तुलनेत येणारे भारतीय तुरळकच आहेत आणि जे येतात ते हे असे आमच्या अहोंसारखे "ऊँचाई" पाहून बळीचा बकरा झालेले.
ट्रेकच्या दुसऱ्या दिवशी पासून रोज साधारण एकरा ते तेरा किमी चालायचं नाही तर चढायचं होतं,अर्थातच ते काही साधं सुधं चढण असणार नव्हतं ह्याची कल्पना होतीच.ते कमी की काय म्हणून रोज सकाळच्या न्याहारी नंतर, नाही तर दुपारच्या जेवण नंतर तर हमखासच तीव्र चढणं चढताना देव आठवायचा. शिवाय जसजशी उंची वाढत जात होती तसतसा विरळ होत जाणारा ऑक्सिजन हेही आव्हान झेपवायचं होतं म्हणजे माझ्यासाठी दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था.नामचे बाजारला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक दिवस होता,आम्हाला वाटलं चला जरा दोन दिवस चालल्यानंतर थोडा आराम .. पण तो काही आराम बिराम करण्याचा दिवस नव्हता तर दुसऱ्या दिवशी जी उंची गाठायची होती त्याची रंगीत तालीम करण्यासाठी होता.त्यादिवशी आम्हाला तेनझिंग नॉरगे म्युझियम आणि मेमोरियलची ३८८० मी.उंचीची सफर घडणून आणण्यात आली. दुसऱ्या दिवशीचा डेबुचेचा ३८८० मी.चा थांबा हा आमचा ४००० मी.उंचीच्या खालचा शेवटचा थांबा असल्यामुळे आजपासून रोज प्रत्येकाच्या रक्तातल्या ऑक्सिजनच्या पातळीची नोंद ठेवली जाणार होती आणि प्रत्येकाच्या रक्तातल्या ऑक्सिजनच्या पातळीकडे कटाक्षाने लक्षही ठेवलं जाणार होतं म्हणजे मी आता रडारवर असणार हे मला कळून चुकलं होतं. जसजशी रोज टप्प्याटप्प्याने उंची वाढत होती तसतसं थंडीचा कडाका आणि नळाला चुकून माकून वाहतं पाणी आलंच तर त्याचा गारवा बर्फासारखा वाटत होता किंबहुना गोरक्षेपमध्ये तर हात आणि ... धुवायला बर्फाचे खडे मिळतात. हात धुतल्यानंतर ते पाण्याच्या गारव्याने पूर्ण बधिर होत असत म्हणजे बाकी कोणकोणत्या गोष्टीत काय काय अडचणी आल्या असतील हे सुज्ञास सांगणे न लगे...
रात्री दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाची पूर्वकल्पना देताना शेवटच्या टप्प्यात म्हणजे ५००० मी वरच्या शेवटच्या टप्प्यात ज्यांची रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी सत्तरच्या खाली असेल त्यांना मला पुढे घेऊन जाण्याचं साहस करता येणार नाही, त्यांना लोबुशे मध्येच थांबावं लागेल असा निर्वाणीचा संदेश आमच्या गाईडने दिला तेव्हा पोटात गोळा उठला,म्हणजे माझा नंबर तर नक्कीच होता.Let me take it as it comes असं स्वतःला समजावत मी पुढच्या दिवसाकडे माझं लक्ष केंद्रित केलं. पण पुढल्या दिवशी चढताना बऱ्यापैकी थकायला होतंय असं जाणवलं.ह्याचं मुख्य कारण कमी ऑक्सिजन पातळी इतकंच नाही तर माझा अत्यंत अल्प आहार हे सुद्धा आहे हे गाईडच्या लक्षात आलं.त्यामुळे ज्या रात्री डेबुचेला सगळ्यांची रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी ८५ ते ९५ च्या घरात होती तिथे माझी मात्र ७५ ते ८० च्या घरात आणि अजून तर आम्हाला ४०००मी.च्या वरचा टप्पा गाठायचा होता."मॅम,खाल्लं नाहीत तर चढायला ताकद कुठून येणार ? त्यामुळे चांगलं तगडं खायला सुरुवात करा नाहीतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट मध्ये दुप्पट खायला लावणार,"अशी धमकीवजा सूचना मला गाईडने हसत हसत दिली.पण अशी अचानक आहार वाढण्याची शक्यता फार विरळ आहे ह्याची त्यालाही कल्पना होती. ४००० मी.च्या आधीचं डेबुचे आणि दुसऱ्या दिवशी ४४०० मी.वरचं डिंगबोचे गाठेपर्यंत माझ्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी ७५ पर्यंत आली,उंचीवर चढताना जरुरीपेक्षा जास्त दम लागतोय की काय अशी मला शंका यायला लागली होती.डेबुचेकडून डिंगबूचेला जाताना सोमेरी नावाचं एक छोटं गाव लागतं,ह्या सोमेरीनंतर निसर्गचित्रातून जी झाडं गायब होतात ती थेट बेस कॅम्पपर्यंत.गवताची साधी एक काडीसुद्धा दृष्टीस पडत नाही त्यामुळे आधीच उंचीमुळे विरळ असलेला ऑक्सिजन अधिकच विरळ होत जातो. डिंगबोचेला नामचे बाजार सारखाच वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक दिवस होता.तेव्हाही आम्हाला पुढच्या दिवशी जी उंची गाठायची आहे त्यासाठीचा सराव करून घेण्यात आला.कधी तुमचं ह्या ट्रेकवर जाणं झालंच तर डिंगबूचेला "४४१० कॅफे"ला जाणं अजिबात चुकवू नका.इतक्या उंचीवर,अशा दुर्गम ठिकाणी अतिशय रुची घेऊन सजवलेल्या ह्या कॅफेचं डेकोर आणि कॅफेतलं प्रसन्न वातावरण आतापर्यंतच्या ट्रेकचा सगळा शिणवटा क्षणार्धात काढून टाकतं.आपण आधी मनाने थकतो आणि मग शरीराने,त्यामुळे मन ताजतवानं झालं की शरीरालाही नव्याने ऊर्जा मिळते.
दुसऱ्या दिवशी डिंगबूचेवरून लोबूचेला जाताना थुकलाला जेवणानंतर लागलीच उंच खडा कडा चढताना आम्हा सगळ्यांच्या तोंडाला फेस आला. दुपारच्या जेवणात खाल्लेलं,न खाल्लेलं, शरीरात असेल नसेल ते सगळं न पचलेले अन्न त्या एका कमालीच्या तीव्र चढाने जिरवून टाकलं.हा कडा चढून गेल्यावर एक पठार येतं,ह्या पठारावर एव्हरेस्ट सर करतानाच्या मोहिमेत मृत्यूमुखी पडलेल्या सगळ्या गिर्यारोहकांची थडगी आहेत त्यामुळे त्यांचा मान राखून इथे कोणतीही फोटोबाजी,गलका करू नका अशी सूचना गाईडने आधीच दिली होती. तिकडून निघताना माझी नजर अशाच एका थडग्यावर पडली ज्यावर लिहिलं होतं In The Loving Memory Of Anjali Kulkarni (54), Mumbai.तमाम फिरंगी नावांमध्ये जेमतेम दोनच नावं भारतीय होती,एक कोणीतरी शाह नावाची मुलगी आणि ह्या अन्जली कुलकर्णी. अगदी मनापासून सांगू तर कोणातरी मराठी व्यक्तीचं नाव तिथे वाचून अभिमानही वाटला आणि मोहिमेत त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला ह्याच तितकंच वाईटही वाटलं.अंजली कुलकर्णींचा वयाच्या ५४ व्या वर्षी मे २०१९ च्या एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यू झाला,ह्या बद्दलचा सविस्तर माहितीपट YouTube वर उपलब्ध आहे.पठारावरून उतरताना सर्द गार वारे वाहत होते त्यामुळे थंडीही बरीच वाढली होती,हाशहुश करत आम्ही लोबूचे गाठेपर्यंत आमच्या सगळ्यांचीच भरपूर दमछाक झाली होती.तशी ट्रेक सुरु झाल्यापासून शहाण्या बाळासारखे आम्ही सगळे रोज साडे सहा सात पर्यंत जेवत होतो आणि साडेआठ पर्यंत झोपत होतो,त्यामुळे कधी एकदा जेवून अंग टाकतोय असं झालं होतं.पण अजून आमचा ऑक्सिजन पातळी तपासण्याचा दैनंदिन कार्यक्रम पार पडायचा होता.ऑक्सिजन तपासण्यासाठी गाईडचा पहिला हात माझ्याकडेच जात असे. इंजिनीरिंगच्या प्रत्येक सहामाही परीक्षेचा निकाल जेव्हा पास आणि नापासांचा जाहीर सत्कार करण्यासाठी कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये समस्त जनतेसाठी सूचना फलकावर लावला जात असे तेव्हा सगळ्या नावांच्या गर्दीत आपल्या नावापुढे "F" तर नाही ना हे तपासताना जो मनावर ताण येत असे अगदी तोच ताण ह्या ट्रेकमध्ये गाईड ज्या ज्या वेळी मला ऑक्सिजन तपासण्यासाठी हात पुढे करायला सांगत असे तेव्हा येत असे,कारण निकाल काय असणार आहे ते त्याला आणि आम्हाला सगळ्यांनाच खरं तर चांगलंच माहित असे.आता आम्ही साधारण ५००० मी.वर येऊन पोहोचलो होतो आणि माझी रक्तातली ऑक्सिजनची पातळी थेट ६५ वर घसरली होती.दुसऱ्या दिवशी लोबूचे ते गोरक्षेप आणि मग पुढे बेस कॅम्पपर्यंत सगळंच चढण कठीण असणार होतं.शिवाय बराचसा glacier walk असणार आहे,त्यामुळे जपून चाला असं गाईड दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगताना म्हणाला होता,म्हणजे माझी ऑक्सिजनची पातळी पाहून हा मला आता नक्कीच एक्सिट डोअर दाखवणार ह्याची मी मानसिक तयारी केली होती. माझ्यासकट सगळ्यांचेच चेहरे माझं ऑक्सिजन रीडींग पाहून चिंतीत झाले होते कारण एव्हापर्यंत आम्हा सगळ्या ग्रुप मेंबर्स चं खूप छान बॉण्ड तयार झाला होता आणि EBC पर्यंत पोहोचणं जेमतेम एक दिवसावर आहे ह्या कल्पनेने सगळे हुरळून गेले होते.त्यामुळे आता लोंबूचे पर्यंत येऊन आमच्या सहा जणांपैकी कोणालाही त्याचं EBC चं स्वप्न पूर्ण न करता मागे फिरायला लागू नये असं सगळ्यांना वाटत होतं पण गाईड चा निर्णय अखेरचा असणार होता हे ही तितकंच खरं होतं. सगळ्यांच्या ऑक्सिजन पातळ्यांची तपासणी पार पडली.दर दिवशीप्रमाणे मी सोडता कोणाच्याच ऑक्सिजनच्या पातळीबद्दल काही अडचण नव्हती पण माझ्यामुळे आम्ही सगळे जीवाचा कान करून गाईड आता काय सांगतोय ह्यासाठी उत्सुक आणि चिंतीत दोन्ही होतो. का आणि कसं माहित नाही पण फार काही नाही बोलता,"मॅम,माझ्या बॅगपॅकमध्ये जागा आहे तर तुमच्या दोन्ही पाण्याच्या बाटल्या आणि अजून तुमच्या बॅगपॅकमध्ये जे काही फुटकळ सामान आहे ते मला द्या आणि तुम्ही कोणतंही अतिरिक्त वजन न घेता फक्त चाला,बस्स."असं गाईड म्हणाला आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
एव्हरेस्ट बेस कॅम्पचं हवामान कोणत्याही क्षणी खराब होण्याची शक्यता असते पण सध्या ह्या एप्रिल मे च्या दिवसांमध्ये ते बहुतांशी वेळा सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत बरं असतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे सकाळी ६ वाजता न्याहारी करून साडे सहा वाजता गोरक्षेपकडे कूच केलं, गाईडच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या कूर्मगतीने हिमनदीतून आम्हाला गोरक्षेप गाठायलाच किमान चार तास लागणार होते,पण त्यादिवशी सुदैवाने बर्फ नव्हता त्यामुळे हिमनदीतून चालणं बऱ्यापैकी सुकर वाटलं,तरीही त्याचा अंदाज खरा ठरला,गोरक्षेपला पोहोचेपर्यंत साडे दहा वाजले होते.गोरक्षेपपर्यंत जाईपर्यंतच सगळ्यांची दमछाक झाली होती,पूर्ण वाट मी तर कमी ऑक्सिजन पातळीवर रिझर्व्ह मध्ये गेलेल्या गाडीसारखी निव्वळ इच्छाशक्तीवर अक्षरशः झिंगल्यासारखीच चालत होते. पण तिथे हॉटेल मध्ये खोल्या ताब्यात घेऊन लगेचच बेस कॅम्पसाठी निघायचं होतं म्हणजे अजून दोन अडीच तासांची पायपीट बाकी होती,शिवाय अतिथंड हवामान हा ही एक खोडा होताच.गोरक्षेपला पोहोचून अर्धा तास लघुदीर्घशंकांसाठी विश्रांती झाल्यावर हवामान खराब होण्याच्या आत बेस कॅम्प गाठू या म्हणून थकल्याआळसावल्या आम्हा सगळ्यांना पराणी ढोसली.नाईलाजाने आम्ही आमची बुडं हलवली आणि बेस कॅम्पच्या वाटेला लागलो.आता मात्र हळूहळू सगळीकडे थोडा बर्फ दिसायला लागला होता,म्हणजे खरा glacier walk आता सुरु होणार होता आणि आमची खरी कसोटी आताच लागणार होती.वाट म्हणायला वाट नव्हतीच फक्त लहान मोठे खडक,काही घट्ट रुतलेले काही सैल,शिवाय पाणी दिसतंय ते पाणीच आहे का बर्फाचा थर हे ही चाचपून पाय टाकणं गरजेचं होतं.मजल दर मजल करत तब्बल अडीच तास तंगड्या तुडवल्यावर अखेर आम्ही "ह्याची देही ह्याची डोळा"तो "Everest Base Camp 5364 Mts" असं लिहिलेला भला मोठ्ठा खडक आणि त्याच्या पुढ्यात उभा केलेला एडमंड हिलरी आणि तेनझिंग नॉरगेचा फोटो डोळ्यांत प्राण आणून पाहिला आणि मला फसवून कधी माझे डोळे बांध फुटल्यासारखे झरले ते माझं मलाच कळलं नाही.कोंडलेल्या वाफेला झाकण अलगद बाजूला करून निचरायला वाट द्यावी तशी माझ्या मनावरच्या ताणाला माझ्या नकळत डोळ्यांनी आनंदाश्रूंमार्फत वाट करून दिली होती. जे कालपर्यंत अशक्य वाटत होतं ते आज वास्तवात उतरलेलं पाहताना मनात जो काही भावनांचा संशयकल्लोळ होता तो शब्दांतून नाही तर असा डोळ्यांतून ओसंडला होता.हवामान खराब झाल्यामुळे एव्हरेस्टने त्याची झलक आम्हाला दाखवली नाही पण एव्हरेस्टने आम्हाला नक्की पाहिलं असेल ह्या कल्पनेनेच आम्ही बेहद्द खुश होतो.त्या " Everest Base Camp 5364Mts."असं लिहिलेल्या खडकापुढे यथेच्छ फोटो काढून परतीला लागेपर्यंत हवामान चांगलंच खराब झालं होतं आणि बर्फ पडायला सुरुवात झाली होती.परतीच्या अर्ध्या वाटेपासून ते हॉटेलवर पोहोचेपर्यंत जवळ जवळ चाळीस एक मिनिटं आम्ही झराझरा पडणाऱ्या बर्फात चाललो,हात पाय छान गारठले होते पण तरीही आता मात्र थकव्याची थोडी जागा आनंदानेही व्यापली होती.असंही गोरक्षेपमध्ये कायमच पारा शून्याच्या खालीच असतो.आम्ही बेस कॅम्पवरून हॉटेलवर पोहोचेपर्यंत तापमान उणे १७ पर्यंत घसरलं होतं आणि रात्रीपर्यंत गोरक्षेप मध्ये इतका बर्फ पडला की सकाळी खिडकीतून खोलीबाहेर डोकावलं तर बर्फाची छान जाड दुलई अंथरल्यासारखी वाटत होती म्हणजे अडथळ्यांची शर्यत अजून संपली नव्हती आणि परतीचा प्रवास सुरूही व्हायचा होता..पण डोळे आता फक्त मुंबईकडे लागले होते.
माधुरी गोडबोले माईणकर
२४ एप्रिल २०२४
.
Well written as usual!
ReplyDeleteHat's off to you to complete the trek when O2 saturation level was so low....you too a bit risk!
Anyway, all's well that ends well!