आधी लगीन कोंढाण्याचे....
कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता त्याला खांद्यावर घेऊन बहुदा तरी गड चढावा लागणार ह्या कल्पनेने माझ्या नवऱ्याला जरा घामच फुटला कारण गडावर जाणारी वाट किती कठीण आहे हे ही माहित नव्हतं.तो जितका चढेल तितका चढेल नाहीतर घेऊ उचलून असा विचार करून दोघा मुलांना नवऱ्याने फक्त पुन्हा एकदा तानाजीची गोष्ट दोघांना सांगायला सुरुवात केली,एरव्ही पाच दहा मिनिटांत संपणारी तानाजीची गोष्ट नवऱ्याने त्यादिवशी मारुतीच्या शेपटासारखी लांबवून रंगवून रंगवून दोन्ही मुलांना तीन तास ऐकवली आणि चमत्कार पहा,ऐकलेलीच गोष्ट पुन्हा एकदा ऐकताना दोन्ही मुलं इतकी भारावली की कोणतीही कुरकूर न करता जातायेता त्यांच्या परीने वेळ घेऊन गड चढून आणि उतरून गेलीही.म्हटलं ना,शिवाजी तानाजी ह्या नावांमध्येच इतकी ऊर्जा आहे की येतंच आपल्याला त्या त्या वेळी उसनं अवसान.तर बरं का मंडळी सध्या आमच्या घरात EBC नावाच्या रोगाचा बराच संसर्ग पसरलेला आहे.तो नक्की कधी निपटेल हे सांगणं कठीण आहे पण EBC चे वारे घरात इतके जोरदार वाहतायत की त्यासाठी काहीही इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे.
त्याचं झालं असं की एक दिवस उगाच इकडचं तिकडचं काहीतरी टीव्हीवर पाहत असताना अमिताभचा "उचाई" आमच्या अहोंच्या दृष्टीस पडला आणि बस्स EBC (एव्हरेस्ट बेस कॅम्प)त्याच्या डोक्यात घर करून राहायला आणि जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसायला सुरुवात व्हायला एकच निमित्त झालं.मग रोज उठून ह्या गिर्यारोहण संस्थेला फोन करून EBC बद्दलची माहिती काढ,आंतरजाल धुंडाळ असा एकच सपाटा लावलाय आमच्या अहोंनी.अशाच कोणत्याशा गिर्यारोहण संस्थेला नवऱ्याने ,"स्वतःचा फिटनेस चाचपयचा असेल तर काय करायचं ?"म्हणून विचारायला फोन केला तर सहज तिकडून उत्तर आलं,"फिटनेस पाहायचा असेल तर सिंहगड एका तासात चढायचा प्रयत्न करा."झालं.... त्यांनी असं सांगायचा अवकाश , त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याने जसा काही सिंहगड चढायचा ध्यासच घेतला होता.नेमकी लागून सुट्टीही आलीच त्याचं औचित्य साधून मग सिंहगडाचा बेतही घाटला.एरव्ही प्रत्येक बाबतीत करू बघू म्हणत गोष्टी महिनोंमहिने लांबणीवर टाकणाऱ्या नवऱ्याकडून इतकी शीघ्र कृती पाहून मीही बुचकळ्यात पडले.म्हणजे मामला बराच गंभीर होता.का कोणास ठाऊक,वर म्हटलं तसं आधी एकदा सिंहगड चढून जायचा उद्योग केलेला असल्यामुळे म्हणा का काय देव जाणे पण ह्यावेळी मी मात्र सिंहगड चढायला फार उत्सुक नव्हते. त्यामुळे, "चल,ह्या वीकेंडला सिंहगड चढूनच येऊ या," म्हणून मागचे किमान एक दोन आठवडे तरी त्याने खूप धोशा लावूनसुद्धा मी काही ते फार मनावर घेतलं नव्हतं, उलट त्याच्यासारखंच ह्यावेळी करू बघू म्हणत मी ही त्याचा संयम थोडा ताणून धरला होता , पण "अहो" मागे हटायची काही चिन्हं दिसत नव्हती.उलट "उमर पचपन की दिल बचपन का" तसं वयाच्या पंचावन्नीला ,"तू येत नसलीस तर मग मी सकाळी एकदम भल्या पहाटे निघतो ,गड चढतो आणि लागलीच उलट परत येतो मुंबईला"म्हणत त्याने शेवटचं अति साहसी अस्त्र उगारलं.त्याचा तो धाडसी बेत ऐकून आणि उतू जाणारा उत्साह पाहून,माझ्या तोंडून कधी "त्याच दिवशी पोहोचून,चढून आणि परत घरी????नको ,इतकं धाडस नको,मी येते तुझ्याबरोबर ,"असं निघालं ते माझं मलाही कळलं नाही.
असं हो नाही करत अखेर आम्ही भल्या पहाटे सिंहगडाच्या मोहिमेवर निघालो.मला माझ्या सवतीचा म्हणजे गाडीचा ताबा मिळण्याची सुतराम शक्यता नाही हे नवऱ्याने आधीच घोषित करून टाकलं होतं.असंही बायकोबद्दल नाही इतका माझा नवरा गाडीबद्दल कमालीचा possessive आहे,त्यामुळे तोच माझ्या सवतीचं म्हणजे गाडीचं सारथ्य करणार ह्या बद्दलच्या आमच्या वाटाघाटी आदल्या दिवशीच पूर्ण झाल्या होत्या.भल्या पहाटे निघालो तर कदाचित वाहनांची वर्दळ तुरळक असेल आणि लवकर पोहोचता येईल असा विचार करणारे आमच्यासारखे शहाणे आम्हाला बरेच भेटले की ..... त्यामुळे नेहमीप्रमाणेच एक्सप्रेसवे वर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा म्हणजे आमच्या फिटनेस बरोबरच आमच्या संयमाची सुद्धा ही परीक्षा होती. किमान तासदीडतास तरी मुंगीच्या पावलांनी त्या ट्रॅफिकमधून गाडी काढण्याचा प्रयत्न करत करत शेवटी एकदाचे आम्ही कसेबसे त्यात यशस्वी झालो तर खरे पण ह्या भानगडीत ठरवलेल्या वेळेपेक्षा चांगला तास दोन तास तरी आम्हाला सिंहगडाच्या पायथाशी पोहोचायला उशीर झाला होता.आम्ही पायथ्याशी पोहोचलो तेव्हा भर मध्यान्हीचं छान टपोरं चांदणं पडलं होतं पण काही इलाज नव्हता.अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता तसा माझ्या नवऱ्याला फक्त सिंहगडाचा माथा दिसत होता त्यामुळे अवाक्षर काढण्याची सोय नव्हती.घड्याळाचा काटा लावून आम्ही सिंहगड चढायला सुरुवात केली. पण आधीच टळटळीत दुपार आणि हट्टाने एकट्याने केलेलं सहा साडे सहा तासांचं ड्रायविंगअहोंची थोडीबहुत दुहेरी दमछाक झालेली असावी, त्यामुळे आम्ही ठरवलेल्या एक तासाच्या टार्गेटेड वेळेऐवजी ऐवजी दीड पावणे दोन तासात सिंहगड चढून माथ्यावर पोहोचलो,पण ठीक आहे इतका पण आपला फिटनेस वाईट नाही म्हणून आम्हीच आमचं सांत्वन करून घेतलं.माझे तर डोळे सिंहगडाच्या माथ्यापेक्षा आधीपासूनच तिथल्या पिठलं भाकरीवर आणि मटका दह्यावर जास्त गाडलेले होते.
तानाजी कडा |
साधारण पंधरा एक वर्षांपूर्वी असेच सिंहगड चढून गेलो होतो तेव्हा गडावर फार वर्दळ नव्हती पण ह्यावेळी मात्र गडावर जत्राच भरल्यासारखी वाटावी इतकी गर्दी...आपल्या राज्य सरकारने गडाचं संवर्धन करून गडाचं रुपडं सुद्धा अंतर्बाह्य पालटलेलं ,त्यामुळे सिंहगड एखादं मनोरंजनात्मक ठिकाण जास्त वाटत होता.पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संख्येने असलेल्या पिठलं भाकरीच्या ठेल्यांची जागा आता रीतसर खाऊ गल्लीनेच घेतलीय,शिवाय फळं विक्रेते,पानाचे ठेले,कुल्फीवाले ह्यांची संख्या सुद्धा भारी. माणसं तर सहकुटुंब सहपरिवार एक दिवसीय सहलीसाठीच आली होती त्यामुळे मुंग्यांच्या संख्येने माणसं.टळटळीत दुपार असूनसुद्धा हवेत यत्किंचितही उष्मा नव्हता,त्यामुळे ऐन उन्हात गड चढणं वाटलं होतं त्यापेक्षा थोडं सुखकर झालं असलं तरी पोटात खवळलेली भूक जेवणाची वेळ अंमळ टळून गेल्याची जाणीव करून देत होती. त्यामुळे एका झाडाच्या गर गर सावलीत अंथरलेल्या चटईखाली गेल्यागेल्याच आम्ही जागा पटकावली . वर पोहोचल्या पोहोचल्याच एका दहिवालीला तिच्या टोपलीत काय आहे म्हणून सहज विचारलं होतं तर आम्ही स्थानापन्न व्हायची खोटी की ती आलीच लागलीच आमच्या मागे तिच्या मटका दह्याची टोपली घेऊन,तिच्याशीच साटंलोटं असलेल्या एकांना तिने पिठलं भाकरीची ऑर्डर द्या अशी विनंती वजा फर्मान काढलं.सध्या गडावर पिठलं भाकरीच्या ठेल्यांची संख्या इतकी आहे की धंदा मिळवण्यासाठी त्यांच्यात कशी चढाओढ होते हेही त्या निमित्त्याने अनुभवायला मिळालं.झाडाच्या गार सावली इतकी सुखद वाटत होती कि तिथून हलवतच नव्हतं पण पुढच्या गिऱ्हाईकांना जागा देण्यासाठी पिठलं,भाकरी,हिरव्या मिरचीचा खरडा,छान गारेगार मटका दह्यावर ताव मारून आम्ही गडाचा फेरफटका मारायला नाईलाजाने आमची बुडं हलवली.
ह्यावेळी सिंहगडावर अजून एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पानाची गादी चालवणाऱ्या बायका.अगदी मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा आम्हाला पानाची गादी चालवायचा व्यवसाय करणारे फक्त पुरूषच आढळतात पण इथे पानाच्या गाद्या चालवणाऱ्या बायका होत्या.पहिल्यांदाच मला बटरस्कॉच,स्ट्रॉबेरी ,चॉकोलेट, कलकत्ता,ब्लॅक करंट ,मँगो अशा सात आठ फ्लेवरची पानं विकायला ठेवलेली पाहायला मिळाली.ती इतकी आकर्षक दिसत होती की विकत घेतलीच आम्ही पानं तिच्याकडून....फोटो काढू का विचारल्यावर फोटोसाठी एकदम सरसावून बसली पहा..
असो. तर गडावर वर गेल्या गेल्याच अमृतेश्वराचं देऊळ आणि टिळक निवास लागतं. गडावर आपटे वाडा आणि हे टिळक निवास असे दोन वाडे आहेत जिथे तुमची गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते. पंधरा वर्षांपूर्वी गडावरच्या देव टाकी मध्ये आम्हाला फक्त शेवाळ आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसला होता त्यामानाने ह्यावेळी देव टाकीचं पाणी बरंच स्वच्छ झालेलं पाहून हायसं वाटलं,म्हणजे शेवाळ फक्त तळाशी होतं आणि बाटल्यांचा खच बऱ्याच प्रमाणात कमी झालेला होता.ह्या देव टाकी व्यतिरिक्त पहार टाकी आणि हत्ती टाकी अशा अजून दोन पाण्याच्या टाक्या गडावर आहेत.गडावरच्या झुंजार बुरूजावर तानाजी आणि उदय भान मध्ये तुंबळ युद्ध झालं ,उदय भानने तानाजीचा तर वध केला पण इथल्या उदयभान थडवर शेलार मामांनी उदयभानला मारून तानाजीच्या वधाचा बदला घेतला. इथल्या कलावंतिणीच्या बुरूजावर उदयभान नाचगाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असे असं म्हणतात. गडावर जशी तानाजीची समाधी आहे तशीच शिवरायांचे पुत्र राजारामाची सुद्धा समाधी आहे कारण ह्या सिंहगडावरच राजारामाने आपला देह ठेवला. राजाराम समाधीकडून पुन्हा पुण्य दरवाज्याकडे जाताना वाटेत मुंगूस भेटीला आलेला पाहिल्यावर माझी पाळता भुई थोडी झाली. गडावर राहणाऱ्या माणसांइतकीच सापाची संख्या सुद्धा आहे त्यामुळे मुंगूसही म्हणे खूप आहेत.आता तो नेमका आमच्याच भेटीला यावा ....
राजारामाची समाधी |
घोड्याची पागा |
आधीच ट्राफिक मधला प्रवास आणि जाता येता सिंहगडाची पायी रपेट झाल्यावर उलट पुण्यापर्यंत येऊन राहण्याची शक्यता धूसरच झाली होती,त्यामुळे सिंहगडाच्या पायथ्याशीच रहावं हे योग्य होतॊकारां आता पूर्णदर इथून जवळच आहे ते पुरंदर पण लगे हाथ सर करता येतोय का ते पहावं म्हणून आम्ही सिंहगडाच्याच पायथ्याशी असलेल्या एका होम्सताय मध्ये आमचा तंबू टाकला.आजूबाजूने हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या बंगला वजा होम स्टे साधा पण छान.होमस्टे सुरु करून नुकते चार पाचच महिनेच झाले असल्यामुळे सुधारणेला नक्कीच वाव आहे.पण होमस्टे चालवणारे भिंगे दाम्पत्य अतिशय आपुलकीने येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करतात.साधं पण आपुलकीने आणि प्रेमाने रांधलेलं गरमगरम जेवण तव्यावरून ताटात येणं ह्यापेक्षा सुख ते काय वेगळं असतं ? भाऊ बहीण परदेशी स्थायिक आणि आई वडील नुकतेच जग सोडून गेल्यामुळे एकाकी झालेल्या,शिवाय cerebral palsy मुळे एक हात आणि एक पाय पूर्णतः नाही पण काहीसा अधू असलेल्या आपल्या एका मध्यमवयीन मित्राला त्याचे सगळे मूड swings सांभाळत त्याच्या कलाने घेत त्याला कायमस्वरूपी आपल्या जवळ ठेवून त्याचा योग्य तो सांभाळ करण्याची जबाबदारी भिंगे दाम्पत्याने स्वेच्छेने आणि अतिशय आनंदाने स्विकारलीय.आजच्या कमालीच्या व्यग्र आयुष्यात रक्ताच्या माणसांचंसुद्धा करण्याची जबाबदारी टाळणाऱ्या तुटक माणसांच्या भाऊगर्दीत अशी भिंगे दाम्पत्यासारखी माणुसकीचा झरा वाहता ठेवत समाजाचं देणं देऊ पाहणारी माणसं आपल्याला निःशब्द करतात.
आदल्या दिवशी आम्ही होमस्टेच्या संचालकांना पुरंदर इथून तास जवळच आहे तर आलोच आहोत तर पुरंदर पण आम्हाला सर करता येईल का ह्याबद्दल माहिती काढण्याची विनंती केली होती.त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती काढून सकाळी सकाळीच पुरंदर आता आपल्या सैन्याच्या अखत्यारीत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी तो खुला नाही अशी खुशखबर दिली.म्हणजे पुरंदरचा बेत तर उधळला होता पण डोणजे मधली सकाळ इतकी प्रसन्न आणि छान होती कि गावात फेरफटका मारायचा मोह काही आवरला नाही.मग होमस्टे च्या संचालकांनासुद्धा आम्ही शांत बसू दिलं नाही.त्यांच्या मदतीने थोडे पाय मोकळे केलेच.सकाळच्या मस्त गरमगरम आणि पोटभर अशा न्याहारीनंतर सगळी आन्हिकं उरकून आम्ही तिघंही गावात चक्कर मारायला बाहेर पडलो.व्यसन मुक्तीच्या सामाजिक कार्यात डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट ह्याचं कार्य अतुल्य आहे. ह्याच मुक्तांगण मधून व्यसनमुक्त झालेला त्यांचाच एक विद्यार्थी ह्या होमस्टे पासून जवळच "स्तुतिवन" नावाचं निवासी व्यसनमुक्ती केंद्र चालवतो.अशी अजून दोन व्यसनमुक्ती केंद्र आम्हाला नजरेस पडली."इतकी संख्या आहे का निवासी विद्यार्थ्यांची ह्या केंद्रांमध्ये ?अशा माझ्या कुतूहलापोटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्यांच्याकडून होकारात आलं तेव्हा मन अस्वस्थ झालं.समाजकार्याला वाहून घेतलेली अशी अजून एक संस्था इथे आहे,"आपलं घर",ह्या संस्थेचं कार्य इतकं मोठं आहे की संस्था स्वतःहून कुठेही जाऊन निधी गोळा करत नाही उलट त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या दात्यांची संख्याइतकी मोठी आहे कि ,"त्यांना "आपलं घर" लाच का देणगी देण्याची इच्छा आहे?",अशी दात्यांचीच मुलाखत त्यांच्याकडून देणगी स्विकारण्यापूर्वी इथे घेतली जाते.
बाकी मी ह्याच्या आधीही म्हटलंय की आपल्याला आपल्या देशाबद्दल माहिती नसते इतकी माहिती इथे पर्यटक म्हणून येणारे परदेशी नागरिक वाचून आणि शोधून काढून घेऊन येतात.ह्या डोणजे मध्ये एक सिध्दनाथ महाराजांचा योग आश्रम आहे.जिथल्या निवासी शिबिरात येणारे योगेच्छुक फक्त अभारतीय असतात.आता इतक्या छोट्याशा गावातल्या योग आश्रमाबद्दल आणि त्यातही तिथे दरवर्षी भारावल्या जाणाऱ्या दहा दिवसांच्या योग शिबिरांबद्दल इथे भारतात राहून आपल्याला नाही पण ह्या परदेशी मंडळींना कुठे आणि कशी माहिती मिळते हे सुद्धा एक कोडंच आहे.आश्रमाचा परिसर खूप मोठा आहे,आश्रमाच्या आवारात असलेल्या शंकराच्या देवळातली पिंड ही कोणत्याही धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेली नाही तर १५० टन वजनाचं हे शिवलिंग पूर्ण पाऱ्याचं आहे.देवभक्तीचे सगळे मार्ग जात धर्म असा भेद करत नाहीत तर परमात्मापर्यंत पोहोचणारा प्रत्येक मार्ग हा एकाच इष्टापर्यंत जातो ह्या सत्याचं द्योतक म्हणजे ह्या देवळाचा कळस जो मुद्दाम मशिदीवरच्या घुमटासारखा केलेला आहे.गावातला फेरफटका मारून परतेपर्यंत निघायची वेळ झाली होती.इच्छा नसतानाही भिंगे दाम्पत्याचा निरोप घेऊन परतीच्या वाटेल लागलो.पण झपुर्झा बद्दल बरंच काही ऐकून होते त्यामुळे सहज होमस्टे च्या संचालकांना जेव्हा झपुर्झा बद्दल विचारलं होतं तेव्हा ते आमच्या परतीच्याच वाटेवर लागेल असेल म्हणाले होते.त्यामुळे लागलीच आम्ही पुरंदरचा वेळ झपुर्झा मध्ये सत्कारणी लावायला झपुर्झा मध्ये थडकलो.
खडकवासला नदीच्या अतिशय नयनरम्य पार्श्वभूमीवर विस्तारलेलं झपुर्झा हे पु.ना.गाडगीळांच्या उच्च कलात्मक,साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिरुचीचं द्योतक आहे.इथल्या दहा कलादालनांमध्ये आपल्याला देशातल्या अनेक नामांकित चित्रकारांच्या चित्रकृती, त्या चित्रकारांची पार्श्वभूमी, प्रख्यात कवींच्या कविता,ज्योतिषविद्ये सारख्या विद्येची ऐतिहासिक पार्श्वभूमी,विविध शतकांमध्ये वापरात असलेल्या वस्तू,वस्त्रं,दागिने हे सगळं अतिशय दर्जेदारपणे सादर केलेलं आढळतं.सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये चांदीच्या भांड्यांवर कोरलेल्या आपल्या वेगवेगळ्या पौराणिक कथा हा ह्या सगळ्या दालनांमधला किमान माझ्यासाठी तरी कलेचा सर्वोच्च बिंदू होता.मागच्या बाजूने नदीचं सौंदर्य डोळ्यात साठवत नदीच्या कडेकडेने चालता येईल अशी केलेली पायवाट संपूच नये असं वाटत होतं.निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर एकदम शांत होणारं मन,थंडावणारे डोळे,त्याच्या सान्निध्यात मिळणारं समाधान खरंच शब्दातीत आहे .....
झपुर्झा मधली मला सगळ्यात जास्त भावलेली कलाकृती |
ह्यावेळची सिंहगडाची भेट भलेही धावती होती,पुरंदर वर न जाता आल्याची काहीशी खंतही वाटली पण जी माणसं भेटली,दर्जेदार कलाकृती आणि वास्तू पाहायला मिळाल्या त्या खूप संधान देऊन गेल्या.अपूर्णत्वात पूर्णत्व कदाचित ह्यालाच तर म्हणत नसावेत ?
माधुरी गोडबोले माईणकर
२७ डिसेंबर २०२३
Comments
Post a Comment