पावनखिंड
काही संज्ञा रूढार्थाने आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये अशा रूजतात की जसे काही ते समानार्थी शब्दच असावेत.अगदी उदाहरणादाखलच सांगायचं तर एखाद्या मूळ दस्तावेजाची नक्कल म्हणजे झेरॉक्स किंवा मिनरल वॉटर म्हणजे बिस्लेरी इत्यादी.वास्तविक पाहता झेरॉक्स काय किंवा बिस्लेरी काय ह्या खऱ्या तर कंपन्या पण मूळप्रतीची नक्कल म्हणजे झेरॉक्स आणि मिनरल वॉटर मग ते कोणत्याही ब्रॅण्डचं असो लोकं सर्रास त्याला बिस्लेरीच संबोधतात.तसंच किमान सगळ्या मराठी लोकांच्या मनात,बाजीप्रभू देशपांडे म्हणजे पावनखिंड हे समीकरण कोरलेलं आहे.शीर्षकच असं आहे की ज्याला शिवकालीन इतिहासाचा पुरेसा परिचय आहे त्या कोणालाच पावनखिंडीबद्दल फार काही सांगण्याची गरज पडत नाही.सिर्फ नाम ही काफ़ी हैं.....
जवळपास चाळीस एक वर्षांपूर्वी जेमतेम दहा वर्षांची असताना पन्हाळगड चढून जाण्याची संधी मिळाली होती त्यामुळे गडाच्या आठवणी तशा खऱ्या धूसरच झालेल्या होत्या पण आठवणींचा मोहोळ मात्र होता.त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक अजब उत्कंठाही होती.अशाच उत्कंठेने काही वर्षांपूर्वी प्रतापगड पाहायला गेलो होतो,त्यावेळी लहानपणीच्या कोवळ्या वयात चढणं झेपत नसताना उत्साहाने पाहिलेल्या प्रतापगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याचं झालेलं व्यावसायिकीकरण पाहून फार निराश झालो होतो.त्यामुळे ह्या किल्ल्यांच्या बाबबीतही असं काहीसं अपेक्षित होतंच.पूर्वी चढून जाव्या लागणाऱ्या पन्हाळगडावर आता अगदी थेट वरपर्यंत आपल्याला गाडी नेता येते.त्यामुळे हॉटेल्स,झुणका भाकरीचे ठेले आणि किरकोळ वस्तूंची विक्री करणारी छोटेखानी दुकानं अपरिहार्यपणे आलीच.शिवाय पर्यटनासाठी आणि छोट्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी छोट्या ओपन टॉप बसेस सुद्धा आता आपली वर्णी लावून आहेत त्यामुळे पन्हाळगड आता ऐतिहासिक स्थळ न राहता फावल्या वेळात येऊन फेरफटका मारण्याचं ठिकाण जास्त वाटतं.आश्चर्याची बाब म्हणजे इथल्या ओपन टॉप बसच्यावर पन्हाळा न लिहिता "लंडन "असं लिहिलंय जे माझ्या डोळ्यांना जरा जास्तच बोचलं.आता खरंतर पन्हाळा दर्शनाचा लंडनशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही पण स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षं उलटली तरीही ब्रिटिशांशी असलेली आपली मानसिक गुलामी कधी संपणार ते देवच जाणे .. पर्यटकांसाठी चाऊ प्याऊची दुकानं आणि अशा ओपन टॉप बसेसने रोजगाराला पुष्टी मिळते हे जरी खरं असलं तरी कोणत्याही गडकिल्ले किंवा ऐतिहासिक स्थळांचं व्यावसायिकीकरण हे त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाला आणि प्रतिमेला जराही धक्का न लावता करण्याचा प्रयत्न झाला तरच ते फिरण्याची रंगत वाढते असं मला मनापासून वाटतं.त्या त्या गडकिल्ल्यांवर गेल्यावर काही क्षणापुरतं का होईना त्या गडाचा किंवा स्थळाचा इतिहास जगता आणि अनुभवता यायला हवा.पण आता हल्ली फक्त फारशा परिचीत नसलेल्या गडकिल्ल्यांचं किंवा स्थळांचं असं व्यावसायिकीकरण दिसत नाही.किंबहुना ती इतकी इतिहास जमा झालेली असतात आणि विस्मृतीत गेलेली असतात की त्या त्या शासनांकडून किंवा सरकारकडून जीर्णोद्धाराचा कोणताच प्रयत्न न झाल्याने उपेक्षित आणि पडीक अवस्थेत असतात.असो.
तीन दरवाजा |
तर पन्हाळगडावर अंधार बावडी,तुपाची विहीर,तीन दरवाजा,अंबरखाना,टेहळणीचा बुरुज,पावनगड,ताराराणींचा महाल आणि सज्जा कोटी ही पाहण्यासारखी काही ठळक ठिकाणं.बिजापूर महाराष्ट्राच्या व्यापारी मार्गावरच्या त्याच्या अतिशय मोक्याच्या स्थानामुळे पन्हाळा हा त्या काळी कायमच मराठा आणि मुघलांमधल्या दख्खनच्या चकमकींचा केंद्रबिंदू होता,जी आक्रमणं ह्या तीन दरवाज्यामार्गे होत असत.आणि नेमकं ह्याच कारणासाठी पन्हाळा बऱ्याच ऐतिहासिक लढायांना साक्षही राहिलाय.इथल्या अंधार बावडीत आपल्या पन्हाळ्यावरच्या वास्तव्यादरम्यान शिवाजी महाराज आंघोळ करत असत असं म्हणतात.शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अहिल्याबाई सती गेल्या आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी ताराबाईंनी राज्यकारभाराची सूत्रं सांभाळून मराठ्यांच्या मुघलांविरुद्धच्या लढ्याला एक ज्वलंत नेतृत्त्व दिलं.राजांचे अतिशय विश्वासू आणि जवळच्या गोटातले सरदार सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची ही अतिशय शूर, कर्तृत्त्वान आणि धाडसी कन्या.कान्होजी आंग्रे,गिरजोजी यादव,बालाजी विश्वनाथ अशा आपल्या मूठभर मात्तबर सेनानींच्या मदतीने ताराबाईंनी मोघलांच्या नाकीनऊ आणले आणि अखेर १७०५ मध्ये मुघलांकडून पन्हाळा परत मिळवून कारंज्याला आपली राजधानी घोषित केली.अशा ह्या शूरवीर ताराराणींनी कोल्हापूर राज्याच्या स्थापनेवेळी १७०८ मध्ये ह्या पन्हाळ्यावर आपला राजवाडा बांधला आणि पन्हाळ्याहून १७८२ पर्यंत म्हणजे तब्बल ७४ वर्षं कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला.हा वाडाही आपल्याला पन्हाळ्यावर पाहायला मिळतो.आज ह्या राजवाड्यात जिल्हा परिषदेची शाळा भरते.राजवाड्याच्या समोरच शिवाजी महाराजांचं देऊळ सुद्धा आहे,जे फक्त सकाळी पूजेपुरतं उघडलं जातं.सर्वसामान्यांना हे देऊळ खुलं नाही. गडावरचा अंबर खाना म्हणजे धान्याचं कोठार खूप मोठं आहे.गंगा,यमुना,सरस्वती अशी ह्या अंबरखान्यात तीन कोठारं आहेत ज्यातलं गंगा कोठार सगळ्यात मोठं आहे ,त्या त्या नद्यांच्या आकारमानावरून ह्या कोठारांची नावं दिली गेलीयत असं म्हटलं जातं.संभाजी महाराजांच्या गैरवर्तनाबद्दल रयतेकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींवरून महाराजांनी अखेर ह्या गडावरच्या सज्जा कोठीत त्यांना कैद करून ठेवलं म्हणून पन्हाळगडावरच्या सज्जा कोटींचं महत्त्व.संभाजी राजांना सज्जा कोठीवर कैदेत डांबून ठेवण्याच्या महाराजांच्या निर्णयामुळे महाराज आणि संभाजी राजांचे आधीच फारसे चांगले नसलेले संबंध अजून ताणले गेले असं म्हणतात.. खरंच किती अवघड आहे एकाच वेळी एक आदर्श शासनकर्ता आणि आदर्श पिता अशा दोन्ही भूमिका तितक्याच निष्ठेने बजावणं . एखाद्या निर्णयाचे भविष्यात होणारे दूरगामी परिणाम माहित असूनसुद्धा काळजावर दगड ठेवून रयतेच्या हितासाठी स्वतःच्या रक्तालाही प्रसंगी अंतर द्यावं लागणं वाटतं तितकं सोपं नाही.
अंधार बावडी |
ताराराणींचा राजवाडा |
पन्हाळगडावरून पावनगडाकडे जाताना अजून एक कुतूहल चाळवणारी वास्तू आपल्याला दृष्टीस पडते ती म्हणजे सूरश्री लताताई मंगेशकरांचा बंगला.आज बंगल्याच्या आसपास इतकी झाडी उगवलेली आहे की बंगला सहजासहजी दृष्टीस पडत नाही आणि आत जाऊन पाहण्याची लोकांना परवानगी नाही. पण लताताईंना इथे का बरं बंगला बांधावासा वाटला असेल हा प्रश्न मात्र मला वाटभर सतावत राहिला.पावनगडावर शिवदुर्ग संवर्धन मंडळाच्या लोकांना काही शिवकालीन तोफगोळे सापडले ज्याचे फक्त फोटोच पाहायला मिळतात.पावनगडावरच्या तुपाच्या विहिरीत म्हणे पूर्वी म्हणजे महाराजांच्या काळात गडावर राहणाऱ्या सगळ्या सैन्यासाठी आणि सेवेकरांसाठी तूप ठेवलं जात असे म्हणून ह्या विहिरीचं नाव"तुपाची विहीर".पण पावनगडावरची तुपाची विहीर आणि पन्हाळगडावरच्या ह्या धान्य कोठारांच्या आकारमानावरून त्या काळी साधारण गडावर किती मोठ्या प्रमाणात सैन्यवस्ती असेल ह्याचा आपल्याला पुरेसा अंदाज बांधता येतो.
अंबरखाना |
गडावरलं शिवमंदिर |
अफझलखानच्या वधानंतर जावळीच्या घनदाट जंगलात त्याच्या सैन्याचा दारुण पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या हद्दीत सातत्याने चढाया सुरूच ठेवल्या.लवकरच १६५९ मध्ये महाराजांनी पन्हाळा काबीज केला तर दुसरीकडे नेताजी पालकरांचा बिजापूरच्या हद्दीत धुमाकूळ सुरूच होता . मराठा सैन्याच्या सततच्या आक्रमणांनी चवताळलेल्या आदिलशहाने सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याच्या मोहिमेवर रवाना केलं.सिद्दीला महाराजांच्या ठावठिकाण्याचा सुगावा लागताच त्याने आपल्या अफाट सैन्यासह तब्बल पाच महिने पन्हाळ्याला वेढा घातला.पावसाळा सुरू झाल्यावर का होईना सिद्दी नक्कीच आपला वेढा उठवेल हा महाराजांचा होरा चुकीचा ठरला.उलट पावसाळा सुरु झाल्यावर सिद्दीने गडाचा वेढा अजूनच घट्ट केला.गडावरची रसद संपत आल्यामुळे चिंतीत झालेल्या महाराजांनी अखेर बाजीप्रभूंच्या मदतीने पन्हाळ्याहून निसटून विशाळगडावर पोहोचण्यासाठी एक धाडसी योजना आखली..एकीकडे तंतोतंत महाराजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदने मुघलांच्या सैन्याची दिशाभूल करण्यासाठी सैन्याच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने पालखीतून निघून महाराजांच्या वेशात सिद्दीच्या हाती लागावं आणि दरम्यान महाराजांनी निवडक सैन्यानिशी विशाळगडाकडे निघावं. पण हजारांच्या घरात संख्याबळ असलेल्या मोघलांच्या सैन्यापुढे जेमतेम ६०० मावळ्यांचा निभाव लागणं जवळपास अशक्यंच होतं.तरीही निव्वळ बाजीप्रभू देशपांड्यांचं कणखर, मुत्सद्दी नेतृत्त्व आणि मावळ्यांच्या धडाडीच्या बळावर आषाढ पौर्णिमेच्या मुसळधार पावसात महाराज पन्हाळगडावरून विशाळगड गाठायला निघाले.महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजी,फुलाजी आणि बांदल सेनेनं सिद्दीच्या फौजेला घोडखिंडीत थोपवून धरावं ही योजना.चाळीशी उलटलेले बाजीप्रभू,त्यांचे भाऊ फुलाजी आणि मूठभर बांदल सेनेनी महाराजांना दिलेल्या शब्दाखातर झराझरा कोसळणाऱ्या पावसात ,सर्वांगावर तलवारींचे वार झेलत घोडखिंड अडवून धरण्यासाठी तब्बल अठरा तास मुघलांशी कडवी झुंज दिली.महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याची ठरल्याप्रमाणे तोफांची सलामी मिळाल्यावरच शत्रूशी झुंजताना धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभूंनी ह्या खिंडीत आपला देह ठेवला.पावनखिंडीत त्यांच्या समाधीचं दर्शन घेताना ह्या सगळ्या गोष्टी आठवून आपल्या अंगावर काटा उभा राहतो, "सरणार कधी रण प्रभु तरी,हे कुठवर साहू घाव शिरी "ह्या लतादीदींच्या गाण्याच्या ओळी खरंच किती अर्थपूर्ण आहेत हे तेव्हा जाणवतं.आज मूळ पावनखिंडीत जायला तर परवानगी नाही पण त्याच्या एका पर्यायी मार्गावरून आपल्याला खाली उतरता येऊन त्या घळीच्या दुर्गमपणाचा अंदाज घेता येतो.
पावनखिंड |
विशाळगडावर मात्र चढूनच जावं लागतं म्हणजे इथे शासनाला वरपर्यंत रस्ता करण्याची सुदैवाने सोय नाहीये.तिन्ही बाजूला अतिशय खोल दऱ्या आणि घनदाट जंगल दक्षिणेकडून मुचकूंदी आणि उत्तरेकडून अधिष्ठी अशा दोन नद्यांनी वेढलेला सह्याद्री रांगेतला ऐन घाटमाथ्यावर वसलेला हा एक बिकट गड,अतिशय दुर्गम आणि नावाप्रमाणेच विशाल.ह्या गडावरून कोकण आणि देश व्यापारी मार्गावर बारीक नजर ठेवता येत असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा.ह्या विशाळगडाच्या उभारणीचं श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा ह्याचं आहे. १६५९मध्ये आदिलशहाकडून पन्हाळा मिळवल्यानंतर लगेचच महाराजांनी विशाळगड म्हणजे पूर्वीचा हा "खेळणा" काबीज केला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत विशाळगड मराठ्यांच्या राजकीय कारवायांचा केंद्रबिंदू राहिला.आज विशाळगड दुरावस्थेत आहे,त्याचं ऐतिहासिक महत्त्व पाहता त्याचं आवश्यक ते संवर्धन शासनाकडून केलं गेलेलं नाही.गडावर इतकी लोकवस्ती आहे की त्याला जो ऐतिहासिक गाभा जाणवायला हवा तो अजिबात जाणवत नाही. गडावर फिरताना आपण एखाद्या गजबजलेल्या शहरातल्या जुन्या छोट्या चाळकरी गल्लीबोळांत फिरत असल्याचा भास होतो.त्यामुळे अगदी मुसळधार पाऊस आणि दाट धुकं असतानासुद्धा ज्या अट्टाहासाने विशाळगडावर गेलो तो नसता केला तरी चाललं असतं असं वाटलं.
किल्ले विशाळगड |
पण क्वचित अशी निराशा पदरी पडली तरी हिमालयाची भटकंती असो वा अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांची भटकंती असो,अशी निसर्गाशी जवळीक साधणारे प्रवास नेहमीच आपल्याला एक अनामिक ऊर्जा,आनंद आणि समाधान देतात.किंबहुना आपल्यातल्या क्षुद्रपणाची सातत्याने जाणीव करून देत राहतात त्यामुळे माझ्या आतल्या खऱ्याखुऱ्या "मी" चा शोध घ्यायच्या ओढीने पावलं त्यांच्याकडे सतत खेचतच राहतात.एकदा दऱ्या खोरी,पर्वतरांगा,डोंगरमाथे पालथे घालण्याचा छंद ज्याला जडला तो वरचेवर अशा मोहिमा काढतच राहतो."हा छंद जीवाला लावी पिसे" म्हणतात ते अगदी खरं.माझ्यापुरतं बोलायचं झालं तर "स्वतः"मधल्या खऱ्या "स्व"चा शोध घ्यायला लावणारे असे असंख्य प्रवास मनाला येईल तेव्हा करता येणं हाच ऐषाराम.तुम्हाला काय वाटतं?
माधुरी गोडबोले माईणकर
१२ ऑक्टोबर २०२३
सुरेख वर्णन!
ReplyDelete