Skip to main content

सह्याद्रीच्या कुशीतला हिरा

 सह्याद्रीच्या कुशीतला हिरा

"अगं कुठेतरी जाऊ या ह्या वीकेंडला,काही सुचतंय का ?"नवरोजी विचारते झाले.एरव्ही लोळून एखादा सिनेमा नाहीतर वेब सिरीज पहात किंवा एखाद्या लठ्ठ पुस्तकाच्या पानांचा वाचून चोथा करत आठवड्याच्या सुट्टीचं सार्थक करणाऱ्या अहोंकडून सहसा असा प्रस्ताव जरा अनपेक्षितच असतो त्यामुळे आधी तर माझा जबडाच पडला.मग मी एकदा स्वतःला जरा चिमटा काढून,मी आता जे ऐकलं ते नक्की खरं आहे का? ह्याची खातरजमा  करून घेतली.तिथवर "मग बघ काही सुचतंय का ते" म्हणत अहोंनी अतिशय सफाईदारपणे ती जबाबदारी माझ्या गळ्यात टाकून तिथून पोबारा केला.पण कोरोना पुरता निपटल्यापासून मागच्या दोन वर्षांचं उट्टं काढत असलेले आमच्यासारखे भटके बरेच आहेत त्यामुळे असं अगदी आयत्या वेळी कुठे काही बुकिंग मिळण्याची  शक्यता जवळपास शून्यच असते.मुंबईतून कुठेही पोहोचायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा नुसता विचार केला तरी आमच्या अंगावर काटा येतो.त्यात मुंबईपासून पोहोचायला कमी जिकिरीचं आणि तरी पैसावसूल पर्याय असं काहीतरी हुडकून काढायचं म्हणजे एक दिव्यच.अगदी अलीकडच्या काळात एकामागून एक अशी दोन्ही पिल्लं घरट्यातून उडाल्यापासून आम्हा दोघानांही रिकामं घर अंगावर आल्यासारखंच  वाटतं त्यातून सुट्टीचा दिवस असेल तर हे रितेपण जरा जास्तच जाणवतं.त्यामुळेच बहुदा चक्क अहोंच्या सुद्धा डोक्यात भटकंतीचा विचार कधी नव्हे तो डोकावला असावा.आता मी पडले जातिवंत भटकी,मग काय पडत्या फळाची आज्ञा.त्यामुळे अहोंनी अनपेक्षितपणे असा प्रस्ताव ठेवायचीच खोटी,त्याचा उत्साह संपायच्या आधी काहीतरी खंगाळून काढावं म्हणून मी ही लगेच बाह्या सरसावल्या.फेसबुकला  साकडं घातलं आणि ते प्रसन्न झालं.प्रशांत कुलकर्णींची पोस्ट वाचली आणि हाताशी लागला सह्याद्रीच्या कुशीतीला हिरा....जुन्नर.आमच्या आखूडशिंगी आणि बहुगुणी ह्या अपेक्षांवर शंभर टक्के खरा उतरणारा..  
 

भीमा नदी

"काखेत कळसा नि गावाला वळसा" ही म्हण किती सार्थ आहे हे लहान असताना उमगत नसे.पण थोडं भान आल्यानंतर ह्या म्हणीची प्रचिती वारंवार यायला लागली.मुंबईपासून फार कष्ट न पडता पोहोचता येण्याजोग्या जुन्नरबद्दल,म्हणजे साधारण पाच साडे पाच तास लागतातच बरं का मुंबईहून जुन्नर गाठायला,आमचं ज्ञान शाळेतल्या पाठयपुस्तकांपर्यंतच  मर्यादित होतं पण हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे ह्या जुन्नरला अनेक पैलू आहेत.शिवनेरी,नारायणगड,ढाकोबा,हरिश्चंद्रगड,चावंड,हडसर,जीवधन,निमगिरीसारखे आठ ऐतिहासिक किल्ले आणि वडज ,माणिकडोह,येडगाव,पिंपळगाव-जोगा,चिल्हेवाडी अशा पाच धरणांच्या जलाशयांनी वेढलेलं जुन्नर सगळ्याच बाबींत समृद्ध आहे.लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि ओझरचा  विघ्नेश्वर हे  अष्टविनायकांमधले दोन गणपती,अगदी बिबट्यांपासून घेऊन ते फ्लॅमिंगो सारख्या नानाविविध पक्षांपर्यंत जैवविविधता,ऊस,द्राक्षांसारखी नगदी पिकं,नानारंगी फुलं जे म्हणाल ते आहे जुन्नरमध्ये.एकदा मुंबई पुण्याचा एक्सप्रेस वे सोडून आपण पुणे नाशिक महामार्गाला लागलो की महामार्गालगत चिकटून डोलणारी लांबच लांब पसरलेली हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत रहातात.कधी उंच  सरळसोट वाढलेल्या ऊसाचा मळा नजरेस पडतो तर कधी  झेंडू आणि वेगवेगळ्या रंगांच्या शेवंतीचे रंगीबेरंगी गालिचे दृष्टीस पडतात.कॉंक्रिटची जंगलं पाहायची सवय असणाऱ्या आम्हा मुंबईकरांच्या नजरेला चोहीकडे सतत हिरवाई पाहूनसुद्धा शीण येईल की काय असं वाटतं.स्वच्छ निळ्याभोर आकाशात विखुरलेल्या कापसासारख्या दिसणाऱ्या छोट्या छोट्या पांढऱ्या शुभ्र ढगांच्या पुंजक्यांआडून डोकावू पाहणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांच्या बॅकड्रॉपवर अतिशय शांतपणे वाहणाऱ्या भीमा आणि घोड नद्या एका वेगळ्याच आत्मिक शांततेची अनुभूती देत रहातात.नजर पडेल तिथे फक्त हिरवीगार शेतं ,झुळझुळतं पाणी आणि फुलांचे ताटवे बस्स..... 











प्रवासाचा योग असला की प्रवास पण कसा अगदी मनासारखा आणि सुखदच घडतो.त्यामुळे कधी नव्हे ते चक्क मुंबईसकट कुठेही ट्रॅफिक न लागता आम्ही वेळेत जुन्नरला पोहोचलो.डॉ.अमोल त्यांच्या फार्मवर स्वागताला तयारच होते.खरं सांगायचं तर जुन्नरला पाहण्यासारखं इतकं काही आहे की जेमतेम दोन दिवसांत नक्की काय आधी पाहावं हे सुद्धा संभ्रमात टाकणारं होतं.पण डॉ.अमोल ह्यांच्याशी केलेल्या वाटाघाटीत आताच्या फेरीत दोन किल्ले आणि नाणेघाट पाहण्यावर आमच्यात आधीच तह झालेला असल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरलेल्या कार्यक्रमानुसार आगाऊ मोर्चेबांधणी करूनच ठेवली होती.तसा शिवनेरी ओळखीचाच पण कधी न ऐकलेल्या हडसर किल्ल्यावर नेमकं काय काय पाहायला मिळेल ह्याबद्दल आम्हा सगळ्यांनाच खूप कुतूहल होतं त्यामुळे शिवनेरीच्याही आधी आम्ही हडसरवर चालून जायचं ठरवलं.सकाळी हडसरच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत गप्प बसलेल्या पावसाला आम्ही चढायला लागल्यावर भलताच सूर गवसला.हडसरवर चढायला शिवनेरीसारख्या रीतसर बांधलेल्या भक्कम पायऱ्या नाहीत त्यामुळे सुरुवातीची वाट शेतांमधला चिखल तुडवत आणि नंतरची दगडाळ वाट पावसामुळे शेवाळ जमून निसरड्या झालेल्या खडकांवरून कसरत करतच पार करावी लागते.पाऊस कधी सौम्य तर कधी तारसप्तकातला स्वर लावतच होता त्यामुळे किल्ला चढायला आमच्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच वेळ लागला.पण मला वाटतं की "शिवाजी" ह्या शब्दातच इतकी कमालीची ऊर्जा आहे की स्वराज्य आणि सुराज्याची  साक्ष देणारा कोणताही गड किंवा किल्ला वय,पाऊस,पाणी अशी कशाचीही तमा न बाळगता चढण्याची एक वेगळीच ऊर्मी आपल्यात संचारलेली असते. असो.. तर सातवाहन,शिलाहार,यादव किंवा बहमनी राजसत्तांच्या काळात कधीतरी ह्या गडाची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे.शहाजी राजांनी १६३६ -३७ च्या दरम्यान मोघालांशी केलेल्या तहामध्ये हा किल्ला गमावला पण शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये तो मोघलांकडून परत मिळवला.त्यानंतर सातत्याने कधी मराठ्यांकडे तर कधी मोघलांकडे असा पाठशिवणीचा खेळ खेळत अखेर १८१८ मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा जुन्नर आणि आसपासचे किल्ले जिंकले तेव्हा २५ एप्रिल १८१८ ला हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.१८१८ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी ह्या किल्ल्याची बऱ्यापैकी नासधूस केली ज्याच्या जखमा आजही हा किल्ला आपल्या अंगावर वागवतो आहे.शिवाजीट्रेल दुर्गसंवर्धन समूहाने स्थानिक तरूणांना हाताशी धरून राबवलेल्या दुर्ग संवर्धन मोहिमेत ह्या गडावरच्या पाण्याच्या कमानी टाकीमधून उपसलेल्या गाळात ज्या तीन तोफा सापडल्या त्याही आपल्याला इथे पाहायला मिळतात.तोफांवर असलेल्या फारसी लिपीतल्या लिखितांवरून त्या तोफा बहमनी राजवटीतल्या असाव्यात असा अदमास बांधायला पुरेसा वाव आहे.ह्या किल्ल्यावरचे बुरुज,धान्य कोठार हे सगळं अतिशय विचारपूर्वक बांधलेलं आहे.किल्ल्यावर एक नैसर्गिक रित्या तयार झालेली गुहा आहे,जी इतकी चिंचोळी आहे की त्याच्या आत फक्त सरपटतच जाता येतं.बाकी निसर्ग त्याची किमया कशी,कुठे आणि कधी दाखवेल ह्याचा नेम नाही,ह्या चिंचोळ्या गुहेच्या मागे सुद्धा एक पाण्याचा साठा आहे.पण ही सगळी माहिती द्यायला सुदैवाने डॉ.अमोल यांच्या "आडवाटा" टीमचे तज्ञ सदस्य सतत आमच्याबरोबर होते म्हणून बरं.नाहीतर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशा गोष्टींचा सुगावा लागणं अशक्यच.


हडसर किल्ल्यावरच्या तोफा

हडसरची मोहीम फत्ते करून आम्ही नाणेघाटाकडे कूच केलं तेव्हा हडसरची रपेट झाल्यामुळे पोटात प्रचंड कावळे कोकलत होते.हडसरकडून नाणेघाटाकडे जात असताना नाणेघाटाच्या थोडं अलीकडे "तालिश" नावाचं एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं रिसॉर्ट लागतं... तालिशचा नुसता फर्स्ट कट पाहूनच आम्ही भाळलो,इथे नक्कीच आपल्याला काहीतरी छानसं पोटात टाकण्यासारखं मिळेल ह्या नुसत्या विचारानेच आम्ही खरंतर सुखावलो होतो.एकीकडे पावसाची संततधार सुरू होती,सगळीकडे धुकंच धुकं दाटलं होतं,वातावरण मस्त गारेगार झालं होतं,अशात अचानक धुकं किंचित सरलं नेमकी तेव्हाच सूर्याची किरणं ढगांआडून डोकावण्याची धडपड करत होती आणि मग ऊन पावसाच्या त्या लपंडावात तालिशवरून निसर्गाचा जो नजारा पाहायला मिळाला ना तो निव्वळ अप्रतिम आणि नेत्रसुखद.अशी निसर्गचित्रं दृष्टीस पडतात तेव्हा माणूस म्हणून निसर्गापुढे असलेल्या आपल्या मर्यादा फार प्रकर्षाने जाणवतात.असो.तालिशने सुद्धा त्यांची जेवणाची वेळ टळून गेलेली असतानासुद्धा आम्हाला अगदी प्रेमाने अतिशय रुचकर जेवण खाऊ घातलं.तालिशचा पाहुणचार झोडून आम्ही नाणेघाटामध्ये असलेल्या लेण्यांकडे आमचे पाय वळवले.नाणेघाट हा अगदी सातवाहनांच्या काळापासून एक प्रमुख व्यापारी मार्ग होता त्यामुळे नाणेघाटात कायमच व्यापाऱ्यांची बरीच ये जा असे.व्यापाराच्या दृष्टीने जुन्नरकडे जाणाऱ्या किंवा जुन्नरकडून खाली मुरबाडकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांना क्षणभर विसावता यावं ह्या उद्देश्याने सातवाहन राजा सातकर्णीची पत्नी नागनिकाने ही लेणी त्यावेळी दगडात कोरून घेतली.त्यामुळे ह्या लेण्यांमध्ये आपल्याला पाली प्राकृत भाषेत ब्राम्ही लिपीत लिहिलेले शिलालेख आढळतात.डॉक्टरांच्या टीममधल्या सिद्धार्थला ब्राम्ही लिपी अवगत असल्यामुळे भिंतीवर लिहिलेली अक्षरं ही,त्या लेण्यांमध्ये आपण कधीकाळी ह्या लेण्यांमध्ये राहून गेल्याची साक्ष म्हणून कोणा लैलामजनूंनी दगडात कोरून ठेवलेली अक्षरं नव्हेत इतकी तरी आमच्या ज्ञानात भर पडली.ह्या नाणेघाटावर लेण्यांकडे जाताना एक मोठा रांजण दिसतो तो आहे तत्कालीन महाराष्ट्रातला पहिला टोल.सत्तेत असलेल्या आपल्या राजकारणी मंडळींनी महामार्गांवर बिनदिक्कत वर्षानुवर्षं टोल आकारण्याची प्रेरणा इथूनच घेतली असावी.अर्थात राणी नागनिकेचा त्यामागचा हेतू त्या जमलेल्या निधीतून रयतेसाठी अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवणं हा होता हा काय तो फरक... 


तालिश रिसॉर्ट


तालिश रिसॉर्ट वरून टिपलेलं निसर्गचित्र




ब्राम्ही लिपीतला शिलालेख

शिलालेख समजावताना ब्राम्ही लिपी तज्ञ सिद्धार्थ







दुसऱ्या दिवशी परतीचा दिवस असल्यामुळे आम्ही सकाळी थोडं लवकरच शिवनेरी चढायला सुरुवात केली.आदल्या दिवशी हडसरची चढाई होऊनसुद्धा प्रदूषणमुक्त हवेचा परिणाम म्हणा किंवा म्हटलं तसं शिवाजी नावातून मिळालेली उसनी ऊर्जा म्हणा थकव्याचा "थ"सुद्धा जाणवला नव्हता. आजही डॉक्टरांनी त्याच्या टीममधल्या दोन सहकाऱ्यांना आमच्यासाठी राखून ठेवलं होतं त्यामुळे गडावरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची वेळोवेळी माहिती मिळणार होती.शिवरायांचा जन्म झाला ते ठिकाण,ज्या शिवाई देवीवरून त्यांचं नाव "शिवाजी"असं ठेवलं गेलं ते शिवाई देवीचं देऊळ हे सगळंच पाहण्याची खूप उत्सुकता होती म्हणून आताच्या जुन्नर वारीत आम्ही किल्ले हाच ठळक मथळा ठेवला होता.संपूर्ण भारतात साधारण बाराशे लेणी आहेत ज्यातली अकराशे लेणी फक्त महाराष्ट्रात आहेत आणि त्या अकराशेपैकी जुन्नर मध्ये साडे तीनशे आणि त्यातही ह्या एकट्या शिवनेरीवर त्या साडे तीनशे लेण्यांपैकी सत्तर लेणी आहेत.हूश्श् !दमले बाई सांगून...पण आहे ना सगळं ऐकायला भारी ? गडावर असलेल्या सातही दरवाज्यांवर आपल्याला वेगवेगळी शरबशिल्पं पाहायला मिळतात.गडावरच्या शिवाईच्या देवळातली देवीची मूर्ती सुद्धा अतिशय प्रसन्न आणि रेखीव आहे.शिवनेरीच्या शिखरावर शहाजीराज्यांच्या राजकीय धामधुमीत संभाजी नंतर चार अपत्यं गमावल्यानंतर जिजाऊंनी "शिवाजी"नामक नररत्नाला जन्म दिला.ती खोली,त्यांचा पाळणा हे सगळं शासनाने अगदी निगुतीने जपून ठेवलंय. नुसता शिवनेरीचा जीर्णोद्धार करण्यात नाही तर शिवजयंतीच्या निमित्त्याने तात्पुरती टेन्ट सिटी वगैरे वसवून पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा कष्ट घेतलेयेत हे विशेष.बाकी हडसरच्या वाटेवरच्या बिबटे पुनर्वसन केंद्राला भेट देता आली नाही तर खट्टू होण्याचं काहीच कारण नाही,शिवनेरीला रात्रीच्या वेळी प्रदक्षिणा घालायला गेलात  तर त्याच्या प्रत्यक्ष भेटीचा अलभ्य लाभ नक्की घेता येईल.ह्या शिवनेरीवरून बाजूच्या सात गडांवर,आजूबाजूच्या सगळ्या परिसरावर बारीक लक्ष ठेवायला टेहळणीसाठी खरंतर भरभक्कम बुरूज आहेत पण महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा हवं तर पण शिवनेरी हा एकमेव किल्ला आहे जो महाराजांना त्यांच्या उभ्या  राजकीय कारकिर्दीत एकदाही परत मिळवता आला नाही. 

 
शिवनेरीचा इतिहास सांगताना "प्रकाश" 






शिवरायांचा पाळणा आणि त्यांचा जन्म झाला ती खोली



डॉ.अमोल आणि त्यांच्या “आडवाटा” चमूचे दोन सहकारी  

आता जुन्नरला आलो आणि मासवाडी खाल्ली नसती तर आमची जुन्नर वारी सफल संपूर्ण होण्यातून राहिली असती.असंही डॉक्टर ,"एकदा तरी आमच्या इथल्या आमंत्रणमध्ये घरगुती मासवाडी खाऊन पहाच !" म्हणून सारखं सारखं सांगत होते त्यामुळे परतीपूर्वीचं जेवण आमंत्रण मध्ये करून मगच परतीच्या वाटेला लागू ह्यावर आमच्या सगळ्यांचंच एकमत झालं होतं.तालिशच्या पार्श्वभूमीवर दिसायला "आमंत्रण"चा चेहरा मोहरा अगदीच सर्वसामान्य.."बाप रे ! इथे जेवायचं",ह्या कल्पनेने मी जरा अवंढाच गिळला पण चेहऱ्यावरून माणसाचे गुण ताडता येत नाहीत हे जसं  खरं आहे तेच झालं "आमंत्रण"च्या बाबतीत.जेवणाच्या बाबतीत "आमंत्रण"ने आम्हाला चारी मुंड्या चित केलं.बेफाट चवीचं पिठलं,दोन हातात सुद्धा मावणार नाही इतक्या जम्बो आकाराच्या गरमगरम बाजरीच्या भाकऱ्या,मस्त खुसखुशीत मासवाडी आणि छान चटकदार वांगी मसाला...अहाहा...निव्वळ स्वर्गसुख....आणि हे सगळं हॉटेल मालकांच्या सौ. , त्यांच्या  सूनबाई आणि मदतीला हाताशी घेतलेल्या गावातल्या सात आठ महिला इतक्या मूठभर फौजेवर चालतं त्यामुळे त्या जेवणाला आत्मा आहे,कुठेही व्यवसायिकीकरणाचा दर्प नाही.त्यातही आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकाला हॉटेलचे मालक स्वतः जातीने लक्ष घालून अगदी आपुलकीने आग्रह करून करून मनापासून खाऊ घालत होते नाहीतर मुंबईत हॉटेल मालक चुकून कधी हॉटेलमध्ये हजर असलेला आढळलाच तर तो फक्त गल्ल्यावर....... येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकांशी यांत्रिकपणे पैशांची देवाणघेवाण करताना.आग्रह करून वाढणं वगैरे तर फार लांबची गोष्ट आहे.त्यामुळे एखाद्या लग्नकार्याला आलेल्या पंक्तीत बसलेल्या पाहुण्यांसारखे गिऱ्हाईकांशी अशी वैयक्तिक पातळीवर भावनिक देवाणघेवाण करणारे हॉटेल मालक ही आमच्यासाठी अपूर्वाई होती.खाऊ घालणाऱ्या रेस्टॉरंट्स ना कुठेच तोटा नसतो पण असं पैशांपलीकडेही गिऱ्हाईकांशी भावनिक बंध तयार करण्याची कला मला वाटतं जुन्नरमधल्या जवळपास सगळ्याच रेस्टॉरंट्समध्ये अगदी आपल्याला अन्न आणून देणाऱ्या वेटरपासून घेऊन ते दस्तुरखुद्द रेस्टॉरंट्सच्या मालकांपर्यंत सगळ्यांना छान अवगत असावी.हृदयाची वाट पोटातून जाते म्हणतात,तसं जुन्नरच्या हॉटेल मालकांना गिऱ्हाईकांची पोटंच नाही तर मनं जिंकणं पण अगदी छान जमतं.जुन्नरमध्ये आम्ही जिथे जिथे उदरभरणासाठी थांबलो त्या सगळ्या ठिकाणचा आमचा अनुभव सारखाच होता,"आतिथ्य"हा शब्दाचा अर्थ जुन्नरकरांना बरोबर कळलाय.एकीकडे घड्याळाची टिकटिक निघायची वेळ झाल्याची जाणीव करून देत होती त्यामुळे जड पोटांनी आम्ही आमंत्रण आणि जुन्नर मधून काढतं पाऊल घेतलंच पण जुन्नर मधून काढतं पाऊल घेताना बरंच काही पाहायचं राहिलंय ह्याची खंतही होती त्यामुळे पुनःश्च जुन्नर नक्की आहे.फक्त कधी इतकाच प्रश्न आहे ....पण तुम्ही जाताय ना जुन्नरला ? डॉक्टरांची टीम वाट पाहतेय…  

माधुरी गोडबोले माईणकर 
३१ ऑगस्ट २०२३


Comments

  1. माधुरी, नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर माहीती दिली आहेस, तुझ्या ओघवत्या शैलीत! आपल्या इतक्या जवळपास असे हिरे असतील ह्याची खरोखरंच कल्पना नव्हती!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता