Skip to main content

Julley लडाख

 Julley(थँक यू) लडाख

आईचं आपल्या सगळ्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं असं म्हणतात पण अपवादाने नियम सिद्ध होतो तसचं काहीसं आहे लडाखचं.म्हणायला लडाखसुद्धा हिमालयाचंच लेकरू,अगदी आता आता २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून नवी ओळख मिळालेला लडाख काश्मीरचा खरंतर सख्खा भाऊ.पण जितकं काश्मीर ट्युलिप्स, केशर, चेरी, अक्रोड, सफरचंद, क्रॅनबेरीज, ब्लू बेरीज,ब्लॅक बेरीज अशा नानाविविध शेलकी फळंफुलं,दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि झरे अशा निसर्गदत्त श्रीमंतीने समृद्ध आहे तितकीच  निसर्गाने लडाखला सावत्र वागणूक दिल्यासारखं वाटतं.त्यामुळे निसर्गसौंदर्याच्या आणि माणसांच्या मनोवृत्तीच्या मामल्यात लडाख काश्मिरच्या बरोबर विरुद्ध.अर्थात हाताची पाच बोटं सारखी नसतात तर मग हिमालयाची ही बोटं म्हणजे लेकरंसुद्धा सारखी कशी असतील.जितकं काश्मीर आपल्या ईशान्येकडच्या राज्यांसारखं निसर्गसंपन्न,हिरवंगार आणि एखाद्या लावण्यवतीसारखं वाटतं तितकंच लडाख रूक्ष,रेताड,उजाड आणि एखाद्या रंग रूपात अंमळ जास्तच डाव्या असलेल्या एखाद्या रांगड्या पुरुषासारखं वाटतं.पण २००९ मध्ये इथल्या सोनम वांगचुक नामक भूमिपुत्राच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत "खुल जा सिमसिम" म्हणत "थ्री इडिएट्स" नावाची एक जादूची छडी ह्या प्रदेशावर फिरली आणि परदेशी पर्यटकांनी नाही तर आपल्या भारतीय पर्यटकांनीच तिथवर उपेक्षित ठेवलेल्या ह्या भूभागाला सोन्याचे दिवस पाहायला मिळाले.२००९ पर्यंत लडाखमध्ये जुलै ऑगस्ट ह्या दोनच महिन्यांपुरती फक्त आणि फक्त परदेशी पर्यटकांची थोडीफार वर्दळ असायची पण आपले भारतीय पर्यटक मात्र लडाखकडे ढुंकून पहात नव्हते असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं.पण २००९ नंतर मात्र "थ्री इडिएट्स"ने लडाखच्या पर्यटनाची चक्र अशी काही वेगाने फिरवली की आज मीतीला मेपासून ते सप्टेंबरपर्यंत अशा अवघ्या चार महिन्यांच्या काळात दर महिन्याला आठ ते नऊ हजार प्रवासी गाड्या लडाखमध्ये फिरतात.अर्थात त्यामुळे बऱ्याच हातांना काम मिळालं हे जरी खरं असलं तरी आधीच नैसर्गिक संपत्तीची वानवा असलेल्या ह्या प्रदेशात पर्यावरणावरचा ताण मात्र प्रचंड वाढला.



मागच्या वर्षी आमच्या काश्मीर सहलीच्या कार्यक्रमातच आम्ही कारगिलचीपर्यंतची सफर घुसडल्यामुळे खडतर झोजिला पासच्या अल्याड आणि पल्याड असलेल्या दोन विरुद्ध भूभागांची काहिशी ओळख झाली होतीच,त्यात द्रासच्या निमित्त्याने लडाखच्या रूक्षपणाची थोडी चुणूकही आम्हाला पाहायला मिळाली होती.लडाखचा तो नजरेतून न सुटणारा रुक्षपणा आणि लडाखच्या समुद्रसपाटीपासूनच्या असलेल्या अतिउंचीचा बऱ्याच मंडळींना झालेल्या तब्येतीच्या त्रासांचे ऐकिवात असलेले वेगवेगळे किस्से ह्यामुळे लडाख पहावं,न पहावं अशा मी द्विधा मनःस्थितीत होते.पण घरातल्या बाकीच्या मंडळींचा उत्साह पहाता शेवटी वय आणि वेळ निघून जाण्यापूर्वी लडाख पाहून घ्यायचं ठरवलंच.सहसा एखाद्या प्रदेशाची सफर करायची ठरवली की मग त्याची असतील नसतील ती सगळी पिसं काढूनच आम्ही परत येतो,पण ह्यावेळी मात्र तसं करताना पावलापावलावर "आपल्याला हे झेपेल ना?" चं एक विचित्र दडपण मनावर होतं.पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते काही उगाच नाही.असं असताना सुद्धा सहलीची अगदी इत्यंभूत रूपरेषा तयार झालीच कारण फक्त पँगॉन्ग पाहून गपगुमाने परत आलो तर ते आम्ही कसे.त्यातून आमच्या "अहों"साठी "AMS म्हणजे काय रे भाऊ?"अशी परिस्थिती त्यामुळे त्याचा जोश टिपेला पोहोचलेला तर AMS शी माझं फारच सख्य असल्याने माझ्या पोटातला गोळा.पण नवऱ्याने भलेही उत्साहाने उड्या मारल्या आणि आपल्या कितीही मनात असलं तरी प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याची परवानगी मिळाली तरच जाता येईल मग कशाला उगाच काळजी करायची,ह्या वृथा  आशेवर "आल इज वेल" म्हणत मी सियाचेन बेस कॅम्प पर्यंत जाण्याची मानसिक तयारी सुरू केली होती. 

सैन्यबळ कितीही कमी असलं आणि शत्रू कितीही मात्तब्बर असला तरी सारथी जर का उत्तम असेल तर युद्धात तुमचा विजय निश्चित असतो ह्याचा दाखला महाभारतात आहेच,त्यामुळे अशी सहल करायची तर नियोजन आणि सारथ्य दोन्ही उत्तमच हवं.मग बऱ्याच झाडाझडती आणि वाटाघाटींनंतर आम्हाला हवा तसा सारथी माझ्या हाताशी लागला,आमचा चालकमित्र " दोरजे ". महिनाभर आधी त्याला थोडेसे आगाऊ पैसे देऊन अडकवून  ठेवलं असलं तरी ठरल्या वारी आणि ठरल्या वेळी तो आम्हाला लेह एरपोर्टवर घ्यायला हजर असेल ना ह्याबद्दल जरा हुरहूर होती.पण बरोबर दोन दिवस आधी मला फ्लाईट डिटेल्स आणि प्लॅकार्डवर लिहिण्यासाठी म्हणून माझं नाव विचारायला दोरजेने जेव्हा स्वतःहूनच फोन केला तेव्हा त्याच्या तत्पर आणि चोख सेवेबद्दल असलेले माझे सगळे किंतु परंतु निकालात निघाले.हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याचा,बारीक मिचकावलेल्या डोळ्यांचा दोरजे ठरल्या दिवशी आणि वेळी आम्हाला विमानतळावर घ्यायला हजर होता.सहलीच्या सुरुवातीलाच दोरजेला मी माझ्या AMS च्या त्रासाबद्दल थोडी कल्पना दिल्यावर आमच्या दहा अकरा दिवसांच्या पूर्ण प्रवासात मी काहीही न सांगता जेव्हा त्याने स्वतःच घाटातून ४० ते ४५ किमी.पेक्षा जास्त वेगाने गाडी हाकली नाही तेव्हा आम्ही किती सुरक्षित हातांमध्ये आमचा जीव सोपवलाय ह्याची ग्वाही आम्हाला मिळाली कारण BRO ची कामं संपूर्ण लडाखमध्ये कितीही जोरदार सुरु असली तरी बरेचसे रस्ते अजूनही कच्चेच आहेत आणि एकंदरीतच लडाखची भौगोलिक परिस्थिती पाहता हिमस्खलन आणि भूस्खलनाला बराच वाव आहे.शिवाय दोरजेची नजर इतकी तीक्ष्ण की कुठे उंच कडेकपारीतून चालणारे ibex,उन्हाळ्याची चाहूल द्यायला बिळातून बाहेर येऊन लपूनछपून गवत चरणारे marmot आणि चीनमधून स्थलांतर करून आलेले black necked cranes , जंगली घोडे, लांडगे ही सगळी मंडळी दोरजेची नजर अगदी बरोबर टिपत होती,त्यामुळे आमची लडाखची जंगल सफारी पण आपोआपच घडत होती. बरं हौशी तरी किती,आम्हाला वाटायचं इतक्या दगड मातीच्या कच्च्या रस्त्यांवर चार पाच तास गाडी हाकून हा दमला असेल तर आता विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी हा ताजा तवाना असलेला बरा,उगाच ताण नको तर आमच्या यादीत नसलेली ठिकाणं सुद्धा हा पठ्ठ्या वीस वीस किलमीटर ज्यादा गाडी चालवून नेऊन नेऊन दाखवायचा,कंटाळा,थकवा जसा त्याला माहीतच नव्हता,आम्हीच पेंदे आहोत की काय असं वाटायचं.बरं तो जेवाखायला गेला असेल आणि आम्ही त्याच्याआधी गाडीपाशी जेवूनखाऊन येऊन थांबलो तर  आम्हाला काही वाटलं नाही तरी त्याला इतकं अपराधी वाटायचं की त्यासाठी तो चार चार वेळा,"सॉरी,मुझे पता नहीं था की आप आ गये होंगे|" म्हणायचा,त्याने त्याच्यापेक्षा जास्त आम्हालाच "उगाच आधी आलो" असं वाटायचं.पण एकंदरीतच सगळी लडाखी लोकं अतिशय समाधानी, मृदुभाषी आणि विनम्र आहेत.दहा बारा  दिवस लडाख मध्ये फिरताना एखाद्या VIP च्या गाड्यांच्या ताफ्यासारख्या इतक्या गाड्या एकामागून एक चालताना आम्ही पाहिल्या, तरी कधी कोणा  दोन ड्रायव्हर्स मध्ये अनावश्यक इगो ड्रायव्हिंग,त्यातून दोन ड्रायव्हर्सचं भांडण,हमरातुमरी,शिवीगाळ किंवा कधी क्वचित अकारण overtaking  साठी अनावश्यक honking आम्ही पाहिलं नाही.सगळे कसे शिस्तीत एकामागून एक चालत राहतात संयम ठेवून,छान वाटतं.असो.

तर लेहमधलं सरधोपट Sightseeing करण्याव्यतिरिक्त आमचा डोळा होता SECMOLवर म्हणजे Students' Educational And Cultural Movement Of Ladakh वर.आजकाल जिथे शहरांमध्ये बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्यासाठी उत्तमातली उत्तम पूर्वप्राथमिक शाळा शोधण्यासाठी पालकांची  धडपड सुरु होते तिथे लेहपासून जवळच असलेल्या Phey नामक उजाड गावात अशी एक शाळा आहे जिथे दहावी नापास असणं हाच मुळी  शाळेत दाखला मिळण्यासाठीचा एकमेव निकष आहे.लडाखच्या दुर्गामातल्या दुर्गम भागांमधल्या, औपचारिक शिक्षण पद्धतीशी पुरेशी ओळख नसल्यामुळे दहावी सुद्धा पार न करू शकलेल्या मूठभर  मुलांना  हाताशी  धरत, त्यांना त्यांचा गमावलेला स्वाभिमान परत मिळवून स्पर्धात्मक जगात आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या सोनम वांगचुक नावाच्या एका ध्येयवेड्या तरुण पदवीधर इंजिनीयरने सुरु केलेली ही छोटीशी चळवळ SECMOL..पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रायोगिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये सृजनशीलता चाळवणं आणि त्यांना स्वतःच्या क्षमता ओळखायला मदत करून कृतिशील आणि स्वावलंबी बनवणं हा ह्या सगळ्या चळवळीमागचा मूळ उद्देश्य.१९८८ साली लावलेल्या SECMOL च्या छोट्याशा रोपट्याचा आज वृक्ष झालाय.अगदी सर्वसामान्य वैज्ञानिक तत्त्वांवर इथल्या राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाची उभारणी केली गेलेली आहे.जगाच्या कानाकोपऱ्यांमधून वेगवेगळी कौशल्यं आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले स्वयंसेवक आळीपाळीने SECMOL मध्ये येऊन विनामूल्य विद्यादान करतात त्यामुळे कृतज्ञता आणि क्षमा ही दोन अतिशय महत्त्वाची जीवनमूल्य सुद्धा मुलांमध्ये आपसूकच रुजवली जातात,जो ह्या शाळेच्या उभारणीचाही आत्मा आहे.सेंद्रिय शेती, गणित, विज्ञान, इंग्रजी, संभाषण कौशल्य, नानाविध खेळ ह्या सगळ्या बाबींमध्ये मुलांवर अतिशय जाणीवपूर्वक मेहनत घेतली जाते.मुलांना आहारशूल्क वगळता कोणतंही शुल्क न आकारता आवश्यक ती कौशल्यं आत्मसात करून  SECMOL तिच्या विद्यार्थ्यांना कोणताही न्यूनगंड न बाळगता जगात मानाने जगायला शिकवते.आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या राष्ट्रीय आईस हॉकी चमूमधले अर्धे खेळाडू हे ह्या शाळेचे आहेत हे विशेष.

SECMOL ची माहिती करून घेताना 
 
हुंडरमध्ये sand dunes साठी वापरले जाणारे अस्वच्छ आणि केविलवाणे दिसणारे दोन मदारीचे ऊंट पाहून त्यांच्यावर बसून सैरसपाटा करण्याची माझी इच्छाच मेली.शिवाय आईला तिच्या मनाविरुद्ध चाबकाच्या धाकावर  पर्यटकांना फिरवण्याची ड्युटी लागल्यावर आईच्या बरोबरीने अनिच्छेने धावणारी तिची लेकरं पाहून तर काळीजच तुटतं.त्यामुळे उंटावरच्या रपेटयाचा बेत आम्ही लागलीच रहित केला.असंही लष्कराची परवानगी मिळाली तर सियाचेन बेस कॅम्पसाठी पुरेशी विश्रांती घेऊन तब्येत आणि ताकद राखून ठेवणं गरजेचं होतं.दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच तयार होऊन आम्ही हॉटेल सोडून बेस कॅम्पची वाट धरली.आर्मीच्या चेकपोस्ट पर्यंत पोहोचेपर्यंत परवानगीची धाकधूक होतीच पण सुदैवाने आकाश  तसं स्वच्छ असल्याने आमच्या तिथपर्यंत जायच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या होत्या.आर्मी चेक पोस्टवर जवानांनी योग्य ती गाडीची आणि आमची उलट तपासणी करून तिथे पोहोचेपर्यंत घ्यायच्या आवश्यक त्या काळजीबद्दल काही सूचना देऊन "जा"म्हटल्यानंतर आम्हाला हायसं वाटलं.ह्या सियाचेन बेस कॅम्पपासून आत तीन दिवसांचा ट्रेक करून पुढे कुमार पोस्टपर्यंत जाता येतं पण त्याला आपल्या सैन्याची विशेष परवानगी लागते.सियाचेन बेस कॅम्पसाठी सुद्धा सरसकट परवानगी दिली जाते असं नाही.ह्या बेस कॅम्पवर ओम प्रकाश बाबा मंदिर आहे.८० च्या दशकात उत्तरी सियाचेन हिमनद्यांच्या भागात मौलाना पोस्ट वर गस्तीसाठी पाठवले गेलेले ओम प्रकाश यांनी एकहाती शत्रूला चित केलं पण त्यानंतर ना ते परत आले ना त्यांचं शव सैन्याच्या हाती लागलं.पण आजही उत्तरी सियाचेन,दक्षिणी सियाचेन आणि मध्य सियाचेनच्या हिमनद्यांमध्ये रात्रंदिवस त्यांची गस्त असते असा जवानांचा विश्वास आहे.येऊ घातलेल्या संकटांची चाहूल ते सैन्याला आगाऊच देतात आणि आणीबाणीच्या प्रसंगी अप्रत्यक्ष रूपात सैन्याला मदतही करतात त्यामुळे आपल्या सैन्यातल्या हुद्द्याचा कोणताही ताठा न ठेवता सीमेवरचे सगळे जवान ह्या ओमप्रकाश बाबांची रोज मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतात.सियाचेनमधली कोणतीही महत्त्वपूर्ण मोहीम ही ह्या ओ.पी.बाबांच्या आशिर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही आणि बाबांचा आशीर्वाद असेल तर "अशक्यही शक्य करतील बाबा(स्वामी)" अशी सीमेवरच्या जवानांची अतिशय दृढ श्रद्धा आहे.आम्ही सियाचेन बेस कॅम्पवर असताना आमच्या  मागोमागच एक कर्नल त्यांच्या काही स्नेह्यांसहित ह्या ओम प्रकाश बाबांच्या देवळात त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले,आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एकदम प्रसन्न आश्चर्यमिश्रित हास्य  जाणवलं कारण फारसे कोणी सामान्य नागरिक ह्या बेस कॅम्पपर्यंत येत नाहीत किंवा काही वेळेस इच्छा असली तरी येऊ शकत नाहीत.त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना तिथे पाहून त्यांना अगदी मनापासून आनंद झालेला त्यांच्या बोलण्यात प्रतीत होत होता.त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून ते २००७ मध्ये त्यांची इथे सियाचेनमध्ये नेमणूक झालेली असतानाचे त्यांना आलेले ओमप्रकाश बाबांचे अनुभवसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला मिळाले."सगळी लोकं नाही येऊ शकत इथपर्यंत पण ओ पी बाबांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही इथवर येऊ शकलात त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या म्हणजे प्रवास सुखरूप पार पडेल," ह्यावर ते ठाम होते.सियाचेन बेस कॅम्प पासून काही किलोमीटर आत एका गुहेमध्ये नैसर्गिक रित्या तयार झालेलं बर्फाचं शिवलिंग आहे जे बाराही महिने गारठ्याने तसच्या तसं राहतं, वितळत नाही,त्याचीही आपले इंदिरा कॉल पर्यंत जाणारे जवान न चुकता पूजा करतात हि माहितीसुद्धा आमची रजा घेण्यापूर्वी त्यांनी पुरवली पण सामान्य नागरिकांना तिथवर जाण्याची परवानगी नाही हे ऐकून आम्ही मनातल्या मनात चुटपुटण्याखेरीज काहीही करू शकत नव्हतो. त्या कर्नलबरोबर आलेले स्नेही  आमच्या समोरच त्यांच्याबरोबर ते शिवलिंग पाहायला पोस्टच्या आत रवाना  झालेले पाहून मात्र आमचा जीव अर्धा झाला.पण इथल्या युद्ध स्मारकावर सियाचेन युद्धाबद्दलची आणि इथल्या भूभागाची पुरेशी सखोल माहिती आपल्याला वाचायला मिळते.सोसाट्याच्या गार  वाऱ्याला न जुमानता ऐटीत फडकणारा तिरंगा इतका सुंदर दिसतो की अभिमानाने आपला ऊर भरून येतो.सियाचेनमधल्या  उणे ४५ डिग्री तापमानाच्या रक्त गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीत आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करायला कटिबद्ध असणाऱ्या आपल्या जवानांना आमचा मानाचा मुजरा देऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.

सियाचेन बेस कॅम्प 




हुन्दरपासून पॅंगॉन्ग दरम्यान बऱ्यापैकी अंतरापर्यंत असलेल्या कच्च्या रस्त्यामुळे आपल्या शरीरात असल्या नसलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या हाडाचा अगदी छान मोफत मसाज होतो.पण असा रस्त्यावरच्या नौकाविहाराचा आनंद घेतल्यानंतर जेव्हा पॅंगॉन्गचा curtain raiser दृष्टीस पडतो ना तो केवळ शब्दातीत ... पँगॉन्गची  निळाई,त्याचा अथांगपणा तिथपर्यंत पोहोचायला झालेले सगळे श्रम आणि त्रास विसरायला आपल्याला भाग पाडतात.आपले दोन डोळे किंवा जगातला अगदी कोणत्याही क्षमतेचा कृत्रिम कॅमेरा त्याचं सौंदर्य टिपायला असमर्थ आहे असं वाटत.जवळपास रोजच वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुष लैंगिक समानता कशी जाणीवपूर्वक राबवून स्त्रियांना सामान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ह्याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांची पोकळ वक्तव्यं वाचायला मिळतात पण लडाखमध्ये मात्र फक्त बोलाची कढी नि बोलाचा भात अशी परिस्थिती नाही.BRO च्या कामांपासून ते गाड्या आणि होम स्टे यशस्वीरीत्या चालविण्यापर्यंत बायका पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात सहभागी झालेल्या दिसतात.आमच्या पँगॉन्गच्या होमस्टेच्या मालकाचं कुटुंब खऱ्याअर्थी स्त्री शक्तीचा जागर करणारं निघालं,होमस्टेचा जेमतेम तिशीतला मालक सोनम वांगचुकच्या शाळेतून तालिम घेऊन बाहेर पडलेला असल्यामुळे तो त्यांच्या बरोबरीने जबाबदार पर्यटन राबवण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ता  म्हणून काम करतो,त्याची बायको केंद्रीय राखीव पोलीस दलात पश्चिम बंगालच्या नक्षलवादी भागात गेले दोन वर्ष पोलीस तुकडीत काम करते आहे,एक बहीण लेह पोलीस दलात नोकरी करते,दुसरी राष्ट्रीय आईस मॅरेथॉन चॅम्पियन आहे आणि तिसरी राष्ट्रीय आईस हॉकी चमूत भारताचं प्रतिनिधित्व करते म्हणजे भौगोलिक दृष्ट्या मागास असलेला हा भाग लोकांच्या मानसिकतेमध्ये मात्र शहरातल्या लोकांपेक्षाही पुढारलेला आणि प्रगत विचारांचा आहे ह्याचा हा सबळ पुरावा.इतकं असूनही सगळ्यांचं विनम्र वागणं मनाला स्पर्शून गेलं.संध्याकाळी त्याच्या आईच्या हातची गरमगरम "छुतई"  खाऊन तर "जी और खुश हो गया".हा "छुतई" पदार्थ दिसायला साधारण सूपी पास्त्यासदृश पण चवीला एकदम वेगळा,कधी लडाखला गेलात तर नक्की चाखून पहा.पण हा तिथल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा फूड जॉईंटवर मिळत नाही,पण कधी होम स्टे मध्ये राहण्याचा विचार केलात तर नक्की चाखायला मिळेल.

तुर्तुक 


थांग 


पँगॉन्ग 

लेहच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्नेयेला आपल्या LAC पासून जेमतेम २० किमी आधी "हानले" नामक मोजक्या कुटुंबाची वस्ती असलेल्या गावात आपली भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे,इथल्या वेधेशाळेने मिळवलेली पूर्ण माहिती सॅटेलाईट द्वारा बंगलोरच्या वेधशाळेकडे सुपूर्त केली जात असल्यामुळे वेधशाळेत तसं फार काही पहायला मिळत नाही.पण ह्या हानलेमधल्या चोवीस बेरोजगार तरूणांना सरकारतर्फे वेधशाळेमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून अवकाश निरीक्षणाचं मोफत  प्रशिक्षण दिलं गेलंय  आणि  डिसेंबर २०२२ मध्ये ह्या प्रशिक्षित तरूणांना १८ दुर्बिणी सुद्धा दिल्या गेल्या आहेत.त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना ह्या तरूणांच्या माध्यमातून रात्री अवकाशनिरीक्षणाचा अनोखा आनंद घेता येतो आणि पर्यटकांमुळे ह्या तरुणांना रोजगार मिळतो.आम्ही पोहोचलो त्या रात्री पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचाच प्रकाश इतका प्रखर होता की तारे धूसर दिसत होते पण जर का बऱ्यापैकी काळोखी रात्र असेल तर रोज आकाशगंगासुद्धा  दुर्बिणीशिवायच डोळ्यांनी पाहता येते इति गावकरी.पण शहाराच्या गजबजाटाने बधिर झालेल्या आमच्यासाठी  लडाखच्या कोण्या एका कोपऱ्यात वसलेल्या हानलेसारख्या बऱ्यापैकी निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या मिट्ट काळोखात आणि नीरव शांततेत तेजस्वी चंद्राला न्याहाळणं हीसुद्धा एक प्रसन्न अनुभूतीच होती.पण अवकाशदर्शनाचा आनंद  घ्यायचा असेल  तर अमावास्येची रात्र गाठणं केव्हाही इष्ट.हानले तसं समुद्रसपाटीपासून ४००० मीटरवर असल्यामुळे थंडीने हातापायांची लाकडंच व्हायची तेवढी बाकी होती.पण " ये तो ट्रेलर था पुरी पिक्चर तो अभी बाकी थी ।" लेह सोडता हानले,पॅंगॉन्ग,त्सोमोरिरी मध्ये रोज रात्री सात ते अकरा इतकाच वीजपुरवठा असतो.त्यामुळे विजेवरचे  उद्योग करायचे असतील तर ते ह्या चार तासांतच करावे लागतात,जसं की कॅमेरा,फोन चार्जिंग आणि अगदी आंघोळी सुद्धा.नळातून येणारं पाणी ऐन मे महिन्यात सुद्धा इतकं कमालीचं थंड की नळाखाली हात धरला तर त्याचा बर्फ होईल की काय अशी परिस्थिती ,त्यामुळे प्रातर्विधी उरकण्याची सुद्धा मारामार .इथली लोकं तर आठवड्यातून एकदाच आंघोळ करतात आणि कपडे धुतात असं बोलता बोलता सहज  होमस्टे चा मालक माहिती पुरवून गेला. "अगर गर्मी में हफ्ते में एक बार नहाते हो तो ठंडी के मौसम में तो दो तीन महीनें नहाते नहीं होंगे ?ह्या आमच्या "अहों"च्या काहीशा कुतूहलमिश्रित टोल्यावर त्याच्या भाबड्या लद्दाखी स्वभावानुसार त्यानेही "नहीं तब भी हम लोग हफ्ते में एक बार नहाते और कपड़े धोते हैं ,ग्रीन हाउस में जा के",असं अगदी प्रांजळपणे उत्तर दिलं.एरव्ही मुंबईतल्या जीवघेण्या उकाड्यात  बाराही महिने दिवसातून दोन वेळा आंघोळींची सवय असणाऱ्या आम्हाला दिवसातून एकदाही आंघोळ न करणं काही पचनी पडेना.त्यामुळे त्याने सगळं सांगून सुद्धा सकाळी आम्ही आंघोळी करण्यासाठी त्याच्याकडे गरम पाणी मागितल्यावर होमस्टेच्या मालकाने आम्ही नुकतेच वेड्याच्या इस्पितळातून  सुटून आल्यागत आमच्याकडे कटाक्ष टाकला.नाश्त्याला उतरलो तेव्हा त्याने कुतूहलाने आम्हाला विचारलं,"आपने  पुरा नहा लिया क्या ?"आता अर्धी मुर्धी आंघोळ कशी करतात ते तोच जाणे पण आमच्या होकारार्थी उत्तरावर,"यहाँ तो आपने पूरा नहा लिया पर त्सोमोरिरी में मत नहाना तबियत  खऱाब हो जाएगी | वहाँ यहाँ से भी ज़्यादा  ठण्ड मिलेगी |"म्हणत त्याने जणू आम्हाला चेतावणीच दिली.त्सोमोरिरीला आम्ही त्याचा अनुभव घेतलाही.अंगात चार आणि पांघरुणाचे दोन थर असे सहा थर असताना सुद्धा दातावर दात आपटेपर्यंत बोचरी थंडी,त्यामुळे प्रचंड कुडकुडत कशीबशी रात्र काढलेले हॉटेलमध्ये उतरलेले  आम्ही सगळे जण लवकरात लवकर त्सोमोरिरीमधून पळ काढण्यासाठी सकाळी साडे सातच्या ठोक्याला न्याहारीला हजर,ते ही चक्क आंघोळींशिवाय.पण निसर्गसौंदर्यात मात्र पँगॉन्ग आणि  त्सोमोरिरी मध्ये चुरसच जणू.सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात त्सोमोरिरीच्या सुंदर निळ्याशार पाण्यावर नाचणाऱ्या सूर्यकिरणांचं सौंदर्य जितकं जमेल तितकं डोळ्यांमध्ये सामावून घेत आम्ही त्सोमोरिरी सोडलं. 

हानले मध्ये दुर्बिणीतून दिसलेला पौर्णिमेचा चंद्र 

हानले मधला मावळतीचा सूर्य 

त्सोमोरिरीवर नाचणारे सूर्यकिरण

बाकी लडाखमध्ये फिरत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे अज्ञानात असलेलं सुख.गंमत आहे ना,माणसाच्या आयुष्यात सुखसोयी आणि समाधान ह्यांचं प्रमाण नेहमी व्यस्त असतं.जितका सुखसोयींशी परिचय कमी तितकं आयुष्य जास्त सुखी आणि समाधानी.पाण्याचं दुर्भिक्ष्य,जेमतेम वीज पुरवठा,इंधनाच्या उपलब्धतेच्या अभावापायी प्रसंगी अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या नियमित पुरवठ्याचीसुद्धा मारामार आणि इंधन नाही त्यामुळे लेह वगळता लडाखमधल्या पँगॉन्ग,त्सोमोरिरी,हानले,चुशुल,सियाचेन बेस कॅम्प जवळची गावं,तुर्तुक,थांग अशा दुर्गम भागांमध्ये अपुऱ्या कसल्या तर जवळजवळ सार्वजनिक दळणवळणाच्या सोयीच नाहीत.असं असतानासुद्धा विनातक्रार आनंदाने खऱ्या अर्थी minimalistic आयुष्य जगणारी अशी ही सगळी  सुखी माणसाचा सदरा घातलेली लद्दाखी माणसं.निरागस हसऱ्या चेहऱ्यांची लाल लाल गालांची लहानथोर मंडळी जेव्हा आपली  त्यांच्याशी काहीही ओळखपाळख नसताना सुद्धा गाडीतून जाताना अगदी हटकून आपल्याला टाटा करतात ना तेव्हा कळतं "सुखं म्हणजे नक्की काय असतं".ईर्षा,स्पर्धा,असूया,हव्यास ह्या सगळ्यांशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेली ही सुखी माणसं नक्कीच आपल्याला अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.

लेह सोडण्याच्या दिवशी आकाशात खूप ढग दाटून आले होते आणि जोराचा गार वाराही सुटला होता त्यामुळे आता कोणत्याही क्षणी बर्फ पडायला सुरूवात होईल की काय असं वाटत होतं.असं ही संपूर्ण ट्रीपमध्ये लडाखमध्ये  खूपदा आभाळ दाटून आलेलं पाहायला मिळालं होतं पण हिमवर्षाव होताना पाहिला मिळाला नव्हता त्यामुळे तेवढी एकच गोष्ट आमची अनुभवायची हुकेल की काय असं वाटत असतानाच परतीच्या दिवशी एअरपोर्टवर पोहोचेपोहोचेपर्यंत हिमवर्षाव व्हायला सुरूवात झालीच.असं म्हणतात की प्रवासाला निघताना किंवा परतताना पाऊस किंवा हिमवर्षाव होणं म्हणजे निसर्गाचा शुभाशीर्वाद.तिथेही निसर्गाने आम्हाला नाराज केलं नाही त्याचा आशीर्वाद दिलाच त्याने आम्हाला आणि मग आपोआपच तोंडातून निघालं ....  
Julley Ladakh for a lifetime transformational experience !


माधुरी गोडबोले माईणकर
१४ मे २०२३









                 












 









Comments

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता