Skip to main content

अजब मुलखाची गजब कहाणी

 अजब मुलखाची गजब कहाणी 

जन्माला येणारा प्रत्येक जण आपापलं नशीब कपाळावर लिहून आलेला असतो,असं किती सहज म्हणून जातो आपण.म्हटलं तर वाचायला आणि वाटायला, एक साधं सरळ सोपं वाक्य.ह्या अशा वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या विधानाच्या मागेसुद्धा वास्तवात काही गर्भितार्थ असेल अशी साधी शंका सुद्धा मनात डोकावत नाही.पण फेसबुकवरच्या एका पोष्टीने मात्र ह्या सत्याचा मागोवा घ्यायला भाग पाडलं.मार्च २०२० मध्ये लॉकडाउन  झाला आणि लोकांमध्ये दडलेल्या सुप्त कलांना जसा ऊत आला.त्या लॉकडाउनच्या काळात जाणो किती हौशी लेखक,कवी,चित्रकार उदयाला आले.तसं आधीही "फेसबुक" नामक मुक्त व्यासपीठ झुक्याच्या कृपेने २००४ पासून अविरत लोकसेवेचे कर्तव्यं अतिशय चोख बजावतंय पण लॉकडाउनच्या कालावधीत हाताशी जरा  जास्तच वेळ असल्याने समाज माध्यमांवर कधीही फारशी  सक्रिय नसलेली आमच्यासारखी  मंडळीसुद्धा  वाचकांच्या रूपाने का होईना बऱ्यापैकी ह्या व्यासपीठावर अवतरली. घरबसल्या  वेगवेगळ्या विषयांवरच्या माझ्या ज्ञानात त्या दिवसांत किती अमूल्य भर पडली हे तर विचारूच नका.फेसबुकवरच्या अशाच वेगवेगळ्या पोष्टी चाळत असताना अपघातानेच एक दिवस "नाडी  ज्योतिषा"विषयी एक पोस्ट तेव्हा माझ्या वाचनात आली होती खरी,पण तो विषय वाचून तिथवरच राहून गेला.अगदी अलीकडे मात्र जेव्हा एका बाईंचा पुन्हा ह्या "नाडीज्योतिषा "वरचा त्यांचा अनुभव सांगणारा  लेख वाचला तेव्हा  ह्या गाडल्या गेलेल्या विषयाने डोक्यात उचल खाल्ली.तसं  "India is all about history and mystery"असं म्हटलं तर खरंच चुकीचं ठरणार नाही.कारण काही गोष्टींचं स्पष्टीकरण हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे, असं म्हणावं लागेल इतक्या त्या अतर्क्य वाटतात.कदाचित हेच कारण असेल की आपला देश अगदी अनादी काळापासून अख्ख्या जगासाठी कायमच  एक कुतूहलाचा विषय राहिलाय. त्यामुळे अशा सगळ्या रहस्यमय आणि गूढ ठिकाणी , जाणो कशी आणि कुठून माहिती काढून ,पण आपल्या देशात  जगातली इतर देशांची मंडळी आपल्या आधी हजेरी लावतात.अशाच काही अजब मुलखांमधलं एक,तामिळनाडूमधलं अतिशय छोटं गाव"वैतीस्वरन कोईल".माणसाच्या गरजा कमी असल्या की आयुष्य किती सुखी असतं ह्याचा जिवंत दाखला देणारं,चेन्नईपासून साधारण अडीचशे किलोमीटर वर वसलेलं हे एक छोटं गाव.गावातली माणसं तर अतिशय साधी आहेतच पण त्यांच्याप्रमाणे त्यांचं राहणीमान सुद्धा साधं आहे.अशा ह्या वैतीश्वर कोईल सारख्या छोट्याशा गावात सुद्धा परदेशी नागरिक अगदी "देश तसा वेष करून" दौऱ्यावर आलेले दिसतात

 


आम्ही जाण्याच्या दोन तीन दिवस आधी पावसाने चेन्नईमध्ये चांगलाच हाहाकार माजवला होता.आधीच दक्षिण भारतात स्वच्छतेचा आनंद त्यात नुकत्याच येऊन गेलेल्या पुराच्या पाण्याने काय अवस्था असेल ह्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आला. शिवाय  नारळ आणि भात ह्यांच्याशी माझं जन्मजात वाकडं.दक्षिण भारताचा दौरा करायचा म्हटलं की आता जेवणात येता जाता नारळ आणि भाताशी तीन चार दिवसांसाठी का होईना मैत्र करावं लागणार हेसुद्धा काहीसं असह्यच वाटत होतं.पण आता सत्याचा छडा तर लावायचा आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी पुढचे तीन दिवस खपवून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता.ह्या वैतीस्वरन कोईलच्या बऱ्याच आख्यायिका आहेत.दक्षिण भारताचं प्रमुख आराध्य दैवत शंकर तसं संपूर्ण दक्षिण भारतात वेगवेगळ्या रूपात आणि भूमिकांमधे भक्तांच्या भेटीस येत असतो पण वैद्याच्या रूपात शंकर ह्या  गावात  स्थित आहे असा समज आहे."वैद्य"+"ईश्वर" मिळून तयार झाला तामिळ भाषेतला शब्द" वैतीश्वरन ".मुख्य देऊळ शंकराचं असलं तरी इथे मंगळाचं सुद्धा देऊळ आहे.ह्या देवळाची उभारणी चोला घराण्याच्या राज्यकर्त्यांच्या काळातच केली गेलीय .आता ह्या देवळाचं नाव वैतीश्वर का पडलं ह्याच मागची कथा सुद्धा फार रंजक आहे. मंगळाला कुष्ठ रोगाची बाधा झाली तेव्हा त्याने शंकराची कडक उपासना केली आणि शंकराने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन इथल्या कुंडाच्या पाण्याने त्याला कुष्ठ रोगातून मुक्ती दिली,तेव्हापासून शंकर इथे वैद्याच्या रूपाने वास करून आहे,अशी इथे येणाऱ्या भाविकांची फार गाढी श्रद्धा आहे.त्यामुळे ह्या देवळाच्या परिसरात असलेल्या जटायू कुंडात बुडकी मारली तर असतील नसतील ते सगळे त्वचेचे आजार नाहीसे होतात असं म्हणतात.


                                                          नवग्रह देवळांपैकी मंगळ देवस्थान 

रावणाशी लढताना धारातीर्थी पडलेल्या जटायुवर राम आणि लक्ष्मणाने ह्या ठिकाणी अंत्यसंस्कार केल्याचं समजलं जातं.म्हणून इथल्या सिद्धअमृतम असलेल्या कुंडाचं नाव पडलं जटायू कुंड. बाकी भारतात बहुतांशी ठिकाणी सगळ्या नवग्रहांचं मिळून एकच देऊळ असतं,पण तामिळनाडू हे भारताच्या नकाशावरचं एकमेव राज्य आहे जिथे नऊ ग्रहांची नऊ वेगळी देवळं आहेत,त्यातलं एक मंगळाचं देऊळ म्हणजे हे वैतीश्वर कोईल.आता ह्या नवग्रहांच्या देवळांमागची कथा सांगायची तर ऋषी कलावा कुष्ठ रोगासहित अजूनही काही आजारांनी गांजलेले होते,तेव्हा त्यांनी नवग्रहांची आराधना केली आणि नवग्रहांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला सगळ्या व्याधींमधून मुक्ती दिली. पण नवग्रहांना देवादिकांचं स्थान नसल्यामुळे त्यांना मानवाला असा कोणताही वर देण्याचे काहीच अधिकार नाहीत असं ब्रह्मदेवांना वाटल्यामुळे त्यांनी संतप्त होऊन नवग्रहांना कुष्ठ रोगाचा शाप देऊन त्यांची पृथ्वीवर हकालपट्टी केली.ब्रह्मदेवाच्या शापाने भयभीत झालेल्या नवग्रहांनी मग शंकराला साकडं घातलं आणि शंकरांनी :शाप म्हणून ह्या वैतीश्वरन कोईलमध्ये सगळ्या नवग्रहांना चिरकालीन अभय दिलं.ह्या नऊ ग्रहांची देवळं कुंभकोणम मध्ये चार आणि नागईपट्टम मध्ये पाच अशी दोन तालुक्यांमध्ये विखुरलेली आहेत.ज्या माणसांना दिर्घायुष्य लाभलेलं आहे त्यांना ह्या नवग्रहांच्या देवळांच्या दर्शनाचा योग येतो अशी मान्यता आहे.असो


                                                          जटायू कुंड (फोटो सौजन्य:गूगल )


तर आता येऊ या मूळ मुद्द्याकडे, ज्याच्या संशोधनार्थ ह्या सहलीचा घाट घातला गेला.ह्या वैतीश्वर कोईलला नाडी ज्योतिषविद्येची परंपरागत देणगी आपल्या ऋषीमुनींकडून लाभलेली आहे.म्हणतात ना की देवाला प्रत्येकाची काळजी असते ते अगदी खरं आहे.ह्या नाडीज्योतिष विद्येवर इथल्या बऱ्याच  कुटुंबांचा  उदरनिर्वाह चालतो.इथे आपल्यालाजागोजागी नाडी ज्योतिषाचार्यांच्या पाट्या वाचायला मिळतात.पण खराखुरा नाडी ज्योतिषी शोधणं तसं अवघडच काम आहे.नाडी म्हणजे भूर्जपत्रं.आपल्या ऋषीमुनींना त्यांच्या  दिव्य योगिक शक्तींनी भूतलावर जन्माला येऊन गेलेल्या,आलेल्या आणि जन्माला येऊ घातलेल्या प्रत्येक माणसाचा भूतकाळ ,भविष्यकाळ ,वर्तमानकाळ  लख्ख दिसत असे असं म्हटलं जातं.प्रत्येक जातकाचा सगळा तपशील आपल्या ऋषींनी अणकुचीदार लेखणीने  वाळलेल्या ताडाच्या पानांवर म्हणजे भूर्जपत्रांवर प्राचीन तामिळ लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे.आता तामिळ लिपीतच का ? तर ह्याचं उत्तर कदाचित तामिळ ही संस्कृतच्याही आधीची प्राचीन भाषा समजली जाते हे असू शकतं,५००० वर्षांपूर्वीच्या जगातल्या आद्य भाषांपैकी एक भाषा आहे तामिळ.नाडी ज्योतिषाची सगळी भूर्जपत्रं अगस्त्य ऋषींनी लिहिलेली  आहेत असं म्हणतात,जी तंजावरच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहेत . ही सगळी पुरातन भूर्जपत्रं नाडी ज्योतिष्यांच्या घराण्यात वारसाहक्काने आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिली गेलेली आहेत.जगात एकूण १०८ प्रकारचे अंगठ्यांचे ठसे आहेत,आणि ह्या ठश्यांच्या प्रकारावरून ह्या सगळ्या भूर्जपत्रांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे.तुम्हाला तुमचं ज्योतिष जाणून घ्यायचं असेल तर स्त्रीच्या डाव्या आणि पुरुषाच्या उजव्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो.शंकराला "अर्धनारीश्वर" असं संबोधलं जातं,ज्यात डावीकडचा  त्याचा अर्धा देह स्त्रीचा आणि उजवीकडचा अर्धा पुरुषाचा आहे,म्हणून स्त्रीच्या डाव्या अंगठ्याचा ठसा आणि पुरुषाच्या  उजव्या अंगठ्याचा ठसा त्या त्या व्यक्तीच्या नावाचं भूर्जपत्र शोधायला वापरला जातो हे त्याचं स्पष्टीकरण.तुमची जन्मतारीख,जन्मवेळ,जन्मदिवस ह्या बद्दल एकही प्रश्न न विचारता फक्त तुमच्या आद्याक्षरांवरून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.विचारलेल्यासगळ्या प्रश्नांची फक्त तुम्ही कोणताही आडपडदा न ठेवता खरीखुरी उत्तरं द्यावीत इतकंच सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित असतं.तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून तुमच्या नावाचं  भूर्जपत्रं शोधलं जातं ,ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास तास दोन तास मोडतात.तुमच्यासाठी लिहिलेलं भूर्ज पत्रं मिळालं नाही तर तुमच्याकडून कोणताच मोबदला घेतला जात नाही हे विशेष.कारण मुळात हे नाडी ज्योतिष हे जन्मवेळेनुसार कुंडली मांडून सांगितलं जात नाही.परमेश्वराने एखाद्याच्या नशिबी जे काही लिहिलेलं आहे, जे अगस्त्य ऋषींना त्यांच्या दिव्यशक्तींनी दिसलं ते त्यांनी तसच्या तसं ह्या भूर्जपत्रांवर लिहिलेलं आहे,जे नाडी ज्योतिषी तुम्हाला वाचून दाखवतात असं सांगितलं जातं.आता मिळालेलं भूर्जपत्र हे तुमचंच आहे ह्याची खातरजमा करण्यासाठी त्या जातकाचं नाव,त्याची जन्मतारीख,जन्मवेळ,त्याच्या आई वडिलांचं नाव,त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी,त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी,त्या जातकाच्या भावंडांची संख्या ह्या संबंधीची त्या भूर्जपत्रावर लिहिलेली माहिती तुम्हाला वाचून दाखवली जाते .त्यांनी सांगितलेली जातकाची वेळ तुमच्या माहितीशी जुळली की  मग  त्यावरून त्या जातकाचं स्वतःचं भविष्य, त्याच्या भावंडांचा वर्तमान आणि भविष्य ,कुटुंबातल्या वर्तमानातल्या अडचणी हे  सगळं अगदी तंतोतंत शोधून  काढलं जातं.तुम्ही पुष्टी केलेल्या जन्मवेळेनुसार त्या जातकाची तामिळ पंचांगानुसार कुंडलीसुद्धा तुम्हाला  मांडून दिली जाते.जे काही घडत होतं ते एखाद्या time machine मधून time ट्रॅव्हल करत असल्यागत भासत होतं.आम्ही जे काही पाहत होतो,ऐकत होतो नुसतंच अविश्वसनीय नव्हतं तर माझ्या सो कॉल्ड विज्ञाननिष्ठ विचारसरणीला आव्हान देणारं होतं. पण काही गोष्टींची कारणमीमांसा विज्ञानाने करता येत नाही हे कधीकधी मान्य करावंच लागतं,कितीही विज्ञानाच्या चौकटीत बसत नसलं तरी जे समोर ऐकत असतो आणि जे घडत असतं ते सत्य आपण नाकारू शकत नाही हेच खरं.ह्या सगळ्याचा पाया  काय,आपल्या ऋषींना अशा कोणत्या दिव्य शक्ती होत्या ज्या आधारावर त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. आपला देश अशा किती अनाकलनीय आणि अकल्पित रहस्यमय सत्यांची जननी आहे हे देवच जाणे.

 

माधुरी गोडबोले माईणकर
२५ नोव्हेंबर २०२२


Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...