ईशान्यरंग (भाग -१)
सफर लामांच्या भूमीची
हिमालय एक व्यसन आहे.जो एकदा हिमालयात फिरायला गेला तो परत परत हिमालयाच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळत राहतो. बरं त्याचे रंग तरी किती म्हणावे.काश्मीर मध्ये तो शृंगारिक दिसतो,हिमाचलमध्ये रांगडा,उत्तराखंड मध्ये सात्विक तर ईशान्येला निसर्गसुंदर.काही वर्षांपूर्वी सैन्यात असलेल्या माझ्या शाळेतल्या वर्गमित्राने फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला,खरंतर त्याने सहज म्हणून तो फोटो पोस्ट केला पण त्या जागेच्या सौंदर्याने मी इतकी मोहून गेले की ती जागा मनात आणि डोक्यात कोरली गेली ती कायमची,भारत चीन सीमेवरचं नितांत सुंदर असं अरुणाचल प्रदेश मधलं तवंग. वीरमरण आलेल्या आपल्या २४२० भारतीय जवानांच्या सांडलेल्या रक्ताने पावन झालेली अशी ही लामांची भूमी,अरुणाचल प्रदेश ...... खूप काही इतिहास आहे तवंगला त्यामुळे लिहिण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखंही बरंच काही,लिहावं तितकं थोडकं.पण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेण्यासारखं जर का काही असेल तर ते आहे १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या अंगावर काटा आणणाऱ्या आपल्या निधड्या छातीच्या जवानांच्या बलिदानाच्या युद्धगाथा..
सूर्याच्या पहिल्यावहिल्या पडणाऱ्या सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघणारा प्रदेश म्हणून ह्याचं नाव पडलं "अरुणाचल प्रदेश".तसं ईशान्य भारतात कुठेही जायचं असेल तर आसाममध्ये आपली पायधूळ झाडून पुढे जाणं केव्हाही सोयीचं असतं,त्यामुळे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तशी आसामची प्रत्येक वेळी थोडी बहुत सफर आपोआपच अपरिहार्यपणे होते. मग आसामला जायचं आणि काझीरंगाला बगल द्यायची हे तर होणे नाही.कधीकाळी ५०,००० च्या संख्येने हयात असणारे गेंडे आज केवळ २४१३ इतकेच शिल्लक आहेत.माणसाची कृपा दुसरं काय... ह्या गेंड्याना अगदी जवळून पाहायचं असेल तर हत्तीची सफारी घेणं केव्हाही इष्ट.वन्य जीवांची फारच आवड असलेली लोकं ह्या हत्तीच्या सफारीव्यतिरिक्त जीप सफारीचा पण आनंद लुटू शकतात.
कधी कोणा स्त्रीच्या रजस्वला होण्याचा पण उत्सव साजरा झालेला ऐकलंय का कधी ? तर त्याचं उत्तर आहे हो.ह्या आसामचं अजून एक चमत्कारिक आणि रोचक असं आकर्षण आहे,नीलांचल पर्वत माथ्यावर असलेलं कामाख्या देवीचं देऊळ. असं मानलं जातं कि दक्ष राजाला आपल्या कन्येचा,सतीचा, शंकराशी विवाह करून द्यायचा नव्हता त्यामुळे त्याने सतीच्या विवाहासाठी आयोजलेल्या यज्ञाचं शंकराला निमंत्रण सुद्धा दिलं नाही पण फक्त आणि फक्त शंकराशी विवाह करण्यास उत्सुक असलेल्या सतीला शंकराचा आपल्या पित्याने केलेला हा अपमान सहन झाला नाही आणि म्हणून सतीने ह्या यज्ञात उडी घेतली.शंकराला जेव्हा हे कळलं तेव्हा तो अतिशय व्यथित झाला आणि दोन्ही हातात सतीला उचलून त्याने तांडव करण्यास सुरुवात केली.शंकराच्या रुद्रावताराने चिंतीत झालेल्या सगळ्या देवांनी विष्णूकडे जेव्हा मदत मागितली तेव्हा विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे १०८ तुकडे केले जे देशातल्या विविध भागांमध्ये पडले, त्यात सतीचा योनीमार्ग इथे पडला.त्यामुळे सतीच्या योनीची पूजा केली जाणारं हे देऊळ म्हणजे सतीचं गर्भगृह आहे असं म्हणतात.१०८ शक्तिपीठांमधलं एक असं हे कामाख्याचं देऊळ जूनमध्ये म्हणजे आषाढ महिन्यात तीन दिवस अंबुवाची मेळा ह्या वार्षिक प्रजननं सोहळ्याच्या निमित्त्याने दर्शनासाठी बंद केलं जातं.अंबुवाची पर्वाच्या तीन दिवसाच्या काळात देवी सती रजस्वला होते अशी आख्यायिका आहे,त्यामुळे भाविकांना प्रवेश निषिद्ध असतो.चौथ्या दिवशी मोठा उत्सव साजरा करून हे देऊळ भाविकांसाठी पुन्हा खुलं केलं जातं.ह्या तीन दिवसांमध्ये तिच्या योनिमार्गातून होणारा रक्तस्त्राव बाजूने वाहणाऱ्या नदीमध्ये वाहून येत असल्यामुळे बह्मपुत्रेचं पाणी सुद्धा त्या तीन दिवसांमध्ये लाल दिसतं असं म्हणतात.आहे ना,ऐकावं ते नवलंच ?
आसाम अरुणाचलच्या सीमेवर असलेल्या पाक्के टायगर रिझर्व्ह मध्ये मोठी अस्वलं,काळे वाघ,उडणाऱ्या खारी असे एक ना अनेक वैविध्यपूर्ण जीव आढळतात.आमच्या ड्रायव्हरने पुरवलेल्या माहितीनुसार ,रात्री बऱ्याच उशिरा जर का कधी आपल्याला ह्या रस्त्याने प्रवास करण्याचा योग आला तर ह्या सगळ्यांशी प्रत्यक्ष रस्त्यातच वार्तालाप करण्याचा अलभ्य लाभ मिळू शकतो.एकदा का आसामची सीमारेषा ओलांडली की संपूर्ण अरुणाचल मध्ये जागोजागी आपल्या सैन्याचा वावर आढळतो.अरुणाचलमध्ये दर थोड्या थोड्या अंतरावर आपले जवान चालवत असलेली छोटेखानी उपहारगृहं ही संपूर्ण प्रवासात स्वच्छ आणि उत्तम न्याहारी मिळण्याची विश्वसनीय सोय आहे. विविधतेमध्ये एकता ह्याचा दाखला म्हणजे ही उपाहारगृहं,इथे शीख रेजिमेंटचे जवान गरमगरम डोसे करून वाढतील तर मराठा लाईट इन्फन्टरीचे जवान मोमोज.पण इथल्या न्याहारीची चव न चाखण्याची चूक मात्र अजिबात करू नका.
मोनपा इथली स्थानिक जमात.मोमोज आणि थुकपा ह्यांचं आपल्याला नाविन्य असलं तरी त्यांच्यासाठी तो दैनंदिनआहार.तसं पाहिलं तर सगळ्या ईशान्य भारताची त्यांची घरी तयार केली जाणारी राईस बिअर ही खासियत पण इथे द्राक्षांपासून नाही तर किवी,सफरचंद ह्या फळांपासून वाईन तयार केली जाते.त्यामुळे जे कोणी सोमरसाचे सच्चे भोक्ते असतील त्यांच्यासाठी इथे पर्वणी आहे.शिवाय इथल्या दऱ्याखोऱ्यांत,पर्वतराजींमध्ये औषधोपयोगी अशा खूप दुर्मिळ वनस्पती आहेत ज्यांची परदेशी बाजारपेठेत किंमत काही वेळेस किलोमागे लाखांमध्ये तर काही वेळेस किलोमागे कोटींमध्ये असते.नानाविध वृक्षवल्लींनी आणि वन्य प्राणिमात्रांच्या जंगलांनी वेढलेल्या,संपन्न अशा ह्या अरुणाचलवर पहिली नजर पडली ती साहजिकच ब्रिटिशांची.त्यांनी पहिल्यांदा ह्या भागाची सीमारेषा निश्चित केली ज्याला आजही मॅकमोहन लाईन असं संबोधलं जातं.मग एकदा का ब्रिटिशांची नजर त्याच्यावर पडली म्हटल्यानंतर निमित्ताला टेकलेला चीनसारखा संधीसाधू देश तर गप्प बसणं केवळ अशक्यच आणि ते निमित्त ठरलं,दलाई लामांचं भारताकडे आश्रय मागणं.१९५१ मध्ये चीनने तिबेट पूर्णपणे काबीज केलं तेव्हापासूनच तिथल्या लामांचे बुरे दिन सुरू झाले होते.पण वारंवार वेगवेगळ्या शकला क्लृप्त्या लढवूनसुद्धा दलाई लामांना बंदी बनवून कायमस्वरूपी तुरुंगात डांबण्यात प्रत्येक वेळी अपयश पदरी आलेला चीन तेव्हा खरा बिथरला जेव्हा १९५९ मध्ये जीवाच्या भीतीने अतिशय बेमालूमपणे सैनिकाच्या वेशात पलायन करून आलेल्या १४व्या दलाई लामांना भारताने आश्रय दिला. १९६२ च्या युद्धाचं रणशिंग तेव्हाच फुंकलं गेलं होतं असं म्हणायला हरकत नाही.पण "हिंदी चिनी भाई भाई"अशा गोड गैरसमजुतीत गाफील असलेल्या भारतावर जेव्हा शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करून चीनने चहू बाजूंनी आक्रमण केलं तेव्हा भारताला चीनने केलेल्या विश्वासघाताची ह्या १९६२ च्या भारत चीन युद्धात २४२० जवानांच्या आहुतीच्या रूपात फार भयंकर किंमत मोजावी लागली.तवंगला पोहोचताना १३७०० फूट उंच असलेल्या घाटाला "सेला पास " हे नाव पडण्यामागे तिचं बलिदान आहे. चीनने भारताशी युद्ध पुकारल्यानंतर जंग गावातल्या सेला आणि नुरा ह्या दोन मुली आपल्या भारतीय सैनिकांना रसद आणि शस्त्रास्त्रं पुरवण्याचं अतिशय जोखमीचं काम करत असत.जंगच्या वरच असलेल्या नुरानंग मध्ये म्हणजे आजच्या जसवंतगढमध्ये दिवस आणि दिवस ऐन बोचऱ्या थंडीत आणि हिमवर्षावात,अन्नपाणी आणि गरम कपड्यांशिवाय अपुऱ्या शस्त्रसाठ्यानिशी सलग ७२ तास एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या ४ गढवाल रायफल्सच्या २२ वर्षांच्या जसवंतसिंग रावतने ३०० चिनी सैनिकांना कंठस्नान घालून नामोहरम करून सोडलं होतं.त्याच्या माऱ्याने पिसाटलेलं चिनी सैन्य जंगपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी नूराच्या वडिलांना नुराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून जसवंतसिंग रावतचा ठावठिकाणा काढून घेतला.नूरा आणि तिच्या वडिलांना ठार केल्यानंतर वर नुरानंग मध्ये चिनी सैनिकांनी निःशस्त्र झालेल्या जसवंतसिंगलाही ठार केलं. जसवंतसिंग ठार झाला असल्याचा अदमास येताच चिनी सैनिकांच्या हातून मरण पत्करण्याऐवजी सेलाने सेला गेट जवळ असलेल्या उंच कड्यावरून उडी मारून आपली प्राणाहुती दिली.त्यामुळे सेला चिरतरुण आहे,ती कधीच म्हातारी होत नाही आणि म्हणून हा १३७०० फुटांवर असलेला सेला पास बाराही महिने बर्फाच्छादित असतो असं मानलं जातं.सेला पास ओलांडून तवंगकडे जाताना ४ गढवाल रायफल्सच्या निधड्या छातीच्या ह्या कोवळ्या जवानाला त्याच्या स्मारकावर आणि तवंगला पोहोचल्यावर तिथल्या युद्ध स्मारकावर जोगिंदर सिंग यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली वाहायला विसरू नका.
महाराष्ट्रात जशी आपल्याला थंडी फारशी माहित नाही तसं अरुणाचलच्या लोकांना उकाडा म्हणजे काय माहित नाही.बाराही महिने इथे हवामान कसं थंडगार असतं,घामाचं साधं एक टिपूस येत नाही.तवंगमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर उणे १७ पर्यंत पारा घसरतो इतका थंडीचा कडाका.खरंतर कडाका हा शब्द सुद्धा त्या थंडीचं वर्णन करायला तोकडा.एप्रिल म्हणजे त्यांच्याकडचा सो कॉल्ड उन्हाळा, जेव्हा तापमान २-३ अंशापर्यंत असतं,त्यामुळे थंडीची पुरेशी ओळख नसलेल्या आपल्याला लघुशंका,दीर्घशंका,आन्हिकं उरकणं म्हणजे एक दिव्यच.त्यातून तवंगमधलं विशेषतः बुमला पासचं ऋतूमान तर दर थोड्या थोड्या वेळाने बदलतं.कधी दाट धुकं तर कधी हिमवर्षाव तर कधी हलकं ऊन.कधी अचानक झालेल्या हिमवृष्टीमुळे रस्ता बंद होईल हे सांगणं कठीण,त्यामुळे तवंगला पोहोचल्या पोहोचल्याच आम्ही बुमला पासला जाण्याची तजवीज केली.बुमला पासला जाताना PTSO लेक,शुंगेस्टर (माधुरी) लेक अशी बरीच निसर्गरम्य ठिकाणं आहेत.अर्थातच धुक्याने पाहायची परवानगी दिली तर.आता आपल्या बॉलीवूड कलाकारांनासुद्धा अशा ठिकाणी येऊन सिनेमाचं शूटिंग करायची काय गरज असते देव जाणे.फरक मात्र हा की त्यांना त्याचे लठ्ठ पैसे मिळतात पण आपल्यासारखे पर्यटक मात्र बोचऱ्या थंडीत स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून अशी ठिकाणं आवर्जून पाहायला जातात.असो. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या "कोयला" सिनेमातल्या एका गाण्याचं शूटिंग ह्या माधुरी लेकवर झालं आणि तेव्हापासून ह्या शुंगेस्टर लेकचं नामकरण "माधुरी लेक"असं झालं.आम्ही माधुरी लेकला पोहोचलो तेव्हा इतकं धुकं की दोन फुटांवरचं काही दिसणं सुद्धा कर्मकठीण.त्यामुळे instagrammable फोटो वगैरे काढणं जवळपास अशक्यच वाटत होतं.शिवाय लेकपाशीच याकसुद्धा मनमुराद हिरवाई चरण्याचा आनंद घेतअसतात.लेकवरच्या माधुरी पॉईंटजवळ अशाच एका याकला चरताना पाहून मी फाजील साहस न करता वेळीच माधुरी पॉईंट वरून जवळच्या आर्मी कॅन्टीनच्या दिशेने नौ दो ग्यारह झाले.तरी त्याला असं आपल्याच धुंदीत शांतपणे गवत चरताना पाहून माझ्या नवऱ्याला मात्र त्याचा अगदी जवळून फोटो काढण्याचा मोह काही आवरता आला नाही.तो त्याचा आता फोटो काढायला जाणार इतक्यात त्या याकने माझ्या नवऱ्याच्या दिशेने तोंड करून एक मोठा हुंकार देत त्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आणि माझ्या नवऱ्याला पळता भुई थोडी झाली.याक हा प्रचंड ताकदीचा प्राणी आणि तो घोड्याइतक्याच वेगाने धावू शकतो,वर कधी शिंग मारेल ह्याचा पण नेम नाही, हे सगळं पाहता त्याने जर का माझ्या नवऱ्याचा पाठलाग करायचं ठरवलं असतं तर माझ्या नवऱ्याचं फोटो काढणं काय किमतीला पडलं असतं ह्याची कल्पना येईल.असो.पण पाहता क्षणी शुंगेस्टर लेकचं हवामान अचानक बदललं,क्षणात धुकं गायब झालं आणि हलकं ऊन पडलं,मग जे दृष्टीस पडलं त्याने डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं.अशा ठिकाणचं सौंदर्य खरंतर डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून अलगद मनाच्या एका कोपऱ्यात घट्ट बंद करून कायमचं ठेवून देण्यासारखं,पण दुर्दैवाने दुधाची तहान ताकावर तसं काळाच्या प्रवाहात ह्या सुंदर आठवणी पुसल्या जाऊ नयेत म्हणून कृत्रिम कॅमेऱ्यात हे सौंदर्य नाईलाजास्तव बंदिस्त करून घ्यावंच लागतं.अशी अगतिकता अरुणाचलमध्ये पावलोपावली जाणवते.
वर १५२०० फुटांवर बुमला पास मध्ये दिवसरात्र डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या जेमतेम २२- २३ वर्षाच्या आपल्या अगदी कोवळ्या सैनिकांना आईच्या भूमिकेतून पाहिलं की जी काही मनात उलथपुलथ होते ती मी शब्दांत मांडू शकणार नाही.महिनोंमहिने आपल्या कुटुंबांपासून लांब,इतक्या दुर्गम ठिकाणी,विषम हवामानात आपल्याशी रक्ताचे कोणतेही लागेबांधे नसताना ही मुलं कशी आपल्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार होतात ह्याचं उत्तर शोधून सापडणं सुद्धा शक्य नाही.तिथल्या एका जवानाला मी सहज विचारलं," कैसे रह लेते हो इतनी ठंड में, वह भी हम जैसे सिव्हिलिअन्स के लिए जिनसें आपका दूरदूर तक कोई नाता भी नहीं होता?". त्यावर तो चटकन उत्तरला ,"यह तो ड्युटी हैं हमारी,सिव्हिलिअन्स में हमारी मॉं बहने नहीं हैं क्या,वैसे आप हो।"त्याक्षणी त्यांच्या ह्या जजब्याला मनोमन सलाम ठोकण्याशिवाय मी काहीही करू शकत नसल्याची हतबलता मात्र काळजात कळ उठवून गेली.सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना एक दिवस जात नसेल की आपण कशाबद्दल तक्रार केली नाही त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाने आयुष्यात किमान एकदा तरी आपले जवान किती खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांची कर्तव्यं चोख बजावतात हे जवळून पाहिलंच पाहिजे.
आमच्या सगळ्या ट्रिपचा highlight म्हणजे सांगेती नदीच्या खोऱ्यात वसलेलं नितांत सुंदर गाव "दिरंग". गाव जरी लहान तरी अगदी नीटस.सांगेती नदीच्या खोऱ्याचं सौंदर्य शब्दातीत आहे ,त्यामुळे ते इथे शब्दांत मांडण्याचा दुबळा प्रयत्न मी करणार नाही.लांबच लांब पसरलेल्या किवीच्या,सफरचंदांच्या आणि संत्रांच्या बागा,शांत वाहणारी सांगेती नदी,वातावरणात तिच्या वाहण्याचा अगदी कळत नकळत असा हलका भरून राहिलेला आवाज,वाऱ्यालाही वाहताना तिथली शांतता भंग पावेल अशी भीती वाटावी इतकी प्रसन्न शांतता."आत्मिक शांतता " ह्या शब्दाची खरी ओळख मला ह्या दिरंग मध्ये झाली.त्यामुळे ह्या "दिरंग"ला फक्त transit halt म्हणून वापरू नका.एक दोन दिवस निवांत इथे घालवा आणि ती सगळी सकारात्मक ऊर्जा बरोबर घेऊन मगच पुढच्या प्रवासाला लागा.
माधुरी गोडबोले माईणकर
१० एप्रिल २०२२
वा, अतिशय सुंदर, informative वर्णन...नेहमीप्रमाणे!👏🏻👏🏻👏🏻
ReplyDeleteखूप छान वर्णन केलं आहेस. नेहेमीच छान लिहितेस.
ReplyDeleteKeep it up
अप्रतिम
ReplyDeleteछान लिहिले आहेस.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Thank you for your flow of words that keeps trhep one on lookout.
ReplyDelete4 GARH RIF is
one of the finest bn of army there
is one real life story ,will mail you.
post is nice and I am sharing to my vault.💯❤️😉
a