Skip to main content

दख्खनचं गतवैभव

 दख्खनचं गतवैभव 

कधी कधी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या गोष्टी अविस्मरणीय आनंद देऊन जातात.दोन वर्षांपूर्वी आम्ही हम्पी बदामीला जाण्यासाठी खूप हाणामाऱ्या केल्या पण काही हाताशी लागलं नाही.हम्पीमधलं एकही हॉटेल आम्हा पामरांना आश्रय द्यायला तयार नव्हतं,शेवटी आम्ही हंपी बदामीचा नाद सोडून दुसरंच ठिकाण शोधून तिथला इतिहास पालथा घातला.मागचे दोन वर्षं कोरोनाने बाकी काही चांगलं काम केलं असेल नसेल पण हौशी पर्यटकांना विनासायास हॉटेल बुकिंग मिळण्याची तजवीज नक्कीच केली. दोन वर्षांपूर्वी जिथे एक हॉटेल आम्हाला थारा द्यायला तयार नव्हतं तिथे ह्यावर्षी ओमिक्रोनच्या आलेल्या नव्या लाटेचा प्रसादच म्हणा ना की आम्हाला म्हणाल त्या हॉटेलमध्ये आम्ही ठरवू तितके दिवस बुकिंग मिळत होतं.आज मितीला कोरोनापूर्व काळात असलेल्या संख्येच्या जेमतेम २० टक्के पर्यटक हंपीमध्ये येत असल्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदारनिर्वाह चालवणाऱ्या स्थानिक लोकांना कोरोनाचा खरंच खूप जबरदस्त फटका बसलाय हैत शंका नाही.एरव्हीच्या पर्यटनाच्या हंगामात जरुरीपेक्षा जास्त गजबजलेली इथली सगळी पर्यटन स्थळं आज बऱ्यापैकी ओस पडलीयत,शिवाय इथे बरीचशी देवळं स्थलदर्शनाचा हिस्सा असल्यामुळे उठूनसुटून नको एवढा फावला वेळ हाताशी असलेले अशा ठिकाणी हुल्लडबाजी करण्याच्या उद्देश्याने येणाऱ्या टवाळखोरांचीही अजिबात डोकेदुखी नाही.त्यामुळे पाहिजे तसा आणि तितका वेळ आपल्याला ह्या सगळ्या पर्यटन स्थळी सध्या घालवता येतोय.सहज म्हणून सुट्टी ठरवायला जावं आणि एरव्ही ठरवून आखून सुद्धा झालं नसतं इतकं सुकर,फारशी आदळआपट न करता आपल्याला हवं तसं मनाप्रमाणे सगळं घडत जावं ह्यासारखं सुख नसतं.अशा सहलीचा आनंद काही औरच... 
 
मुंबईहून साधारण ७५० किमी.वर असलेलं हंपी एक दिवसात स्वतःच्या गाडीने गाठायचं असेल तर भल्या पहाटे निघणं श्रेयस्कर.पण एरव्ही मुंबईच्या दगदगीला उद्वेगलेले आम्ही,आमची कोणतीही सहल फार action packed करायला तयार नसतो मग हाताशी दिवस कितीही असू देत ,सगळं काही सबुरीने मजा घेत फिरणं आणि निवांत सहलीचा आनंद लुटून तणावमुक्त होणं हाच आमचा एकमेव मानस असतो.त्यामुळे एका दिवसात हम्पी गाठण्याचा अट्टाहास न करता आम्ही कोल्हापूरला विश्रांती घेऊन मग पुढची वाट धरायचं ठरवलं.कोल्हापूर माझं असंच अजून एक आवडतं शहर.त्यामुळे कोल्हापुराला अशी आणि इतकी धावती भेट देणं खरंतर आम्हाला फार जीवावर येतं पण ह्यावेळी काही पर्याय नव्हता.कोल्हापूरची स्वतःची अशी वेगळी खाद्यसंस्कृती आहे त्यामुळे जातीवंत खवैय्यांसाठी इथेही खाण्यापिण्याची चंगळ असते हे मी तुम्हाला सांगायला नकोच.शिवाय खुद्द कोल्हापुरात आणि शहराच्या आजूबाजूलाही पाहण्यासारखं बरंच काही आहे,त्यामुळे कोल्हापुरात चार पाच दिवस अगदी निवांतपणे घालवता येतात पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी. असो.तर अनयास थांबलोच आहोत कोल्हापुरात तर कुलदेवी आंबाबाईचं दर्शन करून मग पुढे जावं असा विचार करून आम्ही सकाळी जरा लवकरच उठून E-Plass काढून देवळाकडे निघालो.त्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे कोल्हापुरात सकाळी सकाळी एक वेगळीच चेहलपहल होती.सगळ्या हलवायांच्या दुकानांच्या बाहेर सुंदर केशरी रंगांच्या जिलब्यांचे आणि मऊ लुसलुशीत गुलाबजामचे मोठाले ढीग विकायला रचलेले होते,ते नुसते पाहूनच तोंडाला पाणी सुटत होतं.देवळाच्या आजूबाजूच्या परिसरात असेच ढिगाने विकायला असलेले ताजे नेवाळी, कागडा,मोगरा,अबोलीच्या रंगीबेरंगी फुलांचे गजरे चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होते.त्या सगळ्या फुलांच्या हलका मिश्र सुवासाने देवळाचा आसपासचा परिसर कसा भारून गेला होता.सकाळच्या हलक्या सुखावणाऱ्या गारव्यात आणि कोवळ्या ऊन्हात आंबाबाईचं देऊळच नाही तर अख्खं कोल्हापूर सोनेरी किरणांमध्ये नखशिखांत न्हाऊन निघाल्यासारखं अगदी गोजिरं दिसत होतं.E-Pass काढणं सुद्धा अतिशय सुलभ आणि देवस्थानाचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच चोख असल्यामुळे कोणतीही घाई गर्दी न करता अगदी झटपट पण निवांत दर्शन घेऊन कोल्हापूरचं सकाळचं ते सुंदर रूपडं मनात साठवून घेत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
 
खरंतर हम्पीचा आवाका बऱ्यापैकी मोठा,पण तरी आपण वेचक ठिकाणं पाहायची ठरवली तर फार धावाधाव न करता अगदी आरामात आपल्याला मोजक्या दिवसांत हंपी पाहता येतं.रामायणातल्या वाली, सुग्रीवाची किष्किंधा नगरी आणि राजा कृष्ण देवरायच्या अफाट साम्राज्याची त्यावेळची वैभवशाली राजधानी ... विजयनगरी किंवा पम्पापुरी म्हणजे आजचं हम्पी.हेमकूट,ऋषीमुख,अंजनाद्री आणि मातंग अशा चार डोंगरांच्या कुशीत तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या तत्कालीन विजयनगरी आणि आताच्या हंपीमध्ये आज राजा कृष्णा देवरायच्या महासाम्राज्याचे फक्त भग्नावशेष पाहताना काळजाला घरं पडतात.चहू बाजूंनी मुघलांनी वेढलेल्या विजयनगरीमध्येच नाही तर संपूर्ण दख्खनमध्ये,हिंदवी साम्राज्य टिकवण्यासाठी विजयनगर साम्राज्याचा तत्कालीन सम्राट राजा कृष्णदेवरायाने असंख्य मुघल आक्रमणांना कित्येक वर्षं मोठ्या निकराने एकहाती लढा दिला पण घरचाच भेदी असेल तर होत्याचं नव्हतं व्हायला कसा वेळ लागत नाही ह्याचा आणखी एक दाधांत नमुना म्हणजे हम्पी.




हम्पीच्या युनेस्को हेरिटेज समूहातलं एक,सातव्या शतकातलं विरुपाक्ष मंदिर हा दोड्डा बसप्पांच्या स्थापत्यकला  ,तंत्रज्ञान आणि कुशल बुद्धिमत्तेचा अविष्कार आहे.ह्या विरुपाक्ष मंदिरात चारमुखी ब्रह्मामूर्ती आहे जी पुष्करच्या ब्रह्मा मंदिरानंतर फक्त इथेच पाहायला मिळते.आधुनिक तंत्रज्ञानाची फारशी जोड नसून सुद्धा कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानाचा अतिशय कल्पक उपयोग करून,देवळात शिरता क्षणी आपल्या स्वागताला सज्ज असलेल्या इथल्या दोन गोपुरांची बांधणी केली गेली आहे.शिवाय ह्याच विरुपाक्ष मंदिरात आपल्याला त्यावेळचा पिनहोल कॅमेरा सुद्धा पाहायला मिळतो.सर्वात उंच गोपुरावर पडणाऱ्या प्रकाशकिरणांतून त्याची तयार होणारी ऊर्ध्व प्रतिमा आपल्याला ह्या देवळात फक्त एका विशिष्ट ठिकाणीच पाहायला मिळते.विविध भाज्या फळं वापरून तयार केलेल्या लाल,हिरवा आणि पिवळा ह्या केवळ तीनच नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगवलेली समुद्रमंथनाच्या,रामायण,महाभारतातल्या कथा वर्तवणारी भित्तिचित्रंही ह्या मंदिराच्या छतावर दिसतात.राजा कृष्ण देवरायचं साम्राज्य त्यावेळी फक्त संपूर्ण दख्खन पर्यंत मर्यादीत न राहता ओरिसापर्यंत पसरलेलं असल्यामुळे तिथल्या कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या स्थापत्य शैलीने प्रभावित झालेल्या कृष्ण देवरायाने तसाच दगडी रथ इथल्या विजय विठल्ला मंदिरात साकारण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न केलाय.ह्याच विजय विठ्ठला मंदिरात जवळपास ५६ संगीत स्तंभ (म्युझिकल पिल्लर्स)आहेत,ज्यातून तालवाद्यांपासून घेऊन तंतुवाद्यांपर्यंतचे सगळे ध्वनि निर्माण करता येतात.इथे जवळपास सगळ्याच प्रमुख देवळांच्या बाहेर आपल्याला लांबच्या लांब पडीक अवस्थेमधले त्यावेळचे बाजार दिसतात ज्यात विशिष्ट वस्तूंचाच व्यापार केला जात असे.तसं विरुपाक्ष मंदिराच्या समोरच भग्नावस्थेत उभ्या असलेल्या त्यावेळच्या हम्पी बाजारात उघड्यावर किलोकिलोने हिरेमाणकं विकली जात.भारतातून पूर्वी सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात ते काही चुकीचं नाही.अशा "सोने कि चिडीया" ला लुटण्याचा मोह कोणाला झाला नसता तरच आश्चर्य.जशा दोन्ही मंदिरातल्या देवीदेवतांच्या तशाच इतरही बऱ्याचशा रेखीव शिल्पकृती बहमनी सुलतानाने जाळून उद्ध्वस्त  केलेल्या आढळतात तीच गत इथल्या राजाराणीच्या महालाची आणि इतर वास्तूंची आहे.पुन्हा कधीही त्या दर्जाची कलाकृती उभारता येऊ नये अशा विकृत मानसिकतेतून बहमनी सुलतानाने जमीनदोस्त करू पाहिलेल्या महालाचा आज फक्त पाया शिल्लक आहे पण तरीही राजवाड्याचा विस्तृत परिसर पाहून राजवाड्याच्या भव्य आकारमानाचा अंदाज आपल्याला सहज बांधता येतो.संपूर्ण हंपी मध्ये आपल्याला एकूण नऊ प्रकारच्या स्थापत्य शैलींमधून साकारलेली देवळं,महाल,वेगवेगळ्या शिल्पकृती पाहायला मिळतात जे आपल्याला त्यावेळचं स्थापत्य शास्त्र नुसतंच किती वैविध्यपूर्ण होतं ह्याचीच फक्त नाही तर किती वैज्ञानिक अधिष्ठान असलेलं आणि प्रगत होतं ह्याचीही साक्ष देतात.पण कधी काळच्या इतक्या समृद्ध नगरीत,आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षं उलटल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी गरिबी आढळते,सगळे राष्ट्रीय महामार्ग तर पोटातलं पाणी न हलण्यासारखे आहेत ह्यात शंका नाही तरी केवळ दळणवळणाच्या सार्वजनिक सोयीसुविधा फारशा चांगल्या नसल्यामुळे सगळ्याच नाही तरी बहुतांशी लोकांकडे दाराशी दुचाकी आढळते पण चारचाकी मात्र एखाद्या मंत्र्यासंत्र्याच्या,उच्च सरकारी अधिकाऱ्याच्या किंवा उद्योगपतीच्या बंगल्याबाहेरच फक्त दिसते.. ऊसासारखं  नगदी पीक मुख्यत्वे मोप प्रमाणात घेतलं जाणारं हंपी, त्याचा इतिहास पाहता आज खरतरं किती समृद्ध असायला हवं पण दुर्दैवाने वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.ऊसाच्या व्यतिरिक्त पर्यटन हे सुद्धा हंपी मधल्या लोकांचं अतिशय महत्त्वाचं उपजीविकेचं साधन आहे.हम्पी सारखी युनेस्को हेरिटेज म्हणून प्रमाणित केली गेलेली पर्यटन स्थळं कर्नाटक राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असताना सुद्धा म्हणावी इतकी आणि इतक्या उत्तम दर्जाची स्वच्छ अद्ययावत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स इथे तयार केली गेलेली दिसत नाहीत.त्यामुळे इथे homestays चेच पर्याय जास्त उपलब्ध आहेत.हो पण चांगला homestay हुडकून काढणं जरा जिकिरीचं ठरू शकतं.जिथे आपण मुंबई,पुण्यासारख्या शहरांमधली लोकं रोज महागाईच्या नावाने ओरड करत असतो तिथे हंपीच्या लगतच्या गावांमध्ये आपण फक्त १०० रुपयांत तीन जणं भरपेट न्याहारी करू शकतो हे सत्य कदाचित तिथल्या राहणीमानाचा निर्देशांक म्हणता येईल.पूर्ण दिवसभर हम्पी पालथं घातल्यानंतर जर थोडाबहुत उत्साह राहिलाच तर बाजूच्याच कोप्पळ जिल्ह्यात,केवळ असामान्य शक्ती,सामर्थ्य आणि बुद्धी नाही तर अनन्यसाधारण भक्तीचं सुद्धा द्योतक असलेल्या हनुमंताचं जन्मस्थान असलेल्या अंजनाद्री पर्वताची चढाई आपण करू शकतो.ह्या अंजनाद्री पर्वत माथ्यावरून नजर जाईल तिथे लांबच लांब पसरलेली हिरवीगार भातशेतं आपल्या नजरेला एक वेगळाच सुखद गारवा देऊन जातात.इथल्या मारुतीच्या देवळात रामेश्वर ते लंका जाण्यासाठी प्रभू श्रीरामांनी सेतू बांधणीसाठी वापरलेल्या शिळांमधली एक तरंगती समुद्र शिळासुद्धा ठेवलेली आहे. 





हंपीला जाणारी लोकं बदामीला गेली नाहीत असं होतच नाही सहसा त्यामुळे हंपी म्हटलं की बदामीला भेट देणं ओघानेच येतं.बदामी मधल्या बनशंकरी देऊळ आणि बौद्ध तसंच जैन गुहांव्यतिरिक्त बदामीपासून जवळच पत्तडकल आणि ऐहोले गावांमध्ये चालुक्य आणि होळसाय साम्राज्यकालीन अशाच आणखी दोन युनेस्को हेरिटेज वास्तू आहेत,पत्तडकल मधली राजा विक्रमादित्य २ च्या काळात उभारलेली शिवमंदिरं आणि ऐहोलेचं गजपृष्ठ आकाराचं दुर्गा मंदिर,इतर विष्णू,सूर्य आणि शिवमंदिरं.ह्या व्यतिरिक्त इथे बौद्ध आणि जैन मंदिरं.ह्या सगळ्याच मंदिरांची निर्मिती सातव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळात झाली असल्याचे पुरावे इथे भारतीय पुरातत्त्व विभागाला सापडल्याचं म्हटलं जातं.त्याची पुरेशी माहिती ह्या एहोलेच्या संग्रहालयात वाचायला मिळते. मोघलांची आक्रमणं झेलून मोडकळीस आलेल्या ह्या देवळांचा आपल्या भारतीय पुरातत्त्व विभागाने जीर्णोद्धार करायचा स्तुत्य प्रयत्न केलाय.इथल्या देवळांच्या स्थापत्य शैलीत उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीचा सुंदर मिलाफ जाणवतो.मोडक्या अवस्थेतही ह्या सगळ्या देवळांवर असलेलं नानाविविध शिल्पकृतींचं बऱ्यापैकी शाबूत असलेलं बारीक कोरीव काम आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतं.

शेवटी रामायणातली किष्किंधा नगरीच ती,त्यामुळे हंपी काय किंवा बदामी काय दोन्हीकडे माकडांचा नको इतका उच्छाद जाणवतो.कधी तुमच्याकडून काय हुसकावून घेऊन जातील ह्याचा नेम नाही.बदामीच्या गुहा पाहून परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसून माझा नवरा नुकती गाडी सुरु करणार इतक्यात एका माकडाने आमच्या गाडीच्या साईड mirror वर उडी मारत बसून आमच्या पुढच्या प्रवासासाठी आमचा guide होण्याची तयारी दाखवली.माझ्या नवऱ्याला गाडीच्या  बंद काचेतून बाहेरूनच न्याहाळत ते जणू काही मला पण तुमच्याबरोबर घ्या असंच सांगत होतं.बायकोने कधी टाकला नाही इतका खट्याळ आणि प्रेमळ कटाक्ष माकड त्याच्याकडे टाकत असलेलं पाहून माझा नवरा सुद्धा त्याच्यावर इतका बेहद्द खूष झाला की त्यानेही त्याला guide म्हणून बरोबर घेण्याची तयारी दाखवली.काही केल्या ते माकड त्या mirror वरून हटण्याची तयारी दाखवेना,mirror वरून,गाडीचा टप  ते मागचा spoiler अशा त्याच्या माकडउड्या  सुरूच होत्या त्यामुळे  बाहेर उभं राहून गाडीत बसण्यासाठी तिष्ठत असलेल्या आमची मात्र तिथपर्यंत भीतीने गाळण उडाली होती.शेवटी त्याच्या पाच मिनिटं सुरु असलेल्या ह्या थरार नाट्या नंतर तिथल्या एका स्थानिक माणसाच्या मदतीने कसाबसा आम्ही त्या माकडाचा पिच्छा सोडवला तेव्हा जाऊन आमचा जीव भांड्यात पडला.त्यामुळे sight seeing करत असताना एक डोळा माकडांकडेही ठेवावा लागतो.त्यातही तुमच्या हातात जर का काही खाण्यापिण्याची वस्तू असेल तर मग संपलंच.हम्पी बदमीच्या भेटीचा काहीसा भीतीदायक वाटला तरी हा एक मनोरंजनात्मक पैलू आहे खरा.

उद्याच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं आठवलं,सेल्फीज,इन्स्टा स्टोरीज आणि फेसबुक लाईक्स च्या आभासी प्रेमविश्वात रमणाऱ्या आजच्या तरुणाईला स्वतःचे फोटोज पोस्ट करण्याचा नको इतका सोस आहे,त्याला माझी स्वतःची लेकही अपवाद नाही.पण त्यांचं हा सोस कधी कधी अगदी अनपेक्षित लाभ देऊन जातो.सकाळी सगळं लवकर आवरून रेसॉर्टवरून परतीच्या प्रवासाला निघणार इतक्यात स्वतःचे मनसोक्त फोटो काढून घेण्याच्या इराद्याने तयार होऊन आलेल्या माझ्या लेकीला तिच्या इन्स्टा स्टोरीसाठी फोटो काढून हवे होते.आता निघण्याच्या घाईत हे कसलं खुळ म्हणून माझा नवरा काहीसा वैतागलाच. एरव्ही कमालीचे पेशन्स ठेवत तिच्या पसंतीस उतरतील असे आणि तितके फोटो काढून देणारा तिचा नेहमीचा हक्काचा फोटोग्राफर म्हणजे माझा लेक ह्यावेळच्या ट्रीपला आमच्याबरोबर नसल्यामुळे माझ्या नवऱ्याला फोटो काढण्यासाठी तिने गिऱ्हाईक केलं होतं.रिसॉर्टचा परिसरही फोटोग्राफीला साजेलसा असल्यामुळे तिच्या फोटो काढून घेण्याच्या वेडाला जसं उधाण आलं होतं.नुकताच मॉर्निंग वॉक करून येऊन आपल्या  कॉटेज मध्ये शिरत असलेल्या एका गृहस्थांची नजर त्यांच्यावर पडली आणि अगं,तुला एकदम छान फोटो बाबांकडून काढून घ्यायचे असतील तर आपल्या रिसॉर्टच्या मागच्या बाजूला जा,तिथे तुला तुझ्या फोटोज साठी अतिशय योग्य आणि सुंदर असा बॅकड्रॉप आहे असं सांगत तिचं वेड अजूनच चाळवलं.मग हळूहळू तुम्ही काय करता ,मी काय करतो असं बोलता बोलता सुरु झालेल्या गप्पांच्या ओघात,ते भुवनेश्वरला राहणारे गृहस्थ त्यांच्या बँकेच्या ऑडिटच्या कामानिमित्त गेले आठवडाभर हंपीमध्ये तळ ठोकून असल्याचं कळलं,त्यात नवऱ्याच्या आणि त्यांच्या बँकेमधल्या अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक ओळखींचे बरेच समान धागेदोरे निघाल्यामुळे त्यांच्या दोघांच्या गप्पांना पहाता पहाता भलताच रंग चढला.निघता निघता त्यांनी विचारलं , " इथे आलात ओरिसा पाहायला नाही आलात का कधी?,आमचं ओरिसा पण पाहण्यासारखं आहे,या तिथे सुद्धा.माझा एक स्टुडिओ फ्लॅट आहे तिथे,रिकामाच असतो,त्यामुळे कधी आलात तर हॉटेलमध्ये नका राहू,येण्याआधी फक्त दहा दिवस अगोदर मला फोन करा,मी फ्लॅट तयार करून  ठेवीन,मग माझ्या फ्लॅटवर रहा पाहिजे तितके दिवस ".ह्याला म्हणतात,आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.😀भटकंतीला चटावलेल्या आमच्यासाठी असा प्रस्ताव म्हणजे सोने पें सुहागा. त्यामुळे आता वेध पुढच्या सहलीचे...  


माधुरी गोडबोले माईणकर

१३ फेब्रुवारी २०२२
 

     
 


 
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता