Skip to main content

गंध गुजरातचा (भाग २)

गंध गुजरातचा (भाग २) 

साधारण  तीन चार महिने उलटले की आमच्यासारख्या भटक्यांच्या तळपायाला खरी तर खाजच यायला सुरूवात होते आणि त्यात गेले दोन वर्ष कोरोनाच्या कृपेने तब्बल जवळपास दोन वर्ष आम्हाला भटकंती उपास घडला.म्हणजे तुम्हाला आमच्या दैनेची कल्पना द्यायचीच असेल तर एखाद्या अट्टल बेवड्याचं उदाहरण पुरेसं आहे. त्याला जर त्याचा रोजचा दारूचा रतीब मिळाला नाही तर त्याची जी तगमग होत असेल तशीच काहीशी तगमग आमची ह्या दोन वर्षांत झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे परीक्षा संपण्याचा आणि लॉकडाऊन उघडण्याचाच अवकाश होता की आम्ही पहिली संधी साधून बाहेर पडलोच.हाताशी जर का अगदीच मोजका वेळ असेल तर खाण्यापिण्याची चंगळ आणि अत्यंत सुस्थितीतले रस्ते ह्या दोन प्रमुख कारणांमुळे आपलं "सख्खे शेजारी" राज्यं आमच्यासाठी नेहमीच "गो टू प्लेस "असते.मला अगदी ठळकपणे  आठवतंय,आमच्या लहानपणी गुजरातचा कधीच एक पर्यटन स्थळ म्हणून विचारही होत नसे. पण काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चननं ह्या राज्याचं पर्यटन स्थळ म्हणून ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली आणि रातोरात गुजरातला पर्यटनाच्या दृष्टीने सुगीचे दिवस आले.अमिताभने गुजरातचं ब्रॅण्डिंग करेपर्यंत कोणाला त्या राज्यात इतकं काही प्रेक्षणीय असं काही आहे ह्याचं पुरेसं ज्ञानही नव्हतं,अर्थात त्यात आम्हीही आलोच. पण गिरनारदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदा गुजरातला आमचे पाय लागले आणि तिथून आम्हाला जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा ह्या राज्याला भेट देत जाण्याचं जणू व्यसनच लागलं,इतकं प्रत्येक भेटीत गुजरात आम्हाला नव्या रूपात भेटलंय.त्यामुळे गुजरात भेट ही कायमच आम्हाला बऱ्याच अंगांनी समृद्ध करत आलीय. यंदाच्या दौऱ्याची सुरुवात आम्ही केली अडालजच्या विहिरीने. 





अहमदाबादपासून जवळच असलेल्या गांधीनगरमधल्या अडालज मधली तीव्र पाण्याची टंचाई ओळखून प्रजेची  पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वाघेला साम्राज्याचा सम्राट राणा वीर सिंगने ही विहीर प्रजेच्या कल्याणार्थ बांधायला सुरुवात केली तर खरी पण पुढे शेजारच्या राज्याच्या सुल्तानाशी झालेल्या युद्धात राणा वीरसिंगला वीरमरण आलं.त्याच्या मरणोत्तर त्याची पत्नी रुदाबाई,हिच्यावर जीव जडलेल्या सुल्तान महमूद बेगाडाने रुदाबाईशी विवाह करण्याच्या लालसेने  तिने ठेवलेल्या पूर्वअटीनुसार राणा वीर सिंगच्या स्मरणार्थ  १४९८ मध्ये ही पाच माजली खोल विहीर बांधून पूर्ण केली.नंतर विहिरीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुल्तानाशी विवाह टाळण्यासाठी रुदाबाईने ह्याच विहिरीत स्वतःला जलसमाधी दिली.त्यामुळे संपूर्ण विहीरीच्या बांधकामात भारतीय आणि मुगल स्थापत्य शैलीचा अतिशय सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.विहिरीची बांधणी आणि संरचना अशा पद्धतीने केली गेली आहे की विहिरीच्या आतलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जवळपास ६ अंशाने कमी असतं.बांधणी पूर्ण झाल्यावर उभ्या कालखंडात पुन्हा कधीही इतक्या उत्तम दर्जाची कलाकृती निर्माण केली जाऊ नये ह्या उद्द्येश्याने सुलतानाने ज्या सहा गवंड्यांनी ह्या विहिरींची बांधणी आणि शिल्पकला घडवली त्यांची निर्मम हत्या केली,त्यांची थडगी सुद्धा ह्याच विहिरीच्या वर आपल्याला पाहायला मिळतात.  




अहमदाबादला गेला आणि अक्षरधामला गेला नाही असा माणूस विरळा.दिल्लीचं अक्षरधाम जरी पहिलं अतिशय भव्य आणि मूळ अक्षरधाम मंदिरअसलं तरी २००२ सालच्या अहमदाबादच्या अक्षरधामवरच्या अतिरेकी हल्ल्याने एक कायमची भळभळणारी जखम सगळ्याच भारतीयांच्या मनावर दिली आणि त्यामुळे आज अक्षरधाम म्हटलं की दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरापेक्षा अहमदाबादचं अक्षरधाम मंदिरच सगळ्यांच्या जास्त प्रकर्षाने लक्षात राहिलंय हे कटू सत्य नाकारता येत नाही. खरंतर आज त्या अतिरेकी हल्ल्याचा  खुद्द अक्षरधाममध्ये मागमूसही नाही तरी अलीकडेच O.T.T. वर प्रसारित झालेल्या "The Seige" सारख्या काही वेब सिरीजनी आणि "पी.एम.नरेंद्र मोदी"सारख्या चित्रपटांनी त्या दुःखद आठवणी ताज्या केल्यायत.असो.अतिशय शांत आणि स्वच्छ असा परिसर,मंत्रोच्चारांनी हलकं असं भारलेलं मंगल वातावरण आणि तितकीच मनोहारी स्वामी नारायणाच्या मूर्तीबरोबरच इतर देवीदेवतांच्या मूर्ती पाहून चित्तवृत्ती प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.अशा मनोहारी स्वामी नारायणाच्या दर्शनानंतर  अतिशय माफक खर्चात आणि सात्विक अशी क्षुधाशांती करण्यासाठी अक्षरधाम मंदिर हा उत्तम पर्याय आहे.क्षुधाशांती तर झाली मग अहमदाबादमध्ये आहात आणि तुमच्या स्त्रीसुलभ प्रवृत्तीनुसार तुम्ही माणेक चौकमध्ये शॉपिंगचा आनंद लुटला नाहीत तर मग तुमची ट्रिप वायाच गेली म्हणायची. त्यातही आम्ही अगदी नवरात्राच्या तोंडावरच माणेक चौकमध्ये फिरत असल्यामुळे रंगीबेरंगी घागरे चोळ्या,त्याला साजेलशा अशा वेगवेगळ्या रंगरूपाच्या,आकाराच्या आणि धाटणीच्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीने आणि लोकांच्या खरेदीच्या उत्साहाने माणेक चौक कसा नुसता फुलून गेला होता.तुम्ही काहीही खरेदी करा अथवा नका करू,माणेक चौक मध्ये फिरणं हा एक आगळावेगळा अनुभव आहे हे नक्की. 

अहमदाबादपासून साधारण ८५ किमी.अंतरावरअहमदाबादच्या धोलका तालुक्यात लोथल गावामध्ये इसवीसन पूर्व २२०० वर्षाच्या काळातलं सिंधू खोऱ्यातल्या हडप्पा संस्कृतीमध्ये वसवल्या गेलेल्या शहराचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात.आपल्या भारतीय पुरातत्त्व विभागाने १९५५ ते १९६० च्या दरम्यान उत्खनन करून ह्या शहराचे गाडले गेलेले अवशेष बाहेर काढले,त्याव्यतिरिक्त उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह देखील बाजूलाच असलेल्या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतो.लोथल हे त्या काळातलं पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडांना मौल्यवान जडजवाहीर आणि दागदागिने पुरवणारं अतिशय प्रमुख असं व्यापारी केंद्र होतं.कोणत्याही प्रगत यंत्रांची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत नसताना आपल्याआदीमानवांनी उभारलेल्या ह्या व्यापारी शहराची स्थापत्यरचना आणि व्यापारासाठी वापरली जाणारी अवजारं आपल्याला थक्क करून सोडतात. 




भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आणि स्वतंत्र भारताच्या एकीकरणात महात्मा गांधींइतकीच किंबहुना कदाचित जास्तच महत्त्वाची भूमिका अत्यंत निरपेक्षपणे जर कोणी बजावली असेल  तर ते आहेत आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि " भारताचे पोलादी पुरुष " असा लौकिक मिळवलेले सरदार वल्लभभाई पटेल.३१ ऑक्टोबर १८७५ ला नडियाद जिल्ह्यातल्या खेडा तालुक्यात करमसाद नावाच्या एका छोट्याशा गावात झवेरभाई आणि लाडबाबाई पटेलांच्या पोटी ह्या भारतरत्नाचा जन्म झाला.आणंद मध्ये उभारल्या गेलेल्या त्यांच्या स्मारकापासून अगदी जवळच आजही गुजरात सरकारने त्यांचा यथोचित मान राखून त्यांचं लहानपण सरलेली करमसाद मधली त्यांची वस्तू निगुतीने जपलीय.ह्या वास्तूत त्यांचा संपूर्ण वैयक्तिक आणि राजकीय जीवनपट छायाचित्रांच्या माध्यमातून आणि तिथे दाखवल्या जाणाऱ्या एका माहितीपटाच्या माध्यमातून उलगडून दाखवलेला आहे.  

त्यांच्या प्रखर देशभक्तीची आणि देशाप्रती त्यांच्या कळकळीची ओळख आहे, आजचा आपला अखंड भारत.त्यांच्या ह्या अत्युच्च कामगिरीला शोभेल अशी आदरांजली म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या १४३ व्या जयंतीचं औचित्य साधत ३१ ऑक्टोबर २०१८ ला त्यांचं १८२ मी. उंचीचं पूर्णाकृती शिल्प "Statue Of Unity" लोकापर्ण केलं तेव्हापासून त्याला भेट देण्याची संधी हुकल्याची रुखरुख आमच्या मनात होती.त्यामुळे ह्यावेळच्या वारीचा साहजिकच ठळक मथळा होता -"Statue Of Unity"ची भेट. "ताश्कन्द फाइल्स" चित्रपटात म्हटल्याप्रमाणे भारताची ओळख जितकी "गांधींचा" देश अशी आहे तितकीच खरं तर "लालबहादूर शास्त्री,वल्लभभाई पटेल आणि टिळक सावरकरांचा देश"अशीही नक्कीच आहे,पण ह्या स्वातंत्र्यसेनानींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं अमूल्य योगदान,त्यांची देशभक्ती,राजकीय द्रष्टेपणा काहीसं  इतिहासजमा झाल्यासारखंच होतं.तसं पाहिलं तर सरदार पटेलांनी १९१८ ला खेड्यात पडलेल्या  भीषण दुष्काळानंतर ब्रिटिश सरकारविरुद्ध तिथल्या शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या "शून्य कर"आंदोलनापासून  घेऊन ते त्यांनी दुधाला वाजवी भाव मिळवून देण्याच्या उद्देश्याने पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या सहकारी दुग्धचळवळीपर्यंत आणन्दने वल्लभभाईंच्या अस्तित्त्वाची,सामाजिक कार्याची आणि त्यांच्या देशाप्रती निष्ठेची ओळख नुसत्या "अमूल "च्याच रूपाने नाही तर अजूनही बऱ्याच रूपात जपलीय,हे आणन्द मध्ये फिरताना पावलोपावली जाणवतं.पण त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचं काम "अमूल "नंतर ह्या "Statue Of Unity" च्या उभारणीने केलंय. 





सरदार पटेलांनी अथक परिश्रमांनी लहान मोठ्या अशा तब्बल ५६२ संस्थानांचं स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून सत्यात  साकारलेल्या  स्वतंत्र आणि अखंड भारताच्या स्वप्नाचं  द्योतक आहे"Statue Of  Unity". "Statue Of Unity "चं अनावरण झालं त्यावेळी त्या शिल्पाच्या रेखीवपणावर,त्यावर झालेल्या खर्चावर वर्तमानपत्रांनी आणि काही समाजकंटकांनी बरीच झोड उठवली होती पण त्याच्या उभारणीमागचा उद्देश्य जर का तिथे चालवल्या जणाऱ्या माहितीपटातून  आपण समजून घेतला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपोआपच आपल्याला सापडतात.ह्या स्मारकाच्या बांधणीच्या निमित्त्याने उभारल्या गेलेल्या  नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर धरणामुळे आज त्या भूभागाचं सर्वांगी संवर्धन करणं शक्य झालंय.गुजरात सरकारला केवळ भारतीयच नाही तर विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या परकीय चलनामुळे अर्थार्जनाचा एक आयाम तर सापडलाच पण केवडीयासारख्या छोट्याशा गावाला  आणि ह्या निर्मितीमुळे पर्यटनाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या रोजगारातून लाखो कुटुंबांना पुनरुज्जीवनच मिळालंय हे मान्य करावं लागेल. उभारणीमध्ये खर्च होणाऱ्या पैशाचा जास्तीत जास्त विनियोग केला जाईल ह्याकडे फार बारकाईने लक्ष दिलं गेलंय आणि व्यवस्थापनही अतिशय चोख आहे.संपूर्ण प्रकल्पाची आखणी ते बांधणी फक्त ४६ महिन्यांच्या विक्रमी अवधीत पूर्ण केली गेलीय.संध्याकाळी लेसर शो मध्ये सरदारांचा जीवनपट पाहताना मला सरदार पटेल कोणत्याही अंगाने,आपलं संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या नावे करून शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या रक्षणासाठी सीमारेषेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांपेक्षा वेगळे वाटले नाहीत, परिस्थितींचे संदर्भ फक्त वेगळे होते इतकंच.राहून राहून कवी कुसुमाग्रजांच्या ओळीच मनात रुंजी घालत होत्या .... 

बर्फाचे तट पेटुनी उठले,सदन शिवाचे कोसळले 
रक्त आपुल्या प्रिय आईचे,शुभ्र हिमावर ओघळते.. 
कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागतसे... 
पिवळे जहरी सर्प ठेचणे,अन्य मना व्यवधान नसे 
एक प्रतिज्ञा विजय मिळे तो,राहील रण हे धगधगते 
रक्त आपुल्या प्रिय आईचे ,शुभ्र हिमावरओघळते 


माधुरी गोडबोले माईणकर 
१९ ऑक्टोबर २०२१


Comments

  1. खुप छान वर्णन केलाय! इतिहास ही दिलेला आहे! Inspirational!

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणे छान वर्णन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता