गण गण गणांत बोते
काही गोष्टींचा योगच असावा लागतो असं मला फार राहून राहून वाटतं.विशेषतः देवदर्शनाच्या बाबतीत.आपण जायचं ठरवावं आणि सगळं मनासारखं म्हणजे योजल्याप्रमाणे घडत जावं असं फार वेळा होत नाही.त्यातून सध्याच्या बिकट परिस्थितीत प्रवास करायचं धाडस करणं म्हणजे धोक्याची घंटा.खरंतर मी आणि माझा नवरा फार आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही.देवाचं मूर्तरूप आम्हाला तितकंसं मान्य नसलं तरी एक दिव्य शक्ती किंवा ऊर्जा म्हणून त्याचं अमूर्तरूप आम्हाला भावतं.त्यामुळे फार नाही तरी क्वचित अध्येमध्ये आम्हाला असे देवदर्शनाचे झटके येत असतात.आम्हाला वावगं असतं ते फक्त दोनच गोष्टींचं आपल्याकडच्या देवस्थानांचं पावित्र्य अबाधित न ठेवणाऱ्या देवस्थानांमध्ये चालणाऱ्या व्यावसायिकिकरणाचं आणि देवस्थानाच्या ठिकाणच्या व आजूबाजूच्या परिसरातल्या कमालीच्या अस्वच्छतेचं.ह्या दोन गोष्टींमुळे देवस्थानांचं मांगल्यच हरवून जातं. देवस्थानं आणि स्वच्छता ह्यांचा सर्वसाधारणपणे एकमेकांशी छत्तीसचा आकडा.
मागच्या वर्षीपासून कारंज्याला जायचं खूप मनात होतं पण काही ना काही आडवं येत होतं. पण सध्या समाज माध्यमांवर फिरणारी शेगाव संस्थांनाच्या कोरोना व्यवस्थेबद्दलची पोस्ट माझ्यात कारंज्याला जाण्याची ऊर्मी पुन्हा जागी करायला पुरेशी होती.शेगाव आणि कारंजा अगदी नाही तरी तसं जवळच. याआधी तीन चार वेळा माझं शेगावला जाणं झालंय त्यामुळे माझ्या स्मरणात होतं ते फारे वर्षांपूर्वीचं म्हणजे जवळपास सतरा वर्षांपूर्वीचं शेगाव,स्वच्छतेशी तसा फारसा संबंध नसलेलं, देवस्थानाच्या आवाराच्या आजूबाजूला तर कमालीची गरीबी.म्हणूनच कदाचित इतके वर्षांत शेगावला जाण्याचा विचार कधी फार हिरीरीने माझ्या मनात डोकावला नसावा.एक पाऊल पुढे तर एक मागे अशी अवस्था.पण पोस्टमधलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज संस्थानाने केलेलं चोख व्यवस्थापन मी पाहिलेल्या पूर्वीच्या शेगावशी पूर्ण विसंगत तर होतच पण तितकंच सुरक्षिततेच्या बाबतीत अश्वस्थ करणारं सुद्धा होतं.मन काही केल्या स्वस्थ बसेना म्हणून मग शेवटी खूप धीर करून माझ्या शेगाव कारंज्याच्या मनसुब्याला आम्ही आकार द्यायचं ठरवलं,तेही अगदी अचानकच.खूपच शॉर्ट नोटीस वर लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिट्स मिळणं म्हणजे कर्मकठीण.पण इच्छाशक्ती दांडगी असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या वाटा आपोआप तयार होत जातात हेच खरं. शेगाव - नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या बारमाही भरून भरून जात असतात.त्यामुळे प्रवासाच्या अगदी दोन दिवस आधी तिकिटांची विनासायास व्यवस्था होणं थोडं अशक्यप्रायच होतं आणि झालंही तसंच.आम्ही झटापट करत होतो पण अपेक्षेप्रमाणे निराशा पदरी आली मग शेवटी तात्काळ सेवेत का होईना काही व्यवस्था होतेय का ते पहायला म्हणून काहीशा अनुत्साहानेच भारतीय रेल्वेच्या वेबसाईट वर तपासून पाहिलं तर काय आश्चर्य आम्हाला हव्या होत्या तशा शेवटच्या राहिलेल्या बरोबर दोन सीट्स आम्हाला मिळाल्या.पण तरीही परतीच्या प्रवासाची व्यवस्था झाल्याशिवाय सगळं व्यर्थच होतं . म्हणजे अजून एक अडथळा पार करायचा बाकी होताच. शेवटी आम्हाला सोयीच्या गाडीची नाही तरी नागपूरपासून का होईना तिकिटांची व्यवस्था होताना दिसल्याबरोबर आम्ही शेगावहून परतीचा प्रवास करण्याऐवजी लागलीच नागपूरची तिकिटं पदरात पडून घेतली.काहीही ध्यानीमनी नसताना आता आमची नागपूर वारीही होणार होती.नाही तर मुद्दाम उठून नागपूरला जाण्याचा विचार आम्ही कदाचित कधी केला नसता.
एरव्ही वर्षभर रोज संस्थानाच्या वेगवेगळ्या भक्तनिवासांपासून घेऊन शेगाव स्टेशनमार्गे महाराजांच्या मंदिरापर्यंत दर थोड्या थोड्या वेळाने संस्थानाची नियमित बससेवा उपलब्ध असते पण सध्या कोरोना संसर्गामुळे ती बंद ठेवलेली आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्यामुळे भल्या पहाटे गाडी शेगावात पोहोचेल तेव्हा भक्तनिवासपर्यंत जाण्याची सोय कशी करावी हाही प्रश्न होताच.आम्ही शेगावात पाऊल टाकलं त्याच्या नुकत्या आदल्याच दिवशी संस्थानाने त्यांची बस सेवा रुजू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उरलेसुरले सगळेच प्रश्न निकालात निघाले. हे सगळं कळल्यावर तर मला तेव्हा "ओम शांती ओम"सिनेमातला शाहरुख खानचा डायलॉगचं फक्त प्रकर्षाने आठवत होता,"अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी क़ायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं | "😃 म्हटलं ना, एक दिव्य शक्ती किंवा ऊर्जा म्हणून त्याच्या अमूर्त अस्तित्वाची त्याने कायमच आम्हाला अडीअडचणींच्या वेळी प्रचिती दिलीय. मग कधी आम्हाला तो कोणा स्वतःहून मदतीला धावून येणाऱ्या अनोळखी निःस्वार्थी व्यक्तींच्या रूपाने भेटतो तर कधी चांगल्या स्नेह्यांच्या रूपात तर कधी फक्त तो आम्हाला अलगद उचलून घेऊन चालत रहातो आणि मग चालताना फक्त त्याचीच पावलं आम्हाला दिसत रहातात. असो.
पहाटे शेगावच्या अतिशय स्वच्छ रेल्वे फलाटावर उतरल्यापासूनच संस्थानाच्या एकूण कोरोना संसर्गाच्या जागरूकतेबद्दलची ओळख पटायला सुरूवात होते.भक्तनिवासावर पोहोचल्यावर तर आपण एखाद्या देवस्थानाच्या भक्तनिवासावर आलोय की पंचतारांकीत रिसॉर्टवर असा प्रश्न पडावा.भक्तनिवासाचा परिसर भव्य तर आहेच पण स्वच्छ तरी किती असावा, कोरोनाची शिरकाव करण्याची तर सोडाच पण झाडाच्या एखाद्या पानाची सुद्धा इथे गळून पडून परिसर अस्वच्छ करण्याची बिशाद नाही इतका.भक्तनिवासाच्या खोलीवरच्या पलंगांवर अंथरलेल्या पांढऱ्या स्वच्छ चादरी आणि तितकीच स्वच्छ पांघरुणं पाहून उगाचच इतक्या वर्षांपूर्वीची संस्थानाची प्रतिमा मनात जोंबाळून साशंक झाल्याबद्दल मनातल्या मनात मी फार खजील झाले.त्यावेळी हे संस्थान फार सधन नव्हतं पण तरी तेव्हाही ह्या संस्थानाचा गावातल्या नानाविध सामाजिक कार्यांमध्ये,उपक्रमांमध्ये आणि गावाच्या एकूणच उन्नतीमध्ये सक्रिय सहभाग असे.आता तर संपूर्ण शेगावच संस्थानाने दत्तक घेतल्यात जमा आहे.पाण्याचं अफाट दुर्भिक्ष्य असलेल्या विदर्भासारख्या ठिकाणी शेगावने मागच्या काही वर्षांमध्ये केलेली ही प्रगती हेलावून टाकणारी होती.
लिफ्टमधून जाता येता केनेजीचं जगविख्यात "Breathless" चे instrumental सूर तर भक्तनिवासाच्या अंगणात गायत्री मंत्राचे instrumental सूर कानांवर पडल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात बहारदार आणि प्रसन्न नाही झाली तरच आश्चर्य,नाही का ? पूर्वी जरी आपल्याकडच्या सरसकट धावणाऱ्या एस.टी. च्या लाल डब्यांसारख्या संस्थानाच्या बसेस असत तरी आता मात्र अतिशय सुसज्ज टाटा बसेस सारख्या बसेस,शेगाव स्टेशनमार्गे भक्तनिवास ते देऊळ अशा पहाटे चार वाजल्यापासून दर तासाला भक्तांच्या सोयीसाठी विनामूल्य फेऱ्या करत राहतात. पण आम्हाला मिळणारे आश्चर्याचे सुखद धक्के अजून संपले नव्हते.येणा जाणाऱ्या प्रत्येकाला "माऊली" म्हणून संबोधणारे पांढऱ्या स्वच्छ कडक इस्त्री केलेल्या गणवेशातील आणि भक्तांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले आत्यंतिक विनम्र आणि अगत्यशील सेवेकरी,आजच्या अक्राळविक्राळ महागाईच्या काळातही संस्थांनात साधारण २० व्या शतकाच्या सुरूवातीला असतील इतक्या किरकोळ दरात भक्तांसाठी केली गेलेली चहा नाश्त्याची आणि जेवणाची अतिशय स्वच्छ आणि उत्तम व्यवस्था,उत्तम तरीही विनामूल्य बससेवा आणि अत्यंत माफक दरात भक्तांना उतरण्यासाठी उपलब्ध केलेल्या स्वच्छ खोल्या, किती आणि काय काय करावं एखाद्या संस्थानाने त्यांच्या भक्तांसाठी." गण गण गणात बोते " म्हणजे मी प्रत्येक व्यक्तीत आहे, हा महाराजांचा मंत्र संस्थानातील प्रत्येक सेवेकरी क्षणाक्षणाला शब्दशः जगतो इतका निरपेक्ष सेवाभाव.बरं दक्षता तरी किती घ्यावी संस्थानाने ? सामाजिक अंतराचं भान तर जागोजागी ठेवलेलंच आहे पण हात पाय धुवायला किंवा नाश्ता जेवणासाठी भक्तांना वेळोवेळी सॅनिटायझर तर पुरवला जातो त्याशिवाय त्यांना कुठेही हाताचा स्पर्श करावा लागू नये ह्यासाठी सगळे नळही पेडल पुश केलेले आहेत. हिंमत असेल तर व्यवस्थापनात त्रुट शोधून दाखवावी कुणी...
नाश्ता करून देवळात जायला बस घ्यायला पोहोचलो तेव्हा नेमकी नियोजित वेळेच्या पाच मिनिटं आधीच बस देवळाकडे रवाना झाली होती. पुढची बस सुटायला तासभराचा अवकाश लागणार होता.भक्तनिवासाच्या सेवेकरींच्या हे कानावर घातल्या घातल्या त्यांनी आम्हाला ठरल्या वेळेत दर्शन घेता यावं म्हणून ड्राईव्हरला फोन करून बस असेल त्या ठिकाणाहून भक्तनिवासाकडे माघारी फिरवायला सांगितली.ह्या सगळ्यावर काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही,मनात फक्त ओशाळेपणा.गरजेला कोणासाठी काहीतरी करण्याची फक्त इच्छा असावी लागते बस्स.देवळाच्या आवारात प्रवेश केल्यापासून ते दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत गरजेनुसार केलेली हात पाय सॅनिटाईझ करण्याची सोय,स्टेट-ऑफ-आर्ट टेक्नॉलॉजीने सुसज्ज असं व्यवस्थापनाचं संगणकीकरण,तापमान तपासणी,मनापासून खाऊ घातल्या जाणाऱ्या पोटभर भोजनाचा महाप्रसाद आणि ह्या सगळ्यात सेवेकऱ्यांचं आतिथ्य कमी म्हणून की काय पण आम्हाला कारंज्याला दर्शन घेऊन पुढे नागपूर गाठायचं आहे हे कळल्यावर बस भरायची वाट न पाहता फक्त आम्ही दोघंच प्रवासी असूनसुद्धा ड्राईव्हरने आम्हाला पुढच्या प्रवासाला लागायला उशीर होऊ नये म्हणून बस भक्तनिवासाच्या दिशेने हाकणं, सगळं सगळं कसं थक्क करून टाकणारं.
गजानन महाराज संस्थानाच्या ह्या सगळ्या चोख व्यवस्थापनापुढे कोरोनानेही आपली शस्त्र टाकलीयंत असंच म्हणावं लागेल.अख्ख्या जगाला सळो की पळो करून सोडणाऱ्या कोरोनाचा एकही रूग्ण आजतागायत शेगावात नाही.शेगावातली लोकं अभिमानाने सांगतात की सरकारने आमच्यासाठी काही केलं नाही पण महाराजांनी आमच्यासाठी काही करायचं ठेवलं नाही.कोणत्याही देवस्थानाला मिळणाऱ्या उदंड देणग्यांचा इतका सार्थ विनियोग केला गेलेला माझ्या तरी पाहण्यात नाही.आई आपल्या लेकरांची जशी काळजी घेईल अगदी तसंच हे संस्थान शैक्षणिक सुविधा,नागरी सुविधा,रस्ते दुरुस्ती आणि त्यांच्या बांधकामापासून घेऊन ते वैद्यकीय सुविधा पुरवण्यापर्यंत शेगावातल्या लोकांची आणि पर्यायाने संपूर्ण शेगावची काळजी वाहतं.त्यामुळेच बहुदा इथले लोक येणाऱ्या प्रत्येक भक्ताला "माऊली" म्हणत असावेत.यंदाची शेगाव वारी आमच्यासाठी फक्त दर्शनापुरती मर्यादित न राहता एक संस्मरणीय आणि हृद्य अनुभव झाला.
बरोबर ह्याला पूर्णपणे नाहीतरी बऱ्यापैकी विसंगत असा अनुभव कारंज्याचा होता.वाशीम जिल्ह्यातलं कारंजा(लाड) दत्तगुरूंच्या दुसरा आणि जागृत अवतार नृसिंह सरस्वती अवतारासाठी ओळखलं जातं,इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचे आजोबा बापनाचार्यांच्या मुखचर्येत अवतार घेतला असं मानलं जात. किंबहुना तशी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात नोंदही आहे.ते पाहता ह्या देवस्थानाला कोरोनाच्या संकटाची तीव्रता जाणवायला हरकत नव्हती पण सध्याच्या वैश्विक संकटाची पुरेशी गंभीर दखल या संस्थानाने घेतल्याचं जाणवलं नाही. तिथला उदासीन परिसर आणि सेवेकरी पाहून मनही प्रसन्न व्हायच्या ऐवजी विषण्ण झालं.देवस्थानाला नावं ठेवू नयेत असं आपण म्हणतो खरं पण इतकं जागृत देवस्थान असूनही कारंजा(लाड) आपल्या महाराष्ट्रातल्या कंबरतोड रस्त्यांच्या दुर्दशेला साजेसं आहे असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.आपल्या सरकारी अनास्थेच्या सौजन्याने आपल्याकडच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अगदी स्टेट हायवेची सुद्धा इतकी दयनीय अवस्था आहे की आम्ही शेगावपासून कारंज्यापर्यंत अखंड पोहोचलो हेसुद्धा नशीबच आमचं म्हणायचं😔.आपलं सरकार रस्ते दुरुस्ती किंवा त्यांच्या बांधकामाकडे काटेकोर लक्ष पुरवण्यापेक्षा रस्त्यांना नाव काय किंवा कोणाचं द्यायचं, ह्याकडे जास्त लक्ष पुरवते आणि आधीच्या सरकारने काही नाव दिलंच तर ते रद्दबादल करून त्याचं पुन्हा नामकरण करण्यात जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्यात धन्यता मानते, त्याचाच हा परिणाम.एक से एक अशी पर्यटन स्थळं आणि संपन्न अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असूनसुद्धा केवळ ह्या अशा रस्त्यांमुळे महाराष्ट्रातलं पर्यटन एक सुखद अनुभव होत नाही ही सगळ्यात मोठी खेदाची बाब.
नागपूर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला.ह्या जिल्ह्याला तशी कोणतीही खास अशी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी नसली तरी दरवर्षी इथे होणाऱ्या हिवाळी संसदीय अधिवेशनामुळे,संत्र्यांमुळे म्हणजे पर्यायाने प्रसिद्ध संत्रा बर्फिमुळे आणि पेंच राष्ट्रीय उद्यानाशी त्याच्या असलेल्या सानिध्यामुळे नागपूरने आपली स्वतंत्र ओळख आजवर जपलीय.जागेचा तुटवडा नसल्यामुळे इथले रस्तेसुद्धा एकदम प्रशस्त,त्यामुळे नागपुरकरांना वाहतूक कोंडी हा शब्द फारसा माहित असावा असं वाटलं नाही.अलीकडेच कार्यरत झालेल्या नागपूर मेट्रोचं बांधकाम, त्याचं सौंदर्यीकरण सगळंच आपल्या मुंबई मेट्रोपेक्षा कितीतरी छान.मेट्रोच्या तिकिटांचे दरही मुंबईच्या तुलनेत एक चतुर्थांश.त्यामुळे नागपूर मेट्रोने प्रवास करणं आमच्या कल्पनेपेक्षा मनाला आणि खिशाला😄कितीतरी जास्त सुखावह झालं.आपले विद्यमान वाहतूक मंत्री आणि माजी मुख्यमंत्री ह्यांची दस्तुरखुद्द नागपुरावर तशी मेहेरनजरच.म्हणतात ना " केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" याचा हा उत्तम दाखला.म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोकणचा कॅलिफोर्निया करणं अजिबात अशक्य नाही हेच खरं. बाकी करता करविता तो आहेच ना "माऊली" !🙂
माधुरी गोडबोले माईणकर
www.valuevacations.co.in
४ डिसेंबर २०२०
फारच छान वर्णन केलं आहेस, माधुरी! छोट्या छोट्या तापशिलांसकट लिहिलं आहेस त्यामुळे प्रत्यक्ष शेगाव ला जाऊन आल्याचाच अनुभव आला!
ReplyDeleteखुप सुंदर अनुभव. व्यवस्थापनाचा एक आदर्श म्हणजे शेगाव असे म्हणता येईल. सेवेक-यांची पुर्ण काळजी संस्थानाकडून घेतली जाते. असे हे एकमेव संस्थान असावे. कारंजाचा अनुभव इतर देवस्थानासारखा.नागपूर खरंच छान आहे.
ReplyDeleteChanach varnan....maza pan Shegaon anubhav khupach chan hota...
ReplyDelete