Skip to main content

Thy Name Is England

Thy Name Is England 

" काय गं माधुरी,यंदा सुट्टीला कुठे ? ",योगवर्गात जरा स्थिरस्थावर होते की नाही तो एक काकू विचारत्या झाल्या. तसं त्यांच्या माझ्या वयात अंतर बरंच असलं तरी "भटकंती" ह्या एका समान धाग्याने आमच्या  वयामधलं अंतर बाजूला ठेवून आजवर वर्षानुवर्षं आमची मैत्री घट्ट केलीय. मग काय आम्हा दोघींना तेवढंच निमित्त गप्पाष्टकांसाठी.गप्पांच्या ओघात कळलं की त्यांचा इंग्लंडच्या सुट्टीचा बेत यूके कॉन्सुलटेच्या कृपेने पुरता उधळला गेला होता. त्यामुळे काहीश्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच उद्वेगल्या होत्या त्या.साहजिकच होतं म्हणा. पैसे वाया गेल्याचं दुःख तर होतंच पण व्हिसाचा अर्ज करण्याच्या किचकट सोपस्कारापासून ते सांपत्तिक स्थिती ,संशयास्पद पार्श्वभूमी असं कोणतंही सबळ कारण नसताना व्हिसा नाकारला जाण्यापर्यंत त्यांना झालेला मनःस्ताप,त्याबद्दलची चीड आणि अपेक्षाभंगाचं दुःख त्यांच्या प्रत्येक शब्दात उमटत होतं. 

२००५ च्या अखेरीपर्यंत दुबईतून काढता पाय घेण्याचं आम्ही जवळपास नक्की केलं होतं. तसं दुबई मधून का कोण जाणे पण कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास फार कठीण वाटत नाही.मग आता दुबई सोडणारच आहोत तर अजून थोड्या सुखद आठवणी गाठीशी बांधून मगच सोडूयात असा विचार करून त्या वर्षीचीअँनिव्हर्सरी आम्ही दुबई बाहेर साजरी करायचं ठरवलं. त्यासुमारास टीव्ही वर "अस्तित्व-एक प्रेमकहानी " नावाची मालिका बरीच लोकप्रिय झाली होती. ज्या मालिकेचे काही भाग लंडन मध्ये चित्रित केले गेले होते.तसे ब्रिटिश आपल्याला नवीन नाहीत म्हणा.आपल्यावर थोडीथोडकी नाही तर तब्बल दीडशे वर्षं राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा देश आहे तरी कसा ह्याचंही कुतूहल होतंच.२००५ मध्ये इंटरनेट होतं पण आजच्या इतकं बोकाळलं नव्हतं. त्यामुळे सरसकट सगळी बुकिंग्स इंटरनेट वरून करता येत नव्हती.मनोजने कामानिमित्त नुकत्याच लंडनला जाऊन आलेल्या त्याच्या एका colleague कडून जुजबी माहिती मिळवली.मुलं अगदीच लहान म्हणजे अनुक्रमे एक आणि सहा अशा वयाची असल्यामुळे त्यांच्या कलाने घेत आणि त्यांना रुचेल आवडेल असं फार दगदग न करता आठवड्याभराच्या सुट्टीत साधारण जे काही पाहता येईल त्याप्रमाणे ट्रिपचा एक ढोबळ बेत तयार झाला. अगदी पंधरा वर्षांपूर्वीसुद्धा लंडन मधल्या बऱ्याचशा प्रेक्षणीय स्थळांची एंट्रन्स टिकेट्स नेटवरून काढता येत होती जे फार सोयीचं होतं.आता महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्हिसा. दुबईला जाताना योग्य तो व्हिसा काढून देण्याची सगळी तजवीज माझ्या नवऱ्याच्या ऑफिसने केली असल्यामुळे आपला आपण कोणत्याही देशाच्या व्हिसासाठी अर्ज करण्याचा आमचा हा पहिलाच प्रसंग होता.पहिलीच वेळ आणि त्यात इंग्लंडच्या व्हिसासाठी अर्ज करणं म्हणजे फलंदाजीसाठी नुकत्याच मैदानात उतरणाऱ्या एखाद्या नवख्या सलामीवीराने त्याच्या खेळीचा  पहिलाच चेंडू हवेत उठवून तो थेट सीमेबाहेर लगावण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं ह्याची तेव्हा आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती.आमच्यासाठी इंग्लंडचा व्हिसा एखाद्या दिवशी सहज म्हणून बागेत फेरफटका मारून येण्याइतका सुरळीत पार पडला.पण त्या काकूंचा अनुभव ऐकून भारतातून इंग्लंडच्या व्हिसाचा अर्ज करणं एखाद्या अग्निदिव्याइतकं कठीण वाटत होतं.असो,अज्ञानात सुख कदाचित ह्यालाच म्हणत असावेत. 

इंग्लंडमध्ये पाऊल ठेवता क्षणी त्याचं दुबईपेक्षा अगदी हवामानापासून घेऊन ते मॉल्स,दुकानाच्या वेळेपर्यंतचं  असलेलं वेगळेपण मनावर ठसलं. दुबई सुद्धा जरी  प्रगत होतं तरी  स्काय मेट्रो , साधी ट्यूब मेट्रो ह्या बाबींमध्ये इंग्लंडने दुबईवर सरशी केली होती. दोन्ही आम्हाला इंग्लंडमध्ये पाहायला मिळाल्या. हवामान तर सतत इतकं बदलतं की आठवड्याच्या प्रत्येक दिवशी आम्ही वेगवेगळं हवामान अनुभवलं,मे महिन्याचे दिवस असले तरी कधी उकाडा,कधी बोचरी थंडी तर कधी तुरळक पावसाच्या सरी असं रोज वेगळं हवामान.शाळेत असताना मी आमच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं ग्रेट ब्रिटेनचं वर्णन मला तेव्हा आठवलं की कधीही अवेळी येणाऱ्या पावसामुळे इंग्लंडमधली लोकं सतत आपल्याजवळ छत्री बाळगतात आणि  चहू बाजूंनी समुद्राने वेढलेलं असल्यामुळे बोलायला शिकायच्या आधीही पोहायला शिकतात.  

एखादा देश जर का आंतर्बाह्य जाणून घ्यायचा असेल तर त्या देशाची सार्वजनिक दळणवळणाची साधनं वापरणं कधीही उत्तम पर्याय असतो.त्यामुळे तिथली स्थानिक लोकं,त्यांची जीवनशैली,त्या देशाची संस्कृती खूप जवळून अनुभवता येते. कोणत्याही देशातली अगदी पॉईंट टू पॉईंट मेट्रो म्हणजे तर आमच्यासारख्या भटक्यांसाठी वरदानच. त्यातून इंग्लंडसारख्या देशामध्ये भाषेची अजिबात अडचण येत नाही त्यामुळे ती अधिकच सोयीची वाटते.फक्त अडचण एकच असते की कोणत्याही युरोपियन देशांमध्ये प्रेक्षणीय स्थळं असोत वा मॉल्स,दुकानं सकाळी ९ ते  संध्याकाळी ५:३० पर्यंतच उघडी असल्यामुळे Madame Tussauds Museum, London Eye with Thames River Cruise ,Tower  Of  London Museum अशासारखी वेळखाऊ ठिकाणं निवांतपणे पहाता येण्यासाठी ट्रीपची आखणी तिथल्या रोज बदलत्या हवामानानुसार बरीच काटेकोरपणे करावी लागते आणि वेळेचं नियोजन सुद्धा.आपण इतिहासात वाचलेल्या मुत्सद्दी  आणि धोरणी ब्रिटिशांपेक्षा आताचे ब्रिटिश बरेच वेगळे वाटतात. सकाळी अगदी ऑफिसला जाण्यासाठी मेट्रो पकडायच्या लगबगीत असलेला एखादा गोरा, जेव्हा एक पोर हाताशी आणि एक पोर कडेवर सांभाळत मेट्रोच्या जिन्यावरून सामान चढवा- उतरवायची आमची कसरत पााहून तेव्हा हमखास मदतीसाठी हात पुढे यायचा. तेव्हा आपल्यावर इतके वर्षं राज्य करणारे अत्याचारी ब्रिटिश हेच का असा प्रश्न पडायचा,त्यांच्यातली ही माणुसकी काळजाला हात घातल्याशिवाय रहायची नाही.कदाचित अगदी पूर्वेेकडचे आशियाई देश किंवा दक्षिण पूर्व देेेेश वगळता बॉलिवूडने मोहिनी घातली नसेल असा जगाच्या नकाशावर देश विरळा.मग कधी एके काळी theatres मध्ये ' Indians and dogs are not allowed ' अशी पाटी लावणाऱ्या ब्रिटिशांचा आणि आपला ऋणानुबंध तर किती जुना, इंग्लंड त्याला अपवाद कसा असेल.इंग्लंडच्या Madame Tussauds ने त्यांच्या अभिनयाची दखल घेतलीय त्यामुळे ऐश्वर्या राय,शाहरुख खान,अमिताभ बच्चन सारख्या बऱ्याच दिग्गज कलाकारांनी वॅक्स पुतळ्यांच्या माध्यमातून तिथे आपली वर्णी लावलीय. 

इंग्लंडला जाताना जर का आपल्याबरोबर बच्चे कंपनी असेल तर बर्मिंगहॅमच्या कॅडबरी वर्ल्डची सफर तो बनती है.इथे मुलांना अगदी  उत्तम दर्जाच्या कोकोच्या बिया निवडण्यापासून ते त्यांच्यावर योग्य तो प्रक्रिया करून त्याच सुंदर चविष्ट आणि मनमोहक चॉकलेट्स मध्ये रूपांतर होईपर्यंतची सगळी इत्यंभूत माहिती मिळते आई प्रत्येक दरवाज्यावरू चॉकलेट्स ची त्यांच्या वर इतकी खैरात होते की मुलांच्या आनंदाला तोटाच नाही.लंडनपासून बर्मिंगहॅमला पोहोचेपर्यंत दृष्टीस पडणारी country side तर इतकी विलोभनीय आहे कि जातायेता चारचार तास खर्च करून गेलेल्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं.पण अजून तर बरंच काही पहायचं राहिलंही आहे. 




अलीकडेच लंडनच्या outskirts वर राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीचा फोने आला.आपला देश सोडताना ब्रिटिश भारताला काय काय देऊन गेले अशी ओघानेच चर्चा  झाली.बोलता बोलता, कसं ती  रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेली असतानच्या एक तासाभरात चोरांनी  तिचं घर पुरतं साफ केलं आणि कसं पोलिसांमध्ये त्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करण्याच्या बाबतीत एकंदरीतच औदासिन्य दाखवलं त्याबद्दल ती सांगत होती.गुन्हे तपासात जगभरात स्कॉटलंड यार्डचा दर्जा खरंतर अव्वल समजाला जात असूनसुद्धा ,पोलिसांनी तिला विम्याचे पैसे मिळवून देण्याव्यतिरिक्त कोणतंही फार विशेष असं तपासकाम केलं नाही हे ऐकून आपला देश सोडून जाताना आपल्याकडच्या पोलिसांना अकार्यक्षमपणा बहुदा ब्रिटिश पोलिसांकडून आणि Oxford Street सारख्या भर वर्दळीच्या रस्त्यात पचापचा थुंकणं,कागदाचे कपटे किंवा कचरा टाकणं हे आपल्याला ब्रिटिशांकडून आंदण म्हणून मिळालं असावं ह्याबद्दल शंका राहिली नाही. लूट,चोरी ह्या गोष्टी ज्या कधी काळी आपल्याला माहितही नव्हत्या त्या त्यांनीच तर शिकवल्या. इंग्लंड कितीही सुंदर आणि निसर्गरम्य असलं तरी इतिहासात वाचलेले त्यांनी त्यांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत आपल्यावर केलेले अनन्वित अत्याचार,आपल्या देशाची अपरिमीत लूट आणि त्याच लुटीच्या पैशावर त्यांनी उभी केलेली त्यांची आताची  सो कॉल्ड समृद्धी ह्यामुळे इंग्लंड मध्ये फिरताना ब्रिटिशांबद्दलची मनस्वी चीड, कुतूहल ,कौतुक अशा संमिश्र भावना एक भारतीय म्हणून आपल्यात उचंबळत रहातात. Tower Of London च्या Museum मध्ये आपल्याकडूनच लुटून नेलेला १५० कॅरेटचा कोहिनूर हिरा ऐटीत कोंदणात बसलेला पाहताना ह्या आपल्या भावना अजूनच तीव्र होतात. असं म्हणतात की आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातल्या गोवळकोंड्याच्या खाणीत हा हिरा पहिल्यांदा सापडला. "बाबरनामा" मध्ये ह्या हिऱ्याबद्दलचा उल्लेख वाचायला मिळतो,असं म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा १२१४ मध्ये माळव्याच्या राजा कडे हा हिरा होता जी नंतर १२९४ च्या आसपास ग्वाल्हेरच्या राजाच्या जडजवाहिऱ्यांच्या संग्रहाचा हिस्सा झाला. ह्या हिरा इतका मौल्यवान आहे की तो विकला तर संपूर्ण जगामधल्या लोकांचं दोन वेळचं पोट दोन दिवस सहज भरता येईल.१५२६ मध्ये हा हिरा बाबरच्या हाती लागला.१८७६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा भारतातून लुटून ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाला तो भेट केला आणि १८७७ मध्ये जेव्हा राणीने इंग्लंडच्या गादीचा भार सांभाळला तेव्हापासून तो ब्रिटनच्या राजघराण्याच्या शाही खजिन्याची शान वाढवत राहिला.पण ४३ वर्षांपूर्वीच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार स्वातंत्रपूर्व काळात लुटून नेलेली कोणतीही गोष्ट परत मिळवण्यासाठी भारत ब्रिटनकडे दावा करू शकत नाही. त्यामुळे कोहिनूर हिरा भारतात परत येणं बहुदा तरी दुर्दैवाने अशक्यच.तेव्हा नक्कीच मनात आल्याशिवाय रहात नाही ,

LOOT,TRECHERY, OPPRESSION THY NAME IS ENGLAND !! 


माधुरी गोडबोले माईणकर

३० ऑक्टोबर २०२०
   

Comments

  1. Good write up Madhuri. Yes every Indian feel that the prosperity we see there is primarily due to influx of wealth from India by whatever means in that old era. One thing we have to admit is their love to preserve historical places,redo n encash. We show little respect for preserving our places of pride otherwise India with such varied beauty could have been world tourist centre. Keep writing

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता