Skip to main content

गालबोट

 गालबोट 

मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये पॅरिसचं तथाकथित सुप्रसिद्ध बॅसिलिका "Notre  Dame"आगीत होरपळून निघालं आणि साऱ्या जगात एकच हळहळ पसरली. का कुणास ठाऊक पण  मला मात्र त्याचं फारसं दुःख झालं नाही. कधी कधी त्या वास्तूचा थेट संबंध नसला तरी  प्रवासात अनपेक्षितपणे येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांचा संबंध आपण अतिशय सोयीस्करपणे त्या त्या स्थळांशी कायमस्वरूपी जोडून मोकळे होतो आणि आपल्या सहजसुलभ  मानवी  स्वभावानुसार त्या कटू आठवणी किंवा प्रसंग आपल्या  मनावर कायमचे कोरून ठेवतो. असे घडणारे प्रसंग अकारण आपल्या प्रवासाच्या आनंदाला गालबोट लावतात. ते ही अगदी अनपेक्षितपणे. ह्या " Notre Dame " ला लागलेल्या आगीने माझ्या त्या आठवणीवर नकळत हळूच फुंकर घातली. वास्तविक ह्या Notre Dame चा थेट असा काहीच संबंध नव्हता त्या प्रसंगाशी खरं पण Notre Dame आम्हाला कायमचं लक्षात राहिलं  ते त्याच प्रसंगामुळे.आमच्या आतापर्यंतच्या युरोप प्रवासामध्ये जनमानसात प्रिय असलेले पण मला फारसे न भावलेले असे दोन देश म्हणजे फ्रान्स आणि इटली.निसर्गसौंदर्यात अजिबातच हे देश कुठल्याही अंशाने उणे नाहीत पण उणे आहेत ते तिथल्या माणसांच्या प्रवृत्तीत. युरोप मध्ये काही देशांमध्ये  विशेषतः पश्चिम यूरोपमध्ये  वर्णभेदाबद्दलच्या लोकांच्या जाणीवा  फार  तीव्र आहेत. तसं जर्मनीसुद्धा त्यांच्या देशात येणाऱ्या  पर्यटकांना फारसं आदराने वागवतं अशातला भाग नाही पण त्यांच्याकडच्या व्यवस्था ह्या बऱ्यापैकी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना ध्यानात ठेवून केल्या गेलेल्या आहेत.पण फ्रान्स आणि इटली मध्ये मात्र तसं नाही.मी माणसांच्या प्रवृत्तीत असं म्हणतेय तेव्हा माझा रोख तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांवर विशेषतः गोऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर जास्त आहे आणि इतर स्थानिक लोकांवर कमी.उलट स्थानिक लोकं  बरीच बोलकी आणि आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी कमालीची उत्सुक असतात.जर्मनीमध्ये आपल्याला फक्त अधिकाऱ्यांच्या अलिप्त आणि तुटक वृत्तीचा सामना करावा लागतो तर ह्या दोन देशांमध्ये माणसांबरोबर भाषेच्या अडचणीला सुद्धा तितकंच सामोरं जावं लागत.इटलीत सगळ्या नाही तरी काही व्यवस्था का होईना पर्यटकांना झेपतील जमतील अशा आहेत पण फ्रान्समध्ये मात्र तेही नाही.त्यांच्या सगळ्या सार्वजनिक व्यवस्था फक्त आणि फक्त फ्रेंच मध्ये आहेत ज्यामध्ये इंग्लिश भाषेचा पर्यायच उपलब्ध नाही.बरं,व्यवस्थाही बऱ्यापैकी गोंधळवून टाकणारी,जी समजून घेण्यासाठी लागणारा पुरेसा वेळ प्रत्येक वेळी आपल्या हाताशी असतोच असं नाही.इतर बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये पर्यटकांच्या दृष्टीने कोणत्याही बुकिंग सिस्टिम साठी इंग्लिश  भाषेचा पर्याय उपलब्ध आहे नाही तर सगळ्या मोक्याच्या ठिकाणी टुरिस्ट इन्फॉरमेशन सेन्टरमध्ये त्यांचे अधिकारी  हजर असतात जे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात.त्यामुळे फारशी गैरसोय होत नाही. पण तरीही आपल्या सगळ्यांच्या मनावर इतकी श्रीदेवी आणि शर्मिला टागोरची मोहिनी असते की पहिली युरोप ट्रिप म्हटलं की आपलं फ्रान्स आणि स्वित्झर्लंड ह्याच दोन देशांना पहिलं प्राधान्य असतं.वास्तविक पाहता पूर्व युरोपातले देशही तितकेच निसर्गसुंदर आहेत आणि लोकंही अलिप्त असली तरी तुसडी किंवा शिष्ठ नाहीत. 




ऍमस्टरडॅम आणि बेल्जियम,ह्या दोन देशांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही पॅरिसला पोहोचलो तेव्हा  माणसांच्या वृत्तीमधला  हा बदल आम्हाला फार प्रकर्षाने जाणवला आणि आमचा अगदी विरस झाला.जगभरात फ्रेंच आणि जर्मन लोकं फार अढ्यतखोर समजली जातात असं आम्ही तिथपर्यंत फक्त वाचून होतो पण ते प्रत्यक्ष आम्हाला अनुभवायला मिळालं आमच्या ट्रिप दरम्यान.पॅरिसमधलं आमचं हॉटेल एका छोट्या मेट्रो स्टेशनपासून तसं अगदी हाकेच्या अंतरावर होतं.हॉटेल बुकिंग करताना आम्ही तसं पाहिलंही होतं .पण प्रत्यक्षात स्थानिक लोकांच्या मदतीने हॉटेलचा पत्ता हुडकून काढेपर्यंत मात्र आमची पुरती दमछाक झाली. एकही फ्रेंच माणूस आम्हाला निश्चितपणे हॉटेलचा रस्ता सांगू शकला नाही.जवळपास तासभर पायपीट केल्यानंतर एकदाचं ते हॉटेल आम्हाला गवसलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.आपल्याकडे अगदी छोटं पोरगं सुद्धा जवळपासच्या भागाची पुरेशी माहिती ठेवून असता आणि इतक्या लहान पोराला सुद्धा भाषेची अडचण जाणवत नाही,हे विशेष. भाषा नाहीच कळली तर आपल्याकडे लोकं दुसऱ्याला मदत करायला ती भाषा माहित असलेल्या आजूबाजूच्या एखाद्याची तोडकीमोडकी मदत घेऊ पाहतात आणि अगदीच काही नाही तर दमशेराचा आसरा असतोच.त्यामुळे एखाद्याला पत्ता शोधायचा असेल तर त्या माणसाला त्याच्या इच्छित स्थळी पोहचवूनच आपल्याकडची लोकं दम घेतात.तटस्थपणे त्याची दैना पाहत नाहीत.असो,तर अशी मजल दरमजल करत आम्ही हॉटेलवर पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधारलं होतं. हॉटेलमध्ये शिरताना आमची नजर अगदी हॉटेलच्या समोरच असलेल्या पब्लिक लॉंड्रीवर पडली होती. हॉटेलच्या बगलेत असलेल्या  सुपरमार्केट मधून मिळालेल्या थोड्या जिन्नसांवर आणि जवळ असलेल्या खाद्यपदार्थांच्या शिदोरीवर पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांना थोडं शांत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा त्या पब्लिक लॉंड्रीकडे वळवायचं ठरवलं.तसे ट्रिप सुरु होऊन चार पाच दिवस उलटलेले असल्यामुळे तसा अधावूत कपड्यांचा जमलेला ढीग जमला होताच जो  साफ करणं क्रमप्राप्त होतं आणि अशातच अगदी समोरचअशी लॉंड्री असणं आमच्यासाठी अलभ्य लाभ होता. कपड्यांचा ढिगला घेऊन आम्ही लॉंड्रीमध्ये घुसलो तेव्हा लॉंड्रीमध्ये तिचा मालक सुद्धा हजर नव्हता.तिथे ह्या पब्लिक लॉंड्रीज ऑटोमॅटिक लॉकिंग आणि पेमेन्ट मशीनवर चालवल्या जातात त्यामुळे दुकानदाराला पैशांसाठी किंवा दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी वैयक्तिक रित्या हजर राहण्याची गरज भासत नाही.त्यामुळे साहजिकच  लॉंड्रीमध्ये मालकाचा पत्ताच नव्हता पण आमच्या सुदैवाने एक आफ्रिकन माणूस आपलेकपडे धुवायला लावत होता आणि त्याला चक्क तोडकं मोडकं का होईना पण इंग्लिशही येतंय हे कळल्यावरआम्हाला थोडं हायसं वाटलं. त्याच्याकडून आम्ही त्या लॉंड्रीची सिस्टिम समजून घेऊन तो आणि आम्ही आपापले कपडे धुवायला लावून बाहेर पडणार इतक्यात नऊ वाजल्यामुळे लॉंड्रीचे सगळे दिवे आणि तिचा काचेचा मुख्य दरवाजा आपोआपच लॉक झाला आणि आम्ही तिघेही त्या लॉंड्रीच्या आतच अडकलो.सहजच आमची तिघांची नजर त्या दुकानात लावलेलय पाटीवर गेली तर दुकानाची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ अशी होती. फोन नंबर सुद्धा दिला होता अर्थातच पाटीवरची सगळी माहिती फ्रेंचमध्ये लिहिली होती हे वेगळं सांगायला नकोच. मुलं हॉटेलवर एकटी आणि आम्ही लॉंड्रीमध्ये अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लॉंड्री सकाळी ७ वाजता उघडणार तिथपर्यंत आपण असेच आत अडकलेले राहू ह्या कल्पनेने आमच्या जीवाची घालमेल सुरु झाली.आता काय करावं ह्याचा विचार करत असतानाच त्या पाटीखाली दिलेला नम्बर हा दुकानाच्या मालकाचाच असावा असा अंदाज बांधून मालकाला फोन करून सुटकेचा प्रयत्न करू असं सर्वानुमते ठरल्यावर त्या आफ्रिकन माणसाने दिलेल्या नंबरवर फोन लावला.आमचं दैव बलवत्तर म्हणूनच की काय तो नंबर त्या मालकाचाच निघाला आणि त्याने शक्य तितक्या लवकर दुकानात येऊन लॉक उघडण्याची तयारी  दाखवली तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला.त्या वेळी तो आफ्रिकन माणूस आम्हाला देवदूतच वाटला कारण खरं तर आम्हाला मदत करण्याच्या भानगडीत तो निष्कारण आमच्याबरोबर आत अडकून पडला आणि सुटकेचा मार्गही त्यानेच शोधला.



आपण स्वतः भारतीय आपला देश  इतर प्रगत देशांच्या तुलनेत किती दुय्यम दर्जाचा आहे ह्याच्यावर संधी मिळेल तेव्हा भाष्य करण्यात धन्यता मानतो.आपल्याकडे गरिबीमुळे पैशाच्या हव्यासापोटी चोरी,बेईमानी,भ्रष्टाचार ह्या गोष्टी कशा नित्याच्याच आहेत ह्याबद्दल तर मला नाही वाटत की  कोणाचं दुमत असेल.पण ह्याच सगळ्या गोष्टी स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या आणि बळकट अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्येसुद्धा होतात.पॅरिसमध्ये मेट्रोमध्ये किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान चीजवस्तू जाणं,पाकीट मारलं जाणं हे बऱ्यापैकी नियमित होतं हे आम्हाला माहित होतं. पण हातचलाखीही होते ह्याचा सुद्धा अनुभव आम्ही पॅरिसमध्ये घेतला.तिथे मोठी मेट्रो स्टेशन्स सोडता प्रत्येक मेट्रो स्टेशनवर तिकीट कॉउंटर्स नाहीत आणि जे ticketing kiosk असतात ते सगळे फ्रेंचमध्येच असतात जिथे इंग्लिश भाषेला जागाच नाही.लागलीच दुसऱ्या दिवशी आम्ही आयफेल टॉवर पाहायला जाणार होतो पण जवळ सगळ्या बंद्या नोटा असल्यामुळे ह्या ticketing kiosk मध्ये घालावे लागणारे सुट्टे पैसे आमच्याकडे नव्हते. तिकीट देण्यासाठी कॉउंटरची सोय नसल्यामुळे,ticketing kiosk ला लागणारे पैसे सुट्टे करून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला जवळपास अर्धा तास फिरावं लागलं,अर्धा तास सुट्ट्यांसाठी दही दिशा भटकल्यावर शेवट एक दुकानदार सुट्टे पैसे द्यायला तयार झाला. त्याच्याकडून १०० युरोचे सुट्टे करून घेऊन जेव्हा मेट्रो स्टेशनवर पोहोचलो तेव्हा त्या सुट्टयांध्ये २० युरो कमी असल्याचं लक्षात आलं. त्याच्याकडून सुट्टे घेताना माझ्या नवऱ्याने पैसे मोजून घेऊन खिशात ठेवले होते आणि ते दुकान ते मेट्रो जेमतेम दोन तीन  मिनिटांचं अंतर होतं,ज्यात पैसे मारले जाण्याला तर वावच नव्हता.पण पुन्हा दुकानदाराकडे जाऊन तर काही उपयोग होणारच नव्हता.सुट्टे पैसे देताना त्याने हातचलाखी केली होती हे स्पष्टच होतं.फक्त १०० युरोचं वीस युरोंवर निभावलं अशी मनाची समजूत घालून आम्ही गप्पा बसलो.





पण हे सगळं इथवर संपलं नव्हतं.नंतर Hall Of Mirrors ला जाताना आम्ही आमच्या मेट्रो स्टेशनपासून व्हर्सिलिस पॅलेस पर्यंत परतीचं तिकीट काढलं जेणेकरून  वारंवार आमचा तिकीट काढण्याचा त्रास वाचेल.व्हर्सिलिस पॅलेस पाहून निघाल्यानंतर खरं तर आम्ही सगळेच थोडे दमलो होतो त्यामुळे हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती  घेऊन मग  वाटल्यास पुन्हा बाहेर पडावं असं मनात असतानाच माझ्या नवऱ्याने Notre Dame आणि Arc De Triomphe पण ह्याच मेट्रो route वर आहे तर ते दोन्ही पाहून मगच परत जाऊ या म्हणून टुमणं काढलं.त्याचा त्या दोन्ही गोष्टी पाहण्याचा इतका हट्ट पाहून आमच्या कोणाच्या फारसं मनात नसताना आलोच आहोत तर लगे हाथ तेही आता पाहूच या ,असं म्हणून आम्ही सगळे जरा नाराजीनेच तयार झालो. Notre Dame आणि Arc De Triomphe पाहून आम्ही पुन्हा मेट्रोला परतताना आम्हाला तिकीट चेकरने अडवलं.तिकीट दाखवल्यावर त्यांनी आम्हाला १०० युरोचा दंड आकारला.परतीच्या प्रवासाचं रीतसर तिकीट असूनसुद्धा त्यांनी आम्हाला दंड आकारल्यावर आम्हाला काहीच कळेना.पण फ्रान्समध्ये मेट्रोचं तिकीट इतर देशांसारखं २४ तास वैध नसतं.मेट्रोच्या नेटवर्क मधून बाहेर आल्या आल्या तिकीट मग अगदी परती पर्यंतच्या प्रवासाचं का असेना ते निरुपयोगी होतं हे आम्हाला माहीत नव्हतं,आम्ही हे परोपरीने सांगून सुद्धा तिकीट चेकर ऐकण्याच्या मःस्थितीत नव्हते.उलट आम्ही अनावधानाने नाही तर अतिशय जाणीवपूर्वक खूप मोठा अक्षम्य गुन्हा केल्याच्या अविर्भावात त्या दोघांना आमच्याशी अतिशय उद्दामपणे बोलताना पाहून खरं तर तळपायाची आग मस्तकात जात होती. शेवटी आम्ही १०० युरोची दक्षिणा निमूटपणे त्यांच्या हातावर ठेवून त्याची पावती घेतली.पण खरं शल्य १०० युरोचा दंड पडला हे नव्हतं तर आमच्याकडे तिकीट असूनसुद्धा केवळ अनावधानाने आमच्याकडून ही चूक झालीय हे समजून घेण्याऐवजी त्यांची आमच्याकडे अट्टल गुन्हेगार असल्यासारखी पाहणारी बोचरी नजर आणि त्याप्रमाणे दिलेली अपमानास्पद वागणूक आम्हाला जास्त डाचली. माझ्या नवऱ्याचा त्याने त्याच्या लहानपणी कुठे तरी कधीतरी वाचलेल्या "The Hunch Of Notre Dame" गोष्टीवरून धरलेला Notre Dame पाहण्याचा हट्ट आम्हाला १०० युरोला पडला. पण ह्या कटू प्रसंगामुळे फ्रान्स बद्दलची प्रतिमा आमच्या मनात डागाळली ती कायमची.




मला आठवतंय की पॅरिसनंतर जेव्हा आम्ही स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा तिथे ट्रेन मध्ये एक गुजराती कुटुंब आमच्याच  डब्यात प्रवास करत होतं.पास तपासायला जेव्हा तिकीट चेकर आली तेव्हा त्यांच्याकडच्या असलेल्या स्विस पास वर ते त्या ट्रेनमधून प्रवास करू शकणार नाहीत हे  आणि हसतमुखाने समजावून सांगितलं . तिने ते पर्यटक आहेत ह्याचं भान ठेवून त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून दंड आकारण्याऐवजी, तिथल्या नियमांची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून कदाचित असं झालं असावं ह्याची जाणीव ठेवून त्यांना पुढच्या स्टेशनवर  त्या ट्रेनमधून उतरवून दुसऱ्या योग्य गाडीमध्ये बसवण्यासाठी आपल्याबरोबर घेऊन गेली.पर्यटकांकडे पहिल्या जाणाऱ्या  दोन देशांमधल्या माणसांच्या दृष्टिकोनामधला हा फरक अतिशय बोलका होता.आपण म्हणतो माणसाचं वागणं त्याच्या मनाचा आरसा असतो, मला वाटतं तसंच एखाद्या देशात रहाणारी माणसं त्या देशाचा आरसा असतात.

माधुरी गोडबोले - माईणकर

६ सप्टेंबर २०२०

Comments

  1. खूप छान मांडले आहेत अनुभव. मला असेच वाईट अनुभव स्वित्झर्लंडमध्ये आले होते, ticket checker ने अख्या डब्यात फक्त आम्हाला तिकिट दाखवा असे विचारले व म्हणाला की हा प्रथम श्रेणीचा डबा आहे, मी माझे प्रथम श्रेणीचे तिकीट दाखवले व विचारले की तू इतक्या गर्दीत फक्त मलाच का विचारलेस? मग खजिल होऊन त्याने बाकीच्यांचे तिकिट तपासायला सुरुवात केली आणि अर्ध्याच्या वर 'त्यांच्या' लोकांकडे योग्य तिकीट न्हवते आणि त्याला नाईलाजास्तव लोकांना दुसऱ्या डब्यात पाठवावे लागले. ट्रेन मधून उतरताना मी त्याला 'नॉट गुड' असे सरळ सांगितले. कधी कोणी कॉफी देणार नाही, जागा नाही असे सांगितले तर कधी टॅक्सी वाल्याने त्याच्या भाषेतून नाराजी दाखवली. वर्ण भेद जाणे कठीण आहे आणि तो सहन करणे त्याहून जास्त कठीण...

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, sometimes just one unpleasant experience at a place is enough to form a bad opinion about the place permanentky!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता