Skip to main content

रंगिलो राजस्थान

रंगिलो रास्था 

बऱ्याचदा आपल्याला स्वतःची पुरेशी ओळख नसते. पण काही वेळेस अशी संकटं किंवा असा पेच समोर येऊन उभा ठाकतो की आपला आपल्याला नव्याने शोध घ्यावाच लागतो. तसंच काहीसं आपल्या सगळ्यांचं ह्या कोरोनाच्या महासंकटात झालंय.कित्येक गोष्टी आपण स्वबळावर किंवा स्वकौशल्यावर सहज करू शकतो ह्याचा शोध आपल्या सगळयांनाच आता आताशा लागतोय. मग अगदी घरच्या घरी लादी पाव करणं असो किंवा मग  प्रवास. " इतके दिवस आपण का बरं प्रयत्न करून पहिला नाही? "असा प्रश्न पडतो. लॉकडाऊनने उबलेली लोकं लॉकडाऊन नंतरच्या काळात भारतातल्या अशा कधी न पाहिलेल्या आणि ऐकलेल्या स्थळांना भेटी देण्याच्या आशेवर आतापासून बसलेले आहेत आणि तेही स्वबळावर.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही ग्रुप टूरचा  पर्याय निवडण्याऐवजी वैयक्तिकरित्या प्रवास करण्याकडे जाणवणारा लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन बऱ्याच प्रथितयश टूर कंपन्यांनी आतापासूनच ग्राहकांना लुभावणारे अनेक व्यक्तिगत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने आपली कंबर कसलीय.त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात आपल्याला स्वतःबद्दल अजूनच नवनवीन शोध लागले तर आश्चर्य वाटायला नको.आम्हालाही आमच्या अशाच एका ग्रुप टूरला जॉईन करण्याच्या घोडचुकीने आमचा आम्हाला शोध घ्यायला भाग पाडलं होतं. खरं तर कायम स्वतःचं स्वतः फिरणं पसंत करणाऱ्याआम्ही,काही अपरिहार्य कारणाने तेव्हा त्या ग्रुप टूर बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता पण ते दुःस्वप्न ठरलं. असो,त्याअनुभवाबद्दल नंतर कधी तरी लिहीन. 

भारतातल्या बऱ्याचशा राज्यात पाहण्यासारखं इतकं काही आहे की आपल्याला एका सहलीत सगळीच ठिकाणं पहाता येणं शक्य होत नाही.वानगीदाखलच द्यायची झाली तर गुजरात,राजस्थान,उत्तराखंड,मध्य प्रदेश ही अशीच त्यातली काही राज्यं. पहावं तेवढं थोडंच.त्यामुळे राजस्थानची ट्रिप आम्ही दोन हिश्श्यात विभागली.एका सहलीत  मारवाड आणि दुसऱ्या सहलीत मेवाड.राजस्थान म्हटलं कि पहिला डोळ्यांसमोर उभा रहातो तो महाराणा प्रताप,पृथ्वीराज चौहान,मिर्झाराजे जयसिंग अशा एक से एक मातब्बर योद्ध्यांच्या पराक्रमाचा प्रदीर्घ आणि समृद्ध असा इतिहास.राजस्थान आजही त्याचं ते राजेशाही वैभव पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पुरेपूर टिकवून आहे.त्यामुळे रस्त्यांपासून घेऊन ते वास्तूंपर्यंत सगळंच प्रशस्त आणि अतिशय सुस्थितीत.राजस्थानचं हे ऐतिहासिक वैभव परदेशी पर्यटकांपासूनसुद्धा लपलेलं नाही त्यामुळे भारतीय पर्यटकांइतक्याच संख्येने परदेशी पर्यटक सुद्धा राजस्थानकडे ओढत असतात.मेवाड़ च्या तुलनेत मला मारवाड जास्त भावला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. तसं मेवाड आणि मारवाड दोन्हीही संपन्न,रोमांचक आणि रोचक अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीतएकमेकांच्या तुलनेत  यत्किंचितही उणे नाहीत.

मेवाड म्हटलं की सर्वसाधारणपणे आपली गाडी माऊंटअबू ,जयपूर,उदयपूर,नाथद्वारा आणि चितौडगढ इथपर्यंत येऊन अडकते.पण महाराणा प्रतापांचं जन्मस्थान कुम्भलगढ मात्र आपल्याला फारसं परिचित नाही.त्यांच्या ह्या जन्मस्थानाबद्दल पहिल्यांदा आम्हाला कळलं जेव्हा तिथे क्लब महिंद्राच रिसॉर्ट असल्याचं कळलं.इथे का बरं रिसॉर्ट उभारावंस वाटलं असेल म्हणून आम्ही जरा खोलात जाऊन त्याची माहिती खणून काढली आणि खूप काही रोचक माहिती हाताशी लागली. १५ व्या शतकात महाराजा कुंभांनी समुद्रसपाटीपासून ११०० मी.वर उदयपूर जिल्ह्याच्या राजसमंड तालुक्यात अरवली पर्वतरांगामध्ये तब्बल १५ वर्षं खर्चून हा किल्ला बांधला. ३६ कि.मी. लांब आणि १५ फूट रुंद असलेली ह्या किल्ल्याची मजबूत तटबंदी "ग्रेट वॉल ऑफ चायना" नंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची लांब भिंत आहे.ह्याच किल्ल्यात पन्ना दायिने महाराणा प्रतापचे वडील राजा उदयसिंहचे सुद्धा प्राण वाचवून लपवून ठेवलं होतं.कुम्भलगडावर रात्री "Light And Sound"  शो मध्ये किल्ल्याचा सगळा इतिहास सांगितला जातो.राजस्थानमध्ये मोठ्या संख्येने येणारे देशी विदेशी पर्यटक पाहता राजस्थान  सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने जवळपास सगळ्याच किल्ल्यांवरअशा "Light And Sound"  शो ची व्यवस्था केलीय.रात्री पूर्ण काळोख झाल्यावर गडावर दिवे लागल्यानंतरचं त्याचं सौंदर्य आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतं.ह्याच कुंभळगडावरून आपल्याला मारवाड आणि मेवाड वेगळा होताना दिसतो.कुम्भलगडाभोवतालच्या जंगलात महाराणा प्रताप आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपला जीव वाचवत रानोमाळ हिंडत होता.अशाच एका  "Light And Sound"शो च्या माध्यमातून डोळ्यांसमोर उभा केला गेलेला हल्दी घाटीच्या लढाईचा महाराणा प्रताप आणि आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेल्या चेतक घोड्याने रचलेला रक्तरंजित इतिहास आपल्या अंगावर रोमांच आणतो.तसा अल्लाउद्दीन खिलजीच्या बीभत्स आणि लंपटआगळीकीतून  राणी पद्मिनीला आणि गडावरील इतर स्त्रियांना कराव्या लागलेल्या  चित्तोडगढच्या किल्ल्यावरच्या जौहरचा इतिहास आपण बऱ्याचदा वाचला,ऐकला आणि पद्मावत सारख्या सिनेमामधून अनुभवलाच आहे.चित्तोडगडच्या किल्ल्यावरची जौहरची जागा पाहताना आजही अल्लाउद्दीन खिलजीच्या स्त्रीलंपटपणाची मनस्वी चीड येते.त्यावेळी तिथे घडलेलं नाट्य किती महाभयंकरअसेल ह्याची कल्पनाही नकोशी वाटते. 

मारवाडचं वैभव मेवाडपेक्षा बरंच वेगळं आहे. मेवाडमध्ये सरोवरांना तोटा नाही त्यामुळे मेवाडमध्ये पाण्याचं फारसं दुर्भिक्ष जाणवत नाही. पण उलटपक्षी मारवाड मेवाडच्या तुलनेत जास्त रेताड असल्यामुळे मारवाडमध्ये पाण्याचं अतोनात दुर्भिक्ष .आंघोळ करताना निघणारं सांडपाणी कपडे धुवायला वापरलं जात असे इतकं. कालांतराने गंगा कालव्याचं काम पूर्ण झाल्यावर राजस्थानमध्ये मेवाड आणि मारवाड ह्या दोन्ही प्रांतात पाण्याचं दुर्भिक्ष बऱ्याचअंशी संपुष्टातआलं.आज मारवाडमधलं अजमेर दुर्दैवाने मोहम्मद घोरीला चौदा वेळा नमवून त्याला  जीवदान देऊन परत पाठवणाऱ्या अत्यंत शूरवीर असा महायोद्धा पृथ्वीराज चौहानची जन्मभूमी म्हणून कमी आणि ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीच्या दर्ग्याकरता जास्त ओळखलं जातं.आपल्या बॉलीवूडमधले बरेच हिंदू नट आणि नट्या ह्या अजमेर शरीफच्या दर्ग्यावर आवर्जून डोकं टेकायला आल्याच्या बातम्या आपल्याला खूपदा पेपरमध्ये वाचायला मिळतात. ह्याच अजमेरमध्ये " अढाई दिन का झोपडा" प्राचीन संस्कृत विश्वविद्यालय आहे ज्याचं अर्थातच आता दर्ग्यात रूपांतर झालंय.अजमेर शहरापासून १५ ते २० कि.मी.वर असलेल्या  पुष्करमध्ये आहे जगातलं एकमेव ब्रम्हाचं देऊळ. पुष्करमधल्या पुष्कर सरोवराच्या काठी ५२ घाट आहेत.तीर्थक्षेत्र पुष्कर हे पृथ्वीवरलं ब्रम्हाचं एकमेव  निवासस्थान समजलं जातं.असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती ह्याच पुष्करपासून सुरु केली.पण जोधपूरच्या मेहेरंगड किल्ल्याच्या वैभवाची सर बाकी जैसलमेर,बिकानेरच्या किल्ल्यांना आणि जयपूरच्या आमेर पॅलेसला नाही.जयपूर पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं तर जोधपूर ब्लू सिटी म्हणून.

पण आमच्या ह्या सगळ्या मेवाड आणि मारवाडच्या प्रवासात आमच्यासाठी सगळ्यात अजब आणि न विसरता येण्यासारखं ठिकाण आम्ही कोणतं पाहिलं असेल तर ते म्हणजे बिकानेर पासून ३० कि.मी. वर असलेलं करणी माता मंदिर. आजपर्यंत असं देऊळ आमच्या तरी पाहण्यात आलं नाही. ह्या देवळाच्या परिसरात हजारोंच्या संख्येने उंदीर इकडून तिकडे धावताना दिसतात.जगात असतील नसतील तेवढे सगळे उंदीर ह्याच देवळात अवतरलेयेत असं वाटावं इतकं.कधी उंदीर पायात येईल सांगता येत नाही. ह्या उंदरांचा पायाला स्पर्श होणं इथली लोकं शुभ मानतात. पांढरा उंदीर दृष्टीस पडणं,विशेषतः गाभाऱ्यात देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या गाभाऱ्यात तो दिसणं  तर कमालीचं शुभ समजलं जातं.असाच एक उंदीर माझ्या पायाला चाटून गेल्याचं जाणवल्यावर नकळत माझ्या तोंडातून निघालेला चित्कार ऐकून तिथला एक भाविक मी असं भिऊन किंचाळून उंदराचा अपमान केला म्हणून माझ्यावर फिस्कारला होता.प्रत्येक नवीन लग्न  झालेल्या दाम्पत्याने लग्नाच्या दिवशी संध्याकाळी ह्या देवळात देवीचं दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे.पण इतक्या असंख्य प्रमाणात उंदीर असूनही मंदिराच्या आवारात असलेल्या एकाही दुकानातल्या मालाची एका नवीन पैशाची विल्हेवाट  हे उंदीर लावत नाहीत असं दुकानदार सांगतात.नाही तर इथे मुंबईत घरात घुसलेला एक उंदीर त्याच्या प्रतापांनी आपल्याला सळो की पळो करून सोडतो.आहे नं खरंच,ऐकावं ते नवलंच.

बाकी बिकानेरला गेलात तर जोशीजी के रसगुल्ले खायला विसरू नका.दाल बाटी तर तमाम राजस्थानची खासियत.त्यामुळे "दाल बाटी नाही खाया तो क्या खाया ? ". बिकानेरमध्ये मिठाईचा पूर आहे आणि एकंदरीतच राजस्थान मध्ये शॉपिंग करण्यायोग्य ऐवजांचा. जयपूरचा बापू बझार आणि जोधपूरच्या नयी सडक वरची दुकानं अक्षरशः वेड लावतात. काय घेऊ नि काय नको असं होऊन जातं.राजस्थान,गुजरात,मध्य प्रदेश,कोलकाता अशा ठिकाणी जाऊन फार काही खरेदी न करता परत येईल तो खरा"निश्चयाचा"नाही तर " संयमाचा महामेरू " म्हटला पाहिजे.

राजस्थान वर फक्त एक ब्लॉग नाही तर पुस्तक लिहिता येईल इतका त्याचा इतिहास प्रदीर्घ आणि समृद्ध आहे. काय काय आणि किती किती लिहावं ?

माधुरी गोडबोले - माईणकर

२ ऑगस्ट २०२०      
   

   

 





Comments

  1. अगदी खरं, आम्ही पण दोन्ही मेवाड आणि मारवाड केलं आहे, सुंदर आहे सगळा भाग

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता