Skip to main content

दख्खनच्या जंगलवाटा

दख्खनच्या जंगलवाटा 

कधीकधी काही ठिकाणं अगदी योगायोगानेच पहिली जातात.नाही तर मुद्दाम वाट वाकडी करून ती पाहायला जाण्याचा आपण सहसा विचार करत नाही किंवा करणारही नाही कदाचित.नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा आम्ही कूर्ग पहायचं ठरवलं. क्लब महिंद्राची मेम्बरशिप घेतल्यापासून आम्ही त्यांच्या कूर्गच्या प्रॉपर्टीचं बरंच कौतुक ऐकून होतो त्यामुळे ती प्रॉपर्टी पाहण्याचं कुतूहल तर होतंच,पण एखादं ठिकाण ठरवल्यावर आसपासची फारशी वाट न चोखाळली गेलेली ठिकाणं हुडकून काढणं आता काहीसं सवयीनेच होतं. त्यामुळे तेव्हा मसिनागुडी आणि येरकऊडचा समावेश आपसुकच झाला.ठिकाण कोणतंही असू दे,भारतात किंवा भारताबाहेर आमचा बराचसा भर हा "Being Glocal" वर असतो.ह्या तत्त्वाला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी खाजगी वाहन वापरण्याऐवजी किंवा भाड्याने घेण्याऐवजी शक्य तितकं आणि शक्य असेल तिथे,त्या भागात वापरल्या जाणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि पसंतही करतो ज्याच्यामुळेआम्हाला भटकंतीचा खराखुरा आनंद मिळतो. याव्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधणं,त्यांचं जीवन जवळून पहाणं,त्यांच्या मदतीने तिथली फारशी परिचित आणि ऐकीवात नसलेली ठिकाणं पहाणं आणि त्या ठिकाणांची सहजासहजी पुस्तकांमध्ये न सापडणारी माहिती करून घेणं असे अनेक आनुषंगिक फायदेही मिळतात,जे भटकंतीची रंगतअजून वाढवतात.आता हं,हे असं भटकणं म्हटलं तर थोडं दगदगीचं असू शकतं,विशेषतः भारतात फिरताना But it's worth it ! 


कूर्गला जायचं ठरलं तेव्हाही आम्ही विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास पसंत केला. ट्रेनची वेळसुद्धा पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने जास्त सोयीची होती. अगदी चक्क ठरल्या वेळी सकाळच्या न्याहारीच्या वेळेआधी ट्रेनने बरोबर आमचं बोचकं मँगलोर रेल्वे स्टेशनवर टाकलं.तेव्हा Ola , Uber इतक्या बोकाळलेल्या नव्हत्या पण आपल्याकडच्या प्रीपेड टॅक्सीसारखी मँगलोर स्टेशनच्या बाहेर प्रीपेड रिक्षांची सोय आहे. ट्रेनच्या रात्रभराच्या प्रवासात समोरच बसलेल्या कुटुंबाशी आमचे सकाळपर्यंत चांगले सूर जुळले आणि योगायोगाने तेही क्लब महिंद्राचेच मेंबर होते. त्यामुळे कूर्ग नंतर आपापल्या पुढच्या प्रवासाला पांगेपर्यंत ते आमचे आपोआपच ट्रॅव्हल कंपॅनिअन झाले. मँगलोरला अस्सल उडपी नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही सगळ्यांनी कारने कूर्गची वाट धरली,कूर्ग थंड हवेचं ठिकाण म्हणून जास्त माहित असलं तरी ते कॉफीचे मळे,मसाल्याच्या पदार्थांच्या बागा आणि जवळच असलेलं एक प्रमुख शहर मडिकेरी मुळे तितकंच परिचित आहे.काहीही स्थलदर्शन करायचं असल्यास मडिकेरी शिवाय पर्याय नाही. मडिकेरीपर्यंत गेल्यावर मगच तिथून आपल्याला बऱ्याचशा जंगल ट्रेक्स,ओंकारेश्वराचं देऊळ,मडिकेरीचा किल्ला,abbey फॉल्स सारख्या आणि अशा इतर अनेक पर्यटन स्थळांपर्यंत जाणं सोयीचं होतं . 



मडिकेरी बस स्टॅन्ड वरून म्हैसूर,ऊटीकडे दर थोड्या वेळाने सुटणाऱ्या बसेस आहेत.अशाच एका ऊटीकडे जाणाऱ्या बसने आम्ही मसिनागुडी गाठायचं ठरवलं.मडिकेरीकडून म्हैसूर मार्गे ऊटीकडे जाणारी बस म्हैसूरपर्यंत बंदीपूरच्या जंगलातून जाते .अगदी अगदी २००४ ला पोलिसांकडून ठार मारलं जाईपर्यंत ह्या जंगलात वीरप्पनने हैदोस माजवला होता. जाणा येणाऱ्या प्रवाशांची लूट नवीन नव्हती.त्यामुळे हा मार्ग फारसा सुरक्षित नव्हता.लोकांमध्ये वीरप्पनची दहशत होती त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या ह्या रस्त्याचा प्रवास लोकं जीव मुठीत धरूनच करत असत.पण वीरप्पनला ठार होऊन आठ एक वर्ष उलटलेली असूनसुद्धा, २०१२ मध्ये आम्ही जेव्हा बसने ह्या जंगलातून प्रवास करत होतो तेव्हाही हा जंगलाचा पट्टा ओलांडेपर्यंत बसमधे एक विचित्र शांतता भरून राहिल्याचा भास होत होता.वीरप्पनची दहशत इतक्या वर्षांनंतर सुद्धा लोकांच्या मनाचा पाठलाग करत होती की काय कोण जाणे




मसिनागुडी. तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमा विलग करणाऱ्या  मायर नदीच्या काठी मुदुमलाईच्या घनदाट जंगलात वसलेलं बऱ्यापैकी unexplored  म्हणता येईल असं एक छोटसं गाव.आमचं रिसॉर्ट अगदी मायर नदीच्या ओढ्याच्या काठाशी सुबक सुंदर टुमदार आणि अस्सल जंगल स्टे चा आभास देणारं होतं.रिसॉर्टवरच्या छोट्या छोट्या रो हाऊसेसची रचनासुद्धा जंगल स्टे ला साजेशी अशीच होती.रो हाऊसेसची मागची बाजू थेट नदीच्या छोट्या ओढ्याकडेच उघडत होती.तिथेच मागच्या बाजूला बाहेरच शॉवर बाथ वगैरे दिलं होतं.मोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करत जंगलात प्रातःर्विधी किंवा आंघोळ केल्याचा आनंद लोकांनी घेणं अपेक्षित असावं बहुदा रिसॉर्ट व्यवस्थापनाला."रात्री अपरात्री तुम्हाला जाग आलीच तर रो हाऊसच्या मागे चिकटून असलेल्या ह्या ओढयावर रात्री पाण्यासाठी जंगलातली जनावरं,विशेषतः हत्ती वगैरे सर्रास येतात,तेव्हा जर का तुम्हाला पहायचं असेल तर खोलीत मंद दिवा सुरु ठेवून तुम्ही पाहू शकाल ",असं पिल्लू  खोलीत आमचं सामान ठेवता ठेवता रिसॉर्टचा बेल बॉय सोडून गेला.ते ऐकल्यानंतर मुलांचीच नाही तर आमची सुद्धा इतकी पाचावर धारण बसली की रात्री बेरात्री तर सोडाच पण पहाटे पहाटे अगदी चांगलं फाकल्यानंतरसुद्धा खोलीबाहेर असलेल्या त्या प्रसाधनगृहात आंघोळीलाच काय तर लघुशंकेसाठीसुद्धा जाण्याची आमची हिंमत होईना.सकाळी मागच्या बाजूला खोलीबाहेर जाऊन पाहिलं तर आम्हाला हत्तीच्या पावलांचे हलके ठसे पाहायला मिळाले त्यामुळे रात्री बहुदा तरी तिथे हत्तीचा वावर झालेला असावा ह्याची पुष्टी झाली. 

प्रेम,ज्ञान आणि मदत तुम्हाला कोणाकडून,कोणत्या रूपात,केव्हा,कसं आणि कधी मिळेल हे काही सांगता येत नाही.आमच्या आतापर्यंतच्या भटकंतीने ह्याची प्रचिती आम्हाला खूप वेळा दिलीय.मसिनागुडीला आम्हाला ह्याची प्रचिती आली ती त्या रिसॉर्टवरच्या F& B मॅनेजरच्या रूपाने.मसिनागुडीला पोहोचल्यावर दिवसाचा बऱ्यापैकी वेळ मोकळा होता.तो वेळ जवळपासच्या जागा हुडकण्यात सत्कारणी लावण्याच्या उद्देश्याने आम्ही काही कार वगैरे available होतेय का त्याची कॅफेटेरियाच्या वेटरकडे चौकशी करत असताना तिथल्या  F& B मॅनेजरने बहुदा ऐकलं असावं.काय मदत हवीय म्हणून तो विचारायला आल्यावर आम्ही जेव्हा त्याला कार हवी असल्याचं सांगितलं तेव्हा तो लागलीच म्हणाला,"आता अख्खा वेळ मी मोकळाच आहे,रिसॉर्ट वर माणसंही फारशी उतरलेली नाहीत सध्या,तुम्हाला चालणार असेल तर मी माझ्या गाडीने तुम्हाला जंगल फिरवीन तुम्ही फक्त पेट्रोलचा खर्च करा". म्हणजे हे तर असंच झालं कि आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ,कार तर कार वर त्याबरोबर guide पण फ्री.आम्हीसुद्धा लागलीच त्याची कास धरली आणि मग त्याच्याबरोबर तिथल्या आदिवासी पाड्यात फिरून आदिवासी लोकांचं राहणीमान,त्यांची घरं अगदी जवळून पहाणं,त्यांची खाद्यसंस्कृती,प्रथा,सण इत्यादींबद्दल जाणून घेणं,शिवाय त्या जंगलात वावरणारे प्राणी,त्यांची स्वभाव वैशिष्टयं,behavioural patterns,सवयी ह्याबद्दलची त्याच्याकडून माहिती ऐकणं हाआमच्यासाठी एक असामान्य अनुभव ठरला जो आम्हाला कोणत्याही जंगलात किंवा अभयारण्यात बक्कळ पैसे देऊनसुद्धा कदाचित इतक्या उत्स्फूर्तपणे घेता आला नसता.त्याचा आमचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना,त्या मॅनेजरला आमच्यावर खर्चावा लागलेला वेळ,त्याचे श्रम आणि त्याने दिलेल्या त्या सखोल माहितीच्या मोबदल्यात त्याने मागितलेला पेट्रोलचा खर्च अगदीच जुजबी.कोणत्याही विशेष मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कोण,कोणासाठी,कधी आणि का इतकं करतं ह्या प्रश्नाचं मला नाही वाटत काही उत्तर असेल.पण ही अशीच "माणूस" म्हणून आपल्याला प्रगल्भ करणारी,निरपेक्षपणे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारी माणसं,अगदी अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यात गरजेच्या वेळी  आकस्मिक अवतरणं हा सुद्धा दैवी योगच,दुसरं काय .    


माधुरी गोडबोले-माईणकर 

१ जुलै २०२०       

Comments

  1. मस्त वर्णन. नुकतेच जानेवारी 23 व 24ला आम्ही कूर्ग ला होतो. त्यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद झाला.

    ReplyDelete
  2. Nice.. revived memories if our Koorg visit:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता