Skip to main content

पिझ्झा,पास्ता आणि कोरोना...


पिझ्झा,पास्ता आणि कोरोना...

“कोरोना” नामक एक अदृश्य विषाणू काय आला आणि त्याने पाहता पाहता अख्खं जग आपल्या विळख्यात घेतलं, एखाद्या अजगरासारखं.त्यात स्वतःला धनाढ्य आणि बलाढ्य म्हणवणार्‍या भल्या भल्या देशांची, यूरोप मधल्या विशेषतः इटली,जर्मनी, फ्रांस आणि त्याच बरोबरीने अमेरिकेची, ह्या विषाणूची साथ आवरता आवरता अक्षरशः भंबेरी उडालीय. ह्या साथीला आवरण्यासाठी थोड्या फार प्रमाणात प्रभावी ठरण्याचीअपेक्षा असलेलं Hydroxychloroquine मिळवण्यासाठी एरव्ही कृष्णवर्णीय म्हणून भारतीयांना कसपटा समान लेखणार्‍या वर्णभेदाच्या पुरस्कर्त्या यूरोप,अमेरिकेला मदतीसाठी भारताचे पाय धरण्याची वेळ आली. भारताने मानवीय हेतूने तात्काळ ह्या औषधाच्या निर्यातीवरचे निर्बंध काही अंशी शिथिल करून जवळपास पंचवीस देशांना ह्या औषधाचा पुरवठा  केलादेखील पण ह्या औषधासाठी भारताला धमकी वजा विनवणी करणार्‍या अमेरिकेला , धमकी न देता सुद्धा  भारताने ही मदत माणुसकीला जागून अशीही पुरवलीच असती हे मात्र दुर्दैवाने समजलं नाही कारण  सेवाभाव हा खरं तर आपल्या भारतीयांचा अंगीभूत गुण आहे,अगदी रक्तात मिसळलेल्या ऑक्सिजन सारखाच.हे सगळं लिहिण्याचं कारण असं की दोन तीन दिवसांपूर्वी WhatsApp वर एक meme उडत उडत आलं “ इटलीने भारताकडून औषधं घेण्यास नकार दिला म्हणाले की आम्ही मुलीच्या घरचं पाणीही पीत नाहीत “ . हयात तथ्य आहे नाही ह्या खोलात न जाता आणि विनोदाचा भाग सोडला तरी एकूणच इटालियन्सच्या स्वभातल्या उद्धटपणाला ते अनुसरूनच आहे असं म्हणता येईल,म्हणजे हा आमचा स्वानुभव ...

इटली आणि इंडिया ह्यांच्यात बर्‍याच बाबींमध्ये साधर्म्य आढळतं. त्यांच्या आणि आपल्या देशाचं नाव तीन अक्षरी तेही “ इ ” ह्या एकाच अक्षराने सुरू होणारी .त्यांच्या आणि आपल्या राष्ट्रध्वजातले रंगही जवळपास सारखेच फक्त त्यांचे तीन उभे पट्टे आणि आपल्या राष्ट्रध्वजात आडवे. म्हणायला आपलीही अर्थव्यवस्था फार काही सुदृढ नाही तशीच त्यांचीही नाही. आपल्यासारखीच त्यांचीही खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध,त्यांच्याकडच्या पिझ्झा,पास्ता,रिस्सोटोने तर अख्ख्या तरुणाईला अक्षरशः वेडच लावलंय .जसे आपण इंडियन्स जगभर अतिशय उद्दाम आणि उद्धट समजले जातो किंबहुना आहोत देखील तसेच इटालियन्स देखील. परकीय आक्रमणांपूर्वी,कोण्या एके काळी इंडिया आणि इटली ही दोन्ही अतिशय प्रतिष्ठित आणि श्रीमंत  अशी साम्राज्यं,सोन्याचा धूर निघणारी पण पाहता पाहता र्हास होऊन लयाला गेलेली.आपल्याला जसं भ्रष्टाचाराने गांजलयं तसचं इटलीला सुद्धा. तसा हा देश सध्याच्या युरोपातल्या गरीब देशात गणला जाणारा म्हणजे आपल्यासारखाच विकसनशील.त्यामुळे पैसे,पाकीट,पासपोर्ट किंवा कोणताही किंमती  ऐवज जाण्याचं खात्रीलायक ठिकाण म्हणजे इटली.आपल्याकडच्यासारखे भामटे इथेही भेटतात.वर म्हटलं तसं ,वाखाणण्यासारखा  फरक आपल्यातला आणि त्यांच्यातला तो एकच – स्वतःकडे काही फारसं देऊ करता येण्यासारखं नसतानाही  दुसर्‍यांच्या अडीअडचणीला कोणत्याही वेळी जमेल ती,जमेल तितकी आणि जमेल तशी मदत करायला धावून जाण्याची आपल्या भारतीयांची वृत्ती. 
  
आम्ही व्हेनिसला उतरल्या उतरल्या आम्हाला ह्या इटालियन्सच्या तुसडेपणा ,उर्मटपणा आणि त्यांच्यातल्या फसवेपणाची चुणूक मिळाली.व्हेनिसला उतरेपर्यंत अंधार पडायला लागला होता.युरोपमधल्या इतर देशांमध्ये जशी रेल्वे स्टेशन पासून घेऊन ते शहरातल्या इतर जागोजागी  मोक्याच्या ठिकाणी आपल्याला टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर्स आढळतात तशी इटलीत दिसत नाहीत शिवाय भाषेची अडचण येते ती वेगळीच.त्यामुळे कोणत्याही इछित स्थळी पोहचण्यासाठी फार द्राविडी प्राणायाम करावे लागतात. व्हेनिसला स्टेशनवर उतरल्या उतरल्या समोर टिकिट चेकर दिसल्यावर स्टेशन पासून आमच्या  हॉटेलपर्यंतचा रस्ता माहित करून घेण्यासाठी आपल्याला अगदी फारच  विश्वसनीय स्रोत मिळाल्याच्या आनंदात  मी त्याच्याकडे धाव घेतली खरी पण माझा साफ विरस झाला . “तुम्हाला रस्ता माहित नाही त्याला मी काय करणार,तो माझा प्रॉब्लेम नाही,” ह्या त्याच्या उर्मट जबाबाने मी सर्द झाले. इतकं तुटक आणि असं सडेतोड उत्तर ऐकायला मिळण्याचा यूरोप मध्ये तरी हा आमचा पहिलाच अनुभव असल्यामुळे आमच्यासाठी तो कल्चर शॉकच होता .ऐसा भी होता है ! 

हॉटेल रूमवर पोहोचल्यावर, युरोपियन देशातल्या टॉयलेटमध्ये हटकून न आढळणारा  bum washer स्प्रे पाहून आमचा आनंद गगनात माईना. खरंच, माणसाचं सुख म्हटलं तर किती छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं नाही ! व्हेनिसला पोहोचेपर्यंत ग्रेट गॅम्बलर सिनेमातल्या  अमिताभ आणि झीनत अमान वर चित्रित केलेल्या “दो लब्जों की है दिल की कहानी “ गाण्यात दिसणार्‍या व्हेनिसचा कालवा आणि त्यातली गंडोला राइड हयाबद्दल  माझ्या मनात फारच गुलाबी कल्पना होत्या. पण प्रत्यक्षात तो गढूळ कालवा आणि त्याच्या पाण्याचा आजूबाजूच्या परिसरात पसरलेला हलका दुर्गंध ह्यांनी आमची गंडोला राइड ची स्वप्नं एकदम चक्काचूर केली.त्यामुळे गंडोला राइडचा बेत रद्द करून आम्ही पायीच सगळं व्हेनिस पालथं घालायचं ठरवलं. पण आता कोरोनाच्या साथी नंतर  ह्या कालव्याचं पाणी इतकं स्वच्छं झालंय की त्याचा तळही दिसायला लागलाय आणि त्यात डॉल्फिन विहरायला लागलेयेत ह्या आणि अशा पाहायला आणि एकायला मिळणार्‍या सकारात्मक बातम्या हीच काय ती ह्या साथीची मोठी जमेची बाजू .

व्हेनिसचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे सेंट मार्क बॅसिलिका.सेंट मार्क बॅसिलिका पर्यन्त पोहोचण्यासाठी वाट काढत जाताना, नजर खिळवून ठेवणार्‍या “ मुरानो ग्लास ” च्या artefacts च्या असंख्य दुकानांनी सजलेली छोटी छोटी गल्ल्या बोळं आपल्याला आपल्याकडच्या गिरगाव, लालबागच्या छोट्या गल्ल्याबोळांची आठवण करून देतात.त्यातलं एखादं artefact तुम्हाला नाही खरेदी करावंस वाटलं तरच नवल. हो, पण आपल्या भारतात मिळतं तसं “ फ्री “ किंवा आपण ज्याला “ फुकट ” असं म्हणतो , असं इटलीत काहीही मिळतं नाही. आपल्याकडे आपण हॉटेलात गेलो की काही गोष्टी गृहीतच धरतो...जसं की टेबलवर आधीपासून मांडलेल्या चटण्या,सॉसेस,केचअप,मुखवास इत्यादि फ्री ऑफ कॉस्ट.कोणाला भेट द्यायला म्हणून वस्तू  विकत घ्यायला दुकानात गेलो की अगदी हक्काने दुकानदाराला ती फुकटात छान गिफ्ट wrap करून द्यायला सांगतो  किंवा आपल्यासाठी जरी घेतली तरी वस्तु बरोबर “जरा थैली देना |” असं त्या दुकानदाराला किती अधिकारवणीने सांगतो आपण कारण आपल्यासाठी ते अध्याहृतच आहे. पण इटलीत मात्र तसं नाही.इटलीतली लोकं टाचणी सुद्धा फुकट देणार नाहीत. हॉटेल मध्ये टेबलवर प्लेट्स,काटे,चमचे इत्यादी मांडण्याचा सर्विस चार्ज, तुम्हाला वेटरने प्यायला पाणी आणून दिलं सर्विस चार्ज. कोणत्याही बारीकसारीक गोष्टीला सर्विस चार्ज किंवा चार्ज ,मग अगदी पिझ्झाबरोबर मागितलेल्या टोमॅटो केचअप पासून ते टिश्यू पेपरपर्यन्त. आपल्याकडे हॉटेल मध्ये जर बिल मध्ये आपल्याला सर्विस चार्ज लावलेला दिसला तर वेटरला वेगळी टीप ठेवताना सर्विस चार्ज तर लावलाय खरं, मग वेगळी टीप द्यायची का ह्या विचारात आपण टीप द्यायला काssकू करतो.पण तिथे सर्विस चार्ज व्यतिरिक्त तीही ठेवावी लागते. “सर्विस चार्ज ” ह्या संज्ञेचा खरा अर्थबोध आम्हाला इटलीत झाला.

पण इटलीला आपल्यासारखीच समृद्ध अशी रोमन साम्राज्याची ऐतिहासिक संस्कृती आहे आणि ज्याच्या  खुणा पावलोपावली आपल्याला फक्त रोमच नाही तर तिथल्या प्रत्येक शहरात फिरताना आढळतात. फ्लोरेंस,नेपल्स,मिलान,रोम,व्हेनिस ..... प्रत्येक शहराचं आपलंच असं वेगळेपण.फ्लोरेंस जवळ आहे जगातल्या सात आश्चर्यापैकी एक “Leaning Tower Of Pisa”, नेपल्स जवळचं ब्ल्यु ग्रोट्टो ,व्हेनिस कालवा आणि  गंडोला तर  मिलानची ओळख  इटलीचं फॅशन कॅपिटल म्हणून आहे  पण सगळ्या शहरांमध्ये रोम त्याची शान आजही  टिकवून आहे. म्हणतात नं “ Rome was not built in a day! ते काही उगाच नाही. रोमचं Colosseum,Pantheon आणि Vatican City सगळ्याच वास्तू  कशा एकदम अफाट प्रशस्त आणि भव्य रोमन साम्राज्याचं वैभव आजही आपल्या अंगावर वागवणार्‍या. रस्तेही त्या वास्तूंना साजेसे - एकदम स्वच्छ आणि प्रशस्त.पण माणसं मात्र ह्या सगळ्या देखाव्यामध्ये अजिबात न बसणारी ...उद्धट,फसवी,लोभी आणि तुसडी. “ सौजन्य ” हा शब्द त्यांच्या  शब्दकोषात नाहीच जसा.  
  
Amphi थिएटर ही वास्तू रचनेची संकल्पना रोमन्सनी तब्बल २००० वर्षांपूर्वी साकारली. एका वेळी जवळपास ५०,००० च्या वर लोकं बसून वेगवेगळ्या स्पर्धा,प्राण्यांच्या झुंजी,योद्ध्यांच्या लढतींचा आनंद घेऊ शकतील इतकं भव्य. सहाव्या शतकापासून घेऊन ते दुसर्‍या जागतिक महायुद्ध्यापर्यंत परकीय अतिक्रमणं ,लूट,बॉम्बफेक असे एक नं अनेक आघात सोसत आज भग्नावस्थेत उभं असलेलं हे Colosseum न जाणो किती देहदंडाच्या शिक्षांच्या अंमलबजावणींची ही साक्ष आहे. जुलै २००७ मध्ये ह्या Colosseum ला जागतिक आश्चर्याचा दर्जा प्रदान करण्यात आला.आज जरी फक्त थोड्या बहुत खाणाखुणा शिल्लक असल्या तरी  रोम मध्ये फिरताना त्या काळच्या रोमन साम्राज्याच्या वैभवाची आणि ऐश्वर्याची आपल्याला पुरेशी कल्पना येते.पण दरवर्षी अंदाजे ६० लाखाच्या आसपास पर्यटक आकर्षित करणार्‍या ह्याच कधी काळच्या वैभवशाली रोमचे आज कोरोनाच्या दहशतीने ओस पडलेले रस्ते बातम्यांमध्ये पाहताना विषण्ण वाटतं.कोरोनाच्या ह्या महाभयंकर अशा साथीने इटलीला पुरतं  हतबल केलंय .चमत्कारिक वाटलं होतं नं शीर्षक पण खरंच आता आतापर्यंत लहान थोरांच्या रसनांवर अधिराज्य गाजवणारे “ पिझ्झा,पास्ता “म्हणजेच “ इटली ” अशी जगाच्या नकाशावर अभिमानाने ओळख मिरवणार्‍या इटलीची दुर्दैवाने आता नवी ओळख तयार झालीय ...
इटली ” म्हणजे “ पिझ्झा , पास्ता आणि कोरोना...!   
                                                                                                
माधुरी गोडबोले - माईणकर

२५ एप्रिल २०२०



Comments

  1. बरोब्बर वर्णन इटली च, मस्त!

    ReplyDelete
  2. चांगले वर्णन. भारतीय माणसांबाबत आता सर्व जगाचे मत बदलले आहे तसेच आपली अर्थ व्यवस्था इटलीच्या तुलनेत खुपच मजबूत आहे असे सुचवावेसे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Bhalchandra dada for the honest review of my blog.

      Delete
  3. Very well written about places but I beg to differ about your impression about people. I have stayed in Italian homes and I can never forget the warm welcome and the extraordinary hospitality of Italian people..

    ReplyDelete
    Replies
    1. On personal level, yes as you have experienced they may be a great host,I am not denying that. What I have narrated is our personal experience.You seem to be lucky,though.Thanks a lot for your review about the blog. Your reviews always encourage me to write better n better every time.

      Delete
  4. I had somehow missed this one. Very well written as usual:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता