राधे राधे ...
आज फेसबूकने “ your memories nine years ago”असं म्हणून आठ नऊ वर्षांपूर्वीचा फोटो टाकला आणि मन साहजिकच नऊ वर्ष मागे भूतकाळात जाऊन पोहोचलं....आमच्या दिल्ली-आगरा ट्रीपमध्ये ! सहा एक वर्षांचा असेल त्यावेळी माझा धाकटा लेक.एकामागून एक झपाट्याने तो Tintin,Archie,Tinkle,Sherlock Holmes, Agatha Christie बरोबरच आपल्या रामायण,महाभारतातल्या पौराणिक कथा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास फार रस घेऊन आणि गोडीने अमर चित्रकथांच्या माध्यमातून वाचत होता. त्याचवेळी टीव्हीवरसुद्धा नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांवरची एक मालिका प्रक्षेपित होत असे ज्यात शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका दाखवली होती.रोज रात्री झोपताना मुलांचा गोष्टी ऐकण्याचा रतीब असे.त्याचा बाबा इतिहासातलं रोज एक नवीन पान त्याच्यासमोर गोष्टीरूपाने उलगडत असे.त्यामुळे इतिहास त्याच्यासाठी एक कंटाळवाणा विषय न राहता अतिशय रंजक झाला होता आणि इतिहासबाबतचं त्याचं कुतूहल एकंदरीतच अगदी शिगेला पोहचलं होतं.त्याच्या डोक्यात घोळणार्या असंख्य प्रश्नांना आम्ही आमच्या परीने कितीही समाधानकारक उत्तरं दिली तरी त्याचं कुतूहल काही शमत नसे. अशा वेळी उपाय एकच होता, त्याने जे काही वाचलयं किंवा वाचतो आहे ते सत्यात घडून गेलंय किंवा वास्तवात अजूनही उभं आहे हे त्याला पटवून देण्यासाठी त्या वास्तू किंवा जागा त्याला होता होईतो जमेल तसं प्रत्यक्षात नेऊन दाखवणं.त्याची मुंजही होऊ घातलीच होती त्यासाठी लागणार्या पगड्या,मोजड्या,जरदारी सलवार कुडते वाजवी दरात आणि अमाप व्हरायटी मिळण्याचं रास्त ठिकाण तर दिल्लीसारखं दुसरं नव्हतंच.मग काय एका दगडात दोन पक्षी.लेकाच्या मुंजीच्या खरेदीचं औचित्य साधून मुलं जे काही गोष्टी रूपाने इतिहास वाचत होती ती ठिकाणं त्यांना प्रत्यक्ष दाखवून त्यांचा वाचनातला रस टिकवून ठेवण्यासाठी म्हणून तेव्हा आम्ही निवडला दिल्ली,आगरा,मथुरा,वृंदावन-असा चौकोन.
दिल्लीतले प्रशस्त रस्ते आणि एकूणच दिल्लीचा डामडौल आणि पसारा पाहून दिल्ली नॅशनल कॅपिटल रीजन(NCR) म्हणून इतकं ऐटीत का मिरवतं ते दिल्लीत शिरल्या शिरल्या पटतं .शब्दांत सांगणं तसं कठीणच आहे कारण माला वाटतं दिल्ली हा एक अनुभव आहे.दिल्लीतल्या लोकांकडे पाहिलं की जाणवतं की तिथे लोकं मुंबई सारखी नुसती survive नाही करत तर they live life to the fullest.मुंबईत दिवस रात्र खपून आपली हाडाची काडं होतात पण तिथे लोकं आयुष्य भरभरून जगतात. तिथलं सरोजिनी मार्केट घ्या,लाजपतनगर मार्केट घ्या नाहीतर आयएनए मार्केट घ्या आठवड्याच्या कोणत्याही दिवशी आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहरी सहकुटुंब खरेदी आणि खवय्येगिरीला आलेले बापे मंडळी पाहिली की प्रश्न पडावा की ही मंडळी आता ह्या दिवशी ह्या वेळी कुटुंबाबरोबर इथे आहेत मग काम करतात तरी कधी.त्यांचं राहणीमानही मुंबईच्या तुलनेने शाही वाटतं.त्यात बड्या घरचे पोकळ वासे असतात की ती तितकीच राजसी असतात ते देवच जाणे.असो. पण तसं HOP ON HOP OFF बसची सोय असल्यामुळे दिल्लीत फिरणं कठीण जात नाही. नाही तर मेट्रोची सोय तर आहेच आहे. फक्त ऐन ऑफिसेस च्या वेळी दिल्लीच्या मेट्रोस मध्ये प्रवास करणं हे आपल्याकडच्या लोकल ट्रेन्स मध्ये प्रवास करण्यापेक्षा वेगळं नाही. दिल्ली आणि माफक दरात शॉपिंग असं समीकरणच आहे जणू. आपल्या मुंबईच्या तुलनेत दिल्लीत सत्तर टक्के पैशांत आपण उत्तम शॉपिंग करू शकतो अगदी राजधानीचं शहर असून सुद्धा. जुन्या दिल्लीतला चाँदनी चौक म्हणजे खवय्येगिरीला उधाण.रबडी,दहिभल्ला आणि चाट items ची नुसती रेलचेल.फक्त दिल्लीत कोणत्याही शहाण्याने पावभाजी मागविण्याची चूक मात्र करू नये. ती मुंबईची मक्तेदारी आहे आणि ती कायम राहील.बाकी दिल्लीत फिरताना तुमचा मूड बनतो मात्र..आम्ही दिल्लीत जिथे राहिलो होतो तो होम स्टे होता.घरमालकाचा आग्रा,दिल्लीत मिळून उद्योगाचा बराच पसारा होता.त्याला जेव्हा आम्ही सहजच विचारलं की इतकी लोकं मुंबईत उद्योग धंद्याचा पाय रोवण्यासाठी तडफडत असतात मग तुम्हाला नाही का वाटलं कधी की मुंबईत जम बसवावा,तेव्हा तो इतका तुच्छ स्वरात म्हणाला,”है क्या आपकी मुंबई में जुहू बीच के इलावा, हमारे दिल्ली की बात मुंबई में कहा ... “ मुंबईबद्दल पहिल्यांदाच इतक्या तुच्छतेने कोणाला तरी बोलताना ऐकून मला तेव्हा पु .लं.च्या “तुम्हाला कोण व्हायचे आहे-मुंबईकर,पुणेकर की नागपूरकर ? ” त्याची आठवण झाली.त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुणेकरांइतकाच दिल्लीकरांमध्ये दिल्लीबद्दलचा so called जाज्वल्य अभिमान ओसंडून वाहताना त्यावेळी त्या मालकात आम्ही पाहिला होता.तसं दिल्लीच्या जीवनशैलीमध्ये दिखाऊपणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आम्ही ऐकून होतो पण ह्या मालकात त्याच्या संपत्तीमुळे आलेल्या अहंभावाबरोबर त्याचा दिल्लीबद्दलचा अभिमानही ओतप्रोत भरलेला होता.
आग्र्याला एकूणच इतिहासात असलेलं महत्त्व आपण जाणतोच.इब्राहीम लोधीने ह्या शहराचं महत्त्व ओळखून दिल्ली आधी आग्र्यालाच आपली राजधानी बनवणं इष्ट समजलं.आग्र्याचा किल्ला हा तर मोघलिया राजकारणाचा केंद्रबिंदू.आग्रा हे मुघलांच्या आणि त्यामुळे पर्यायाने भारतातल्या इतिहासातलं एक महत्वाचं पान त्यामुळे दिल्लीपर्यंत जाऊन आग्र्याला न जाणं हे तर कल्पनातीतच वाटतं. त्यातून आयुष्यात एकदा का होईना जगातल्या सात आश्चर्या पैकी एक ताज महालला पाय लावावे आणि तो “ याचि देही याचि डोळा ” पहावा हे तर आपल्या प्रत्येक भारतीयाचं ईप्सित.मग आम्ही तरी मागे कसे ? यमुनेच्या विस्तीर्ण पात्राच्या काठी आजही दिमाखात उभा आहे देशोदेशीच्या पर्यटकांचं आकर्षण, भारताची ओळख आणि नवरा बायकोच्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक - शहाजहानने आपली चौथी आणि सर्वात लाडकी पत्नी मुमताज बेगमसाठी बांधलेला “ ताज महाल ” .बगदाद ,तुर्कीस्तान,चीन,इराण,उझ्बेकिस्तान,बलुचिस्तान,इटली अशा देशोदेशीच्या २०,००० मजुरांच्या २२ वर्षांच्या अहर्निश मेहनतीतून आकारास आलेली एक अप्रतिम कलाकृती . जगात एका दिवसात सगळ्यात जास्त पर्यटक भेटीला येण्याचा बहुमान आज ताजमहालला आहे.भारतासकट संपूर्ण जगभरातून जवळपास ४० लाख पर्यटक दरवर्षी ताजमहालला भेट देतात ज्यात जवळपास निम्म्याहून अधिक प्रमाण हे परदेशी पर्यटकांचं आहे. असं म्हणतात की ताजमहाल आपला रंग बदलतो- सकाळच्या कोवळ्या किरणांत हा गुलाबी,संधीकाली स्वच्छ शुभ्र पांढरा आणि रात्री चंद्राच्या मंद प्रकाशात हा सोनेरी दिसतो.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा ताज महालच्या भेटीवर आले होते तेव्हाचे त्यांचे ताजमहाल पाहिल्यानंतरचे उद्गार मनात कोरून ठेवण्यासारखे आहेत.ते म्हणाले “आज मला जाणवतंय की जगात फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत-एक ते ज्यांनी ताज महल पाहिला आहे आणि दुसरे ते ज्यांनी ताज महल पाहिलेला नाही.”त्यांचे हे उद्गार भारताच्या शिरपेचात कलगी तुरा आहेत . जगात अनेक स्मारकं पाहिली पण ताज महालसारखा एकच...कारण ह्या ताजमहालाच्या पायाशी एका राजाने आपल्या लाडक्या राणीसाठी आपलं काळीज जे काढून ठेवलेलं आहे....
“राधे राधे” असा सायकल रिक्षाचा हॉर्न ऐकलाय का कधी ? नाही ? मग जाच वृंदावनला.भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणून मथुरा तर आपल्याला सगळ्यांनाच माहितेयं.मथुरेत भलेही श्रीकृष्णाचा जन्म झाला पण वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्णांचं बालपण गेलं.वृंदावनाजवळ नंद गावात तो आपल्या आई वडिलांसमवेत राहत असे. श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलांची भूमी-वृंदावन.तसं तर वृंदावनला मंदिरांची भूमी म्हणून ओळखलं जातं पण इथलं बाके बिहारी मंदिर सगळ्यात जागृत देऊळ समजलं जातं.इथे देवळाच्या नियमांचं पालन न करणार्यांना कोणत्या ना कोणत्या परिणामांना सामोरं जावच लागत अशी समजूत आहे. असं म्हणतात की, पौर्णिमेच्या रात्री ह्या मंदिराच्या झरोक्यातून आलेल्या चंद्र किरणांमध्ये न्हाहून निघालेल्या श्रीकृष्णाचं सौन्दर्य अलौकिक दिसतं. “ जो वृंदावन में हसेगा वह हरदम हसेगा | “ अशी इथल्या लोकांची खूप गाढ श्रद्धा आहे. त्यामुळे इथे दर थोड्या थोड्या वेळाने एखाद्या Laughter Club चा मेंबर असल्यासारखं टाळ्या वाजवून मोठमोठ्याने हसावं लागतं. इथल्या निधीवनात आजही रोज रात्री न चुकता राधाकृष्ण येतात,रास खेळतात आणि इथल्या रंगमहालात झोपतात असं मानलं जातं . त्यामुळे इथे निधीवनात सूर्यास्तानंतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. असं म्हणतात की राधा कृष्णाच्या येऊन जाण्यानंतर इथल्या रंगमहालातल्या सजवून ठेवलेल्या शय्येवर सुरकुत्या दिसतात,रंग महालतलं सामान विखुरलेलं दिसतं.जे दुसर्या दिवशी सकाळी भक्तांना दाखवलं जातं. इथली झाडं सूर्यकिरणाच्या दिशेने न वाढता जमिनीच्या दिशेने वाढलेली आहेत आणि पाण्याशिवाय वर्षानुवर्षं जीवंत आहेत ह्याचं गूढ इथे रोज रात्री रचल्या जाणार्या राधाकृष्णेच्या रासलीलेत आहे. आणि हो इथली लोकं आणि इथला परिसर इतका कृष्णमय झालेला आहे की इथे सायकल रीक्षांना हॉर्नची गरज नाही,कोणी सायकल रीक्षा समोर आल्यानंतर हॉर्न वाजविण्याच्या ऐवजी त्यांच्या मुखातून निघणारा “राधे राधे” हा कृष्ण नामाचा गजर हाच त्यांच्या रीक्षाचा हॉर्न आहे.वर्षानुवर्षं अशाच कृष्णभक्तीत एकरूप झालेल्या नानाविध देशांमधील भक्तांना वृंदावन आकृष्ट करतच आहे.त्यामुळे मथुरेपेक्षाशी वृंदावनात परदेशी पर्यटकांचा ओघ वाढता आहे. जितकी लोकप्रियता जगात ताजमहालची आहे तितकीच श्रीकृष्णाची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो आज इतक्या हजार वर्षांनंतर सुद्धा सगळ्यांच्या मनांवर गारुड घालतोय एवढं नक्की.
” जय श्री कृष्ण !! ”
माधुरी गोडबोले – माईणकर
८ फेब्रुवारी २०२०
Well written, Madhuri!👍
ReplyDeleteGood one Madhuri. This write-up reminded me of our days together in Dubai. We too love this place. Never ever did we feel out of place in this country. Every expat, religion is respected here. Salute to Dubai and UAE.
ReplyDelete