सह्याद्रीच्या कुशीतला हिरा "अगं कुठेतरी जाऊ या ह्या वीकेंडला,काही सुचतंय का ?"नवरोजी विचारते झाले.एरव्ही लोळून एखादा सिनेमा नाहीतर वेब सिरीज पहात किंवा एखाद्या लठ्ठ पुस्तकाच्या पानांचा वाचून चोथा करत आठवड्याच्या सुट्टीचं सार्थक करणाऱ्या अहोंकडून सहसा असा प्रस्ताव जरा अनपेक्षितच असतो त्यामुळे आधी तर माझा जबडाच पडला.मग मी एकदा स्वतःला जरा चिमटा काढून,मी आता जे ऐकलं ते नक्की खरं आहे का? ह्याची खातरजमा करून घेतली.तिथवर "मग बघ काही सुचतंय का ते" म्हणत अहोंनी अतिशय सफाईदारपणे ती जबाबदारी माझ्या गळ्यात टाकून तिथून पोबारा केला.पण कोरोना पुरता निपटल्यापासून मागच्या दोन वर्षांचं उट्टं काढत असलेले आमच्यासारखे भटके बरेच आहेत त्यामुळे असं अगदी आयत्या वेळी कुठे काही बुकिंग मिळण्याची शक्यता जवळपास शून्यच असते.मुंबईतून कुठेही पोहोचायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा नुसता विचार केला तरी आमच्या अंगावर काटा येतो.त्यात मुंबईपासून पोहोचायला कमी जिकिरीचं आणि तरी पैसावसूल पर्याय असं काहीतरी हुडकून काढायचं म्हणजे एक दिव्यच.अगदी अलीकडच्या काळात एकामागून एक अशी दोन्ही पिल्लं घरट्यातून उडाल्यापासून